माझ्या संपादकीय कारकिर्दीतील काही फुले काही काटे

कोणताही व्यवसाय निष्कंटक नसतो. राजाला नोकर-चाकर, प्रासाद-रंगशाळा, अलंकार-जामदारखाना सारे काही असते. असे असूनही त्याला सुखाची झोप येतेच असे नाही. जास्त जबाबदाऱ्या, जास्त लोकप्रियता किंवा अधिक उपद्रवशक्ती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य फुले-आणि काटे या दोन्हींनीही भरलेलं असतं. नुसते फुलांचे हार किंवा नुसताच काट्याचा रस्ता जगात अस्तित्वात नसतो, सुखदु:खांचे प्रमाण कमी-जास्त असेल, यश-अपयश यांच्या फूटपट्ट्याही बदलत असतील, पण या जगातील सर्वच प्रवासात फुलांचा गंध येतो-त्याच वेळेस काट्यांनी रक्तबंबाळही व्हावे लागते. मिळालेले सन्मान ही दु:खावरची फुंकर असते, आणि सोसावे लागते ते ते सारे अहंकाराच्या उपशमनार्थ असते.

आपल्या देशातील प्रत्येक संपादक टिळक-आगरकर यांचाच वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हा तरी फुलणारी फुले. शिवाय ते संपादक नव्हतेच. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारापैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरले एवढेच. शिवाय पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचे नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्यालाही उडता येते म्हणून चिलटाने गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे? लोकमान्यतेचे हार त्यांच्या गळ्यात पडले, पण त्यासाठी मंडालेतील एकांत कोठडीत स्वत:चे रक्तही त्यांना जाळून प्यावे लागले. गळ्यात पडलेल्या प्रत्येक हारासाठी रक्ताच्या थेंबाथेंबाने किंमत चुकवताना मागे उरल्या त्या त्याच्या उग्र, दाहक डोळ्यांच्या आठवणी. आणि त्याच उग्र डोळ्यांच्या दाहकतेला हायलंडर फलटणीही शरण आल्या होत्या.

आज अनेक संपादक आहेत. त्यापैकी बहुतेकजण शब्दांचे सौदागर आहेत. कुणाचे तरी शब्द स्वस्तात विकत आणावेत आणि कुणाच्यातरी ते गळ्यात मारावेत असा हा साधा व्यापार आहे. पुष्कळ संपादकांना शब्द प्रसन्नच नाहीत. पुष्कळजण लिहीतच नाहीत आणि त्यांनी लिहिले तरी फारसे कोणी वाचीतही नाहीत. कोळशाची किंवा बर्फाची वखार काढावी तशा पुष्कळांनी शब्दांच्या वखारी काढल्या. म्हणून त्या शब्दांना रेखीव असा काही अर्थच नसतो. प्रस्थापित राज्यकर्ते, समाजरचना किंवा विषमता याविरुद्ध संपादकाच्या मनात खरोखरीच राग निर्माण झाला असेल तरच तो त्याच्या शब्दातून वा वृत्तपत्रातून व्यक्त होणार ना! कुणावर तरी राग करण्यासाठी कुणावर तरी मनभरून प्रेमही करावे लागते. आणि प्रेम करणे काय इतके सोपे आहे? ज्याला हिशेब नाही असे प्रेम करता येण्याचं भाग्य फार थोड्यांनाच लाभते. आपल्या देशावर, धर्मावर, भाषेवर, आप्तस्वकीयांवर असं मनभरून प्रेम केलं की कधी कधी शब्द गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गंध-मखमाली होतात. आणि प्रसंगी तेच शब्द ठिणग्याही होतात. खऱ्या प्रेमात द्वेष, राग हे आपोआपच सामावलेले असतात. काहीच जमत नाही म्हणून वृत्तपत्र व्यवसायात येणाऱ्या माणसाचे राग-लोभही कोमट असतात. म्हणून त्याचे शब्दही गिळगिळीत होतात. एखादा संपादक लोकप्रिय होतो याचा अर्थ तो प्रेम करीत असलेला विषय लोकांना पसंत आहे, असा नसतो. संपादकाची कितीतरी मते अमान्य असूनही वाचक त्याच्यावर खूष असतात. कारण त्याच्या शब्दातून अस्सल असंतोषाचा बाणेदारपणा जाणवत असतो. एकदा आपल्या शब्दांच्या तावडीत वाचक सापडला की त्याला कोणत्याही लांबच्या प्रवासाला नेण्याची त्या शब्दात ताकद असते. प्रामाणिकपणाचा स्पर्शसुद्धा माणसाला मोहात टाकतो. कारण दिवसेंदिवस प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे. सगळ्याच अस्सल गोष्टी हळूहळू दिसेनाशा झाल्या आहेत. अन्नात, वस्त्रात, औषधात, सगळ्यातच भेसळ असते. तशीच माणसांच्या विचारातही आता भेसळ होऊ लागली आहे. दिखाऊ परखडपणाच्या आड शरणागत भेकडपणा खाली मान घालून बसलेला असतो. अशाही परिस्थितीत कुठेकुठे एकाकी लढणारे, जखमांनी विव्हळ झालेले-परंतु युद्धाची नशा चढलेले लहानमोठे संपादक दिसतात. विचार त्यांचाच करायचा.

आता ही गोष्ट खरी की वरील आदर्शात मी कुठे बसत नाही. मोठे व्हायचेच नाही असं एकदा स्वीकारलं की आपोआपच आपल्या शत्रूंची संख्याही मर्यादित होते. एका माणसावर एका वेळेस तीनचार माणसंच हल्ला करू शकतात आणि बाकीची हल्ला करणार्यांच्यावरच हल्ला करीत असतात, तसंच हे आहे. लहान पत्रकाराची लढाई सोपी असते. त्याला संपूर्ण नष्ट करून टाकणे सहसा शक्य होत नाही. त्याचे व्यवसायाचे साधन म्हणजे त्यांची लेखणी. बाकीच्या लहान-मोठ्या गोष्टींचा नाश करता आला तर त्याच्या लेखणीचा नाश करता येतो. महापुरात लव्हाळी वाचावीत आणि वटवृक्ष उन्मळून पडावेत तसेच छोट्या वृत्तपत्रकाराचे होते. तो आपल्या अंगाबरोबर जगत राहू शकतो! गुरगुरू शकतो, संधी पाहून आव्हाने देऊ शकतो आणि पुन:पुन्हा सर्वनाशाला तयार होतो.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

  1. पत्रकार आणि संपादक निःपक्ष असावा, असं सध्या समाज माध्यमांवर सतत ओरडून सांगणाऱ्यांनी हा लेख अवश्य वाचावा. ‘सोबत’ आणि ‘माणूस’ या साप्ताहिकांची एके काळी वाट पाहिली जायची. आपल्या मरणानंतर ‘सोबत’ चालू राहावे, अशी काही आपली इच्छा नाही, असेही बेहेरे यांनी एकदा कोठे तरी लिहिले होते. ‘ते मतपत्र आहे आणि माझ्या मरणानंतर ते चालू राहण्यात काही अर्थ नाही,’ असा त्यांच्या म्हणण्याचा आशय होता. न लिहिणाऱ्या संपादकांबद्दल त्यांनी 38 वर्षांपूर्वी लिहिलं. अशा संपादकांची आज चलती आहे.
    >कित्येकदा आपल्या मनात काही व्हावे अशी इच्छा असते, आणि ती आपली मन:कामना पूर्ण होण्यासाठी वास्तवाचे तर्कशास्त्र आपण बिघडवून टाकतो.लहानसे का असेना विरोधी तोंड बंद करून टाकावे ही प्रवृत्ती हुकुमशाही प्रवृत्तीची असते.ज्याच्या व्देषाचा फणा क्षणार्धात उभा रहात नाही असा संपादक सरकारविरोधी लेखन कधीच करू शकणार नाही.< निखळ सत्य!

  2. he was publishing saptahik SOBAT. Publish few from those.

  3. सोबत लहानपणी येत असे घरी, शाळेत होते तरी वाचत होते तो. त्यामुळे हे वाचायला मजा आली.

  4. कसला प्रमाणिक व छान लेख आहे… आवडला

  5. super

  6. eka sampadakache swatawarache bhashya kadhich wachanat aale navate. lok tyanchyakadun nehami samajik bhashyach apekshitat. khoop chhan watale wachun. eka sachchya vruttapatrachi duari baju samor aali.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: