सृजन आणि स्त्री

संपादकीय    संपादकीय    2020-03-08 10:00:27   

स्त्रीमुक्ती... स्त्री-पुरुष समानता.... स्त्री ही आदिशक्ती आहे असे सांगणे.... स्त्रीची विविध रूपे दाखवणे..... स्त्रीचे समाजातले स्थान अधोरेखीत करणे...... अशा अनेक अंगांनी आपण दरवर्षी ८ मार्चच्या सुमारास वैचारिक रवंथ करत असतो. परंतु आपण तो केला अथवा न केला तरीही स्त्री ही निसर्गाची एक अमोघ व्यवस्था आहेच. पुरुषाला जसे तिच्याशिवाय पूर्णत्व नाही आणि तसे स्त्रीलाही पुरुषाशिवाय पूर्णत्व नाही ही वस्तुस्थिती आहे. दोघे एकत्र आल्याशिवाय मानववंश पुढे चालू राहणार नाही हे दोघांनाही माहिती आहे. मुक्ती, अन्याय, अत्याचार हा स्त्रीभोवती केंद्रीत झालेला सगळा अभिव्यक्ती आविष्कार म्हणजे केवळ सत्तेचा खेळ आहे, ताकदीचा खेळ आहे. एरवी, सृष्टीच्या रचनेत दोघांना निसर्गाने समान अधिकार दिलेले आहेत. सृजनासाठी, नवनिर्मितीसाठी दोघांचेही परस्पर सहकार्य लागते. सगळे काही पुरुषसत्ताक असल्याचे दिसत असले तरीही सृजनाच्या प्रक्रियेत कळीची भूमिका स्त्रीकडेच असते. पशू-पक्ष्यांमध्ये, किटकांमध्ये ज्याप्रमाणे मादीला आकर्षित करण्यासाठी नरांमध्ये स्पर्धा असते, मादीला वश करण्यासाठी ‘नर’ मंडळी विविध क्लुप्त्या करत असतात, स्वतःचे श्रेष्ठत्व मादीवर ठसावे म्हणून स्पर्धा करत असतात तेच सर्व नरमनुष्यही करत असतो. कारण आपण मानव भले स्वतःला इतर जीवसृष्टीच्या तुलनेत वरचे स्थान देत असू, त्याच्या बुद्धीचे-प्रगतीचे गोडवे गात असू, मात्र  निसर्गाच्या नजरेत कीडा-मुंगी आणि मनुष्य यांच्यात काही फरक नाही. मनुष्याकडे तो आपली एक निर्मिती म्हणूनच पाहात असतो. पक्ष्यांमध्ये मादीला आकर्षित करण्यासाठी काय काय केले जाते हे पाहिले तर माणूस आणि पक्षी-प्राणी यांच्यात काहीही फरक नाही हे लगेचच स्पष्ट होते. शास्त्रज्ञांच्या निरिक्षणानुसार नरपक्षी मादीला आकर्षिण्यासाठी मुख्यतः पाच अस्त्रांचा वापर करतो. मधुर आवाजात गाणे, आपले सौंदर्य- शक्ती यांचे प्रदर्शन करणे, नृत्य करणे, नकळत स्पर्शातून भावनांचे सूचन करणे, उत्तम अन्न आणून देणे, देखणे घरटे बांधण्याच्या कौशल्याचे प्रदर्शन करणे. आता ही सर्व कौशल्ये माणसाकडेही लागतातच. हत्तींमध्ये, हरणांच्या टोळ्यांमध्ये, माकडांच्या टोळ्यांमध्ये मादीसाठी कसा संघर्ष होतो आणि अखेर बलवान, शक्तिशाली नर तिला कसा प्राप्त करुन घेतो, किंवा तीच त्याची निवड कशी करते हे तर आपण अनेकदा वाचले आहे. या सर्व प्रक्रियेत मादी अत्यंत महत्वाची असते, कारण सृजन ही केवळ एक क्रिया नाही, तर आनंदाने करावयाची क्रिया आहे. या आनंदात मादीला ‘प्राप्त’ केल्याचे सुख नराला झिंग आणत असते तर मादीच्या दृष्टीने ‘मी त्या नराला हे सुख सहजासहजी मिळू दिलेले नाही’, याचे समाधान असते. दोघांच्याही अशा समागमातूनच सजीव सृष्टी पुढे वाटचाल करत असते. मनुष्यातही याच दोन भावनांचा आविष्कार सहसा घडत असतो याची प्रचिती आपल्याला आपली पुराणे, साहित्य, लोकसाहित्य, चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमांमधून सतत येत असते. पुराणांकडे पाहण्याची एक विशिष्ट भक्ती-आदरयुक्त नजर परंपरेने आपल्याला दिलेली असते. मात्र त्या पलिकडे जाऊन विचार केला तर नर-मादी, पुरुष-स्त्री या आदिम आकर्षणाचा समान धागा सगळीकडे दिसू लागतो. एकमेकांवर आपार प्रेम असलेल्या पाच भावांमध्ये भांडणे होतील अशा धास्तीमुळे कुंतीला द्रौपदीची वाटणी पाच भावांमध्ये करावी लागली, यावरुन द्रौपदीच्या सौंदर्याची  कल्पना आपल्याला येतेच. पण निसर्गानं पुरुषांत स्त्रीसौंदर्याचं आकर्षण किती कमालीचं खोल पेरुन ठेवलेलं आहे याचाही हा पुरावा आहे. समागमाच्या क्रियेचा उल्लेख करताना नेहमीच ‘कर्त्या’ची भूमिका पुरुषाकडे दिली जाते. परंतु या क्रियेसाठी ‘ती’ची संमती असणे, ‘ती’ने पुढाकार घेणे, ‘ती’ने वश होण्यापूर्वी नराकडून काहीबाही कृती करुन घेणे, सहजपणे राजी न होणे, असे अनेक पदर त्या क्रियेला असतात. त्यामुळे कर्त्याची भूमिका हा केवळ पुरूषी अहं सुखावून घेण्याचा एक प्रकार आहे, प्रत्यक्षात कर्त्याची भूमिका स्त्रीकडेच असते, हे लक्षात येईल. पुराणांकडून आपण लोकसाहित्याकडे वळलो तरी हेच दिसतं. ‘उंच माडीवरती चला, भोग द्या मला, मी ग रायाच्या बसते की डाव्या बाजूला...’ या लावणीत पुरुषाची निवड तिनं स्वतः केली आहे, आणि ती भोग ‘घ्या’ म्हणत नाही तर भोग ‘द्या’ म्हणते आहे. 'मुखसे ना बोलो कान्हा, बाजुबंद खोलो...' ही यमुनाबाई वाईरकरांची एक प्रसिद्ध हिंदी लोकरचना होती. त्यातही प्रणयाची सूत्रे स्त्रीकडे आहेत आणि काय कृती करावी ते ‘ती’ सांगत आहे. आपल्या साहित्यात तर याची उदाहरणे लाखोंनी सापडतील. पुरुषाचे सामर्थ्य, ताकद स्त्रीच्या मनोबलापुढे कसे शून्य ठरते, त्या बाबत मर्ढेकर म्हणतात, ‘येशील तेंव्हा जपून ये, ठिसूळ माझ्या पहा बरगड्या, आलिंगन तू देता मजला कडकडुनी, ह्या पिचतील निधड्या.’ ग्रेसही आपल्या कवितेत, ‘तरी तुझ्या कुशीचा रंग, शरिरावर माझ्या उमटे’ असं म्हणतात. पुरुष भले बलवान असो, कुशीचा रंग उमटतो तो स्त्रीचा आणि कूस उजवली जाते तीसुद्धा स्त्रीचीच. आरती प्रभूंनीही त्यांच्या कवितेत प्रश्न विचारला होता, ‘काय नराच्या बेंबीमधूनी, द्रवेल केंव्हा धुंद कस्तुरी?’ साहित्यातील पुरुष व्यक्तिरेखांचा स्वतंत्र अभ्यास सहसा कोणी करत नाही, परंतु महाभारत, रामायण आणि भारतीय-जागतिक साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखा हा सतत चिंतनाचा विषय होत असतो. नोरा, सिंधू, गीता, चंपा, अंबिका प्रत्येक व्यक्तिरेखेचा कंगोरा स्त्रीच्या अद्भभूत क्षमतेचे वेगळे वैशिष्ट्य सांगत असतो. चित्रपटांमध्ये डिसिकाच्या ‘टू विमेन’मधून स्त्रीचे दिसलेले रूप पाहिल्यावर तिला अबला म्हणण्याची कोणी हिंमतच करणार नाही. आपण जेंव्हा इतिहास खंगाळतो तेंव्हा चकीत होतो आणि स्त्री समजून घेण्यात कमी पडलो आहोत हे लक्षात येतं. आम्ही ‘पुनश्च’मधून गेल्या शंभर दीडशे वर्षातील उत्तम लेख निवडत असताना तर वारंवार स्त्रीच्या सर्जनशीलतेचा प्रत्यय येतो. अंबिकाबाई दांडेकर, दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे, शांताबाई शेळके...मोठी यादी आहे. तर, हा इतिहास असाच खंगाळत, धुंडाळत राहू. भूतकाळाच्या उजेडात वर्तमान पाहात राहू. महिला दिन येईल-जाईल, निसर्गानं नेमून दिलेल्या सृजनाच्या सोहळ्याची ती अनुपम व्यवस्था आहे आणि त्यात कोणी उणे-अधिक नाही याचे भान असू द्या. ********** [ पुन्हा पंधरा दिवसांनी संपादकीयमध्ये नवीन विषयांसह भेटूच. तोवर हा पाक्षिक संवाद, भला-बुरा कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवा. ]

संपादकीय , स्त्री विशेष

प्रतिक्रिया

  1. Gajanan Jadhav

      3 वर्षांपूर्वी

    खुप छान लेख. अजून विस्ताराने असता तर समाधानाची पातळी व त्यातून मिळणारा आनंद वाढला असता.

  2. shubhadabodas

      4 वर्षांपूर्वी

    स्त्री किती श्रेष्ठ वगैरे गोडवे गायले तरी पुरुषी मग्रूरीपुढे ती हतबल ठरते. सगळ्या सिरियल्स हेच दाखवत आहेत.

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    Khup chan!

  4. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    लेख फार छान

  5. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    स्त्री अबला नसून पुरुषाला स्त्री प्रत्येक क्षणाला आवश्यक आहेच असे माझे वयक्तिक मत आहे

  6. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे . आवडला . थोडा संक्षिप्त वाटला

  7. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    Khup khup chan

  8. Tanu

      4 वर्षांपूर्वी

    स्त्री ही अबला नसून निसर्गाची एक अमोघ व्यवस्था आहे हे अनेक सुंदर उदाहरणांनी सांगितले आहे.

  9. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    पाक्षिक संवाद छानच वाटतोय.

  10. Kadganche

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख

  11. किरण जोशी

      5 वर्षांपूर्वी

    मला वाटतं स्त्री पुरुष समानतेच्या विषयातल्या मर्मावर मा.सम्पादकांंनी अचूक बोट ठेवले आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen