fbpx

आठवड्याचा अग्रलेख- २ नोव्हेंबर २०१९

निवडणुकांचे निकाल लागले आणि पाठोपाठ दिवाळी सुरु झाली. त्यामुळे गेला आठवडा निकालांचे कवित्व आणि दिवाळीचा फराळ दोन्ही एकत्रच सुरु होते. अर्थात १० दिवस उलटून जाऊनही महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच काही अद्याप सुटलेला दिसत नाहीये. किंवा सर्वोच्च पातळीवर ‘ आमचं ठरलंय ‘ असलं तरी अजून ते जाहीर करण्याचा मुहूर्त आलेला नाही, असं म्हणूयात.

त्यामुळे गेल्या आठवड्यात प्रामुख्याने हेच विषय अग्रलेखांतून हाताळले गेले असले तरी दिवाळी, फटाक्यांचे प्रदूषण, व्हॉट्सअपची पाळत आणि हेरगिरी, ओला दुष्काळ, इत्यादी विषयही जोडीने चघळले गेले. मात्र आश्चर्यकारकरीत्या, सर्वाधिक दखल घेतली गेलेली बातमी आंतरराष्ट्रीय होती. आयसीस संघटनेचा म्होरक्या बगदादी याचा अमेरिकेने केलेला खात्मा आणि त्यामागील विश्लेषण तब्बल सात अग्रलेखांतून केले गेले.

पाहूया कोण काय म्हणतंय…

**********

अल्‌ बगदादीला कुत्र्याच्या मौतीने मारले, अशी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाड ट्रम्प यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया, या व्यक्तीविषयी अमेरिकेच्या मनात किती चीड होती, हे दाखवून देणारी आहे. त्याला ठार मारल्याच्या घटनेचे, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनीही खुल्या दिलाने स्वागत केले आहे. कुणीही ट्रम्प यांच्या या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. ते ट्रम्पविरोधी असले तरी त्यांनी या राष्ट्रीय मुद्याशी त्या विरोधाचा संबंध जोडला नाही. भलेही ते ट्रम्प यांचा तिरस्कार करीत असले, तरी त्यांनी त्या तिरस्काराचा लवलेशही राष्ट्रीय मुद्याला समर्थन देण्याच्या प्रसंगी जाणवू दिला नाही. कारण त्यांचे अमेरिकेवर, आपल्या देशावर नितांत प्रेम असून, ते अमेरिकेचा शत्रू असलेल्या प्रत्येकाला आपला वैयक्तिक शत्रू मानतात. म्हणून अमेरिकेतून अबु बक्र अल्‌ बगदादी याच्याविरोधात निघालेला हुंकार एकसुरात बघायला मिळाला. भारतात मात्र याउलट उमटलेली प्रतिक्रिया लोकांनी अनुभवली आहे. ज्या वेळी रात्रीच्या काळोखात भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी हल्ल्याचा बदला घेतला आणि सीमा सुरक्षा दलाच्या 40 जवानांचा अतिरेक्यांनी घेतलेल्या बळींचा बदला म्हणून बालाकोटमध्ये हल्ले करीत अतिरेक्यांची प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त केली, त्या वेळी आपल्याकडील विरोधकांनी सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही आणि तो केला असेल तर लष्कराने त्याचे पुरावे द्यावे, अशी मागणी करून सरकारच्या प्रामाणिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दोन देशांतील विरोधी पक्षांमधील हे अंतर बरेच काही सांगणारे आहे.

तरुण भारत नागपूरhttps://bit.ly/2Nxs4JW

**

‘आयसिस’ या संघटनेने पाच वर्षामध्ये सारा आशिया खंड इस्लाममय करून खिलाफती राजवटीच्या अंतर्गत आणणार अशी वल्गना २०१४ मध्ये केली होती. खिलाफत राजवटीच्या अंतर्गत येणा-या देशांचा नकाशाही या संघटनेने प्रसिद्ध केला होता. त्यात भारताचाही समावेश करण्यात आला होता. इंग्रजी सत्तेपूर्वी भारतावर मुस्लिमांचेच राज्य होते, त्यामुळे भारतही खिलाफतीचाच एक भाग आहे, अशी या संघटनेची समजूत होती. साधारणत: २०१३च्या आसपास या संघटनेचा इराकच्या मोसूल भागात उच्छाद सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षामध्ये संघटनेने सीरियाचा जवळपास एक तृतियांश भाग आणि इराकचा निम्मा भाग एवढय़ा भूप्रदेशावर आपले नियंत्रण असल्याचा दावा केला होता. अवघ्या दोन वर्षाच्या काळात जगाकडून फारसा प्रतिकार न होता एवढे यश मिळाल्याने बगदादी हुरळून गेला आणि त्याने अल्पावधीतच जगाचा पुष्कळसा भाग इस्लाममय होईल, अशी स्वप्ने पाहण्यास प्रारंभ केला होता. त्यानंतर अमेरिका आणि सीरियाच्या सैन्याने ‘आयसिस’विरोधात आघाडी उघडली. त्यांच्या आधुनिक शस्त्रांपुढे आणि युद्धतंत्रापुढे बगदादीचा पाडाव लागेनासा झाला. इराक आणि सीरियाचे एक एक भाग त्याच्या तावडीतून निसटू लागले. इराक आणि तुर्कस्थान तसेच सीरियातील कुर्द बंडखोरांनीही ‘आयसिस’ला नामोहरम करून सोडले. या बंडखोरांना अमेरिका व पाश्चात्त्य देशांनी शस्त्र पुरवठा करून त्यांची शक्ती वाढविली. अशा तीन आघाडय़ांचा प्रतिकार करणे बगदादीला अशक्यच होते. शेवटी या संघटनेचा पाडाव झाला आणि स्वत: बगदादीला सीरियातील अज्ञातस्थळी दडून राहण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्याच्या खात्यामुळे खिलाफची पुनस्र्थापना करण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले. आजही या संघटनेचे हस्तक अनेक देशांमध्ये असून त्यांचा उपद्रव जगाला होत आहे.

प्रहारhttps://bit.ly/329KRA7

**

सकाळ –  https://bit.ly/36vLrM8

***

बगदादीच्या मृत्यूच्या वावडय़ा गेल्या तीन चार वर्षांमध्ये अनेकदा उठल्या होत्या. त्यामुळे प्रथम जेव्हा त्याचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले तेव्हा त्याबद्दल अविश्वास व्यक्त केला गेला. पुरावे मागण्यात आले. आजही दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया पाकिस्तानसारख्या देशाला बगदादीबद्दल आत्मीयता किती वाटते हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. पाकिस्तानमधील काही मान्यवरांनी त्याच्या मृत्यूसंदर्भात संशय व्यक्त केला आहे, तर पाक सरकार मूग गिळून गप्प आहे. मात्र अनेक राष्ट्रप्रमुखांनी अमेरिकेच्या या कारवाईसंदर्भात समाधान व्यक्त केले आहे. एकंदर परिस्थिती पाहता यावेळी बगदादीचा अंत झाला असे हे वृत्त खरे आहे असे वाटण्यास बरीच जागा असल्याचे दिसते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात घुसून अमेरिकेच्या कमांडोंनी अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अशाच प्रकारे मारले होते. काही फरक वगळता ताजी घटना ही लादेनच्या मृत्यूचीच पुनरावृत्ती आहे असे म्हणता येते. बगदादीची आयएसआयएस ही संघटना अल् कायदाची जास्त कठोर आवृत्ती होती. स्वतः बगदादीचा एक दहशतवादी म्हणून कार्यकाळ अल् कायदा या संघटनेपासूनच सुरू झाला होता. तो या संघटनेचा एक हस्तक होता. पण ही संघटना पुरेशी ‘दहशतवादी’ नाही असा आरोप करत त्याने नवी आयएसआयएल (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लीव्हंट) ही संघटना स्थापन केली. नंतर तिचे नामकरण आयएसआयएस असे करण्यात आले.

तरुण भारत बेळगाव – https://bit.ly/2WCWrTv

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu