Zugunruhe... एक घरवापसी


किंग सामन मासा युकोन नदीवर झुकलेल्या ढगात जन्मतो, अगदी, अगदी उगमापाशी. तिथे त्याची आई खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या कडेला घरट्यासारखे खळगे करते. यात पाणी पाळण्यासारखे सावकाश हलते. छोटे सामन या pebbles च्या घरट्यातून पहिल्यांदा नदी बघतात. आणि मग कुठल्या दूर समुद्राची हाक त्यांना ऐकू येते की ढगातले आपले घर सोडून सगळे खळखळ-नदीतून मोठ्या नदीत, मोठ्या नदीतून विस्तीर्ण खाडीत आणि खाडीतून पार, पार खाऱ्या समुद्रात जातात. कुठे जातात, तिथे काय खातात, गोड्या पाण्यातले जीव इतक्या खाऱ्या पाण्यात कसे जगतात हे आपल्याला काही माहित नाही. पण खरी किमया होते ती नंतर. जेव्हा या खलाशी सामन माशांना अंडी घालायची असतात तेव्हा मात्र समुद्रातल्या लाखो, करोडो लिटर खाऱ्या पाण्यातून ते आपल्या जन्म नदीचा एक थेंब ओळखतात आणि एक अशक्य प्रवास सुरु करतात. किंग सामान मासा ३,२०० किमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहून समुद्रातून आपल्या नदीत परत येतो. परत त्याच ठिकाणी जिथे त्याचा जन्म झाला. गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात आणि परत गोड्या पाण्यात. डोंगरात पोहोचेपर्यंत माशाच्या खवल्यावरची चंदेरी चमक विरते, खाणे पूर्ण बंद होते, शेपटीचा झोक केविलवाणा होतो, नजरेतील आग विझू लागते.

पण आपल्या घरी पोहचेपर्यंत मासा इथे तिथे बघत नाही आणि तिथे अंडी देऊन, त्यांना त्यांच्या सावकाश झुलणाऱ्या पाण्याच्या घरट्यात ठेवल्यावर तो आकाशाकडे डोळे करून पाण्यावर शांतपणे तरंगतो. पाण्यात बुडतो. यांचे सगळेच विलक्षण. पण सगळ्यात विलक्षण म्हणजे यांना घरचा रस्ता कसा सापडतो? आम्ही एक-दोन वळणं चुकलो की नव्या गावाला जातो, हे मासे परत घरी कसे येतात? आर्क्टिक टर्न पक्षी हजारो किमी उडायला कोणता नकाशा वापरतात? सई मांजर एकदा नव्या घरातून पळून गेली होती. एक महिन्याने ती घरी कशी आली? कोण रस्ता दाखवतं यांना? कुठला नकाशा? काय खुणा असतात यांच्या घरच्या? पण रस्ता मात्र बिनचूक. मग तिथे काहीही होऊ द्या. सामन माशांच्या मार्गात धरण आले तर ते धरणाच्या भिंतीवर डोकी आपटत राहतात, त्यांना पाण्याच्या टाकीत ठेवले तर migration season मध्ये आपल्या नदी उगमाच्या दिशेला डोके करून टाकीत पोहत राहतात. असेच पक्ष्यांचे. पिंजऱ्यात देखील आपल्या मार्गच्या दिशेला उडण्याचा प्रयत्न करत राहतात. याला म्हणतात Zugunruhe. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी पोहचण्याची जीवघेणी धडपड. पक्ष्यांमध्ये याचा खूप अभ्यास झाला आहे. माशात देखील दिसते. काही माणसात पण. हे सगळं परवा आठवलं कारण त्रिंबकेश्वरला गेलो होतो आणि तिथे "पवित्र" गोदावरी slab खाली बिनबोभाट वाहत होती. हु नाही आणि चु नाही. वर भाजी बाजार. रस्ता. नदीवर बसलेले लोक मेथी विकत होते, भक्तगण ओलेत्या अंगांनी, ओशट पुण्यप्राप्तीचे expression घेऊन इथे तिथे फिरत होते. गायी शांत रवंथ करत होत्या. संगमेश्वराचे छोटे मंदिर रस्त्यात उभे होते. ज्या नीलगंगा आणि गोदावरीचा संगम तिथे कधी काळी होत होता, ती जागा आता 6 feet under गेली होती. जे गाव आपली उपजीविका एका नदीच्या उगमामुळे मिळवते त्याने त्या नदीला गाडून टाकलं होतं आणि वरवर सगळं अलबेल होतं. आणि दुसऱ्याच दिवशी संततधार पाउस झाला. नद्यांनी आपला ओळखीचा रस्ता घेतला, जणू मधली वर्षे कधी घडलीच नाहीत, जणू कॉन्क्रीट नदीत पडलंच नाही, बाजार वर बसलाच नाही, तेलकट पंडितांनी सोयीचे मंत्र म्हटलेच नाहीत. संगमेश्वरच्या मंदिराजवळ संगम व्हायचा तो झाला.

सगळ्या पुसलेल्या रेषा परत निळ्या झाल्या. DP Map वरचे रस्ते, बिल्डींग, पार्किंग क्षणात नाहीसे झाले. नदीला तिचा रस्ता माहित होता. ती आपल्या जव्हार डावीकडे आणि नाशिक सरळ या बोर्डांकडे बघत नव्हती. हे पुण्यात झाले, मुंबईत झाले, दिल्लीत झाले. पथ वापरात आले. आणि हे तर नवे रस्ते. नदीचे Paleo Channels, म्हणजे तिने सोडलेले, बदललेले शेकडो, हजारो वर्षांपूर्वीचे रस्ते देखील पुरात फुलून येतात. बिनचूकपणे नदी समुद्राकडे जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग धरते आणि रस्ता कापत जाते. मध्ये आपण उभे असतो, ती नाही. बिहारमध्ये, पंजाबमध्ये, बंगालमध्ये Paleo Channels वर अजूनही अभ्यास होत आहे. पूर आले की हे रस्ते परत गजबजून उठतात, उठणार आहेत. आपण पथिक. हे सगळे मात्र पृथ्वीची परिक्रमा आपल्या फार आधीपासून करत आहेत. आपण बुजवलेले, बदललेले, कापलेले रस्ते, यांचे जुने मित्र आहेत. छोटी सी ये दुनिया, पहचाने रास्ते है, तुम कहीं तो मिलोगे, तो पूछेंगे हाल 

**********

लेखिका- परिणीता दांडेकर 


ललित , सोशल मिडीया , पर्यावरण

प्रतिक्रिया

  1. Jayashree Gokhale

      3 वर्षांपूर्वी

    आपल्याला विचार प्रवृत्त करणारा लेख.बिघडलेला का सुधारलेला माणूस ढम काही करणार नाही.

  2. Viraj Londhe

      3 वर्षांपूर्वी

    लेख खुसखुशीत आणि विचार करायला लावणारा आहे

  3. Prakash Hirlekar

      5 वर्षांपूर्वी

    छान. मुळाची ओढ जेनेटिकली टिकून राहणे हे मनुष्या व्यतिरिक्त इतर काही प्राण्यात दिसते.तसे लेखही वाचल्याचे आठवते.

  4. ugaonkar

      5 वर्षांपूर्वी

    एकूण लेख जरी गमतीचा वाटलं तरी मारुतीची इतकी मोडतोड का?

  5. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    वाह !! खूप छान !!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen