नरकासुराची वंशावळ आणि आर्यधर्मप्रसार

पुनश्च    माधव राजवाडे    2020-09-26 06:00:54   

अंक : दीपावली, जून १९७०

लेखाबद्दल थोडेसे : विष्णुपुत्र नरकासुराच्या वंशजांद्वारा इसवीसनाच्या ४ थ्या शतकापासून ते बाराव्या शतकारंभापर्यंत आर्यधर्मविस्तार कसा झाला त्याचा आणि वंशावळींचा वेध घेणारे हे विवेचन आहे.  कामरूपाच्या सीमेपासून जवळच भगवान बुद्ध जन्मले व त्यांनीही जवळच्याच मुलुखात धर्मप्रचार व प्रसार आरंभला तरीही  त्याच्या निर्वाणानंतर प्रायः १५०० वर्षे नरकवंशीय राजे बुद्धधर्मापासून अलिप्त राहिले येवढेच नव्हे तर आर्यधर्माचा व शैवपंथाचाच त्यांनी पुरस्कार केला. वर्मन,  शालस्तम्भवंशीय व पालवंशीय राजांच्या  इतिहासांचा हा वेध ताम्रपत्रांच्या आधारे घेता येतो. तरीही दिवाळीतील 'नरकासुराच्या वधाचे' कोडे सुटत नाही, असे हा पन्नास वर्षे जुना लेख सांगतो. या लेखात नरकासुराचा उल्लेख आहे, त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा असेल तर संजय सोनवणी यांचा https://sanjaysonawani.blogspot.com/2015/11/blog-post_10.html  हा ब्लॉग अवश्य वाचा.आर्यधर्मप्रचारक आणि विष्णूचा पुत्र असूनही नरकासुराला असूर मानण्यात त्याच्यावर अन्यायच होत आहे...तसेच दिवाळीतील नर्कचतुर्दशीशी त्याचा संबंध जोडणेही उचित नव्हे...

भारत सम्राट हर्षवर्धन याची व युवानची गाठभेट गंगाकिनारी झाली. त्या भेटीत महायान बुद्धधर्माची हीनयान बुद्धांना खरी ओळख पटवून देण्यासाठी एक धार्मिक परिषद कनौज येथे बोलावण्याचे ठरले. ही परिषद इ. स. ६४३ मध्ये भरली. त्यात एकंदर १९ राजे उपस्थित होते व हजाराचे वर बौद्ध भिक्षुक. ह्या दीक्षान्त समारंभात सम्राट हर्षाने भास्कराला शैवपंथी असूनही बहुमानाचे उच्चस्थान किंबहुना निजसमार स्थान देऊन आपल्या ज्वलंत मैत्रीची ग्वाही दिली. एवढेच नव्हे तरत कनौजनंतर प्रयाग येथे भरलेल्या महामोक्ष परिषदेतसुद्धा तेच बहुमानाचे स्थान पुनश्च दिले.

सर्वत्र प्राप्त वर्णनावरून राजा भास्कर वर्मन प्रख्यात व दिग्विजयी होऊन गेला हे प्रमाण सिद्ध ठरते. राजा भास्करवर्मन सुमारे इ. स. ६५० मध्ये दिवंगत झाला असावा. तो मरेपर्यंत त्यास कुमारराजा म्हणण्याची प्रथा असे. ह्याला दोन कारणे असू शकतात. प्रथम तर तो युवराज नसून द्वितीय राजकुमार होता. व दुसरे म्हणजे तो ब्रह्मचारी असावा. त्याचे नंतर अवंतीवर्मन् राजा झाला पण त्याचे भास्कराशी काय नाते होते हे ज्ञात नाही. अवंतीवर्मनने प्रायः ५ वर्षे राज्य केल्यानंतर वर्मन राजवंशाचा लोप झाला व राज्यात विल्पव झाले. हा काळ सुमारे इ. स. ६६० चा असावा. ह्या राज्यविल्पवाचा बोध पालवंशीय द्वितीय राजा रत्नपाल याच्या ताम्रशासनात मिळतो.

विल्पवकाळी परिस्थितीचा फायदा घेऊन शालस्तम्भ ह्या म्लेंच्छ सरदाराने राज्य काबीज केले असे ते ताम्रपत्रक म्हणते.

एवम् वंशक्रमेण क्षितीमय निखिलाम् भुंजताम नारकाणाम्।

राज्ञाम् म्लेंच्छाधिनाथो विधिचलनवशादेव जग्राह राज्यम्।।

शालस्तम्भ क्रमेस्यापि हि नरपतयो विग्रहस्तम्भमुख्या।

(वडगावचे ताम्रपत्रक)

म्लेंच्छाधिनाथ म्हणजे म्लेंच्छ प्रदेशाचा अधिनाथ अर्थात् सांप्रतचे रूढ भाषेत राज्यपाल अर्थात् गव्हर्नर असावा. म्लेंच्छ प्रदेश म्हणजे आज ज्या ठिकाणी मेच जातीचे लोक आसाममध्ये वास करीत आहेत तोच असावा. कारण मेच हा म्लेंच्छ शब्दाचा अपभ्रंश आहे. शालस्तम्भ वंशीय राजांचा काळ दाखल्यावरून सिद्ध झाला आहे व त्या वंशाचे एकंदर २१ राजांनी प्रायः ३०० वर्षे राज्य केले ह्यालाही प्रमाणे आहेत.

शालस्तम्भ वंश

शालस्तम्भ वंशीय राजे हर्जरवर्मा, बलवर्मा व वनमाल तसेच पालवंशीय राजा रत्नपाल यांचे उपलब्ध ताम्रपत्रावरून संकलित केलेली शालस्तम्भ वंशलतिका इतिप्रमाणेः-

शालस्तम्भ – सातवी शताब्दी शेषार्ध

विजय (विग्रहस्तम्भ)

पालक – आठवी शताब्दी

कुमार वज्रदेव

हर्षदेव वा श्री हरिष – (इ. स. ७४८ ते ७५८ चे सुमारास)

बलवर्मा

चक्र

अरथि

आरथ

प्रालम्भ—जीवदा वा जीवदेवी – नववी शताब्दी

हर्जर – मंगलश्री – इ. स. ८२९-३०

वनमाल

जयमाल (वरीबाहू) – अश्वा

बलवर्मा

त्यागसिंग – मृत्यु इ. स. ९८५.

शालस्तम्भ घराण्याचा काळ अंदाजे इ. स. ६५५ ते इ. स. ९८५ पर्यंतचा होता. ताम्रपत्रक विशेषज्ञ डॉ. हर्व ली यांनी अक्षरांचे पर्यालोचन करून प्रतिपादले आहे, की भास्करवर्माच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षात शालस्तम्भाने वर्मन वंशजाकडून राज्यग्रहण केले असावे. नेपाळातील पशुपतिनाथ मंदिराच्या पश्चिमद्वाराच्या सन्मुख वृषभाच्या पश्चाद्भागी असलेल्या एकखण्ड कृष्णप्रस्तरावर खोदलेल्या शिलालेखावरून राजा हर्षदेवाचा काळ हर्षाब्द १५३ म्हणजे इ. स. ७५८ ठरतो. प्रत्येक राजाने सरासरी २० वर्षे राज्य केले असे अनुमान धरले तर शालस्तम्भाचा काळ भास्करवर्मनचा होतो ह्या अनुमानास दुजोरा मिळतो. दरांग जिल्ह्याचे मुख्यस्थान तेझपूर या शहराच्या सन्निकट ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरी एक पाषाणलेखात राजा हर्जरवर्माचे नाव आहे व गुप्त संवत ५१० असा शब्दांक स्पष्ट लिहिला आहे. गुप्त ५१० म्हणजे इ. स. ८२९-३० वर्ष. ह्यावरून हर्जराचा काळ प्रमाणसिद्ध होतो. तसेच वंशातील शेवटचा अर्थात २१ वा राजा त्यागसिंग निपुत्रिक वारल्यानंतर पालवंशीय ब्रह्मपाल इ. स. ९८५ मध्ये राजा झाला हेही ज्ञात आहे.

शालस्तम्भाला राजा रत्नपाल जरी म्लेंच्छाधिनाथ म्हणतो तरी शालस्तम्भ वंशीय राजे स्वतःस नरक-भगदत्ताचे वंशधर म्हणूनच उल्लेखितात. एवढेच नव्हे तर त्यांच्या शासनाचे सीलसुद्धा हस्तीमूर्ती समन्वित आकार होते. त्याला ताम्रपत्रकात व शिलालेखात आधार आहेत. इतिपूर्व उल्लेखिलेल्या पशुपतिनाथाच्या मंदिरातील शिलालेखात नेपाळच्या राजा जयपालाने भगदत्तवंशीय राजा श्री हर्षदेवाची आत्मजा देवी राज्यमतीशी विवाह केला असे म्हटले आहेः (इ. स. ७४८)

श्री हर्षदेवात्मजा देवी राज्यमती कुलोचित गुणैर्युक्ता।

प्रभुता कुलैर्येनोढा भगदत्तराजकुलजा लक्ष्मीरीवक्ष्माभुजा।।

राजा वनमालच्या तेजपूर ताम्रपत्रकात प्रलम्भ यांचा भगदत्त वंशीय असा उल्लेख आहेः

संप्रातो भगदत्तः श्रीमतप्रागज्योतिषवधिनाथत्वम्।

तस्यान्वये भूत्क्षितीपाल मौलिमाणिक्यरोचिः स्फुरितांष्रिपीठः।

प्राग्ज्योतिषेशः क्षतवैरिवीरः प्रालम्भ इत्यद्भुतनामधेयः।।

राजा रत्नपाल हा राजा प्रालम्भाचा नातू. नेपाळच्या शिलालेखात श्री हर्षदेवाला “गौडोद्रादी—कलिंग—कोसल पति” असेही म्हटले आहे. हर्षदेवाने आपला एक नातेवाईक श्री क्षेमांकर देव ‘ओद्राधिपति’ नेमले. क्षेमांकर व त्याचे वंशजही स्वतःला ‘भौम’ असे विशेषण लावतात. भूमिपत्र नरक ह्यास भौमासूर असेही नाव होते. हर्षाचा नातेवाईक जर नरकापासून आपला उगम प्रकटपणे दर्शवितो तर हर्षाच्या सम्बन्धीही तेच म्हणता येते.

हरुपेश्र्वर म्हणजे सध्याचे तेजपूर

शालस्तम्भ वंशीय राजे हर्जरवर्मन, धनमाल व बलवर्मा यांच्या ताम्रपत्रकावरून ते सर्वच हरुपेश्वर नामक स्थानी शासनारूढ होते. हे नगर कोठे होते ह्याचा पक्का अंदाज जरी करता येत नाही तरी ब्रह्मपुत्रेच्या तीरी उत्तरेस ते असावे. किंबहुना आजचे तेजपूर म्हणजेच हरुपेश्वर असावे असे मानतात. नरकापासून ते भास्करापर्यंत सर्वच राजे प्राग्जोतिषपुरी (म्हणजे गुवाहाती) राज्य करीत. शालस्तम्भाने राज्यग्रहण केल्यानंतर तो प्रागज्योतिषपुरी राज्यशासन करण्यास धजला नसावा व ज्या अंचलाचा तो अधिनाथ त्याच अंचलातील हरुपेश्वरी त्याने राजधानी वसवली असा तर्क आहे. राजधानी कोठेही असली तरी हे स्वतःस भगदत्त वंशीय समजणारे शालस्तम्भाचे वंशजसुद्धा आर्यधर्माचे जोरदार पुरस्कर्ते होते हे उपलब्ध तीनही ताम्रपत्रकावरून निःसंशय सिद्ध होते. तेजपूर येथे सांपडलेल्या राजा वनमालाच्या ताम्रपत्रद्वारा, ‘शाण्डिल्य गोत्रप्रदीप वेदार्थविद् भिज्जट नामक पवित्र देवोचिद् गुणयुक्त व सांग यजुर्वेदाच्या अध्ययन करणाऱ्या एका ब्राह्मणाचे ‘विशुद्धब्राह्मणगुणयुक्ता’ सभ्रायिका नाम्नी सौभागग्यवतीपासून झालेल्या पुत्रास इन्दोकास श्री वनमालदेवाने मातापित्याच्या पुण्यानिमित्त त्रिस्त्रोता (तीस्ता) नदीच्या पश्चिमेस एक गाव दान दिले.’

“बभूव शाण्डिल्य कुलप्रदीपो वेदार्थविद् भिज्जटनाघेयः।

साङ्ग यजुर्वेदमधीतवान् यस्त्यागी शुचिर्देवगुणोपपन्नः।।

शौचविप्रगुणोपेता पत्नी सभआयिकामिधा।

ब्राह्मयेण विधिना सम्यक् परिणीता कुलोद्भवा।।

सुनुस्तयो र्वेदविदग्रजन्मा इन्दोकनामा गुणवान् वरिष्टः।

तस्मै ददौ श्री वनमालदेवो ग्रामं स मातापितृपुण्याहेतोः।।”

राजा बलवर्माने केवळ जमीनच ब्राह्मणास दिली येवढे नव्हे तर तीही मुक्त हस्ते. दक्षिण कुलातील द्विजिन्ना विषयान्तर्गत ४००० चतुसहस्त्र द्रोण धान ज्यातून उत्पन्न होईल एवढी जमीन त्याने ऋतिधर नामक ब्राह्मणास स्नान करून दान दिली. कपिलगोत्रदीप तपस्वी पुण्यात्मा मालाधर भट्ट यांचा वैदिक धर्म अध्वर्यू पुत्र देवधर व त्याची सौभाग्यवती श्यामायिका यांचा हा ऋतिधर पुत्र होता. हे दान राजाने आपल्या कारकीर्दीच्या आठव्या वर्षात दिले.

वैदिक चालीरीतींचाच पगडा

राजा बलवर्माचा पिता राजा जयमाल याने तसेच नंतर राजा ब्रह्मपाल यानेही योग्य वेळी राजसंन्यास घेतला ही घटना वैदिक धर्माला अनुसरून होती व आसामीय राजांवर वैदिक चालीरीतींचा किती दीर्घ पगडा होता याची आणखी एक प्रमाण देते.

वंशातील एकविसावा राजा त्यागसिंह निपुत्रिक वारला म्हणून त्याच्या प्रजेने ‘भौमच’ राजा असावा ह्या हेतूने नरकवंशीय ब्रह्मपालास इ. स. ९८५ मध्ये राजा निवडला.

निर्वंशम् नृपम् एकविंशतितम् श्री त्यागसिंहामिधन्तेषाम्।

विक्ष्य दिवंगतम् पुतरहो भौमो हि नो युज्यते।।

रत्नपाल ताम्रफलक

पालवंश

नरकवंशीय ब्रह्मपालाने स्वतःस महाराजाधिराज ही उपाधी घेतली होती. तो थंड स्वभावाचा होता व त्याच्या कारकीर्दीत कोणतीही विशेष घटना घडली नसावी नाहीतर नंतरच्या सापडलेल्या तीनचार ताम्रफलकात त्यासम्बन्धी उल्लेख सापडला असता. चिरंजीव रत्नपाल राज्यभार धारण करण्यास योग्य होताक्षणीच ब्रह्मपालाने राजसंन्यास घेतला व गादीची सूत्रे रत्नपालाच्या हाती सोपवली. ह्या वंशाचे एकंदर आठ राजे होऊन गेले व त्यांची कारकीर्द १४० वर्षे म्हणजे इ. स. ११२५ पर्यंत टिकली.

ब्रह्मपालग

रत्नपाल

पुरंदरपाल

इंद्रपाल

गोपाल

हर्षपाल

धर्मपाल

जयपाल.

वरीलपैकी रत्नपाल, इन्द्रपाल व धर्मपाल ह्यांनी दिलेली प्रत्येकी दोन म्हणजे एकूण सहा ताम्रपत्रके उपलब्ध आहेत. रत्नपालाची पत्रके त्याच्या कारकीर्दीच्या अनुक्रमे २५ व्या व २६ व्या वर्षात दिलेली आहेत. इन्द्रपालाने आठव्या वर्षात व एकविसाव्या वर्षात ही ताम्रपत्रके काढलीत. धर्मपालाच्या फक्त पहिल्या ताम्रपत्रकाचीच वेळ म्हणजे कारकीर्दीच्या तिसऱ्या वर्षात दिली. पण ह्याच धर्मपालाच्या दोन्ही पत्रकांमध्ये पालवंशावळ उद्धृत केली आहे त्यावरून वंशमालिकेसम्बन्धी पूर्ण उलगडा होतो. ह्या दोन्ही पत्रकांच्या आरम्भीच ब्रह्मपालाच उगम नरक भगदत्तापासून वर्णिला आहे. रत्नपालाच्या प्रथम ताम्रफलकातील श्लोक इतिपूर्व नोंदलाच आहे. इंद्रपालाचे दोन्ही पत्रकात पालवंशाचा उगम नरक-भगदत्त-वज्रदत्तापासून दर्शविला आहे—श्लोक-८.

भौमान्वयोन्नतिपदप्रथितप्रतिष्टः पृथ्वीभुजां विजयिनांघुरि वज्रदत्तः।

दोर्वज्रवीर्यपरितोषित वज्रपाणिरासिदमुष्य मुषितारियशास्तनुजः।।

अस्मिन्नेव नृपान्वये नरपतिः श्री ब्रह्मपालोभवत्।

मगध देशीय वर्मनराजांच्या ताम्रपत्रकानुसार मगधराज जातवर्मन याने ब्रह्मपालाचा पराभव केला. ह्याच कारणास्तव बहुधा ब्रह्मपालाने राजसंन्यास घेतला असावा असा इतिहासकारांचा तर्क आहे. रत्नापालाने गादीवर आल्याबरोबर राजधानीच्या संरक्षणाकडे दृष्टिक्षेप केला व शहराचा त्याने कडेकोट बंदोबस्त करून राजधानीचे नव्याने ‘श्री दुर्जया’ असे नामाभिधान केले. ह्याची कारकीर्द एकूण तीस वर्षांची झाली व तो पराक्रमी म्हणून गाजला. ‘परमेश्वर परमभट्टारक महाराजाधिराज’ ही पदवी त्यास ब्रह्मवृंदानी चिकटवली व ‘शत्रुघ्न’ म्हणून त्याची कीर्ती गायली. पूर्वजांप्रमाणे तोही शास्त्र पंडीतांचा आश्रयदाता झाला. त्याची दोन ताम्रपत्रके – पहिले वडगांव येथील व दुसरे सोयालकुची येथील – उपलब्ध आहेत. पहिल्या ताम्रपत्रकान्वये २००० द्रोण धान्योत्पादान होईल एवढी जमीन राजाने शास्त्रविद्येतील अग्रगण्य व धर्मनिष्ठ ब्राह्मण वीरदत्त यांस विष्णुपदी संक्रांतीच्या दिवशी दान केली. हा वीरदत्त वाजसनेयी (यजुर्वेदीय) काण्वशाखेचा पराशर गोत्रीय होता. पत्रकाप्रमाणे तो शास्त्रज्ञगणाग्रणी व तीक्ष्णबुद्धी होता. जमीन लौहित्यनदीच्या उत्तरकुलात त्रयोदशग्राम विषयातील लाबूकुटी क्षेत्रात होती. दुसऱ्या ताम्रपत्रकाप्रमाणे ३००० द्रोण धान्योत्पत्ती होईल एवढी जमीन कलंग विषयात भारद्वाज गोत्रोत्पन्न काण्वशाखीय वाजसनेची भट्ट बलदेव ह्या विख्यात पंडीताचा पौत्र कामदेव यांस दिली होती.

ताम्रपत्रकांवरून स्पष्ट होणारी माहिती

रत्नपालाचा पुत्र पुरंदरपाल अकाली वारल्याने त्याचा पुत्र इंद्रपाल राजा झाला. तो पण विद्वत्तेचा पाठीराखा होता. इंद्रपालाच्याही दोन ताम्रपत्रिका उपलब्ध आहेत. ज्याअर्थी दुसरी पत्रिका कारकीर्दीच्या २१ व्या वर्षी दिली गेली त्याअर्थी असे मानण्यास प्रत्यवाय नाही की त्यानेही पितामहाप्रमाणे अनेक वर्षे राज्य केले. पहिल्या पत्रिकेद्वारा हप्योप विषयातील ४००० द्रोण धान्य उत्पत्ती होईल एवढी जमीन यजुर्वेदीय कश्यप गोत्रीय देशपाल ब्राह्मणास दिली गेली. दुसरीप्रमाणे ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनारी मन्दी विषयात २००० धान्योत्पत्ती होईल एवढी जमीन वैनामक गावच्या यजुर्वेदी काण्वशाखीय सोमदेव ब्राह्मणास दान दिली गेली.

रत्नपाल व इंद्रपाल हे दोघेही ११ व्या शतकात राज्य करून गेले. इंद्रपालनंतर पुत्र गोपाल व नातू हर्षपाल हे गादीवर आले. पैकी हर्षपालाची कारकीर्द धामधुमीची झाली. विल्हणाच्या ‘विक्रमांक चिरतात’ चालुक्यराज विक्रमांक याच्याशी हर्षपालचे युद्ध झाले असे विदीत आहे. हर्षपाल व राणी रत्ना यांचा पुत्र धर्मपाल हा गादीवर आला व १२ शतकापर्यंत राज्य करता झाला. त्याच्याही दोन ताम्रपत्रिका उपलब्ध आहेत. पहिल्या पत्रकाद्वारा सामवेदज्ञ शाण्डिल्य गोत्रीय ब्राह्मण रामदेव याच्या दोघा पौत्रांना द्विजिन्ना विषयातील ओविंदाप व कांजियाभिटी अशा अनुक्रमे ४००० द्रोण व २००० द्रोण धान्यापादन करणाऱ्या जमीनी दान दिल्या गेल्या. दुसऱ्या ताम्रपत्रकात पूरजि विषयातील गुहेश्वर डिगडोल गावातील १०००० द्रोण (दशहस्त्र द्रोण धान्योत्पत्ती) जमीन ख्यातिपती गावच्या यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेच्या सुद्धमौद्गल गोत्रीय मधुसूदन भट्टास दान दिली. उक्त दोन्ही ताम्रपत्रकांतील ब्रह्मवृदांचे व त्यांच्या सहधर्मचारिणींचे वर्णन फारच काव्यमय आहे. वरीलपैकी एका सनदेत धर्मत्याग करू नये असा उपदेश केला आहे. ह्या विशेष उल्लेखावरून असे अंदाजिले गेले आहे की धर्मपालाच्या कारकीर्दीत कामरूपमध्ये तांत्रिक बुद्धधर्माचा प्रचारारंभ झाला.

धर्मपालानंतर जयपाल गादीवर आला. गौडाधिपती रामपाल याने इ. स. ११२५ मध्ये कामरूपवर स्वारी करून जयपालाचा पराभव केला. येथेच नरकासूर वंशाचा अखेर अस्त झाला.

उपलब्ध ताम्रपत्रके व शिलालेखांवरून हे सिद्ध होते की बुद्धाचा व बुद्धधर्माचा जन्म शेजारील राज्यात होऊनही आसाम म्हणजे कामरूपवर त्याचा प्रभाव पडला नाही. ह्या विधानास युवानच्वँगची साक्ष आहे. राजा भास्करवर्मन सम्राट हर्षवर्धनाचा परममित्र तरी सुद्धा कनौजच्या महान धार्मिक बैठकीत भास्कराची वैदिक धर्मावरील श्रद्धा अबाधित राहिली. सर्वच वर्मन राजे शैवपंथी राहिले व क्षात्रधर्मास अनुसरून ते ब्राह्मणांचे पुरस्कर्ते व त्राते राहिले. त्यांचे अभय वर्तमान राहिले. अनेक मंदीरे त्यांनी स्थापन केली व वेळोवेळी यज्ञही आरंभिले. ब्राह्मणधर्माचा प्रचार कामरूपात इतका होता की शंकराचार्यसुद्धा इ. स. च्या ९ व्या शतकात कामरूपास भेट देते झाले. त्यांच्या आधी आठव्या शतकातील कुमारिल भट्ट हा ब्राह्मण कामरूपच्या इतिहासात सुप्रसिद्ध आहे. भास्करवर्माच्या निधानपूर ताम्रपत्रकात त्याचा जो स्वाभिमान गौरवपूर्वक उल्लेख आहे तो असाः ‘कालितिमिर संचयतयाप्रकाशितार्य धमीलोकः’, ‘कलियुगपराक्रमाकलितविग्रहस्य समुच्छवास इव भगवतो धर्मस्य नयस्याधिष्टानभास्पदं गुणानां निधिः’ – अनेक आसामीय राजांनी शिवमंदीरे बांधली व यज्ञही केले. भूतिवर्मन भास्करवर्मन, वनमाल, बलवर्मा, रत्नपाल, इन्द्रपाल, धर्मपाल ह्या राजांनी मुक्त हस्ते भूमिदाने दिली ते इतिपूर्व सविस्तर वर्णिलेच आहे.

विष्णुपुत्र नरकासुराच्या उपर्युक्त वंशजांद्वारा इसवीसनाच्या ४ थ्या शतकापासून ते बाराव्या शतकारंभापर्यंत आर्यधर्मविस्तार कसा झाला त्याचा हा विमर्श झाला. कामरूपाच्या सीमेपासून जवळच भगवान बुद्ध जन्मला व त्यानेही जवळच्याच मुलुखात धर्मप्रचार व प्रसार आरंभिला तरीही कुशीनगरी त्याच्या निर्वाणानंतर प्रायः १५०० वर्षे नरकवंशीय राजे बुद्धधर्मापासून अलिप्त राहिले येवढेच नव्हे तर आर्यधर्माचा व शैवपंथाचाच त्यांनी पुरस्कार केला. भास्करवर्मनला दिलेल्या ‘प्रकाशित आर्य धर्मालोक’ ह्या संज्ञेचा अर्थ असाच लावावा लागेल की तद्देशीय आर्येतर अर्थात् मांगोलियन जमातींना त्याने आर्यधर्माची दीक्षा दिली. वर्मन राजांप्रमाणेच शालस्तम्भवंशीय व पालवंशीय राजे कर्मठ म्हणावे लागतील कारण त्यांनी शेकडो देवळे बांधली व मुक्त हस्ते जमिनी दान करून ब्राह्मणांना आपलेसे केले. एवढेच नव्हे तर यज्ञ करून होणाच्या धूराने गगन धूसरही केले.

नरकासुराला आसूर म्हणणे अयोग्य

असा ह्या आर्यधर्म प्रचारक आर्येतर जमातींच्या राजांचा आर्यानी द्वेष कां करावा? त्यांची ‘असूर’ म्हणून गौणत्वी गणना करावी कां? आपल्या देशातील वैदिक-अवैदिक अशा झगड्याचा हा कोणता प्रकार मानावा? जैन-बौद्ध हेही अवैदिक होते. नरकासूर व त्याचे वंशज आर्यधर्माचे पुरस्कर्ते राहिले. मग त्यांच्या विरुद्ध द्वेशाचे बीज कां रोवले गेले? या संदर्भात नरकचतुर्दशीचा जो नरकवधाशी संबंध जोडला गेला आहे तो आणखीनच गोंधळातच टाकणारा आहे. बहुधा ह्यातील नरक हा नरकासुराशी संबंध नसून नर्क म्हणजे Hell शी जोडलेला असावा; पण पुराणकालीन कथांनी केवळ प्रबळ आर्येतर म्हणून नरकासुराला त्यात ओढलेले दिसते. आणखी एक विचार या संदर्भात अधिक तार्किक वाटतो. तो असा की नरकासूर हा विष्णूचा भूमीपासून झालेला पुत्र जनकराजाने त्याचे पालनपोषण केले. पण त्याचे सात्मीकरण झाले नाही. म्हणजे देवपुत्र असुनही, अनौरस समजल्याने तेथे परका – दानवात देवांचा म्हणून दूरचा. त्याच्या मानसिक कोंडमाऱ्याने त्याच्या कर्तृत्वशाली आयुष्यात कामाख्यादेवीच्या संदर्भात त्याला विचलित केले असे म्हटल्यास ते फारसे अति आधुनिक ठरू नये. शिवाय त्याच्या आक्रमक व अग्रेसर भूमिकेचेही यात थोड्या अंशाने स्पष्टीकरण नाही का सापडत?

********

लेखक : माधव राजवाडे

Google Key Words - Madhav Rajwade, History of Kamrup, Historical Reference of Narakasur, Arya's and Non Aryan's Conflic, Aryadharma

इतिहास , माहिती

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.