दादर...शिवाजी पार्क आणि मी...!


१९८६ साली जानेवारी महिन्यात मुंबईत नोकरी सुरु झाली. रहायची सोय आणि ऑफिस दादर मध्येच असल्याने, भलतंच निवांत आयुष्य होतं. ऑफिस मधल्या सहकाऱ्यांना हे खोटंच वाटायचं...! ते सगळे दिड-दोन तासाचा लोकलचा प्रवास करून यायचे अन मी चालत पाच मिनिटात ऑफिसमध्ये पोचायचो.

हळूहळू ऑफिसमध्ये, दादर...मुंबईच्या वातावरणात रुळायला लागलो. प्रवास, लोकल, बस, वेळ, जाणं-येणं असं कशाचंच टेन्शन नव्हतं. आनंदाचा एक भाग म्हणजे माझ्या रहाण्याच्या ठिकाणाहून अगदी जवळ होतं ते "शिवाजी पार्क"....! मुळातच क्रिकेटची अगदी मनापासून आवड असल्याने आणि मुंबई क्रिकेटच नव्हे तर भारतातल्या क्रिकेटची “पंढरी” समजलं जाणारं शिवाजी पार्क सारखं ठिकाण जवळच असल्याने, दिवस उगवला की मी अगदी भक्तिभावाने तिथे पोचायचो.. आणि संध्याकाळी ऑफिस सुटलं की पुन्हा शिवाजी पार्क गाठायचो.

सकाळी सकाळी पार्कात फिरायला, व्यायामाला, खेळायला येणाऱ्या लोकांमध्ये बरेच सेलेब्रिटीज असायचे. मराठी सिनेमा/नाटकांमध्ये कामं करणारी मंडळी दिसायची. शिवाजी पार्क जिमखान्यात जुन्या नव्या क्रिकेटवीरांचा सतत वावर असायचा. ज्यांना आजवर केवळ टीव्हीवर/बातम्यांमध्ये/वर्तमानपत्रातून पाहिलं होतं...ते प्रसिद्ध खेळाडू असे समोरासमोर पाहायला खूप छान वाटायचं. त्यांच्याशी बोलताही यायचं. अनेक खेळाडू तर तिथेच आसपास राहायचे... अजित वाडेकरांचं घर सुद्धा अगदी जवळच होतं. पार्काच्या गेट समोरच गझल गायक अनुप जालोटांचा (चक्क) बंगला होता..(जो आधी दिवंगत संगीतकार सी. रामचंद्र यांच्या मालकीचा होता..) हे सारं हळूहळू कळत गेलं.

शिवाजी पार्क जवळच्याच पाटील वाडीत, संदीप पाटलांचं घर आहे हे कळलं. संदीप पाटील जेंव्हा निवृत्तीच्या मार्गावर होते पण लोकप्रियतेच्या शिखरावर होते, “षटकार” नावाच्या पाक्षिकाचे संपादक म्हणून ही काम पहात होते. तेंव्हा प्रथम आठवलं काय..? तर त्यांनी एक छोटं नादुरुस्त विमान खरेदी केलं होतं आणि ते त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर ठेवल्याची “षटकार” मध्ये वाचलेली बातमी...त्याचा त्यांनी खाजगी BAR म्हणून केलेला वापर...! ही त्याकाळातली तोंडात बोटे घालायला लावणारी बातमी होती. मग मी लगेच जाऊन त्यांचं घरही पाहून आलो होतो.

मुंबईतल्या क्रिकेट मैदानावरच्या (खास करून शिवाजी पार्कच्या) भटकंतीतून कळालेल्या या सुरस आणि “रम्य” कथा मला अचंबित करून जायच्या.

शिवाजी पार्कला अगदी मधोमध, म्हणजे कै. रमाकांत आचरेकर सरांच्या नेटला अगदी लागून, एक विकेट आहे, ती होती (किंवा आजही असेल), दिवंगत सुरेंद्र तथा अप्पांची बाबरेकर यांच्या “भारत क्रिकेट क्लबची”. रोज शिवाजी पार्कवर जाऊन जाऊन, अप्पांशी ओळख झाली होती. त्याच्याकडे एक बबन नावाचा groundsman काम करायचा. छोट्या चणीचा, बोलतात थोडसं अडखळणारा, हा पोरगा भलताच चंट होता. तिथे येणाऱ्या बहुतेक सर्व स्थानिक खेळाडूंना तो गणवेष पुरवायचा.

शिवाजी पार्क मधल्या गणपती मंदिराशेजारी, एका कोपऱ्यात, मनोहर नावाचा एक मुलगा मोठ्ठी लोखंडी पेटी घेऊन बसलेला असायचा. हा बॅट्स दुरुस्तीची कामे करायचा, पॅड्स, ग्लोव्हज इ.इ. दुरुस्त करायचा. याची खासियत ही होती की याच्याकडे सगळ्या बड्या, सुप्रसिद्ध खेळाडूंच्या नवीन बॅट्स knocking किंवा seasoning (नवीन बट वापरण्यापूर्वी लाकडी हातोड्याने किंवा ball hammer ने ठोकून तयार करणे) साठी यायच्या. त्यावेळचे मुंबई रणजी संघातले (आजी-माजी), मुंबईच्या विविध वयोगटाच्या संघातले वयाने छोटे-मोठे खेळाडू तसेच भारताकडून खेळणारे, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, प्रवीण आम्रे, नंतरचे सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, असे सगळेच नामचीन खेळाडू याच्या कडे येऊन चक्क त्याच्या लोखंडी पेटीवर बसून दुरुस्तीचं काम करून घेताना दिसायचे.

त्याकाळी हे खेळाडू देखील आपल्या बॅट्स, ग्लोव्हज, पॅड्स दुरुस्त करून वापरायचे, हे आज वाचायला आणि पचायला जरा कठीणच आहे, पण ते खरं आहे..! त्या मनोहरशी देखील मी मैत्री केली होती. त्याच्याकडे दुरुस्तीला आलेल्या बॅट्स ग्लोव्हज, पॅड्स हातात घेऊन पाहण्यात्त देखील कोण आनंद मिळायचा. एकदा संजय मांजरेकर ने वेस्ट इंडीज दौऱ्यात द्विशतक झळकावताना वापरलेली बॅट मनोहर कडे आली होती. ती हातात घेऊन पाहताना मी अंतर्बाह्य शहारलो होतो. कोणाला ही अतिशयोक्तीही वाटेल.. पण असे मोठे टेस्ट/रणजी खेळाडू नुसते दिसले तरी कृतकृत्य वाटायचे दिवस होते ते..!

त्यांच्या इतकं जवळ जाण्याचा हा अनुभव माझ्यासाठी तरी अप्रुपाचाच होता. बऱ्याचदा हे बडे खेळाडू प्रत्यक्ष भेटले, त्यांना जवळून पाहता आलं अनेकदा त्यांच्याशी बोलताही आलं. ते क्षण माझ्यासाठी फार फार आनंदाचे होते. आजच्या काळात, क्रिकेट सामने आणि क्रिकेट खेळाडू चोवीस तास टिव्हीवर दिसत असूनही, त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्याविषयीची उत्सुकता किती असते हे आपण पाहतोय. त्या पार्श्वभूमीवर जवळपास तीस वर्षांपूर्वी या विख्यात खेळाडूंना असं प्रत्यक्ष पाहता-भेटता आलं याचा माझ्यासारख्या क्रिकेटवेड्याला किती आनंद झाला असेल याचा अंदाज करू शकता.

क्रिकेट, क्रिकेट खेळाडू, सामने यांचं पराकोटीचं वेडच डोक्यात भरलेलं होतं. आणि आता ते सारं माझ्या डोळ्यासमोर होतं. यावर माझा खरच विश्वास बसत नव्हता. दादरलाच पलीकडच्या (पूर्वेला) बाजूला रुईया कॉलेज समोर दडकर मैदानात, मुंबई क्रिकेट मधलं खूप मोठ्ठ नाव असलेलं, म्हणजे “दादर युनियनचं” साम्राज्य होतं. या खाणीतूनच भारतीय आणि जागतिक क्रिकेटला मिळालं होतं...सुनील गावस्कर नावाचं रत्न...! तिथे जवळच हिंदू कॉलोनीत ते रहायचे सुद्धा. तसाच आणखी एक गुणवान फलंदाज “कर्नल”...दिलीप वेंगसरकर देखील तिथलाच रहिवासी..(नंतरच्या काळात हे सगळे मोठे खेळाडू वरळी भागातल्या “स्पोर्ट्सफिल्ड” नावाच्या केवळ खेळाडूंसाठी उभारलेल्या गगनचुंबी इमारतीत राहायला गेले पण या दोघांचं बालपण मात्र हिंदू कॉलनी मधलंच तर क्रिकेट दादर मधलं..).

हे दोघेही, इतर अनेक मोठ्या नावांसह “दादर युनिअनचं” प्रतिनिधित्व करायचे.. हे पण माहिती होतं. एकेकाळी भारतीय संघातले निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू, शिवाजी पार्क आणि दादर युनिअन या दोन दिग्गज संघातूनच आलेलं असायचे. या दोन संघांची “कांगा लीग” मधली खुन्नस, मैदानावरचं त्याचं वैर, एकापेक्षा वरचढ एक पराक्रम, खूप लहानपणापासून “टाईम्स ऑफ इंडियात” शब्दश: “FOLLOW” करत असल्याने चांगल्याच परिचयाचे होते. शिवाजी पार्क मध्ये त्यावेळी शिवाजी पार्क जिमखाना, बेंगाल क्रिकेट क्लब, स्काउट ग्राउंड आणि समर्थ व्यायाम प्रसारक मंडळ अशी स्वत:च्या इमारती असलेले क्लब्स होते. तर माटुंगा जिमखान्याचं बहुदा छोटं शेड होतं.

आणि याशिवाय इतर असंख्य क्लब्सच्या खेळपट्ट्या (विकेट्स) असायच्या. किमान दहा ते पंधरा विकेट्स असाव्यात. त्या महापालिकेकडून भाडेतत्वावर दिल्या जायच्या. अनेक खूप जुने क्लब्स होते. जुने-जाणते अनुभवी प्रशिक्षक त्या विकेट्सवर आपापले नेट्स (प्रशिक्षण वर्ग) चालवायचे. त्यापैकी साधारणपणे पार्कच्या मधोमध असणाऱ्या एका विकेटवर कोचिंग करायचे ते सुप्रसिद्ध आणि द्रोणाचार्य पदक विजेते प्रशिक्षक दिवंगत श्री. रमाकांत आचरेकर सर...! ते त्यावेळी आपल्या प्रशिक्षण वर्गासह शारदाश्रम शाळेचे सुद्धा प्रशिक्षक होते.

याचं दरम्यान फेब्रुवारी, १९८८ साली तेंडूलकर आणि कांबळी यांनी हारिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेत ती जगप्रसिद्ध ६६४ धावांची भागीदारी रचली, आणि शारदाश्रम शाळा, आचरेकर सर आणि त्याचं ते शिवाजी पार्कवरचं “नेट” एकदम झळाळून उठलं..! त्या भागीदारी नंतर त्यांना खेळताना पाहायला संध्याकाळी प्रचंड गर्दी व्हायची. १९८६-८७ या वर्षात त्यावेळी सचिन ने विजय मर्चंट, हारिस आणि गाईल्स या स्पर्धेत (१५ वर्षाखालील) तब्बल २३३६ (दोन द्विशतकासह – एकूण नऊ शतकं) धावांचा डोंगर उभा केला होता. तर १९८७-८८ साली फक्त नऊ की दहा (१४ व्या वर्षीच मुंबई रणजी संघात निवड झाल्याने तो इतर सामने खेळू शकला नाही) सामन्यात १४०६ धावा रचल्या (यात दोन त्रिशतके, एक द्विशतक आणि सहा शतकं होती).

त्या काळात क्रिकेट रसिक, बाल सचिनची बॅटिंग पहायला या शालेय स्पर्धेतल्या सामन्यांनाही तोबा गर्दी करत होते. कारण बाल खेळाडूतला असामान्य थोर खेळाडू तेंव्हा पासूनच दिसायला लागला होता. यातले बरेच सामने मी शिवाजी पार्क वर पाहू शकलो. “सचिन तेंडूलकर” नावाचं क्रिकेट मधलं एव्हरेस्ट बाल्यावस्थेत असताना, अगदी जवळून पाहता आलं, ते शिवाजी पार्कच्या मैदानावरच. इतकंच नव्हे तर, आमच्या office चा संघ तयार करून आम्ही जेंव्हा “Times Shield Tournament” मध्ये भाग घ्यायला लागलो तेंव्हा आमचं नेट देखील शिवाजी पार्कवरच “भारत क्लब” च्या विकेटवर व्हायचं..(अप्पा बाबरेकरांशी झालेल्या/असलेल्या ओळखीमुळे..)

बाजूलाच आचरेकर सरांचं नेट असायचं. तिथे सचिन खेळत असायचा. आणि त्यावेळी शिवाजी पार्कच्या (खास सचिनसाठी असलेल्या) नियमानुसार सचिन त्यांच्या नेट मधली त्याची बॅटिंग झाली की इतर नेट्स मध्ये घुसायचा, मग तिथल्या गोलंदाजांनी त्याला बोलिंग करायची...दहा-पंधरा मिनिटांनी पुढचं नेट, असं करत हा पार्कभर फिरत फिरत बॅटिंग करायचा.. तसाच तो आमच्या नेट मधेही यायचा आणि मी चक्क सचिन तेंडूलकरला बोलिंग करायचो..! हे आता खरं वाटत नाही..पण घडलंय खरं...! (सहज आठवलं म्हणून लिहीलं)

**********

लेखक-  मदन देशमुख, पुणे.


सोशल मिडीया , अवांतर , मदन देशमुख

प्रतिक्रिया

  1. dilip manjrekar

      3 वर्षांपूर्वी

    Nice information

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    छान !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen