तंबी दुराई-2018

हरवलेले एक वर्ष

‘तंबी दुराई’चा जन्म २००० साली अरुण टिकेकर यांच्या कल्पनेतून झाला आणि लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतून तो ‘दोन फुल एक हाफ’ म्हणत वाचकांपुढे आला. वाचकांनी त्याच्यावर अमाप प्रेम केले. टिकेकर निवृत्त झाले आणि लोकसत्ताच्या संपादकपदाची सूत्रे कुमार केतकरांकडे आली, त्यानंतरही तंबी भेटत राहिला. त्याच्यावर कौतुकाचा प्रेमाचा वर्षाव सुरुच राहिला. २०११ सालच्या ऑक्टोबर महिन्यात तंबीने लोकसत्ताचा निरोप घेतला आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये मुक्काम हलवला. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर जानेवारी २०१२ पासून तो महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत ‘दीड दमडी’ खुळखुळवत नव्या-जून्या वाचकांपुढे पुन्हा आला. नव्या मैदानातील फटकेबाजीलाही टाळयांचा प्रतिसाद मिळाला. २०१७च्या अखेरिस काही अडथळे आले आणि त्याने आणखी एक ब्रेक घेतला. हा ब्रेक संपावा म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स, पुणे’चे निवासी संपादक आणि तंबीचे सहकारी पराग करंदीकर सतत प्रयत्नात होते, मात्र अडचणी संपत नव्हत्या. वाचक विचारत होते, तंबीला कोणी तंबी दिली? तो गप्प का?

२०२० मध्ये महाराष्ट्र टाइम्सची सुत्रे सर्वाथाने संपादक पराग करंदीकर यांच्याकडे आली आणि त्यांनी तंबी दुराईंच्या भात्यातील बाणांना पुन्हा संवादचे पान उपलब्ध करुन दिले. तंबीच्या विनोदाला, तिरकसपणाला पुन्हा दाद मिळू लागली. दरम्यान ‘दोन फुल एक हाफ’ आणि ‘दीड दमडी’चे पाच खंडही आले.

काळाच्या या हिशेबात २०१८ आणि २०१९ ही वर्षे गायब आहेत. त्यातल्या एका वर्षाचा हिशेब म्हणजेच हे छोटेखानी पुस्तक आहे. किरण भिडे यांनी ‘पूनश्च’ हा डिजिटल उपक्रम सुरु केला तेंव्हा सुरुवातीला ‘पेड ब्लॉग’ ही कल्पना पुढे आली. ‘पैसे द्या आणि वाचा’ पद्धतीने आपले लिखाण वाचकांपुढे ठेवण्याच्या या परीक्षेला बसण्यास भल्या भल्या स्तंभ लेखकांनी नकार दिला. तंबीने बिनधास्त होकार दिला. कोणतीही गोष्ट ‘पहिल्यांदा’ होते तेंव्हा कोणीतरी धाडस करावेच लागते. तंबीने ते केले आणि पूनश्चच्या वाचकांनी या सशुल्क ब्लॉगला बऱ्यापैक प्रतिसाद दिला. जानेवारी ते डिसेंबर २०१८ असा वर्षभर हा ब्लॉग दर आठवड्याला वाचकांपुढे येत होता. त्यानंतरच्या अडिच तीन वर्षात पुनश्चचे बहुविध या अधिक मोठ्या व्यासपीठात रूपांतर झाले. शेकडो नवे वाचक आले आणि आता त्याचा पसारा अधिकच वाढतो आहे. २०१८ साली लिहिलेले हे ‘पन्नास लेख’ म्हणजे त्या हरवलेल्या एका वर्षाचा जमा-खर्च आहे. त्याची ही  डिजिटल पुस्तिका वाचकांना निश्चितच आवडेल.

तंबी दुराई

([email protected]

 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

तंबी दुराई-2018

Install on your iPad : tap and then add to homescreen