श्वानप्रेम आणि भूतदया


कुत्रे जमातीवर भूतदया दाखवणाऱ्या लोकांकडे बघून मला फार भरुन येतं. आपल्या घरातल्या राहिलेल्या पोळ्या भाकरी ब्रेड घेऊन हे लोक सोसायटीच्या बाहेर येतात. लगेच कुत्र्यांचं एक टोळकं जमा होतं. सुरक्षित अंतर ठेवून हातभर लांबूनच कुत्र्यांच्या दिशेने पोळीचे तुकडे भिरकावणं चालतं. हे झालं की मग हात पुसून घरी जाताना यांच्या मुखकमलावर मुक्या प्राण्यांवर दया दाखवली वगैरे समाधान निथळून वहात असतं.

याहीपेक्षा वरची कडी असे एक काका मला माहित आहेत. ते फिरायला येताना गाडीवर येतात. गाडी टेकडीच्या पायथ्याशी लावतात. टेकडीवर फिरुन आले की गाडीला किक मारायच्या आधी खिशातून दोन पारलेजीचे पाच रुपयेवाले पुडे काढतात. गाडीला किक मारतात आणि बिस्किटं टाकत टाकत जातात. ते पुढे आणि त्यांच्या गाडीच्या मागे पळणारी कुत्र्यांची टोळी असं अनुपम दृश्य असतं ते. मला ते बघून रथामागे पळणाऱ्या गरीब लोकांवर खैरात करत जाणाऱ्या माजोरड्या राजाची हटकून आठवण येते.

एक गोष्ट आधीच सांगायला हवी होती मी, ती म्हणजे माझं कुत्रा या प्रकारावर विलक्षण प्रेम आहे. माझ्याकडे नऊ दहा वर्षं घरात कुत्रा होता. त्याच्यासारखं जीव आणि माया लावत नाही कुणी आपल्याला. त्यामुळे मला प्राण्यांची दया वगैरे नाही, पथ्थरदिल आहे मी अशा निष्कर्षाला येण्याआधी थोडं थांबा. या अशा खायला घालण्यातून तुम्ही त्या मुक्या प्राण्यांच्या अपेक्षा वाढवताय. त्याला असा सिलेक्टिव्ह जीव लावता येत नाही.

त्याच रस्त्यावरुन जाताना केवळ हातात पिशवी आहे म्हणून कुत्र्यांनी पाठलाग केलेला आहे अशी उदाहरणं आहेत. हे ती कुठून शिकतात? विचार करा घरातलं लहान मूल ज्याला पटकन आपण जारे दुकानातून काही घेऊन ये म्हणून सांगतो, फिरायला जाणारी वयस्कर माणसं ही सगळी या हल्ल्यांना व्हलनरेबल आहेत. मॉर्निंग रनर्सना तर हा त्रास कायमचा आहे. विद्यापीठ - खडकी लुपवर इतक्यातच दोन तरी रनर्सना अशी भटकी कुत्री चावली आहेत. इंजेक्शन आणि ट्रीटमेंट सोपस्कारासकट जवळपास पाच ते आठ हजाराचा फटक बसला आहे.

हा त्रास सगळ्या एरियात आहे. यावर असाही एक युक्तिवाद केला जातो की मला घरी यायला उशीर होतो. मग रात्री कुत्री मागे लागतात. त्यामुळे त्यांना खायला घालून त्यांच्याशी ओळख ठेवावी लागते. फार पटण्यासारखं कारण नाहीये हे. ते जनावर आहे कारण. ते त्याच्या इन्स्टिंक्ट्स प्रमाणेच वागणार, तुम्ही ओळख वाढवा न वाढवा त्याच्याशी. पुणे महानगरपालिकेकडे कुत्र्यांच्या त्रासासाठी अत्यंत अपुरी यंत्रणा आहे. माझ्याच मैत्रिणीची पोटरी जवळपास फाडली होती कुत्र्याने. तक्रार केल्यानंतर नोंदवून घेतली पण कुणीही कारवाईला आलं नाही. पकडून नेलं तरी कुत्र्याला न्यूटर करुन परत आणून सोडतात. त्यामुळे त्यांची पैदास जरी होत नसली तरी मूळ प्रश्न राहतोच.

डॉग सेंटर्सच्या क्षमतेवर सुद्धा मर्यादा आहेत. मुळात इतक्या प्रमाणावर कुत्र्यांना सामावून घेणारी सेंटर्सच नाहीत. त्यामुळे या त्रासावर किंवा समस्येवर आपणच काही आळा घातला तर घालू शकतो. यावर सगळ्यांनी मिळून विचार करण्याची गरज आहे. हे सगळं सविस्तर लिहायचं कारण असं की तुम्ही घरची पोळी भाकरी खायला घालून फार काही भूतदया दाखवताय अशातला काही भाग नाहीये. उलट तुम्ही त्याला आयत्या अन्नाची सवय लावताय. इतकंच प्रेम आणि कणव असेल तर त्या मुक्या जीवाची संपूर्ण जबाबदारी घ्या. अर्धवट सोयीस्कर माणुसकीने ना तुम्हाला पुण्य मिळतंय ना त्या जीवाचं कल्याण होतंय.

एक खरा घडलेला किस्सा सांगण्यासारखा आहे. गाडीवरून जाणाऱ्या एका माणसावर एका कुत्र्याने हल्ला केला. त्या माणसाने जीवाच्या आकांताने त्या कुत्र्याला लाथ मारली. समोरुन खिशात बिस्किटं घेऊन येणारा माणूस जोरात ओरडला, "अहो मुकं जनावर आहे ते. त्याला लाथ काय मारताय?" गाडीवाला गाडीवरुन खाली उतरला. त्याने कुत्र्याचे दात लागलेला पाय दाखवला आणि विचारलं, "मला चावल्यावर मी काय करणं अपेक्षित आहे? तुमच्यासारखं बिस्किटं खिशात घेऊन फिरु का आता?" यानंतरचे लडिवाळ संवाद सांगण्यासारखे नाहीत पण मला वाटतं मुद्दा कळला असावा.

**********

लेखिका - प्राजक्ता काणेगावकर


सोशल मिडीया , प्राजक्ता काणेगावकर , अवांतर

प्रतिक्रिया

  1. sumitra jadhav

      3 वर्षांपूर्वी

    घरात आधी आल्सेशियन कुत्रा, त्याची आजारात सर्व प्रकारची काळजी घेणे व नंतर त्याचा मृत्यू हा अनुभव एकूण 3वर्षे व त्यानंतर पामेरिअन कुत्री, तिची दोन बाळंतपणे व नंतर नसबंदी शस्त्रक्रिया, मग आजारपण आणि मृत्यू ही 13 वर्षे असा 16 वर्षे या अतिशय प्रेमळ आणि प्रामाणिक प्राण्याचा सहवास घेतला. घरी कुत्रे पाळणे हे ' येरागबाळ्याचे काम नोहे. ' म्हणूनच कुत्र्याना चार बिस्किटे फेकणार्यांची कीव करावीशी वाटते.

  2. Ratnakar

      5 वर्षांपूर्वी

    हा आमचा रोजचंच अनुभव आहे ,कोथरूड भागात टोळक्याने कुत्री असतात, बाहेर चालायला जाणे धोकादायक झाले आहे

  3. s2borwankar

      5 वर्षांपूर्वी

    त्या माणसाने दुसरी लाथ खिशातून बिस्कीट घेऊन येणाऱ्या माणसाला घातली नाही हे नशीब



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen