मोटाभाईंच्या कपाटातला जिन


सततच्या राजकारणाचा कंटाळा येऊन एक दिवस मोटा भाई आरामात सोफ्यावर बसले होते. समोर ढोकळ्याची प्लेट होती. त्यावर त्यांच्या आवडती हिरवी चटणी होती. ग्लास मध्ये मस्त कोथिंबीर घातलेलं थंड ताक होतं. टीव्हीवर त्यांचा आवडता 'एन्काउंटर शंकर' सिनेमा चाललेला होता. खोलीत शांतता होती. पण त्या खोलीतल्या एका कपाटातून सारखे खुसपुस आवाज येत होते. फाईली खाणाऱ्या उंदारांपैकी कोणीतरी आपल्या कपाटात घुसला असावा, असा विचार मोटा भाईंच्या मनात आला. पण थकवा इतका आला होता, की सोफ्यावरून उठण्याची इच्छाच होत नव्हती.

पण हळूहळू आवाज वाढायला लागला. काहीतरी गडबड आहे, हे लक्षात घेऊन मोटा भाई उठले आणि त्यांनी ते कपाट उघडलं.

त्यातून एक उंचपुरा, दाढी-केस वाढलेला, जरा आक्राळ-विक्राळ दिसणारा माणूस बाहेर आला. मोटा भाई दचकलेच. भूत-पिशाच्च वगैरे गोष्टींवर आधी त्यांचा विश्वास नव्हता. पण गेल्या महिन्यातच पिंपळाच्या झाडावरील तीन पिशाच्च त्यांना बघून पळून गेली होती. "अखेर मी बाहेर आलो, मी बाहेर निघालो, मी मुक्त झालो...", असं तो माणूस तो आनंदाने ओरडत होता. नाचत होता. तेवढ्यात मोटा भाईंना त्याच कपाटात एक जुना दिवा दिसला. कधी काळी एका जादूगाराने त्यांना तो दिला होता. अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे ह्या दिव्यातूनही राक्षस बाहेर आलेला पाहून मोटा भाई खुश झाले.

"तू जिन आहेस. मला कळलंय. माझ्या तीन इच्छा तुला पूर्ण कराव्या लागतील. ऐकतोयस ना?", मोटा भाई त्या जिनला एका ठिकाणी स्वस्थ बसवण्याचा प्रयत्न करत होते.

"ऐक! माझी पहिली इच्छा! मला त्यांच्या पक्षातले दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आमदार हवेयेत. ऐकतोयस ना?", हे ऐकल्यावर तो जिन शांत झाला.

"मेरे आका, माझी सुटका केल्याबद्दल धन्यवाद", जिन.

"पण मग आता माझ्या इच्छा पूर्ण कोण करेल? तुझा बाप?", मोटा भाई जरा चिडले होते.

"ती मी नाही करू शकत मोटाभाई!"

"का?"

"कारण मीच एक आमदार आहे."

"तू आमदार?"

"हो मोटा भाई. वर्षभरापूर्वी तुम्ही मला पळवून आणलं होतं आणि लपवून ठेवण्यासाठी ह्या कपाटात बंद करून ठेवलं होतं. नंतर कामाच्या व्यापात तुम्ही विसरून गेले."

"अरेरे.. सॉरी म्हणजे... पण तू इतके दिवस जिवंत कसा राहिलास?"

"आमदारांना सवय असते मोटाभाई या सगळ्याची! याआधीही असाच आठ महिने एका ट्रंकेत लपून होतो. फक्त तुम्हा मोठ्या लोकांना एक रिक्वेस्ट आहे मोटा भाई.."

"बोल"

"हे आमदार पळवापळवीचं एक अँप बनवून घ्या ना. म्हणजे कोणता आमदार कधी पळवला आणि त्याचं लोकेशन काय आहे, ह्याचं रिमाईंडर तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही विसरणार नाही. चला निघतो मी आता..."

"थोडा ढोकळा तरी खाऊन जा.."

"नको मोटा भाई. एक वर्ष तुमच्या कपटातली झुरळं खाऊन काढलंय. आता बाहेर जाऊन छान मटण-बिर्यानी आणि कवाब खातो. टाटा."

"सांभाळून राहा रे. पुन्हा भेटू, असं म्हणत नाही. टाटा."

तो आमदार निघून गेला. मोटा भाई पुन्हा सोफ्यावर जाऊन बसले.

**********

लेखक- अपूर्व कुलकर्णी


विनोद , सोशल मिडीया , अपूर्व कुलकर्णी

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    ठिक

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    बरा आहे . एवढा पण खास नाही

  3. Nishikant

      5 वर्षांपूर्वी

    नवा तंबीदुराई जन्म घेतोय!

  4. amarsukruta

      5 वर्षांपूर्वी

    हा हा हा, छान खुसखुशीत



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen