पावणे दोन पायांचा माणूस

‘पावणेदोन पायांचा माणूस’  सर्वप्रथम 'साधना'च्या २००५ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. माझी ही पहिलीच कादंबरी. माझ्या फुटकळ लिखाणावरून, माझ्यात कादंबरी लिहिण्याची क्षमता असल्याचा विश्वास माझे एक मित्र सुनील कर्णिक यांना वाटला आणि साधनाचे संपादक नरेंद्र दाभोलकर यांनीही त्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या या विश्वासामुळेच ही छोटेखानी कादंबरी मी नेटाने पूर्ण केली. या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे.

‘साधना’च्या दिवाळी अंकाच्या मजकुराचे कंपोझिंग सुरू असतानाच तेथील माझ्या एका अनाम मित्राने या कादंबरीची शिफारस देशमुख आणि कंपनीच्या विनय हर्डीकर आणि रवींद्र गोडबोले यांच्याकडे केली. त्यांनी तत्परतेने ती वाचली आणि आत्मीयतेने माझ्याशी संपर्क साधला. या दोघांसारख्या चोखंदळ संपादकांना कादंबरी आवडावी व त्यांनी ती प्रकाशित करण्याची तयारी दाखवावी, हे माझ्यासारख्या पैलाडू कादंबरीकाराला आत्मविश्वास देणारे होते. या दोघांचाही त्याबद्दल मी आभारी आहे.

‘साधना’मध्ये ही कादंबरी वाचून अनेकांनी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवरून आपल्याला ती आवडल्याचे आवर्जून कळविले. त्यात माझे संपादक कुमार केतकर, नाटककार प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मुकुंद टांकसाळे, हेरंब कुलकर्णी, अशी जाणकार मंडळी होती. कादंबरीकार स्व. अरूण साधू यांनी स्वत: फोन करून माझ्याकडून दिवाळी अंक मागवून घेतला आणि मला व्यक्तिश: भेटून कादंबरी खूप आवडल्याचे सांगितले. या सर्वांच्या चार चांगल्या शब्दांमुळे हुरूप वाढला.

माझ्या सहकाऱ्यांनीही आत्मीयतेने कादंबरी वाचली व कौतुक केले. ते खरेच असावे, असे मी समजतो. राजीव खांडेकर, अरविंद गोखले, मुकुंद सांगोराम, शुभदा चौकर, सुहास गांगल, रवींद्र पाथरे, विकास नाईक या सर्व सहकाऱ्यांनी माझा उत्साह वाढवला. तर श्रीकांत गोखले (पुणे), मयुर पांडे (जेजुरी) यांनी पत्र पाठवून कादंबरी आवडल्याचे सांगितले. ‘हास्यरंग’ या पुरवणीच्या संपादनामुळे ज्यांच्याशी मैत्र जुळले व सूरही जुळले ते साक्षेपी वाचक व संवेदनशील कवी अशोक नायगावकर यांनी या कादंबरीला दिलेली दाद ही मोठीच कमाई होती.

‘साधना’मध्ये ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा सत्येन टण्णू यांनी त्यासाठी रेखाचित्रे काढली होती. त्यांचा मी आभारी आहे. कादंबरी पुस्तकरूपात येताना तिला चित्रकार मित्र दत्तात्रय पाडेकरांच्या कुंचल्याचा स्पर्श व्हावा, अशी इच्छा होती. माझ्या लेखनाचे चाहते असलेल्या पाडेकर यांनी मुखपृष्ठावरील चित्रामधून कादंबरीचा आशय नेमका पकडला आहे. त्यांचाही मी ऋणी आहे.

…आणि आता

कादंबरी पुस्तक रूपात आल्यापासून एकही महिना असा गेला नसेल की एखाद्या वाचकाचा ती वाचून फोन आला नाही. अगदी सातारा किंवा अकोला येथील एखाद्या ग्रंथालयाच्या सदस्यापासून तर उमेश कुलकर्णी, अमृता सुभाष, नागराज मंजुळे, संदेश कुलकर्णी, अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या चोखंदळांपर्यत अनेकांनी ती आवडल्याचे सांगितले. आता ही कांदबरी इ स्वरूपात येत आहे. छापील माध्यमातून ई-साहित्याच्या वैश्विक पटलावर जाताना सुनील डिंगणकर या माझ्या तरूण मित्राचा हात तिने धरला आहे. आधीच्या प्रवासात न भेटलेले वाचक तिला त्यामुळे भेटू शकतील. ही कांदबरी कदाचित लवकरच पडद्यावरही पाहायला मिळेल, त्याचा तपशील आताच देणे श्रेयस्कर नाही.

इ स्वरूपातील कादंबरीचा हा आणखी एक पुढला अवतार आता वाचकांसमोर येत आहे. बहुविध डॉटकामने ‘डी-बूक’च्या माध्यमातून ही कादंबरी आणण्याचा नवा प्रयोग केला आहे. या नव्या प्रयोगाची सुरुवात ‘पावणे दोन पायांचा माणूस’पासून होत असल्याचा आनंद आहे. या प्रयोगामुळे आता मोबाईलवरही ही कादंबरी सहज वाचता येईल. कादंबरीचे मूळ मुखपृष्ठ तयार करणारे ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर आणि साधनाच्या दिवाळी अंकात या कादंबरीसाठी चित्रे काढणारे सत्येन टण्णू यांचे आभार.

दरम्यान या कादंबरीवर ज्येष्ठ लेखक स्वर्गीय रत्नाकर मतकरी, समीक्षक प्रभाकर बागले, समीक्षक डॉ. किशोर सानप यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिल्या. कादंबरीला दाते पुरस्कारही मिळाला.

 

श्रीकांत बोजेवार

स्कायलाईन, ए-६, मीठबंदर मार्ग, कोपरी.

ठाणे (पू.) ४००६०३

मोबाईल - ९८९२४१९२६७

([email protected])

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

पावणे दोन पायांचा माणूस

१०. उत्प्रेरकाची कमाल..

श्रीकांत बोजेवार | 15 Jun 2021

मुख्यमंत्री हसत हसत म्हणाले, यांना व्यसन लागलंय भंडाफोड करण्याचं. साध्या सामान्य घडामोडी टिपण्यात यांना इंटरेस्टच नाही.’

६. हाफ पँटीतून फुल पँटीत..

श्रीकांत बोजेवार | 05 Jun 2021

गेंगाणेच्या बायकोनं नवऱ्याचं ताट वाढलं मात्र घारीच्या नजरेला नजर देण्याचं ती टाळत होती. आपल्या पापाची साक्षीदार मुकी असली तरी तिची नजर भेदक आहे, हे तिला ठाऊक होतं. आणि आज इथं काय घडलं, त्यातलं अवाक्षरही मांजरीच्या मीटिंगमध्ये सांगायचं नाही हे घारीनं ठरवून टाकलं होतं. पंरतु, लंगड्याला धडा शिकविण्यासाठी तिची नखं शिवशिवत होती. दिवसभर गावात सर्वत्र हिंडून पिल्लं रात्री लाईटपोलजवळ भेटणार म्हणून ती आता मीटिंगच्या दिशेनं चालली होती. मात्र गेंगाणेसारख्या भल्या माणसाच्याच आयुष्यातच हे का घडावं, या प्रश्नानं तिचं डोकं पेटून निघालं होतं.

५. घारीनं स्वीकारलं लठ्ठ्याचं प्रेम!

श्रीकांत बोजेवार | 03 Jun 2021

मुख्य म्हणजे, या बातमीचं कात्रण शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आल्यानं आता लंगड्या एकदम थोरामोठ्यांच्या पंक्तीत जाऊन बसला होता. अजाबरावला दारू पिण्याचा आणि छतावर चढून कीर्तन करण्याचा आणखी एक बहाणा या बातमीनं दिला होता.

४. सुपर डिलक्स प्रगतीचा मार्ग खुला..

श्रीकांत बोजेवार | 01 Jun 2021

लंगड्याच्या या प्रश्नावर पत्रकाराने तोंडात पसरलेले पान आधी जिभेने गालाकडे सरकवले. मग हातातील फोर स्केअरचा एक छानसा झुरका घेतला आणि म्हणाला, ‘शालेय जीवनात तुम्हांला किती मार्क मिळतात, याला फार महत्त्व नाही. जीवनाच्या शाळेत तुम्ही कसे टिकाव धरता तेच खरं.’

३. गढीतलं गूढ

श्रीकांत बोजेवार | 29 May 2021

तिच्या उष्ण स्पर्शानं लठ्ठ्याचे कान ताठ झाले आणि नखं बाहेर आली. आपला हा आनंदातिरेक एखाद्या लाकडी खांबावर नखांचे ओरबाडे काढून व्यक्त करण्याची अनिवार इच्छा त्याला झाली. हडक्याचं ऐकून आपण गढीकडे आलो हे कित्ती कित्ती बरं झालं या विचारानं तो मोहरला. तेवढ्यात घारी सावरली आणि आपण लठ्ठ्याच्या बाहुपाशात आहोत, हे तिच्या लक्षात आलं - ती पटकन बाजूला झाली.

२. गेंगाणे मास्तर पाणीकम आहे का गं?

श्रीकांत बोजेवार | 27 May 2021

या बाईचं काही प्रकरण हाती लागलं तर त्याचा बभ्रा करता येईल आणि तिची हकालपट्टी करून आपला पगार पुन्हा एकदा तीनशे रुपयांनी वाढवून घेता येईल, असं गेंगाणेला वाटू लागलं. अंधाराचा अंदाज घेत, गढीच्या एका एका कोपऱ्याची नजरेनंच झडती घेण्याचा त्यानं सपाटा लावला.

१. बापूरावच्या म्हशीनं मार्कलिस्ट खाल्ली...

श्रीकांत बोजेवार | 25 May 2021

दोन भाकरी पोटात गेल्यावर लंगड्याच्या डोक्यातली आरेदार चक्रं नॉर्मल वेगाने काम करू लागली होती. मार्कलिस्ट दाखवायचा बेत त्यानं मनातल्या मनात रद्द करून टाकला आणि मघाशी मनातल्या मनात तयार केलेली ष्टोरी ऐकवण्याचा प्लॅन अमलात आणायचं ठरवलं.
Install on your iPad : tap and then add to homescreen