हॉटेल वाल्यांची lifestyle


लेखमालेच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की माझा प्रवास हृदयाकडून पोटाकडे झाला. म्हणजे हॉटेल चालू करण्यापूर्वी मी माधवबाग या हृदयरोगावर उपचार करणाऱ्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स चालवण्याच्या व्यवसायात होतो. गेली जवळ जवळ १२ वर्षे हृदयरोगाची कारणे आणि त्यावर घ्यायची काळजी या विषयांवर आम्ही लोकांना सतत मार्गदर्शन करीत होतो. जीवनशैली कशी सुधारावी, वेळेत जेवावे, वेळेत उठावे, व्यायाम ह्या सगळ्यांचे महत्व आम्ही ह्यामधून समजावून सांगत होतो. "आधी केले, मग सांगितले" हा बाणा असल्यामुळे स्वाभाविकच स्वतःची जीवनशैली सुद्धा 'सर्वकाही वेळच्यावेळी' या कोष्टकात बसणारी होती. साडेसहा पर्यंत उठणे, मग व्यायाम, नऊ वाजता नाश्ता, एक वाजता जेवण, साडेपाच वाजता चाव-म्याव आणि रात्रीचं जेवण साडेआठ वाजता हा माझा दिनक्रम क्वचितच चुकायचा. हे सगळं १ जानेवारी २०१५ च्या सकाळच्या नाश्त्या पर्यंत व्यवस्थित चाललं होतं. या दिवशी मेतकूट चालू झालं आणि पुढचे काही महीने  ग्राहकांच्या झंझावातापुढे माझे वर सांगितलेले  टाईमटेबल  पाला-पाचोळ्यासारखे  उडून गेले .              त्यामुळे आता मी जे काही सांगणार आहे हे १००% स्वानुभवावर आधारित आहे. ही हॉटेलवाल्यांची लाइफस्टाइल समजून घ्यायला एकदम सोप्पी पण पचनी पडायला अतिशय कठीण. जो स्वतः किंवा ज्याचे निकटवर्तीय कुटुंब (पती, पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी) या व्यवसायात आहेत त्यांची हे समजून घेताना जी दमछाक होत असेल त्याची मी कल्पना करू शकतो. म्हणजे बघा! सामान्य माणसाची जेवणाची वेळ दुपारी एक ते चार आणि रात्री साडेआठ ते साडेदहा. याच वेळात ग्राहक  जेवणासाठी हॉटेलात येणार. म्हणजे तो हॉटेलवाल्यांच्या धंद्याचा टाइम. त्यावेळी ते हॉटेलात नसून कसं चालेल? या वेळात ते स्वतः जेवू शकत नाहीत. त्यांचं जेवण एकतर सर्वांच्या आधी किंवा सर्वांच्या नंतर. आधीची शक्यता खूप कमी. ९९% हॉटेलीयर्सच्या जेवणाची वेळ म्हणजे दुपारी ४ आणि रात्री ११ नंतर. बरं ११ नंतर लगेच जेवता येईल याची शाश्वती नसते. शेवटचा ग्राहकच ११ पर्यंत येतो. तो जेवून जाईपर्यंत १२ वाजतात. मग आवराआवर, कॅशची मोजदाद, हिशोब, आवकजावक, टाळे बंद यात आजचं काम उद्यावर ढकलून चालत नाही. त्यामुळे हॉटेल बंद करून सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन घरी जायला १ वाजतो. त्यानंतर जेवण..
            ९९ टक्के हॉटेलर्स आपापल्या घरी जाऊनंच जेवतात. लोकांना वाटतं यांची मज्जा आहे रोज हॉटेलातच जेवत असतील. पण आम्हाला तेच तेच पदार्थ बघून इतका कंटाळा येतो की घरचेच चार घास बरे वाटतात. त्यामुळे हॉटेलवाल्यांच्या घरात जेवण बनतं की हॉटेलातलच येत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल. रात्री १ वाजल्यानंतर जेवून हा माणूस झोपणार कधी, उठणार कधी? उठायचा फार आळस करून चालत नाही कारण दुसऱ्या दिवसाची तयारी करायची असते ना! मग कसला आलाय व्यायाम. वर्षानुवर्ष अशा जेवणांच्या वेळांमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे हॉटेलवाल्यांच्या तब्येतीचि विविध तक्रारी सूरु होणं स्वाभाविकच. तरुणपणी हे जाणवत नाही, पण वय जसं वाढतं तशा या सवयी त्रास द्यायला लागतात. हे झालं खाण्यापिण्याच्या वेळांबद्दल.                      

            दुसरं महत्वाचं म्हणजे, आपण सामान्य माणसाची ज्या दिवशी सुट्टी किंवा सण त्या दिवशी हॉटेलवाल्यांचा जास्तीत जास्त धंदा. म्हणजे त्या दिवशी इतर दिवसांपेक्षा जास्त वेळ आणि जास्त सावधानतेने, चौकसतेने हॉटेलात सक्रिय राहावं लागतं. म्हणजे गणपती, दिवाळी, दसरा हॉटेलवाल्यांनी (आणि त्यांच्या कुटुंबियांनी) सुट्टी विसरा अस्संच असतं. हे ही असं वर्षानुवर्ष. त्यामुळे कुटुंबियांबरोबर वेळ घालवायला वेळच मिळत नाही. हॉटेलवाल्यांच्या वेळा आणि घरातल्यांच्या वेळा एकदम  विरुद्ध. त्यामुळे आम्ही हॉटेलवाले रात्री घरी येतो तेव्हा लहान मुलं झोपलेली असतात आणि ती उठून शाळेत जातात तेव्हा आम्ही झोपलेले असतो. मुलं मोठी होताना दिसतच नाहीत. हॉटेलात गिऱ्हाईकाबरोबर आलेल्या त्यांच्या पोरांबरोबर हसणाऱ्या, खेळणाऱ्या हॉटेलवाल्यांना स्वतःच्या मुलांबरोबर घालवायला अजिबात वेळच मिळत नाही. अर्थात हे सगळं सांगून हॉटेल व्यवसायाची फक्त उणी बाजूच सांगतोय असं नाही. अधिकच्या बाजूला पैसे, प्रतिष्ठा आहेच पण बाहेरून बघणाऱ्यांना फक्त हीच बाजू दिसते. त्या नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. हॉटेलवाल्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय काय लपलंय याचा आता तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल.
 

लेख आवडला असेल तर जरूर शेअर करा.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...