आंदोलन - तेव्हा आणि आता 

पुनश्च    भानू काळे    2020-02-05 06:00:36   

आणिबाणीच्या विरोधातील देशव्यापी चळवळ आणि दिल्लीत अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन यांचा उल्लेख स्वातंत्र्योत्तर भारतातील दोन महत्वाचे राजकीय सामाजिक लढे  म्हणून केला जातो. परंतु या दोन्ही लढ्यांमध्ये एक मूलभत फरक आहे....'अंतर्नाद'चे संपादक भानू काळे यांनी हा फरक अत्यंत स्पष्ट भाषेत आणि समपर्क तुलना करुन या लेखात सांगितलेला आहे.  आणिबाणीविरोधातील लढ्याच्या वेळचे भारलेले वातावरणही या लेखातून अत्यंत परिणामकारकतेने उभे राहते. 'अंतर्नाद'च्या मे २०१२ च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.**********

अंतर्नाद, मे २०१२

आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात सामील झालेली आमच्यासारखी काही मंडळी १८ जानेवारी १९७७ची दुपार कधीच विसरणार नाहीत. मुंबईतल्या ताडदेव इथल्या अरुण चेंबर्समधल्या ‘हिंमत’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या छोट्याशा कार्यालयात आम्ही आठ-दहा जण कोंडाळे करून बसलो होतो. मधे टेबलावर एक छोटा ट्रान्झिस्टर ठेवला होता आणि कानात प्राण आणून आम्ही बातम्या ऐकत होतो. इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्तीची व सार्वत्रिक निवडणुकीची अत्यंत अनपेक्षित अशी घोषणा केली होती. सर्व राजबंद्यांची त्वरित सुटका करण्याचे आदेशही दिले होते. आमचा आनंद गगनात मावत नव्हता. अठरा महिन्यांनी काळरात्र आता संपली होती. जे ऐकत होतो, त्यावर खरेतर आमचा विश्वासच बसत नव्हता.

आम्ही काही तरुण मंडळी मिळून जेमतेम पाच-सहा हजार खप असलेले हे इंग्रजी साप्ताहिक चालवत असू. सेन्सॉरच्या धाकाला न जुमानता आणीबाणीविरोधी आंदोलनाच्या बातम्या त्यात छापत असू. हिंमतची छपाई नेहमी ‘स्टेट्‌स पिपल प्रेस’ या छापखान्यात होई. मुंबईत फाउन्टन विभागात त्यांचा मोठा पाच मजली छापखाना होता. पण त्यांची स्वत:ची ‘जन्मभूमी’सारखी गुजराती दैनिके-साप्ताहिके होती. शिवाय ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’सारखी इतरांचीही नियतकालिके ते छापत. काही विशिष्ट तासांपुरतीच त्यांची छपाई यंत्रणा हिंमतसाठी उपलब्ध असे. विनोद राव हे एकेकाळचे पत्रकार तेव्हा मुंबईत मुख्य सेन्सॉर होते. हिंमतची प्रेसकॉपी ते वेळेवर छपाईसाठी क्लिअर करून देत नसत. आमच्या तत्कालीन संपादिका कल्पना शर्मा यांच्याबरोबर त्यांचे सतत खटके उडत. नाइलाजाने शेवटी ‘स्टेट्‌स पिपल प्रेस’ने हिंमत छापायला नकार दिला. नंतर ज्या ज्या छापखान्यात आम्ही छपाई करू लागलो, तिथे तिथे सेन्सॉरकडून जाच सुरू झाला . सगळेच छापखाने सरकारला टरकून होते. पुढे पुढे साप्ताहिक छापायला मुंबईतला कुठलाही छापखाना जेव्हा, सेन्सॉरच्या प्रेसजप्तीच्या धमकीमुळे तयार होईना, तेव्हा वर्गणीदारांकडून पैसे उभारून आम्ही एक जुनाट छापखानाही खरेदी केला होता. त्यावरही जप्ती येऊन ‘हिंमत’ बंदच पडेल व आपण सगळेच तुरुंगात डांबले जाऊ, ही टांगती तलवार डोक्यावर सतत होतीच. लोकसभेतील सेन्सॉर न केलेल्या भाषणांतील अंश आम्ही एका पुस्तिकेच्या रूपात छापले होते. तिच्या पहिल्या पानावर आमचे ब्रीद म्हणता येईल असे एक वाक्य होते- ''All the darkness in the world cannot extinguish this small flame of truth.'' (‘‘जगातील सगळा काळोख सत्याची ही छोटी ज्योत विझवू शकत नाही.’’) लाखाच्या वर माणसे तेव्हा तुरुंगात डांबलेली होती. स्वातंत्र्योत्तर काळात इतका मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या प्रदीर्घ काळासाठी कुठल्याही आंदोलकांना तुरुंगवास भोगावा लागला नव्हता. सुदैवाने आम्ही बाहेर होतो; पण आमच्या परीने लढ्यात सामील होतोच. कारागृहात असलेल्यांसाठी आम्ही निधी उभारत असू. माझ्या जवळची एक व्यक्ती आपला बरोबर निम्मा पगार दरमहा मिसाबंदींच्या [आंतरिक सुरक्षा व्यवस्था अधिनियम (Maintenance of Internal Security Act (MISA)सन १९७१ कायद्याखाली तुरुंगवास उपभोगलेल्या] कुटुंबियांसाठी तब्बल सतरा महिने देत होती. या कानाचे त्या कानालाही कळू न देता. गुप्तपणे व स्वत: नामनिराळे राहून. मला स्वत:लाही हे बऱ्याच वर्षांनी कळले. अशी अनेक सर्वसामान्य परिवर्तनसन्मुख मंडळी आमच्या अवतीभवती होती. तुरुंगात गेलेल्यांचा त्याग मोठा होताच; पण तुरुंगाबाहेर राहूनही जे लढ्याला मदत करत होते, त्यांचेही योगदान कमी नव्हते. जयप्रकाश नारायण हे तेव्हा आमचे आराध्यदैवत होते. त्यांच्या पटण्यातील कदमकुआँ भागातल्या दुमजली घरात पाऊल ठेवले, तेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यासारखे मला वाटले होते. हे सगळे एकीकडे चालू असतानाच सरकारच्या जबदरस्त ताकदीमुळे आंदोलन टिकवून धरणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत आहे, या वास्तवाची मलूल करणारी जाणीवही खूप बोचरी होती.

आणि आता अचानक अथांग बोगद्याच्या शेवटी उजेडाची किनार दिसू लागली. पुढे ती ऐतिहासिक निवडणूक झाली, देशाच्या तोवरच्या इतिहासात प्रथमच कॉंग्रेस पराभूत झाली आणि केंद्रात जनता पक्ष सत्तेवर आला. आमचा लढा अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठी होता आणि तो आम्ही जिंकला होता. दुर्दैवाने पुढे जनता पक्षात फाटाफूट झाली आणि लवकरच कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, ही गोष्ट खरी आहे; पण त्यामुळे त्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ असे त्या लढ्याचे तेव्हा वर्णन केले गेले होते आणि त्याची आठवण आजही अंगावर रोमांच उभे करते.

या सगळ्या आठवणींना उजाळा देणारा एक प्रसंग मध्यंतरी घडला. गेल्या २५ जूनला, आणीबाणी जाहीर झाली होती त्या दिवसाचे औचित्य साधत, दिल्लीत एक परिसंवाद झाला. विषय होता ‘भारतीय लोकशाही बळकट कशी करता येईल’ हा. जुन्या ‘हिंमत’वाल्यापैकी राजमोहन गांधी व नीरजा चौधरी या दोन वक्त्यांचीही परिसंवादात भाषणे झाली. त्यावेळी दिल्लीत अण्णा हजारे यांचे आंदोलन जोरात होते व बरेच जण त्याचाही उल्लेख ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ असाच करत होते. त्या पार्श्वभूमीवर परिसंवादानंतरच्या अनौपचारिक गप्पांमध्ये व आमच्या मनातही या दोन आंदोलनांची तुलना होणे अपरिहार्य होते. अशा प्रकारची तुलना करणे तसे धोक्याचेच असते आणि शेवटी प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनानुसार विचार करत असल्यामुळे ती तुलनाही व्यक्तिसापेक्षच असते. शिवाय स्मरणरंजनात रमण्याची, भूतकाळातल्या आठवणी प्रत्यक्ष घटितांपेक्षा अधिक रोमांचकारक करण्याची, त्यात नसलेले रंग भरण्याची आणि असलेले अधिक गडद करण्याची एक सहजप्रवृत्ती आपल्यात असते. पण ते धोके पत्करूनही या दोन आंदोलनांमधले काही फरक नोंदवावेसे वाटतात.

पहिला फरक म्हणजे, तेव्हाच्या आंदोलनाला एक व्यापक असे वैचारिक अधिष्ठान होते. अर्धशतकाहून अधिक काळ जयप्रकाश नारायण राष्ट्रीय पातळीवर कार्यरत होते; अगदी पंतप्रधानपदासाठीही त्यांचा पंडित नेहरूंना पर्याय म्हणून अधूनमधून उल्लेख झाला होता. शिवाय, आणीबाणीविरुद्धच्या आंदोलनाला जेपींव्यतिरिक्त आचार्य कृपलानी, नानाजी देशमुख, अटल बिहारी वाजपेयी, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, ना. ग. गोरे, चंद्रशेखर, मोहन धारिया यांसारख्या इतरही अनेक दिग्गजांचे सहनेतृत्व लाभले होते. देशापुढील समस्यांचे या सगळ्यांनी केलेले विश्लेषण अचूक वा निर्विवाद होते अशातला भाग नाही; पण आपापल्या परीने ही सर्व माणसे मोठी होती. त्यांच्या आयुष्यभराच्या चिंतनातून आणि अनुभवातून एक वैचारिक बैठक सिद्ध झाली होती. आजच्या आंदोलनाला तसे व्यापक वैचारिक अधिष्ठान असल्याचे जाणवत नाही.

दुसरा फरक म्हणजे, आजच्या आंदोलनात असलेला गांभीर्याचा अभाव. आजच्या आंदोलनाचे नेते आणि त्यांचे बहुसंख्य सहकारी या सर्वांच्या प्राथमिकता (प्रायॉरिटिज्‌) वेगवेगळ्या आहेत. आपापल्या संस्थांच्या व्यापात त्यांचा बराचसा वेळ जात असतो. आपले सर्वस्व त्यांनी या आंदोलनासाठी पणाला लावले आहे, असे वाटत नाही. पण असे फावल्या वेळात काम करणारे क्रांती करू शकत नाहीत. "I am not demanding your weekends, I am demanding your lives.'' (‘‘मी तुमचा सुट्टीचा वेळ मागत नाही आहे, मी तुमची आयुष्ये मागतो आहे’’) हे ट्रॉटस्कीने आपल्या कॉम्रेड्‌सना केलेले आवाहन प्रसिद्ध आहे. स्वत:ला झोकून दिल्याशिवाय मोठी कामे उभी राहू शकत नाहीत. आजच्या चळवळीत सहभागी असणाऱ्यांमध्ये हे झपाटलेपण फारसे कुठे आढळत नाही.

तिसरा फरक म्हणजे, त्यावेळच्या आंदोलनाला एक उदात्ततेचा स्पर्श लाभला होता. ती लढाई कुठेतरी मूल्यांची लढाई हेती. जे जिंकायचे होते, ते रुपये-आणे-पैशांत मोजता न येणारे होते. जेपींना स्वत:साठी काहीही नको होते. त्यांची समाजहिताची तळमळ निरलस होती - त्यांच्या शत्रूंनीही कधी त्यांच्या हेतूंविषयी शंका घेतली नव्हती. जेपींचे ‘संपूर्ण क्रांती’चे आवाहन हे मूलत: मानवी मनातल्या उदात्ततेच्या ओढीला होते, 'Hunger for Heaven' ला होते, आकाशात झेपावणाऱ्या ज्वालांप्रमाणे असलेल्या माणसाच्या अंतर्मनातील उन्नयनाच्या सुप्त पण उपजत भुकेला होते. जेपींच्या ‘संपूर्ण क्रांती’च्या सादेला एक उदात्त - जवळजवळ आध्यात्मिक असे - परिमाण होते. जशी साद, तसा प्रतिसाद. हजारो तरुणांना जेपी समर्पणोत्सुक बनवू शकले, व्यक्तिगत सुखस्वप्नांच्या कोषातून त्यांना बाहेर काढू शकले, कारण जेपींच्या स्वत:च्याच जगण्याला उदात्ततेचा स्पर्श होता आणि त्या उदात्ततेतून त्यांची खेच निर्माण झाली होती. आजच्या आंदोलनाला हा उदात्ततेचा स्पर्श नाही.

चौथा मुख्य फरक हा आजच्या प्रसारमाध्यमांमुळे (त्यातही मुख्यत: दूरचित्रवाणीवाहिन्यांमुळे) पडलेला आहे आणि तो खूप दुर्दैवी आहे. अण्णा हजारेंचे आंदोलन देशभर पसरवण्यामध्ये प्रसारमाध्यमांचा खूप महत्त्वाचा वाटा होता व त्यात मिळालेल्या यशामुळे प्रसारमाध्यमांची ताकद सिद्ध झाली, हे उघड आहे. अशी सुदृढ प्रसारमाध्यमे लोकशाहीसाठी आवश्यकच आहेत. पण माध्यमांच्या या वाढत्या सामर्थ्याला जर जबाबदारीच्या जाणिवेची जोड नसेल तर हे सामर्थ्य खूप धोकादायकही ठरू शकते. इंदिरा-राजीव हत्येसारखे काही अपवाद वगळता, कोणाही एक व्यक्तीला पूर्वी केव्हा वाहिन्यांनी इतके उचलून धरल्याचे आठवणीत नाही. दिवसभरात कधीही, कुठल्याही वाहिनीवरच्या बातम्या बघा, अण्णा हजारेंची छबी दिसणारच, हा प्रकार काही आठवडे सलग चालू होता. भ्रष्टाचाराबद्दल व एकूणच देशापुढील प्रश्नांबद्दल माध्यमांची स्वत:ची अशी काही व्यासंगपूर्ण भूमिका होती व आहे, असे या चित्रणातून कुठेच सूचित होत नव्हते. आणीबाणीविरुद्धच्या किंवा पूर्वीच्या कुठल्याही आंदोलनाला प्रसिद्धीचा असा ‘ओव्हरडोस’ मिळाला नव्हता. या ओव्हरडोसामुळे आंदोलनाविषयी अवास्तव अपेक्षा निर्माण झाल्या - विशेषत: देशातील तरुण वर्गाच्या. या आंदोलनातून अपेक्षित ते परिवर्तन झाले नाही, तर या तरुणाईचा मोठा भ्रमनिरास झालेला माणूस खूपदा ‘सिनिकल’ बनतो; त्याच्या मनाला पुन्हा उभारी देणे, एखाद्या कामासाठी त्याला पुन्हा उत्साहित करणे मग अधिकच कठीण बनते. दुर्दैवाने असे घडले तर त्या पापाचे डाग काही अतिउत्साही प्रसारमाध्यमांच्या हातांवरही असतील.

पण या सर्वांपेक्षा अधिक क्लेशदायक असा पाचवा फरक आहे आंदोलनाकडे पाहण्याचा समाजाच्या दृष्टिकोनात पडलेला फरक. आधी उल्लेख केलेले चारही फरक हे अण्णांचे अपयश नसून ते मुख्यत: आजच्या रोगट अशा सामाजिक मानसिकतेतून उद्‌भवलेले आहेत. लोकसभेत जेव्हा या लोकपाल विधेयकावर चर्चा झाली, तेव्हा लालू यादवांपासून अनेक नेते (जे एकेकाळी जेपींबरोबर होते) या आंदोलनाची कोडगेपणाने टर उडवत होते आणि अन्य सर्वच खासदार आपल्या हशा-टाळ्यांनी त्याला साथ देत होते. ‘तुम्ही कोण आम्हांला शिकवणारे’ हा अहंकार त्या उपहासातून ओसंडत होता. हे झाले नेत्यांच्याबाबत. माध्यमांच्या दृष्टीने बघितले, तर ही केवळ एक ‘इव्हेन्ट’ होती; टीआरपी वाढवण्यासाठी घेतलेला पवित्रा होता. मागील आंदोलनाच्या वेळी आंदोलनाची छोटीशी बातमी छापणे हेही पत्रकाराच्या दृष्टीने मोठे धाडस होते; आजच्या पत्रकारांना तशी कुठलीही भीती बाळगायचे काही कारणच दिसत नाही; सगळ ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’चा प्रकार असावा, अशीच बेदरकारी त्यांच्या देहबोलीत होती आणि तुमच्या-आमच्यासारख्या ‘सर्वसामान्य नागरिकांची’ भूमिका तरी काय वेगळी होती, किंवा आहे? आपण सगळेच एका निर्लेप मनाने भोवतालचा सगळा ‘खेळ’ पाहत आहोत. काल अण्णा हजारे होते, आज आयपीएल आहे, उद्या आणखी काही असेल; पण इथूनतिथून सगळा टाइमपासच!

अण्णा हजारेंना नावे ठेवणारे, त्यांची टिंगल करणारे हे विसरतात, की मुळात अण्णांचे अपयश हे आपल्या सगळ्यांचेच अपयश असणार आहे. आंदोलनकर्त्यांमधील नैतिकतेचे वा निष्ठेचे स्खलन हे मुळात आपल्या एकूण समाजातीलच स्खलनाचे प्रतिबिंब आहे.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांत नैतिक व सांस्कृतिक पातळ्यांवर आपल्या एकूण समाजाचेच खूप मोठे स्खलन झाले आहे. देश तोच, समाज तोच, धार्मिक व वांशिक वैशिष्ट्ये तीच, हवामान तेच, पर्यावरण तेच आणि समस्याही साधारण त्याच, अशी एकूण परिस्थिती असतानाही तेव्हाचे आंदोलन आणि आताचे आंदोलन यांच्यात एवढे फरक जाणवतात, याचे सर्वाधिक महत्त्वाचे कारण आपले नैतिक व सांस्कृतिक स्खलन हे आहे.

केवळ या आंदोलनालाच नव्हे, तर एकूण जीवनालाच आपण एक ‘एंटरटेनमेंट’ बनवून टाकले आहे. कुणालाच कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनाला आच पोचत नाही, तोवर समाजाचे काहीही होवो, आपण आपल्या कोषाच्या बाहेर यायला तयार नाही. भावनांची संवेदनशीलता ही सांस्कृतिक उन्नयनासाठी अत्यावश्यक अशी बाब आहे आणि त्याच भावनांचे एक सार्वत्रिक बधिरीकरण आज सगळीकडे जाणवते. उन्नयाच्याऐवजी आपण खाणे, पिणे आणि वीणे या जगण्याच्या प्राथमिक पायरीकडेच चाललो आहोत की काय, अशी शंका येते.

भावनांचे बधिरीकरण आणि जीवनाचे थिल्लरीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच नाण्याची आज समाजात चलती आहे आणि बहुधा यातच तेव्हाचे आंदोलन आणि आताचे आंदोलन यांच्यातला सर्वात मोठा फरक सामावलेला असावा.

**********

लेखक : भानू काळे

 

अंतर्नाद , राजकारण

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.