पोळी पुराण


मला स्वतःला बाहेरचं जेवण फार आवडत नाही. मधल्या वेळचं खाणं ठीक आहे पण जेवणाच्या ऐवजी इडल्या-डोसे, पावभाजी वगैरे कसं जमणार? जेवण म्हणजे पोळी भाजी आणि शेवटी घासभर भात. पंजाबी जेवण प्रकार देण्याऱ्या हॉटेल्समध्ये हे शक्य असतं म्हणून मी गेलोच तर अश्याच हॉटेल्समध्ये जायचो. पण दरवेळी पंजाबी तंदुरी रोटी नामक पदार्थ जो पानात येतो त्याने माझ्या मनात पंजाब्यांच्या दातांबद्दल उत्सुकता निर्माण केली. ही मैद्याची रोटी  गरम असे पर्यंत अतिशय लुसलुशीत (मऊ) लागते पण थोड्याच वेळात अगदी चामट होते. इतकी की एका हाताने तुकडाही तोडता येत नाही. तरीही ह्या पंजाबी रोटीची  लोकप्रियता एवढी की ५ स्टार हॉटेलपासून रस्त्यावरच्या छोट्या टपरीवजा हॉटेल मध्येही ती दिसते. तिची रुमाली रोटी, नान हि भावंडे रूपाने वेगळी पण गुणाने हिच्यासारखीच.  माझ्या मनात कायम यायचं हे हॉटेल वाले आपली नॉर्मल पोळी का देत नाहीत? सनीशी ( म्हणजे मेतकुट चा कर्ताधर्ता सनी पावसकर, माझा पार्टनर ) ह्याविषयावर गप्पा मारल्या. तो म्हणाला खरं तर पंजाब मध्ये गहू सगळ्यात जास्त पिकतो. त्यामुळे पंजाबी तंदुरी रोटी गव्हाचीच असणं अपेक्षित आहे.  सुरवातीला ती तशी असेलही. पण नंतर  cost cutting च्या नावाखाली गव्हात मैदा मिसळायला सुरवात झाली आणि हळूहळू आता  मैद्याच्याच रोट्या सगळ्या हॉटेलांमध्ये मिळतात.
 तुम्ही बघा, जिथे तुम्हाला तंदुरी रोटी आवडते तिथे ती गव्हाचीच असणार, म्हणून ती चांगली लागते. मैदा वापरण्याचे काही फायदे अजून आहेत. मैदा वापरल्यामुळे गव्हापेक्षा स्वस्त आणि तंदूरमुळे एकाच वेळी २० रोट्या ५ मिनटात तयार. म्हणजे गव्हाच्या पोळ्या करायला गेलं तर महागही पडणार, शिवाय पटापट जास्त पोळ्या हव्या असतील तर माणसंही जास्त लागणार कामाला. दोन्ही मिळून पुन्हा किंमत वाढणारच. म्हणूनच कोणी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा महाराष्ट्रीय लोकांना हव्या असूनसुद्धा घडीच्या पोळ्या (गेला बाजार चपात्या/फुलके) देताना दिसत नाही. त्यामुळे मेतकूट चालू करायचं ठरलं तेव्हा हे पक्कं होतं  की आपण इथे नुसत्या पोळ्या नाहीत तर चांगल्या घडीच्या पोळ्या द्यायच्या. आपण द्यायला लागल्यावर हळू हळू सगळे द्यायला लागतील. एक दिवस घडीची पोळी ५ स्टार हॉटेलच्या मेनूकार्डवर स्थान मिळवेल असं स्वप्न आम्ही बघायला लागलो. आता घडीची पोळी द्यायची म्हंटल्यावर ती बनवणार कोण? हा प्रश्न आला. फुलके बनवायला मशीन असतं, 'चिमट्याची' पोळी सहज बनवणं जमतं पण घडीची पोळी करायला वेगळ स्किल पाहिजे. बरं नुसता स्किल असून उपयोग नाही, हात पण पटपट चालला पाहिजे. म्हणजे गर्दीच्यावेळी खोळंबा नको.
माहितगारांशी ह्याबाबत बोलल्यावर लगेच  धोक्याची सूचना आली. उगाच नको ते रिस्क घेऊ नका. मुकाट्याने बाहेरून पोळी-भाकरीचे suppliers असतात त्यांच्याकडूनच पोळ्या-भाकऱ्या घ्या. सगळे हॉटेलवाले तेच करतात. आम्ही विचार केला हा supplier कुठल्या प्रतीचा गहू वापरणार? आणि आणून देईपर्यंत थंड झालेल्या पोळ्या-भाकऱ्या पुन्हा गरम करून गिऱ्हाईकांना देण्यात काय मज्जा? मग हेही आव्हान आपण स्वीकारलं. सुरवातीला पोळ्या करणारी एक बाई join झाली, मग दोन. असं करता करता आता पोळ्यांसाठी चार बायका आहेत. या सगळ्या दुपारी आणि रात्री लागणाऱ्या ३०० पोळ्या आणि २०० भाकऱ्या ताज्या गरमागरम करून देऊ लागल्या. शनिवार रविवार दांडी/सुट्यांसाठी  परवानगी नाही. बाकीच्या दिवशी हजर बायका काम चालवू शकतात. घडीच्या पोळ्या बनवणारं मशीन असू शकतं का? याचाही आम्ही शोध घ्यायला सुरवात केली आहे. माझे एक इंजिनिअर सासरे (श्री. मिलिंद केळकर - डोंबिवली) ज्यांचा फॅब्रिकेशनचा कारखाना आहे. ते ह्या कामावर लागले आहेत. तुमच्यापैकी कोणाला यात रस असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. बघू भविष्यात जर का आम्ही असे मशीन बनवू शकलो तर अनेक गृहिणींनासुद्धा मोठ्ठा दिलासा मिळेल यात शंकाच नाही.



प्रतिक्रिया

  1. Bahuvidh Super Admin

      4 वर्षांपूर्वी

    धन्यवाद. आपण पोळीचा आग्रह धरला तर हळूहळू चित्र बदलेल...

  2. Manoj Deshmukh

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख .. अगदी महाराष्ट्रातील छोट्यातील छोट्या शहरांमधील हॉटेल मधून पोळी हद्द पार होत आहे .. तंदूर रोटी हा माथी प्रकार मारला जातो.. दुर्दैव ..

  3. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    चांगला लेख आहे.हाँटेल व्यवसायात पडल्याने किरण भिडे यांना त्यातून अडचणी लक्षात येत आहेत.आपल्या जेवणातला पोळी हाच मुख्य घटक आहे..त्यामुळे गरमागरम पोळी देणारी मोठी हाँटेल्सच चांगली चालत आहेत. पुण्यातील श्रेयस,दुर्वाकूर,इ.हाँटेल तुफान चालतात.

  4. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    चांगला लेख आहे.हाँटेल व्यवसायात पडल्याने किरण भिडे यांना त्यातून अडचणी लक्षात येत आहेत.आपल्या जेवणातला पोळी हाच मुख्य घटक आहे..त्यामुळे गरमागरम पोळी देणारी मोठी हाँटेल्सच चांगली चालत आहेत. पुण्यातील श्रेयस,दुर्वाकूर,इ.हाँटेल तुफान चालतात.

  5. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    चांगला लेख आहे.हाँटेल व्यवसायात पडल्याने किरण भिडे यांना त्यातून अडचणी लक्षात येत आहेत.आपल्या जेवणातला पोळी हाच मुख्य घटक आहे..त्यामुळे गरमागरम पोळी देणारी मोठी हाँटेल्सच चांगली चालत आहेत. पुण्यातील श्रेयस,दुर्वाकूर,इ.हाँटेल तुफान चालतात.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen