महाग की स्वस्त?


गेल्या आठवड्यात मेतकूटमधे आलेल्या काही जणांनी पदार्थाचे दर जास्त वाटतात अशी तक्रार केली. मी स्वत: हॉटेलमध्ये असताना एक दोनदा, "तुमची पुरणपोळी आणि मोदक महाग आहे बुवा!" अशी तक्रार माझ्यासमोरच काहींनी केली होती. या सगळ्यांना काय म्हणायचं आहे ते मी समजू शकतो. त्यामुळे या तक्रारीबद्दल थोडंस स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, जे मोकळ्या मनाने वाचतील त्यांना आमची बाजू थोडीफार तरी कळू शकेल.

खरं तर महाग किंवा स्वस्त हे दोन अर्थविषयक शब्द आपण वापरत असलो त्याच्या मागे फक्त आर्थिक कारण किंवा विचार नसतो. खरं कारण असतं ते आपल्या मनातलं त्या गोष्टीचं perception किंवा दृष्टीकोन. उदाहरणानेच स्पष्ट करतो. मी खराखुरा १००% कोकणस्थ आहे. म्हणजे नुसता आडनावानेच नाही तर आमचं आजोळ कोकणातलं, त्यात आंब्याच्या बागा आहेत- असा कोकणात सध्याही पाळंमूळं असलेला 'कोकणस्थ' आहे. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळ गाठणे आणि ओ येईस्तोवर आंबे खाणे हाच आमचा कार्यक्रम असे, पण मोठं झाल्यावर जेव्हा विकत घेऊन आंबे खायची वेळ आली तेव्हा ५०/६० रुपयाला एक आंबा हे समीकरणच मनाला पटेना. बायकोने कौतुकाने विकत आणलेला आंबा गोड लागेना. याचा अर्थ मला तो परवडत नव्हता असा नाही तर माझं मन मानत नव्हतं या किमतीला आंबा खायला. पण हाच आंबा जानेवारीत १२,०००/- रुपये डझन घेऊन खाणारे लोकही आहेत, त्यांना तो महाग वाटतं नाही. म्हणजे आपल्या मनात एखाद्या गोष्टीची आपल्या पूर्वानुभवावरून आपण लावलेली एक किंमत असते. त्यापेक्षा समोरच्या गोष्टीची किंमत जास्त असेल तर ती महाग आणि कमी असेल तर स्वस्त असं आपलं सोपं समीकरण असतं आणि आपला पूर्वानुभव हा आपल्या 'एक्सपोजर'वर अवलंबून असतो. एक्सपोजर, जे आपल्याला आपल्या कामाच्या अनुभवातनं, वाचनाने, शिक्षणातनं, फिरण्यामुळे मिळतं. त्यामुळे आपल्या मनातलं परसेप्शन हा पहिला मुद्दा झाला.

दुसरा मुद्दा आहे आर्थिक पण तो समजण्यासाठी खूप सोपा आहे. त्याच्या फार खोलात मी जात नाही. यात परवडणं हा मूळ मुद्दा असतो. उदा. मुंबईतल्या जागांच्या किंमती या मध्यम वर्गाला न परवडणाऱ्या आणि म्हणूनच महाग आहेत.

तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो मूल्यवर्धन (value addition). मूल्यवर्धनाचं उदाहरण म्हणजे मारुतीच्या गाडी पुढे मर्सिडिज महाग आहे. आर्थिक दृष्ट्या ज्यांना परवडणार आहे असे लोकही मर्सिडिज घेतीलच असं नाही. ज्याला त्यातले सुरक्षेचे उपाय (safety measure) महत्वाचे वाटतात तो त्यासाठी मर्सिडिजची किंमत मोजतो. यातली सेफ्टी हे त्याला मूल्यवर्धन वाटतं. 

चौथा मुद्दा आहे सोय. हल्ली सोयीचे सगळ्यांना पटेल असे उदाहरण म्हणजे मल्टिफ्लेक्सेस मध्ये आपण खातो ते पॉपकॉर्न आणि शीतपेयांच्या किंमती. रस्त्यावर ४० ते ५० रुपये किमतीला मिळू शकणाऱ्या पॉपकॉर्न आणि शीतपेयांना आपण सर्रास तिथे दीड दोनशे रुपये मोजतो. मला तर आजही ते घशाखाली उतरत नाही. पण आजूबाजूला टबने पॉपकॉर्न खात सिनेमा बघणारे लोक बघितले की गम्मत वाटते.

शेवटी आता थोडं मेतकूट विषयी. हॉटेलमधील मेनुकार्डमधले दर हे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. (कोणीच अव्वाच्या सव्वा नफा कमावू शकत नाही कारण प्रचंड स्पर्धा असते) पदार्थाची किंमत ठरवणारे मुख्य घटक जागेचं भाडं (जे लोकेशनवर अवलंबून असतं म्हणजे स्टेशनजवळ किंवा मुख्य रस्त्यावर जागा असेल तर भाडं जास्त असतं. आडरस्त्यावर असेल तर कमी ), कामगारांचा पगार (प्रशिक्षित व अनुभवी कामगार जास्त पगार घेतात) पदार्थात वापरलेले घटक आणि त्यांचा दर्जा (उदा.तेल, तूप, मसाले) कटलरी आणि क्रॉकरी (उदा. मेलामाइन की पोर्सेलीन) मेनू किती मोठा आहे (जितका मेनू मोठा तितकं वाया जाणाऱ्या पदार्थांचे म्हणजे वेस्टेजचं प्रमाण जास्त) पोर्शन साईज किती आहे (एकाला पुरेल, दोघांना की चारांना) अशा अनेक गोष्टींचा विचार करून पदार्थाची किंमत ठरवली जाते. हॉटेलने इंटेरियरवर, मेटेंनन्सवर किती खर्च केला असेल तो ही त्या किंमतीमध्ये धरणं आवश्यक आहे. मोदक, पुरणपोळ्या आपण हॉटेलमध्ये घेतो तेव्हा सोयीचा पण विचार केला पाहिजे. घरी दोन मोदक किंवा दोन पुरणपोळ्या करणं आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या शक्य आहे का? मग ही सोय आहे. त्याची किंमत काही तरी असणारच. मेतकूटमधले मोदक फ्रोजन किंवा बाहेरून मागवलेले नसतात. आपण मोदकच काय कुठलाच पदार्थ (पोळ्या, भाकऱ्या) बाहेरून मागवत नाही. का तर चांगलं द्यायचं आहे, ताजं द्यायचं म्हणून. अर्थात त्याचा किंमतीवर परिणाम होतोच. शिवाय बेकायदेशीरपणे जागांना न व्यापणं वा अतिक्रमण न करणं, सर्व प्रकारचे टॅक्सेस भरणं यासारखी सध्याच्या काळात चलती नसलेली तत्वे बाळगून व्यावसाय करण्याची काही किंमत असतेच.

असो. आतापर्यंत तुम्हाला किंमत या शब्दाचे विविध कंगोरे कळले असतील. तरी खिशातून पैसे द्यायची वेळ येते तेव्हा ते बोचतातच, मला याची कल्पना आहे, स्वानुभव ही आहे. म्हणून मेतकूटच्या थाळीमध्ये आपण इतरांकडून २४९/- घेतो तेव्हाच जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांकडून १७९/- रुपये असे सवलतीचे मूल्य घेतो. त्याचबरोबर आम्ही मेतकूट अ-ला-कार्ते मध्ये नेहमी येणाऱ्या आमच्या एकनिष्ठ खवय्यांना लॉयल्टी प्रोग्रॅममधून काही सूट देण्याचा प्रयत्न केला आहे.  ********** लेखक - किरण भिडे अतिरिक्त दुवे - या लेखमालिकेतील अन्य लेख

  Google Key Words - Kiran Bhide, Metkut, Metkut Hotel, Marathi Hotel, Experience Of Hotel Industy, Hotel Management, Menu Pricing.


उद्योगविश्व , अनुभव कथन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. sansal24

    4 वर्षांपूर्वी

  Agree with your view

 2. kaustubhpotdar

    4 वर्षांपूर्वी

  Agree to this! Thats the mindset…getting similar experience in my case as well…the customers want something like Alpmoli-Bahuguni-Bahu Dudhi cow…its ideally not possible…

 3. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  दिलगीर आहे. मला वाटलं तुम्ही पुनश्च वर रिपीट कस्टमर विचारलेत. बघा मी किती पुनश्चमय झालोय ते :-) हॉटेल सुदैवाने खूप चांगली सुरु आहेत आणि 'खायचे काम' व्यवस्थित चाललंय. गेल्या वर्षीच आम्ही 'काठ न घाट' नावाने महाराष्ट्रीयन शाकाहारी मांसाहारी फाईन डाईन हॉटेल सुरु केले.

 4. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  आपण वार्षिक सभासदत्व देतो. ते वाचक login करून सर्व सशुल्क लेख वाचू शकतात. जे चाचणी सभासद आहेत ते १५ दिवसांकरिता सर्व लेख वाचू शकतात. ते वाचून त्यांनी सशुल्क बाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. सभासद कितीदाही साईटवर/app वर लेख वाचू शकतो. हे लक्षात घेता 'रिपीट कस्टमर' म्हणजे काय म्हणायचे आहे आपल्याला ते सांगितलेत तर उत्तर देता येईल.

 5. avadhoot

    4 वर्षांपूर्वी

  how many repeat customers do you get... any analysis done?वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen