राहू सारे दक्ष...

संपादकीय    संपादकीय    2020-01-01 10:10:17   

नवे शतक आज वयात येत आहे, म्हणजे २१ व्या शतकाची १९ वर्षे संपून ते २०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या शतकाची पौंगडावस्था संपवून त्याला तारूण्याची झळाळी देण्यास सरसावलेल्या नव्या वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !! डिजिटल युगाचे बोट धरुन, भूतकाळातले अक्षरवैभव जतन करण्याच्या, उत्तम ते पुनरूज्जीवित करण्याच्या आमचा प्रयत्नात सहभागी झाल्याबद्दल आपणा सगळयांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार. जुन्या आणि उत्तम लेखांची पुनर्भेट घडवताना पुनश्च हा शब्द सुचला होता आणि आमच्या गेल्या दोन-अडीच वर्षांच्या प्रवासात लक्षात आलं की, हा शब्द आता आपल्या एकूण मनोव्यापारालाच चपखल लागू होतो आहे. जुनी चित्रपटगीते, भावगीते ही तर सदैवच आपले भावविश्व व्यापून होती, परंतु इतरही अनेक अर्थांनी ‘स्मरणरंजन’ अर्थात भूतकाळाचे स्मरण हा शब्द गेल्या काही वर्षात परवलीचा बनलेला आहे. स्मृतिआड गेलेले जुने मित्र फेसबुकमुळे पुन्हा समोर आले; व्हॉट्सअॅपमुळे अशा मित्रांचे ग्रुप्स तयार झाले. कधी न भेटलेले नातेवाईक आवर्जून मोबाइलच्या स्क्रीनवर शुभेच्छांची फुले पाठवू लागले. आपल्या जगण्यात, आपल्या व्यवहारात नेहमीच एक गंमतीदार विरोधाभास असतो. एकीकडे आपण ‘जुने ते सोने’ समजतो आणि त्याचवेळी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ असेही सांगतो. ‘पुनश्च’ ला आम्ही या दोहोंचा सुवर्णमध्य म्हणतो. संत कबीर म्हणतात, ‘साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय, सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय’- ‘सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडताना कचरा बाजूला करुन धान्य तेवढं बाजूला करुन देतं, अशा संतांची जगाला गरज आहे.’ तर साहित्याच्या प्रचंड पसाऱ्यातून असं सत्व पाखडून वाचकांना देण्यातला हा आनंद आम्ही सध्या घेतो आहोत. याच भावनेचा पुढला आविष्कार म्हणून ‘बहुविध डॉट कॉम’ हा पुनश्चचा विस्तार आम्ही केला. त्यातलं साहित्य निवडतानाही तीच कसोटी लावली, उत्तम ते निवडून देणारी माणसं आपल्या परिघात सामील व्हावीत. तशी ती होत असल्याचं तुम्ही पाहात आहातच. त्यातले बदल तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगतो, सांगत राहू. परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हा सर्वांशी मुक्त संवाद व्हावा यासाठी दर पंधरा दिवसांनी हे संपादकीय देत राहू. या संवादाला विषयाचं बंधन नसेल मात्र तो कालसुसंगत नक्कीच असेल. आता आपल्या या पहिल्याच संवादात, नवीन वर्षांच्या उत्साही वातावरणात गंभीर विषय टाळायचं ठरवलं आहे. तसं एरवी सुद्धा सहज गप्पा मारल्यासारखा हा पाक्षिक संवाद असेल याबाबत आम्ही दक्ष राहू, आणि तुम्हीही राहा.  ** आता दक्ष हाच शब्द ओघात आला आहे तर त्याचाच थोडा किस पाडू या. हल्ली अगणित कारणांमुळे आपल्याला विविध प्रकारे दक्ष रहावं लागतं. आपण दक्ष नसलो तर पावलापावलावर आपली फसगत करण्यासाठीचे भूसुरुंग पेरलेले असतात, जे आपल्याला साध्या नजरेनं दिसत नाहीत. परंतु राहून राहून आपण दक्ष तरी किती राहणार? सदा सर्वकाळ, चोविस तास तर आपण सावध राहू शकत नाही, त्यामुळे आपण कधीतरी फसतोच! ‘एकावर एक फ्री’च्या भूसुरुंगावर पाय पडून त्या स्वस्ताईच्या स्फोटात जखमी झालेले काही ग्राहक जूनाट शर्ट नवे म्हणून घालतात, फ्री मिळाले म्हणून खांदे पडलेले शर्ट वापरतात. अनेकदा वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कुणाला तरी देऊन टाकतात. पुढे कधीतरी त्याची घडीही न मोडता, कंपनीच्या टॅगसह आणि मेड इन युकेच्या शिक्क्यासह तो शर्ट त्याच्या विद्यमान मालकाच्या कपाटातून आणखी कोणाकडे तरी गिफ्ट म्हणून जातो. आता या व्यवहारात कोणी कोणी आणि किती किती बरं दक्ष रहायचं? कितीही दक्ष रहायचा प्रयत्न केला तरी हमखास फसवणूक होण्याचं आणखी एक क्षेत्र म्हणजे डाएटिंग उर्फ आहारनियंत्रण. सध्या या क्षेत्रात जेवढा गोंधळ असेल तेवढा भारताच्या अर्थव्यवस्थेतही नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपल्याला माहिती आहे परंतु व्यक्ती तेवढ्या डाएटच्या पद्धती हे आत्ता आत्ता आपल्याला कळू लागलेलं आहे. कुठेही आणि कोणीही आपल्याला ‘मी नाही खाणार आत्ता, माझ्या वेळा ठरलेल्या आहेत खायच्या’ असं म्हटलं की समोरचा त्याला एक गुढ लूक देतो आणि हळूच विचारतो, ‘काय, दीक्षित का? ' सध्या डॉ. जगन्नाथ दीक्षितांना माधुरी दीक्षितपेक्षा अधिक TRP असल्याने दीक्षित एवढा एकच शब्द पुरेसा असतो. तुम्ही एकदा डाएटची आणि दीक्षितांची कबुली दिली, की समोरची व्यक्ती आपली प्रवृत्ती दाखवते आणि तिचं रुपांतर सल्लागारात होते. "अरे, दोन वेळा जेवून उलट त्रास होतो. खरं तर किमान तीन वेळा खायला हवं. आणि तू ताक पीत जा भूक लागेल तेंव्हा, माझ्या आत्तेभावाचं वजन ११० होतं, ताक पिऊन पिऊन त्यानं ते ८५ वर आणलं." आता ताक फुंकून फुंकून प्यायचं असतं हे आपल्याला माहिती असतं त्यामुळे आपण मूग गिळून गप्प बसतो. परंतु तरीही डाएट दक्ष म्हणून आपली बदनामी होते ती होतेच. तर, अशा ‘सल्लादक्ष’ लोकांकडून एवढे बहुरंगी आणि बहुढंगी सल्ले ऐकून घ्यावे लागतात, एवढं करुन त्या कष्टाचं ‘फळ’ मिळेल याची काही गॅरेंटी नसतेच. एक कॅटेगरी असते, आर्थिकदक्ष लोकांची. ते हळूच विचारतात, ‘काही एसआयपी वगैरे आहे की नाही?’ त्यांना तुम्ही चुकून एसआयपी म्हणजे काय’ असा प्रश्न विचारला तर ते एवढी माहिती दिली की, त्या माहितीच्या बळावर आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरसुद्धा होऊ शकतो. या सर्वांपेक्षा धोकादायक असतात ते 'स्व' दक्ष लोक. हे लोक एक वाक्य कायम ऐकवत असतात, ‘आपला स्वभाव त्याला माहिती नाही, आपण चांगले आहोत तोपर्यंत चांगलो आहोत, एकदा आपलं डोकं तापलं की मग त्याला महाग पडेल!’ आपण म्हणजे कोणी तरी खास आहोत, सर्वांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्यासारखे तर केवळ आपणच आहोत, असं त्यांना वाटत असतं. शिवाय या व्यक्ती बहुधा स्वतःचा उल्लेख आदरार्थी बहुवचनी करत असतात. विषय कुठलाही असो, त्यातलं ब्रम्हवाक्य आपलंच असायला पाहिजे, असा यांचा हट्ट असतो. ‘आपल्याला बुवा असं हवं’, ‘आपल्याला बुवा हे पसंत नाही’, ‘आपल्याला बुवा ते चालणार नाही’ हे सांगण्यातच यांची अर्धी हयात गेलेली असते. अशा स्वदक्ष व्यक्ती आसपास असतील तर आपण थोडं दूर जाऊन थांबावं. एखाद्या गोष्टीत दक्ष असलेली माणसं परवडली, दक्ष राहण्यासाठी झपाटलेलीही परवडली, परंतु या ‘स्व’दक्ष माणसांचा ‘स्व’ एवढा मोठा असतो की त्याचा फुगलेला फुगा आपल्याला सतत दिसत राहतो आणि त्याला टाचणी मारायची तीव्र इच्छा आपल्याला सतत होत राहते. तर नव्या वर्षात अशी दक्ष माणसे तुमच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी शुभेच्छा... ** शेवटी पुन्हा एकदा कबीराचा हात धरू. कबीर म्हणतो, जब गुण को ग्राहक मिले, तब गुण लाख बिकाई। जब गुण को गाहक नहीं, तब कौड़ी बदले जाई। वस्तूचं महत्व कळणारा माणूस समोर असेल तरच त्या वस्तूला महत्व आहे. आम्ही पुनश्च आणि बहुविधमधून जे करत आहोत, त्याचं महत्व तुम्हाला कळलं म्हणूनच पुनश्चच्या अस्तित्वाला अर्थ आहे.

संपादकीय

प्रतिक्रिया

  1. Tanu

      5 वर्षांपूर्वी

    'स्व' ची माहिती छान दिली आहे.

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    उत्तम

  3.   5 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख

  4. asmitaph

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख.

  5. pjanaokar

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख. वाचनीय.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen