भाषाविचार - भाषा आणि वादचर्चा-स्पर्धा (भाग - ७)


"महाराष्ट्रात काय किंवा देशाच्या इतर भागांमध्ये काय अशा शेकडो स्पर्धा होत असतील. त्यातून तरुण मुलांचं वैचारिक आदानप्रदान घडत असेल. नव्या पिढीचं भाषाभान समृद्ध करण्याच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण गेल्या दहावीस वर्षांत अशा स्पर्धांना जाणारी मुलं घटलीत. त्यांना इतर गोष्टी खुणावू लागल्यात. आपल्या तिजोरीला धक्का लावण्यापेक्षा महाविद्यालयं, संस्था आता प्रायोजक घेऊन चटपटीत, गडबडगुंडा, धांगडधिंगा असलेले कार्यक्रम करू लागलेत. त्यामुळे दिलखेच नाचगाण्याच्या कार्यक्रमांनी भरलेल्या फेस्टिव्हल्सनी सगळा माहोल भारलाय. इथे फार विचार नकोच आहे कुणाला. भाषाबिषांची भानगडच नको. सूत्रसंचालनापासून जाहिरातींपर्यंत सगळं इंग्रजीमय झालंय. त्यामुळे अशा स्पर्धा सांदीकोपऱ्यात घेण्याची वेळ लोकांवर आलीय. भाषेच्या दृश्य व्यवहारातलं एक परिणामकारक क्षेत्र आटतंय. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आधीच आपापल्या भाषांपासून दुरावली आहेत, त्यात ह्या इव्हेंटीकरणामुळे भरच पडलीय. हा दुष्काळ पावसाअभावी होणाऱ्या दुष्काळाइतकाच भयानक आहे. त्यातून बाहेर पडायचं तर अशा स्पर्धा गावोगावी व्हायला हव्यात. भाषा जगवण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे."  ‘भाषाविचार’ सदरातून तरुणांच्या भाषेविषयी सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

-------------------------------------------------------------------

मागे एका वादविवाद स्पर्धेचा परीक्षक म्हणून पुण्याला गेलो होतो. ‘प्रमाणित मराठीचा आग्रह मराठीच्या विकासासाठी बाधक आहे’ हे विधान वादविवादासाठी दिलं होतं. १९८८-९३ या काळात अशा स्पर्धांसाठी मी कुठेकुठे फिरलो होतो. नव्या मुलांमधला उत्साह, आकलन पाहायला मिळेल आणि एकूण भाषेबद्दल मुलं काय विचार करतात हेही कळेल म्हणून गेलो होतो. जो विचार मराठीसाठी होतो, तोच कमी अधिक फरकाने इतर भाषांसाठी करणं सहज शक्य आहे.

हेही वाचलंत का!

भाषाविचार – शिक्षणव्यवस्थेच्या परिघावरली लाखो मुलं (भाग – ६)

भाषाविचार – इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५)

चाळिसेक तरुण मुलं बोलली. अर्थातच  निम्मी विषयाच्या बाजूने आणि निम्मी विरोधात. स्पर्धेत बोलायचं म्हणजे दर वेळेला आपल्या मनात असतं तेच बोलता येतं असं नाही. त्यामुळे प्रमाण भाषेला विरोध करणाऱ्या काहींना तो नीट जमत नव्हता. विरोधकांचंही तसंच होत होतं. प्रमाण भाषा म्हणजे काय, प्रमाण आणि बोली भाषांचं नातं काय, दोन्हींचं सहजीवन शक्य आहे का आणि कसं, भाषेचा विकास म्हणजे काय, त्याचे मापदंड कोणते या आणि अशा अनेक प्रश्नांवर मुलांनी विचार करणं अपेक्षित होतं. पण ते घडलं नाही, काही अपवाद अर्थातच होते. मुलं भाषणं पाठ करतात किंवा त्यांना कुणीतरी ती लिहून दिलेली असतात. ही गोष्ट सुद्धा मुलांचं भाषिक कुपोषण सिद्ध करायला पुरेशी आहे. 'मराठी' हा शब्द अनेक मुलांना नीट उच्चारता आला नाही. याबद्दल या मुलांना दोष देता येणार नाही. ज्याला आपण प्रमाण भाषा म्हणतो, तिचा वावर जर सर्वसामान्यांच्या जवळपास नसेल तर लोकांच्या मनात तिच्याबद्दलची भीती दिसणारच. त्याचं प्रतिबिंब मुलांच्या बोलण्यातही दिसलं.

प्रमाण भाषेची व्याख्या एखाद-दुसरा अपवाद वगळता कुणालाच नीट सांगता आली नाही. सगळी मुलं महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत हे लक्षात घेतलं, तर त्यांच्या शालेय जीवनात त्यांचं भाषाशिक्षण वाईट पद्धतीने झाल्याचं सहज लक्षात येत होतं. 'महाराष्ट्रात खूप बोलीभाषा आहेत', असं म्हणणाऱ्यांना तीन-चारपेक्षा जास्त बोलीभाषांची नावं सांगता आली नाहीत. बहुतेकांच्या लेखी बहिणाबाई चौधरी या बोलीभाषेचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या महत्त्वाच्या आणि एकमेव कवयित्री वाटल्या. आणि लेखकांचे संदर्भ अत्र्यांशी संपले. फक्त एका मुलीला मर्ढेकर आठवले. गेल्या पाच पन्नास वर्षातलं कुणाला काही सांगावंसं वाटलं नाही. एकही ताजा संदर्भ नाही. फक्त एका मुलीला साहित्य महामंडळाच्या लेखननियमांची थोडीफार माहिती होती. म्हणजे एखाद्या भाषेचा प्रमाणित्वाचा डोलारा ज्यावर उभा आहे त्याबद्दल फारसं माहीत नसलेली मुलं आता अभिव्यक्तीच्या मैदानात उतरली आहेत. ही तशी काळजी करायला लावणारी बाब आहे.

वर्षानुवर्षे या स्पर्धांमधे स्पर्धकांचा एक वर्ग येतो. त्याला घरची वाचनाची पार्श्वभूमी असते. महाविद्यालयांमध्ये अनुकूल वातावरण असतं. सर्वसाधारणपणे ही मुलं सवर्ण असतात. हा काही त्यांचा दोष म्हणता येणार नाही. पण ही मुलं अधिक सामाजिक भांडवल घेऊन या स्पर्धांमध्ये उतरतात. या उलट ज्यांच्या घरात शिक्षणाची अजिबात पार्श्वभूमी नसते अशा मुलांना मुळातून सुरुवात करावी लागते. त्यामुळे ती धडपडतात. त्यांचं धडपडणं त्यांच्या भाषेत, वाक्यरचनेत दिसतं. पण या मुलांबद्दल सहिष्णू राहण्याची गरज आहे. कारण ही मुलं त्याच वेळात खूप अंतर कापत आहेत. स्पर्धेत पुणे शहरातली, परिघावरची खूप मुलं होती. विद्येचं माहेरघर वगैरे असणारं 'पुणं' पार बदलून गेलंय. खेडोपाड्यांतली मुलं आता तिथे शिकायला येतात. एमबीए करणाऱ्या मुलांनाही वादविवादात भाग घ्यावा असं वाटू लागलंय. मुलांच्या यादीवरून नुसती नजर टाकली तरी चित्र समूळ पालटल्याचं दिसतं. हा बदल प्रत्येक भाषेसाठी काम करणाऱ्यांनी समजून घ्यायचा आहे.

आलेली अनेक मुलं जागतिकीकरणाबद्दल बोलली. म्हणजे असं की, त्यांच्या बोलण्यात जागतिकीकरण हा शब्द होता. पण ते कशाशी खातात हे काही फार कुणाला सांगता आलं नाही. पण असा एक शब्द आपल्या बोलण्यात आला की, आपलं बोलणं समकालीन होईल असं बहुतेकांनी गृहीत धरलं असावं. जागतिकीकरण आलं की इंग्रजीचा उल्लेख अपरिहार्यपणे आलाच पाहिजे. तसा तो बऱ्याच जणांनी केला. पण जागतिकीकरणामुळे आपल्या भाषाव्यवहाराच्या बदललेल्या रूपाबद्दल फार कुणाला माहीत नव्हतं. भाषेचा विकास होण्यासाठी ती कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आणि कशी वापरली जायला हवी, भाषा विकासाला कोणत्या यंत्रणा लागतात, त्यासाठीची गुंतवणूक कुणी करायची वगैरे प्रश्न अनेकांच्या आकलनाच्या कक्षेपलीकडचे होते. काही गोष्टी स्वाभाविकही असतात. म्हणजे वाचणं ही गरज वाटण्याचा काळ आता राहिला नाही. आता गूगल सर्च आणि कॉपी-पेस्टचा काळ आलाय. त्यामुळे ढापीव माहितीवर वेळ मारून नेणं लोकांना जमू आणि आवडूही लागलंय. भल्याभल्यांना हे प्रलोभन टाळता येत नाही. तरुण मुलामुलींना त्याचा मोह पडणं स्वाभाविकच म्हणायला पाहिजे.

 या सगळ्या गदारोळातही काही लक्षणीय आणि भाषेच्या प्रश्नाबद्दल आश्वासक गोष्टी दिसल्या. रत्नागिरीच्या एका मुस्लीम मुलीनं तिची मातृभाषा उर्दू असली तरी मराठीचं तिचं भान पक्कं असल्याचं दाखवून दिलं. नुकत्याच पुण्यात आलेल्या एका सोलापूरकर मुलाने भाषाशास्त्रज्ञांची नावं सांगून चकित केलं. विशेष म्हणजे ज्यांच्या घरी शैक्षणिक, आर्थिक पार्श्वभूमी नाही अशा अनेक मुलांमध्ये उत्साह दांडगा होता. भाषाशुद्धी, शुद्ध-अशुद्ध भाषा याबद्दल इतरांचं ऐकून त्यांना काही प्रश्न पडत होते आणि लगेच त्याचं स्वत:च्या युक्तिवादात रूपांतर करावं असं त्यांना वाटत होतं. अभिनिवेश आणि विचार यातली सीमारेषा या वयात पुसट असतेच. पण त्या मांडवाखालून गेल्याशिवाय मुलं सुधारत नाहीत. एखाद्या भाषेचं काय व्हायचं ते होवो, पण या मुलांच्या भाषाविकासासाठी हा मुक्काम महत्त्वाचा असतो.

महाराष्ट्रात काय किंवा देशाच्या इतर भागांमध्ये काय अशा शेकडो स्पर्धा होत असतील. त्यातून तरुण मुलांचं वैचारिक आदानप्रदान घडत असेल. नव्या पिढीचं भाषाभान समृद्ध करण्याच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण गेल्या दहावीस वर्षांत अशा स्पर्धांना जाणारी मुलं घटलीत. त्यांना इतर गोष्टी खुणावू लागल्यात. आपल्या तिजोरीला धक्का लावण्यापेक्षा महाविद्यालयं, संस्था आता प्रायोजक घेऊन चटपटीत, गडबडगुंडा, धांगडधिंगा असलेले कार्यक्रम करू लागलेत. त्यामुळे दिलखेच नाचगाण्याच्या कार्यक्रमांनी भरलेल्या फेस्टिव्हल्सनी सगळा माहोल भारलाय. इथे फार विचार नकोच आहे कुणाला. भाषाबिषांची भानगडच नको. सूत्रसंचालनापासून जाहिरातींपर्यंत सगळं इंग्रजीमय झालंय. त्यामुळे अशा स्पर्धा सांदीकोपऱ्यात घेण्याची वेळ लोकांवर आलीय. भाषेच्या दृश्य व्यवहारातलं एक परिणामकारक क्षेत्र आटतंय. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आधीच आपापल्या भाषांपासून दुरावली आहेत, त्यात ह्या इव्हेंटीकरणामुळे भरच पडलीय. हा दुष्काळ पावसाअभावी होणाऱ्या दुष्काळाइतकाच भयानक आहे. त्यातून बाहेर पडायचं तर अशा स्पर्धा गावोगावी व्हायला हव्यात. भाषा जगवण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे.

– डॉ. दीपक पवार

संपर्क – ९८२०४३७६६५, santhadeep@gmail.com

(लेखक मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य आहेत.)

– ‘भाषाविचार’ पुस्तकातील लेखांश


मराठी भाषा , मराठी अभ्यास केंद्र , भाषाविचार , मराठी प्रथम , दीपक पवार , भाषाभान

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.