कोरोना आणि नॉरमॅलिटी उर्फ सामान्यत्व

संपादकीय    संपादकीय    2020-10-07 15:14:20   

आपल्या जगण्यात सामान्यत्व जपणे ही माणसाची मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे कितीही मोठे संकट असो, आपत्ती असो किंवा अगदी जिवलगांच्या अपमृत्यूचा आघात असो, हे सर्व मागे टाकून पुन्हा सामान्य जीवन जगायला सुरुवात करणे हा मानवाचा स्वभावधर्मच असतो. दरवर्षी जगात ठिकठिकाणी महापूर, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी अशा नैसर्गिक आपत्तींना माणूस तोंड देत असतो. साथींचे रोग तर त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. म्हणूनच बाळाच्या पाचवीला त्याला लसी टोचल्या जातात. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारतातील प्लेगचा कहर, १९२० च्या सुमारास युरोपात आलेली इन्फ़्लूएन्झा व्हायरसची लाट, किंवा अलीकडे स्वाईन फ्लूने उडवलेला हाहाक्कार आठवत असेल तर अक्षरशः लक्षावधी लोकांचे प्राण या रोगांनी घेतलेले आहेत. मात्र तरी त्या त्या वेळी रोगांची लागण काही देशांपुरती किंवा काही भागांपुरती मर्यादित होती. कोरोना मात्र असा अभूतपूर्व रोग आहे की अपवाद वगळता, तो संपूर्ण जगावर परिणाम करणारा ठरतोय. कोरोनामुळे झालेली आरोग्यहानी आणि जीवितहानी यांची किमान मोजणी तरी करता येईल. पण त्या जोडीने जगाचे आणि विशेषतः आपल्या देशाचे जे अपरिमित आर्थिक नुकसान होत आहे त्याची मोजदाद करणेही तूर्तास अशक्य आहे. याचे कारण सात महिने होवून गेल्यावरही हे संकट संपलेले नाही, आणि पुढे किती काळ ते सुरु राहील याबद्दल कुणीही ठामपणे सांगू  शकत नाही. महापूर किंवा भूकंपांनी कितीही हानी केली तरी त्यांना एक कालमर्यादा असते. इथे मात्र सगळंच अनिश्चित दिसतंय. म्हणूनच कोरोनाला आजवरची सर्वात मोठी नैसर्गिक(?) आपत्ती म्हणावे लागेल. मात्र सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे त्यातही सामान्यत्व प्राप्त करणे ही आपली सामाजिक प्रेरणा आपण विसरलेलो नाही. कोरोनाच्या धक्क्याचा सुरुवातीचा काही काळ ताणाचा होता. पण १४ जूनला मुंबईत एका चित्रपट नायकाचा मृत्यू झाला आणि भारतीयांना पहिली संधी मिळाली. वरकरणी एक सामान्य आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेचे एवढे राजकारण झाले की काही टीव्ही वाहिन्यांनी अन्य सर्व बातम्यांना फाटा देऊन २४×७ हे प्रकरण चालवत ठेवले. राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार, मुंबई पोलीस विरुद्ध सीबीआय, या गदारोळात समाजाला काही काळ कोरोनाचाही विसर पडला. मग याच प्रकरणातून हिंदी चित्रसृष्टीतील ड्रग्ज माफिया, त्यात अडकलेले सितारे यांचे दळण दळले गेले. जणू यापूर्वी असे काही नव्हतेच, अशा आविर्भावात हेही प्रकरण तापवले गेले. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की आज चार महिने झाल्यावरही ती आत्महत्या होती की खून याबद्दल वाद चालू आहेत. राजकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार बिहारमधील निवडणुकांपर्यंत हे प्रकरण असेच अनुत्तरीत आणि तापलेले राहील. एका बाजूला हे चालू असताना ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिराचा शिलान्यास झाला आणि धर्मभावनेने सर्व समाज भारून गेला. मूलतः राममंदीर प्रश्न वादग्रस्त असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच हा सोहळा पार पडल्याने त्याविरोधात बोलायला फारसा वाव नव्हता. त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी सुद्धा या घटनेचे स्वागत केले. मात्र तरीही कोरोनाच्या संसर्गाची भीती असताना शिलान्यास करणे गरजेचे होते काय वगैरे विसंवादी युक्तिवाद  झालेच. यात देखील गंमत अशी की आषाढी एकादशीला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सपरिवार पंढरपूरला जाऊन विठोबाची पूजा केली तेव्हा मात्र याच विरोधकांना कोरोना वगैरेचा सोयीस्कर विसर पडला होता. थोडक्यात हे सर्व राजकारण सुद्धा सामाजिक स्थिती नेहमीच्या सामान्यत्वाला येण्याचे लक्षण म्हणावे लागेल. त्यानंतर आयपीएलच्या रूपाने कोरोनापिडीत जनतेला मनोरंजनाचे सामान्यत्व बहाल करण्याची जबाबदारी आपल्या क्रिकेट बोर्डाने स्वीकारली. पण भारतात लाखांमधील रुग्णसंख्येचा विचार करता यंदाचा हंगाम इथे भरवणे अशक्य होते. त्यामुळे दुबई-शारजा-अबुधाबी येथे आयपीएलचे सामने भरवायचे ठरले. सुरुवातीला तिथे प्रेक्षक स्टेडीयमवर येऊ शकतील असा आयोजकांचा अंदाज होता. मात्र तेथील सरकारने सद्य परिस्थिती बघून ती परवानगी नाकारली. आणि मग प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत रिकाम्या स्टेडीयमवर सामने सुरु झाले. कारण टीव्हीवर सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा अट्टाहास पूर्ण करणे आवश्यक होते. मग वातावरण निर्मितीसाठी काही विनोदी मालिकांत जसे खोटे हशे वगैरे पेरलेले असतात तसेच इथे पार्श्वभूमीवर खोट्या टाळ्या आणि प्रेक्षकांच्या आवाजाचा हास्यास्पद प्रयोग करण्यात आला. जो अर्थात अजूनही चालू आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. लोकांची सामान्यत्वाची प्रेरणा, याखेरीज दुसरे काय म्हणणार याला? हे सर्व घडत असताना १५ दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित मुलीवर क्रूर अत्याचार करून तिचा अमानुष खून झाल्याची अत्यंत उद्विग्न करणारी घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे नातेवाईकांकडे मृतदेह न सोपवता पोलिसांनी परस्पर तिचा अंत्यसंस्कार पार पाडला. मग आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या. राजकारणाने कळस गाठला. तिची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना स्थानिक पोलिसांनी धक्काबुक्की केली. खुनापूर्वी बलात्कार झालेलाच नाही असा अहवाल बाहेर आला. जणू बलात्कार न होणे हीच समाधानाची गोष्ट असावी. यातील सर्वात भयावह भाग म्हणजे उत्तर प्रदेशात आरोपींच्या समर्थनार्थ उभे राहिलेले राजकीय पक्ष आणि जातपंचायती. इतक्या गंभीर प्रकरणात देखील न्यायाच्या बाजूने समाजात एकमत नसावे, ही किती चिंताजनक गोष्ट आहे, याचा दुर्दैवी प्रत्यय भविष्यकाळात आपण घेणार आहोत. अर्थात मुंबईतील प्रकरणाप्रमाणेच यातून काय काय बाहेर येईल याचा तूर्तास अंदाज नाही. किंबहुना घटनेमागील वास्तव कधी जनतेसमोर येईल का, हेही सांगणे कठीण आहे. मात्र देशभर पेटलेल्या वातावरणामुळे जनतेला कोरोनाचा काही काळ विसर पडला आहे हे निश्चित. महाराष्ट्रात परवा ५ ऑक्टोबर पासून सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. सुयोग्य निर्बंधांचे पालन करून याचा वापर केला गेल्यास हॉटेल मालक, त्यांचे हजारो कर्मचारी आणि अर्थातच ग्राहक या सर्वांसाठी हा निर्णय अतिशय दिलासा देणारा असेल. सामान्यत्व प्राप्त करण्याची समाजाची धडपड खरी करणारी ही एक अपवादात्मक सकारात्मक घटना म्हणता येईल. या सर्व भानगडीत आपल्या वाचकांच्या सामान्यत्वाचे काय ? हॉटेल्स सुरु झाली मात्र राज्यातील ग्रंथालये अद्याप बंद आहेत. ती चालू झाली की सुटकेचा एक मोठा निश्वास वाचनप्रेमी टाकतील. बहुविध.कॉमच्या विश्वसनीय सूत्रांनुसार ग्रंथालयांचा निर्णयसुद्धा येत्या काही दिवसांत होणार असल्याची खात्रीलायक बातमी आहे. पुढील पंधरवड्यात पुनश्च भेटूच. तोवर सर्वांनी आपली आणि कुटुंबियांची काळजी घ्या. गाफील राहू नका आणि मुखपट्टीचा वापर सोडू नका. पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा ग्रंथालये सुरु झाली असतील या सकारात्मक आशेवर आपली रजा घेत आहोत.

संपादकीय

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    hello, very good read...

  2. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    . Best

  3. anantrao

      4 वर्षांपूर्वी

    सामाजिक वातावरणाची आठवण करुन दिली आहे. तरी कृषी विधेयक, कांदा निर्यात बंदी, आणि आरक्षण आंदोलन बाकी राहिले. अर्थात करोना काळातील याही घडामोडी आहेत.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen