गणपती आले...


गावात ठराविक दुकानं ही नेहमीच भाड्याने दिलेली असायची. तिथे एक धंदा कधी चालायचाच नाही. दिवाळीत फटाके, आकाशकंदील असायचे, ते संपले की कोकणातून येणारे आंबे, फणस मांडले जायचे.पावसाची झड सुरू झाली की आंबे आवरले जायचे आणि त्याच दुकानांत राख्या मांडल्या जायच्या.

एखाद्या दुकानात मात्र लोखंडी मांडण्या लागायच्या. मग रात्री अवचित शे दीडशे पांढऱ्या मूर्ती कुठूनतरी यायच्या. लहान मोठ्या आकाराच्या ह्या मूर्ती जपून प्लॅस्टिकने झाकल्या जायच्या. त्यांना पूर्ण रंग दिलेले नसायचे. दुसऱ्या दिवसापासून ते उरलेले रंगकाम शटर उघडं ठेवून सुरू व्हायचे. गणपती आले, आम्ही म्हणायचो.. आषाढधारांनी कोसळणारा पाऊस वातावरणात रुतून बसलेला असायचा. सगळ्या आसमंतात तो राखी करडेपणा साचलेला असायचा.

रस्त्यावरची माती आणि डांबर वाहून गेलेलं असायचं. स्लीपरने उडणारा चिखल पाठीवर रांगोळी काढायचा. ओलसर गार कपड्याने शाळेत जायचं जीवावर आलेलं असायचं. वाहत्या साचल्या पाण्याचे, शेवाळाचे, स्टाफरूम मधल्या उकळत्या चहाचे वास वर्गात फिरत राहायचे. जीव जड झालेला असायचा. आणि मग एक दिवस गटारी यायची. दर्दी लोक खास सुट्टी काढायचे. मटणाच्या दुकानापुढे रांग लागायची. आदल्या रात्री कळपाने आलेल्या शेळ्याही दुकानामागे रांगेत बांधलेल्या असायच्या.

घरोघरी मसाल्यांचे गंध रेंगाळायचे. खाऊन पिऊन तुस्त झालेली माणसं पोटातले सुख डोळ्यावर ओढून झोपी जायची. आखाड संपलेला असायचा. हासत नाचत श्रावण यायचा. नागपंचमी यायची, नाग घेऊन गारुडी फिरायचे. नागाचे दात काढलेत की गारुड्याचा मंत्र पॉवरफुल आहे ह्याचे वाद रंगायचे.उन्हापावसाचा खेळ सुरू व्हायचा. उन्हात पाऊस पडायला लागला की "नागडा पाऊस, नागडा पाऊस" असं ओरडत आम्ही हातावर थेंब घ्यायचो.

श्रावणी शुक्रवार यायचा. स्टाफ रूममध्ये चणे उकडले जायचे. कागदाचा द्रोण आणि पुठ्याचा चमचा आपणच करायचा असायचा. नुसत्या मिठावर उकडून काढलेल्या चण्यात, एखादी मिरची कापून टाकली जायची. अप्रतिम चव लागायची. वातावरण उजळलेले असायचे. राखाडी करडेपणा संपून श्रावणी सण सुरू व्हायचे. उगाचच सगळं छान वाटायला लागायचं. श्रावणी सोमवार सुरू झालेले असायचेच. निर्जळी सोमवारचे व्रत तेंव्हा अनेक काकू करायच्या, कुठेतरी उद्यापन असायचं. लगबग असायची. आयुष्य भोळं होतं.

रक्षाबंधन होऊन जायचं. भरल्या हाताने मुलं दहीहंडी फोडायला जायची. हंड्याही तेंव्हा कॉर्पोरेट नव्हत्या. फारतर चार पाच थरांची दहीहंडी असायची. आपापल्या मित्रमंडळाची बंद गळ्याची बनियन छापून घेतली जायची. ती घालून दहीहंडीत मिरवले जायचे. आता प्रतीक्षा असायची गणपतीची. सरत्या पावसाळ्यात गणपती यायचे. पाऊस आहे पण आणि नाही पण असा पडत असायचा. दहा बारा दिवस आधी एखाद्या मैदानात मंडप ठोकला जायचा.

लग्नाचे दिवस नसल्याने बांबू, स्पीकरवाल्याना काम नसायचे. कुठूनतरी वीज घेतली जायची नाहीतर सरळ मीटरच्या अलीकडे वायर चिकटायची. मित्रमंडळ नावाचा जमाव पावती पुस्तकं घेऊन घरोघरी फिरायचा. कुठे आग्रहाने, कुठे गोडीने तर कुठे कुणाच्या नावाने जळवून जास्तीत जास्त वर्गणी वसूल केली जायची. मंडळाच्या सीमारेषा असायच्या. त्या रेषेवर ज्या बिल्डिंग असायच्या तिथे दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते जायचे. मचमच व्हायची. प्रकरण शक्यतो बोलाचाली होऊन मिटवले जायचे.

एकदा वर्गणी लक्षात आली की खर्चाचा अंदाज मांडला जायचा. गणपती मूर्ती हा मोठा भाग नसायचाच. सजावट महत्वाची असायची. त्यातही फार काही देखावे वगैरे नसायचे. घरच्या गणपतीत जी सजावट असेल तीच जरा मोठी करून इथे केली जायची. भटजी ठरायचा, टेम्पो किंवा हातगाडी ठरायची, कॅसेट आणल्या जायच्या. त्याचवेळी घरोघरी गणपतीची तयारी सुरू असायची. उजव्या बाजूला तोंड येईल असा घरातला एखादा कोपरा रिकामा केला जायचा.

घरात असेल तर ठीक नाहीतर शेजारून एखादा टेबल आणला जायचा. गणपतीसाठी म्हणून घरात एक मल्मली चादर असायची. ती मागच्या गणपतीनंतर धुवून घडी घालून ठेवलेली असायची. ती बाहेर निघायची. पलंग सरकवले जायचे, कपटावरची जळमटे निघायची, रॉकेलने फॅन पुसले जायचे. निरमाचा फेस करून, घासून घासून लाद्या धुतल्या जायच्या. दरवाजे सर्फमध्ये बुडवून, ओल्या फडक्याने पुसले जायचे.घर नवं दिसायला लागायचं. रेशनवर रवा आलेला असायचा.

प्रसादाला लागेल आणि नंतर संपेल म्हणून डालडा विकत घेऊन ठेवला जायचा. देशी तूप वगैरे चैन तेंव्हा नव्हती. उकडीच्या मोदकाचे प्रस्थ कोकणातल्या घरांत होते पण घाटी पब्लिक तळलेल्या मोदकाची तयारी करायचे. खोबर, नारळ आणून ठेवले जायचे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी चहा साखर जास्तीचे भरले जायचे. शिवसेनेच्या शाखेवर धारा तेल मिळायचे, जरा स्वस्त आणि चांगले असायचे. लोकं रांगा लावून खरेदी करायचे. पोटोबाची तयारी पूर्ण झालेली असायची, कुटुंब आता विठोबाच्या तयारीला लागायचे.

ठरलेल्या दुकानात जाऊन मूर्ती निवडली जायची. काही जणांकडे सिरीज असायची, म्हणजे अष्टविनायक किंवा तसं काही. इतर लोक आपल्या आवडीने मूर्ती निवडायचे. गणपती पूजन करायला पुरोहित वगैरे कोणी बोलवायचं नाही. पूजेची तयारी म्हणून आपापल्या पध्दतीने सुपाऱ्या, अगरबत्त्या आणल्या जायच्या. गणपती पूजनाची पुस्तकं मागवली जायची. फुलं- हार आधीच सांगून ठेवले जायचे. घरातले तांब्याचे ताम्हण, पळी बाहेर निघायचे. एखादी चांदीची निरंजन असेल तर कोलगेट पावडर लावून तिला साफ केलं जायचं.

झब्बे पायजमे किंवा एखाद धोतर, असेलच तर पितांबर धुवून घेतलं जायचं. एखादा हौशी विकतही घ्यायचा. पुढे दिवाळी येणारच असायची त्यामुळे इतर कपडे घेणे मात्र टाळले जायचे. पांढऱ्या काळ्या टोप्या उन्हं द्यायला बाहेर निघायच्या. आरतीला आणि पूजेला टोपी लागायचीच. डेकोरेशन नावाचा एक खास कार्यक्रम असायचा. सुरवातीला फक्त पुठ्याचे डेकोरेशन असायचे. त्यामागे एखादे निसर्गचित्र चिकटवले जायचे. नंतर थर्माकोल मिळायला लागले. पातळ थर्माकोल शीट, ब्लेड, डिंक, रंग, टाचण्या आणि वेगवेगळ्या रंगाची चमकी-टिकल्या हा मुख्य कच्चा माल असायचा.

माहितीत चित्रकला चांगली असलेला एखादा कलावंत टाईपचा मुलगा असायचाच. मग रात्री दोन वेळा चहा आणि काहीतरी नाष्टा ह्या मोबदल्यात हा मुलगा यायचा. रात्र जागवली जायची. अशीच जागरण सार्वजनिक मंडपात पण व्हायची, पण तिथला नजारा वेगळा असायचा. एखादा सुतार, दोन चार कलाकार मुलं, त्यांच्या हाताशी चार सहा सांगकामे असा संपूर्ण चमू असायचा. खिळे, फेव्हीकॉल अस्ताव्यस्त पडलेले असायचे. नाक्यावरच्या हॉटेलवाल्याला जेवणाची ऑर्डर असायची. कधीकधी इतरही सोय असायची.

कोणतंही काम न करणारे काही पदाधिकारी रात्री टेबल टाकून पत्ते कुटायला बसायचे. हे सगळे मिळून एक दोन रात्री जागवायचे. पुढच्या जागत्या रात्रीची ही बहुदा सुरवात असायची. गणपती बसल्यावर ऋषीपंचमी येणार असायची. आई सात ऋषींच्या सात शिळा आणून ठेवायला सांगायची. ह्या विशिष्ट प्रकाराच्याच लागायच्या. बांधकामाला आणलेल्या खडीतून त्या उचलून नेल्या की ओरडा बसायचा. नदीतून घासून गुळगुळीत झालेले गोटे लागायचे. ते कधीकधी जवळ मिळायचे नाहीत. मग खाडीजवळ जाऊन घेऊन यायला लागायचे.

ओलेत्याने ऋषींची पूजा होणार असायची. मग गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसाची संध्याकाळ यायची. ज्यांचा गणपती दीड दिवसांचा असायचा तो शक्यतो संध्याकाळीच आणला जायचा. खास गणपतीचा पाट असायचा. तो आदल्या दिवशीच धुवून पुसून ठेवला जायचा. मुलं गोळा व्हायची. टाळ, एखादी ढोलकी, पळी ताटली घेऊन उत्साहात गणपती आणायला मंडळी निघायची. सार्वजनिक गणपतीसाठी बऱ्याचदा सजवलेली हातगाडी असायची. तिच्या चारी बाजूला केळीचे खुंट, फुलांच्या माळा लावून माफक सजावट व्हायची.

नाशिक ढोल अजून आले नव्हते. तरीही बँडवाले असायचेचं. बऱ्याचदा ते खास गणेशचतुर्थीच्या काळात आसपासच्या खेड्यातून आलेले असायचे. ते सुपारीची वाट बघत नाक्यावर किंवा मूर्तीच्या दुकानजवळ उभे असायचे. सुपारी ठरली की ते आपापल्या पिपाण्या साफ करायचे. घसा ओला करायचे. गणपती हा त्यांच्यासाठी सिझन असायचा. लंबोदर बाप्पा सगळ्यांच्या पोटाची काळजी घ्यायचा. वाजत गाजत देव घरोघरी यायचे.

खूप उशिरा मंडपातही यायचे.मंडपातल्या मूर्तीची विधिवत पूजा व्हायची. रात्रीच्या अंधारात मखरात ठेवलेल्या मूर्तिपूढे समयी तेवत राहायची. मध्यरात्री कधीतरी जाग यायची. मग सहज मंडपात नजर टाकली जायची. कोणीतरी पत्ते खेळत असायचं. कोणी बाजूला पेंगत असायचं. सगळ्या वातावरणात एक निवांतपणा रेंगाळत असायचा. देवही जणू आपल्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकायला सज्ज होतं असायचा. गणपती आलेला असायचा.

**********

लेखक - शैलेंद्र कवाडे


समाजकारण , प्रासंगिक , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

  1. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    छान तपशील...विसर्जनाची गम्मत पण अनुभवायची होती.......असाच लेख पुढे चालू राहावा असं वाटलं.

  2. ajaygodbole

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर.त्या काळात गेल्या सारखे वाटले



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen