मी पुन्हा आलो - (पण हा ‘मी’..तो नव्हे)

संपादकीय    तंबी दुराई    2019-11-24 09:30:47   

प्रवेश पहिला (काका आणि पुतण्या विचारमग्न) काका- बोल, काय म्हणतोस? पुतण्या- काका, आपण हे काय करतो आहोत? तुमचं खरंच वय झालं की काय? असं तीन पायाचं सरकार स्थापन झालं तर ते किती दिवस चालणार? त्यातही एक पाय असा ज्याचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. काका- मी बोललो आहे त्यांच्याशी. त्यांच्यापुढेही आत्ता काही पर्याय नाही. आपल्याला एकत्र यावंच लागणार आहे. पुतण्या- आणि उद्या तिथं पर्याय निर्माण झाला, तर कसं चालवणार इथलं सरकार? काका- चालवू रे, तू शांत रहा. पुतण्या- शांत कसा राहू? माझं करिअर अजून संपलेलं नाही. पोराला मार्गी लावायचं आहे आणि ती चौकशी पण सुरु आहे. काका- चौकशीला काय घाबरतोस एवढा? देशभर अशा सतराशे साठ चौकशा सुरु असतील. बघू. पुतण्या- बघू काय? गेली पाच वर्ष आपण बघतोच आहोत ना? काका- मला जरा विचार करु दे पुतण्या- करा. ते मला नाही जमणार. माझं डोकं तापट आहे फार. (थोडा वेळ दोघेही शांत बसतात) पुतण्या- केला का विचार? काका- करतो आहे, थांब पुतण्या- अहो लवकर करा. काका- तू थांब जरा, वेळ लागतो विचार करायला. पुतण्या- बरं, मी निघतो. झाला की बोलवा मला. काका- अरे, किती घाई? तू बस इथं माझ्यासमोर. हाताची घडी, तोंडावर बोट. (पुतण्या हाताची घडी, तोंडावर बोट असा बसतो) काका- मी सांगतो तसं तसं करायचं, लक्षात ठेव. पुतण्या- मग आत्तापर्यंत काय करत आलोय? काका- ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. पुतण्या- बरं, वेगळं तर वेगळं. सांगा काका- जे सुरु आहे ते आपण सुरु ठेवू. पुतण्या- यात काय मोठं प्लॅनिंग आहे? तुम्ही काही विचार केलेला दिसत नाही. काका- विचार दिसत नसतो. तो नुसताच असतो. पुतण्या- मला मराठी शिकवण्याची ही वेळ नाही. काका- शिकवत नाही आहे मी. सांगतो आहे. मी विचार केला आहे, पण तो अजून पुरता शिजलेला नाही. शिजत ठेवलाय मी डोक्यांत. पुतण्या- च्यायला, डोकं माझं गरम आणि विचार शिजतात तुमच्या डोक्यात. गंमतच आहे. काका- तुला गंमतच वाटते सगळी. असं राजकारण होत नसतं. पुतण्या- बोला, बोलून घ्या. तुमच्यामुळेच सगळं मिळालं आहे, तर आता तुमचं ऐकून घ्यावंच लागेल. काका- अरे कुणासाठी करतोय मी हे सगळं? तुमच्यासाठीच ना? पुतण्या- (खाली मान घालून) बरं, सांगा. काका- हां, तर विचार सूचलेला आहे, पण अजून पुरता शिजलेला नाही. तो शिजेल तोवर आपण आत्ता जे चाललं आहे तेच सुरु ठेवायचं. मिटिंगा, बैठका, खाते वाटपाची चर्चा वगैरे. पुतण्या- हां ते कळलं मला, पण हे ‘वगैरे’ काय आहे ते समजून घ्यायचं आहे. काका- सांगतो हळू हळू. पण यावेळी तुला प्रमुख भूमिका करायची आहे हे लक्षात ठेव. पुतण्या- (आनंदाने) किती तरी वर्षे मी तुमच्या तोंडून हे वाक्य ऐकायची वाट पाहात होतो. काका- रंगमंचावर तू, रंगमंचाच्या मागे मात्र मी.. पुतण्या- हरकत नाही. सुरुवातीला हे करावंच लागणार आहे. पण विंगेतून किमान रंगमंचावर तरी आलो ना? काका- शाब्बाश. ही तुझी कळ काढण्याची भूमिका मला आवडली. पुतण्या- मी कुठं कळ काढली? काका- तुझं मराठी थोडं कच्चं आहे, म्हणून तुझा गैरसमज होतो आहे. कळ लावणं आणि कळ काढणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कधी कळ काढायची आणि कधी कळ लावायची, हे कळणं म्हणजेच राजकारण कळणं. ते नागपूरकर बघ कसे शांत राहून कळ काढत आहेत. पुतण्या- नागपूरकर? त्यांचा काय संबंध? आपण त्यांच्याशी कुठं चर्चा करत आहोत? काका- (चेहऱ्यावर हास्य) तुला म्हटलं ना विचार दिसत नसतात, ते फक्त असतात. चल, बैठकीची वेळ झाली आहे. ते प्रवक्ते आता बरे आहेत का? त्यांना भेटून ये एकदा. पुतण्या- बरं, बघतो. (त्या नंतरचा पंधरावा दिवस) पुतण्या- शिजला का डोक्यातला विचार? काका- हो, मी काल दिल्लीत कोणाकोणाला भेटलो ते माहिती आहे ना? पुतण्या- हो..मॅडमना.. काका- ते सोड रे पुतण्या- त्यांचे ते विश्वासू सहकारी... काका- तेही सोड रे... पुतण्या- मग...ते तुमचं बोट धरून जे राजकारण शिकले ते.... काका- तोंडावर बोट ठेव आधी, तोंडावर बोट ठेव..कधी शिकणार आहेस तू या साध्या साध्या गोष्टी? पुतण्या- बरं ठेवलं. आता सांगा, शिजलं? काका- (मिश्किल, हसऱ्या चेहऱ्यानं पुतण्याकडे पाहतात आणि मग आतल्या खोलीकडे पाहून आवाज देतात) अहो, ऐकलंत का? माझा तो खंजीर पाठवाल का जरा.. (आतून एक जण खंजीर घेऊन येतो. त्याकडे मोठ्या कौतुकानं पाहात त्यावर चढलेला गंज काका हळूवार बोटांनी साफ करतात, फुंकर मारून धूळ झटकतात आणि तो प्रेमानं दोन्ही हातात धरून पुतण्यासमोर धरतात. पुतण्याही तो तेवढयाच सन्मानानं, प्रेमानं दोन्ही हातांनी स्वीकारतो आणि कपाळाला लावतो) काका- काय करायचं आहे ते आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. काही निवडक साथीदारांना घेऊन तुम्ही कात्रजच्या घाटातनं निघा, मी वेगळ्या मार्गानं येऊन पुढे तुम्हाला गाठतो. (पुतण्याच्या डोळ्यांत पाणी, तो काकांच्या पाया पडतो) काका- नाव राखशील माझं.. पुतण्या- काय निरोप सांगायचा आहे त्यांना? काका- काय सांगायचा तो मी सांगितला आहे. तुम्ही फक्त ठरल्याप्रमाणे वेळेवर पोहोचा म्हणजे झालं. (पुतण्या निघतो) काका- आणखी एक, मी तुझ्याविषयी जगापुढे काय काय बोलेन, ते मनावर नाही घ्यायचं. पुतण्या- (मनातल्या मनात) ते मी आधीही घेत नव्हतो. (वरकरणी) हो, लक्षात ठेवतो. काका- (वरकरणी) जा, गुणवंत व्हा. (मनातल्या मनात) आम्हा घरी शब्द, धनाचीच रत्ने... पुतण्याच्या खिशातला खंजीर- (मोकळ्या हवेत श्वास घेत) ४१ वर्षे वाट पाहून पाहून, अखेर मी पुन्हा आलो, मी पुन्हा आलो, मी पुन्हा आलो... To be continued…(प्रवेश दुसरा) ********** तंबी दुराई

तंबी दुराई

प्रतिक्रिया

  1. sdmulye

      4 वर्षांपूर्वी

    भयंकर खुसखुशीत आणि अगदी समयोचित....!!!👍👍

  2. Kalpana Pradhan

      4 वर्षांपूर्वी

    संवाद खुसखुशीय

  3. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    वाह वाह.... पूर्वी एक फुल दोन हाफ लोकसत्ता मध्ये दर रविवार लिहिणारे. श्रीकांत बोज्जेवार.. ग्रेटच... तंबी दुराई.... हे आपले topan नाव

  4. gadiyarabhay

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम. फारच छान

  5. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    मस्त

  6. pushpak63

      5 वर्षांपूर्वी

    छान



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen