आता शिक्षणविषयक आणीबाणीची परिस्थिती !


अंक: जडण-घडण, जुलै २०२१ 

संपादकीय

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं अखंड देशभरातच नव्हे तर जगभरात अक्षरशः हाहाःकार माजवला. गाफील राहण्याच्या आपल्या भारतीयांच्या पारंपरिक रक्तदोषामुळं तर आपल्या देशात या दुसर्‍या लाटेचा जो तडाखा बसला, तोही कल्पनेपलिकडचा! त्यातच अजून आता तिसर्‍या लाटेची भीती! या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपल्याला काही सामूहिक शहाणपण आल्याचं सार्वत्रिक चित्र दिसत नाही. सरकारातले मंत्री एका बैठकीत गर्दी करू नका असं शहाणपण लोकांना सांगतात आणि त्या बैठकीनंतर आपल्या पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शेकडो कार्यकर्त्यांच्या जमावात सहभागी होतात. आपणच केलेले कायदे, आपणच जाहीर केलेले निर्बन्ध हे आपल्यासाठी नसतातच बहुधा! ते फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच असतात, अशीच जणू या मंडळींनी मंत्रीपदाची शपथ घेताना प्रतिज्ञा केली असावी असं चित्र देशात, महाराष्ट्रात, पुण्यात कुठंही पाहायला मिळतं. आरोग्य व्यवस्थेची धूळदाण उडावी अशी कोरोनामुळं उद्भवलेली परिस्थिती पाहता देशात आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करावी असं चित्र आहे. (तरीही पुन्हा सरकार आणि समाजाच्या पातळीवर सामूहिक शहाणपणाचा अभावच!)

अशीच आणीबाणीची परिस्थिती आता शिक्षणक्षेत्रातही दिसून येत आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठसाहित्यिक, माजी प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी जाहीरपणे तसं मतही व्यक्त केलं आहे. ते प्रातिनिधीक म्हणावं लागेल. अनेकांच्या मनातल्या भावनाच त्यांनी बोलून दाखवल्यात. डॉ. लवटे हे ‘जडण-घडण’चे संपादकीय  सल्लागार आहेत. आपल्या अनेक लेखांमधून ते आपली भूमिका स्पष्टपणे आणि त्याबाबतची उदाहरणं, पुरावे आणि उपायांसह नोंदवत असतात. यावेळीही त्यांनी तशीच अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा कितीही बोलबाला झाला असला (किंवा त्याला सध्या पर्याय नाही असं म्हटलं जात असलं) तरी, त्यामुळं शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी म्हणायचे त्याप्रमाणं ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही दरी तशीच राहिली आहे, वाढली आहे असं दिसून येते. ऑनलाईनच्या सुविधा आणि उपलब्धता असणारा एक वर्ग आणि त्या सुविधांचा अभाव असणारा एक वर्ग अशी ही सरळसरळ विभागणी झालेली दिसते. विशेषतः ग्रामीण भागात तर इंटरनेटची कनेटिव्हिटी पुरेशा प्रमाणात नसल्यानं, स्मार्ट फोन नसल्यानं आणि ऑनलाईन शिक्षण देण्या-घेण्याचं प्रशिक्षण नसल्यानं, मुळातच आपल्याकडं स्वाध्याय पद्धतीनं संकल्पना समजावून घेऊन शिक्षण घेण्याची पद्धतच मोडीत निघाल्यानं, शिक्षण आणि करिअर देखील ‘फास्ट फूड’ प्रमाणंच रेडिमेड मिळावं - मग त्यासाठी लागेल तो पैसा टाकावा हीच संसर्गजन्य स्थिती सार्वजनिक स्वरूपात बोकाळल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

सर्वदूर तळागाळातील परिस्थितीचं पुरेसं अवलोकन करून त्यानुसार निर्णय घेण्याऐवजी प्रशासकीय अधिकार्‍यांची परिपत्रकांचे रतीब घालण्याची हौस काही कमी होत नसल्यानं या शैक्षणिक आणीबाणीची तीव्रता आणखी वाढत चालली आहे. परीक्षा घ्याव्यात की नाहीत ? हे वर्षभराच्या कोरोनात्तर परिस्थितीचा अनुभव पाठीशी असतानाही सरकारला पुरेसा घोळ घातल्याशिवाय ठरवता येत नसेल तर मग खात्याच्या इतर उपक्रमांची काय कथा ? शिक्षकांच्या नेमणुका, त्यातले घोळ आणि गैरकारभार, गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयीची तळमळ नसलेल्या अधिकारी मंडळींचा भरणा, बदलत्या जागतिक परिस्थितीचा आणि त्यानुसार शिक्षणक्षेत्राकडं पाहण्याचा आवाका नसलेले धोरणकर्ते आणि त्यांचे सल्लागार अधिकारी... आणि ‘आम्हाला काय त्याचे? आपण फक्त परिपत्रकं अमलात आणावीत’ अशीच भूमिका घेणारे बहुतांशी ‘मानडोलवे!’ त्यामुळं डॉ. लवटे म्हणतात त्याप्रमाणं खरोखरीच शैक्षणिक आणीबाणीची परिस्थिती दिसून येते. सरकार ती अधिकृतपणे जाहीर करत नाही इतकंच!

अशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत सरकार, परिपत्रकं, मंत्र्यांच्या घोषणा या सर्वांच्या पलिकडं जाऊन लक्षावधी शिक्षक, बंधू-भगिनींनीच आपापली सदसद्विवेकबुद्धी पणाला लावावी, आरोग्यविषयक सर्व नियम पाळून विद्यार्थी-हितासाठी प्राप्त परिस्थितीत आपल्याला जे जे करता येणं शय आहे ते ते सर्व करावं असं आमचं आवाहन आहे. अनेकजण तसं काम करतही आहेत. बाकीच्यांनाही परमेश्वरानं तशी सुबुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना!

सध्याच्या काळात त्यासाठी काय करता येणं शक्य आहे आणि त्यापेक्षाही भविष्यात बदलत्या जागतिक परिस्थितीमुळं शिक्षणातही किती अभूतपूर्व बदल होऊ घातले आहेत - याविषयीची भविष्यवेधी मुखपृष्ठकथा आम्ही या अंकात प्रसिद्ध करत आहोत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, एम. के. सी. एल. चे एक शिल्पकार, माहिती-तंत्रज्ञान आणि शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व ‘जडण-घडण’ चे सल्लागार श्री. विवेक सावंत यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं नजिकच्या भविष्यातील शिक्षणाबाबतचे संभाव्य बदल मांडले आहेत. शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी अंतर्मुख होऊन याचा गांभीर्यानं विचार करून आपापला आराखडा तयार करावा असं वाटतं. या लेखाबाबत आपण मोकळेपणानं आपली प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना जडण-घडणकडे कळवाव्यात ही विनंती.

-  डॉ. सागर देशपांडे

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


जडण-घडण , जुलै २०२१ , संपादकीय

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    लेख वाचायला आवडेल . बहुविध वर प्रसिद्ध करावा .

  2. Ramdas Kelkar

      3 वर्षांपूर्वी

    इथे स्वार्थी मतलबी माणसे जबाबदार जागेवर असल्याने शिक्षणातील आणीबाणी कमी कशी व्हायची,?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen