भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - १


व्हॅलेंटाईन डे च्या आसपास घडणाऱ्या प्रेमकथा आपण नेहमीच ऐकतो आणि वाचतो. पण भाद्रपदातील गणपतीसारख्या उत्सवी वातावरणांत देखील अनेक प्रेमकथा उमलत आणि फुलत असतात. उत्सवाच्या नादांत आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र आपल्या बारीक आणि मिश्कील नजरेने या गोष्टी पाहणारा लेखक, धार्मिकतेच्या सणाला लाभलेली गुलाबी किनार अचूक टिपतो आणि ती कथाबद्धही करतो. बीबीसी मराठीचे पत्रकार आणि लेखक रोहन नामजोशींच्या अशाच कथामालिकेचा पहिला भाग वाचा आज.

**********

प्रतिष्ठापना

शार्दूल आणि ओवी च्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा गणेशोत्सव होता (म्हणजे आहे)

दोघांना एकमेकांबद्दल मैत्रीच्या पलीकडे काहीतरी वाटतं याची कॉलेजच्या या शेवटच्या वर्षाला खात्री पटली आहे. आता पुढे काहीतरी विचार करायचा असेल तर घरच्यांचा अंदाज घ्यायला हवा या उद्देशाने ओवीने शार्दूलला आज 'दर्शना' ला बोलावलं. मागच्या आठवड्यापासून आजच्या खास दिवसाची तयारी दोघांनी सुरू केली होती.

शार्दूल ने fab मध्ये जाऊन एक विशेष कुर्ता घेतला होता. २०-२५ ऑप्शन ट्राय केल्यानंतर ओवीने ज्या कुर्त्याला मान्यता दिली तोच त्याने घेतला. अखेर आज संध्याकाळी शार्दूल प्रभात रोड वर असलेल्या तिच्या बंगल्यात आला. घरासमोर हश पपिज, मोची, मेट्रो च्या चपलांचा खच पडला होता. बाटाच्या काही अंगठ्याच्या चपलाही त्यात होत्या. त्यावरून घरातल्या मंडळींच्या वयाची रेंज त्याच्या लक्षात आली. घरात शिरताच उदबत्ती, गजरे, झेंडूची फुलं, उंची अत्तरं, बटाट्याची भाजी यांचे मिश्र सुवास त्याच्या नाकात शिरले. त्याला अगदी प्रसन्न वाटलं.

तसा तो ओवीकडे नेहमीच यायचा. ओवीचे आई वडील त्याच्या अगदी चांगले ओळखीचे होते. तरी आजचा दिवस वेगळा होता. आज तो स्वतःच उमेदवार म्हणून तिथे आला होता. ओवीचे वडील समोरच बसले होते. "अरे शार्दूल ये.. ये.."काका वदले. "नमस्कार काका.." त्याला वाकायची इच्छा होती. पण त्याने ती दाबली. आतापासूनच नको वाकायला असंही त्याला वाटून गेलं. "काय रे एकटाच आलास? आई बाबांना घेऊन यायचं की. त्यानिमित्ताने त्यांचीही भेट झाली असती" "नाही काका. त्यांना एका ठिकाणी जायचं होतं. " " बरं बरं हरकत नाही. "

पाच मिनिटांनी ओवी आली. गुलाबी रंगाच्या पैठणीत ती अगदी लावण्यवती दिसत होती. महिन्यातले अर्धे दिवस श्रेडेड जीन्स घालणारी हीच ती ओवी असा त्याला प्रश्न पडला. त्याला एक मिनिट काही सुचेचना. पण काही बोलताही येईना. शेवटी जुजबी बोलून त्याने व्हॉट्सअॅप उघडलं आणि तिला १५-२० बदाम पाठवले. दहा मिनिटांनी उगाच लगबगीत असल्यासारखं भासवत ओवी त्याला डोळा मारत निघून गेली. पंधरा वीस मिनिटं अशीच गेली. त्याला काय करावं काही सुचलं नाही . तरी हा बसला..

शेवटी खोलीतून 'चला आरतीला' असा आवाज आला आणि सगळ्या जनतेने तिथे धाव घेतली. रमा काकू सगळ्यांना आरतीच्या झेरॉक्स वाटत होत्या . याच्याकडे देताच याने सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात 'नको नको. मला सगळ्या आरत्या येतात.' असं सांगितलं. ५०-६० वयोगटाच्या नजरा त्याच्याकडे लगोलग वळल्या. तरी हा आपला भोळसट चेहरा करून उभा राहिला. आरतीच्या वेळी ओवीला पाहण्याची नामी संधी त्याला मिळाली. तरी त्याने चोरटे कटाक्षच टाकले.

कोहली जरी आवडत असला तरी काही वेळी द्रविड व्हावं लागतं हे कळण्याइतका शहाणपणा सीओईपीच्या मागच्या चार वर्षात त्याने मिळवला होता. त्यामुळे त्याने जास्त अगाऊपणा केला नाही. आरती म्हणून थकल्यावर खोलीत मंत्रपुष्पांजली म्हणणारी तीन चार डोकी होती. त्यात हा पठ्ठ्या पण होता.. शेवटपर्यंत शार्दूलने व्यवस्थित खिंड लढवली. नंतर अथर्वशीर्षाची वेळ आली. ओवी नुसती पुटपुटत बसली . या हिरोने त्यातही बाजी मारली. सगळ्यांना एव्हाना हा कोणीतरी वेगळा आहे याचा अंदाज आलेला होता.

आरतीनंतर सगळी पुरुष मंडळी सोफ्यावर नेहमीप्रमाणे बसली होति. यंदा मंदीची चर्चा सगळीकडे आहे. ओवीच्या घरीही ही चर्चा लगेच रंगात आली. तेवढ्यात या मंदीत संधी साधून शार्दूलने 'द हिंदू' च्या एका लेखाचं उदाहरण दिलं आणि सभा काबीज केली. ही कुजबूज किचन मध्ये ऐकू गेली. 'हुशार दिसतोय ओवीचा मित्र' म्हणून तिथेही चर्चा झाली. आता शार्दूल ची भीड चेपली होती. जेवतानाही त्याने आपल्या बुद्धिमत्तेचे दाखले दिले पण तरीही आपला इथे येण्याचा उद्देश कुणालाही कळू दिला नाही (तो कळला नाही असं त्यालाच वाटलं हा भाग वेगळा)

जेवण झाल्यावर सेल्फ्यांचा पाऊस पडला. त्यात आपण भिजणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली. शेवटी ओवीचे बाबा त्याला म्हणाले,"अरे शार्दूल तिथे का उभा आहेस? ये इकडे" शार्दूल लगेच 'त्यांच्यात' मिसळला. जावईपणाची प्रतिष्ठापना झालेली होती.

(क्रमशः)

**********

लेखक - रोहन नामजोशी  Google Key Words - Rohan Namjoshi, BBC Marathi Writer


कथा , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

  1. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    केव्हा.

  2. Mandar Kelkar

      3 वर्षांपूर्वी

    Fabulous. When is the next part?

  3. Aparna Ranade

      3 वर्षांपूर्वी

    छान,नेहमीचेच उसाचा,पुढे बघू

  4. Ashwini Gore

      3 वर्षांपूर्वी

    Interesting 👍

  5. mahesh phadke

      5 वर्षांपूर्वी

    पुढे काय होणार हे वाचण्याची उत्सुकता निर्माण होते आहे.

  6. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    छान !

  7. MaheshKhare

      5 वर्षांपूर्वी

    एकदम समकालीन कथा! मध्यमवर्गीय वातावरण चपखलपणे आलं आहे. पुढे काय होणार हे वाचण्याची उत्सुकता निर्माण होते आहे.

  8. ambarishk

      5 वर्षांपूर्वी

    :)



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen