तुरुंगातले दिवस

आणीबाणी    मृणाल गोरे    2018-06-02 06:00:38   

आणीबाणीच्या काळात अनेक नेते तुरुंगात गेले. तुरुंगातही त्यांनी आपापल्या परीने आणि पद्धतीने लढा आणि निषेध सुरुच ठेवला होता. मृणाल गोरे या त्यातीलच एक झुंजार नेत्या. अटकेपासून वाचण्याचे प्रयत्न फसल्यावर अखेर त्यांना अटक झालीच. त्यांना सतत एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येत होते. या दरम्यान त्यांनी पाहिलेले कैदी, तुरुंगातील अव्यवस्था आणि वेळोवेळी त्यांनी केलेला संघर्ष त्यांच्याच शब्दात-

********

माझी भांडणे, माझा आग्रह

आर्थर रोड, अकोला, धुळे, येरवडा, चार कारागृहातील माझा वर्षा-सव्वा वर्षाचा तुरुंगवास! आता मागे वळून पाहिले म्हणजे या सगळ्या कालखंडाची मोठी गंमत वाटते, सुखदु:खाचे अनेक प्रसंग आठवतात. पण त्यातून ध्यानात राहिले आहेत ते या काळातील समर प्रसंग! कोणत्याही तुरुंगात अन्यायाने वागणाऱ्या कोणाशी माझं भांडण झालं नाही असं नाहीच. माझा स्वभाव भांडखोर आहे का? मला मनापासून वाटत नाही मी भांडखोर स्वभावाची आहे. पण अन्याय दिसला की राहावतच नाही. त्याला मी तरी काय करणार? अन्यायाविरुद्ध उभं राहाण्यासाठी मन उसळून येतं. आता, मला अटक झाली तोच दिवस पहा ना. एका मोठ्या तुरुंगातून मी छोट्या तुरुंगात कोंडली गेले तो दिवस २१ डिसेंबर १९७५. खरंच, त्या आधीचे सहा महिने मी मोकळी होते का? दिवसासुद्धा तोंड बाहेर काढायची चोरी! तोंड बाहेर काढायची कसली, जिथं असेन तिथल्या दारं-खिडक्यासुद्धा उघड्या ठेवायची चोरी असायची, म्हणजे तो तुरुंगच नाही का? पहाऱ्याला पोलीस नसले म्हणून काय ??? दादरच्या एका ब्लॉकमध्ये होते. बाल्कनीत दार बंद करून घेतलं होतं, आत वाचत होते. तेवढ्यात ज्यांच्याकडे होते त्यांच्या आजींना शेजारच्या काकूंनी विचारले, ‘‘आजी, चार दिवस झाले बाल्कनी बंद दिसतेय.’’ आजी काय सांगणार कप्पाळ! म्हणाल्या, ‘‘कावळे सतावतात हो फार!’’ नशीब काकूंनी विचारलं नाही : गेल्या चारच दिवसात कावळे फार झाले का?

खांडेकरांच्या घरी

तर असा सारा मामला. बंद दारांच्या आड राहायचं. रात्रीच बाहेर पडायचं. जोखमीनं प्रवास करायचा. मात्र उमेद होती. उत्साह होता. काहीना काही काम होत होते. त्याचे समाधान होते. त्या दिवशी माझा मुक्काम होता वांद्र्याला, माऊंट मेरी रोडच्या टोकाला. खांडेकरांकडे. तिथेच २१ डिसेंबरला संध्याकाळी, वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिपचा वरंवटा फिरत असूनसुद्धा पत्रकार गप्प का राहातात? कोणीच कसं अन्यायाविरुद्ध उभं राहात नाही? हा विचार मला सतावत होता. म्हणून अगदी विश्वासातले, पत्रकार संघात काम करणारे चार पत्रकार खाजगी निरोप देऊन बोलावून घेतले होते.

लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत, हा अन्याय मुकाट्याने सहन करू नका, असे मी काहीबाही बोलले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. वेळ संध्याकाळी ५ ची होती. तास-दीड तासांनी पत्रकार मित्र बाहेर पडले आणि नंदू धनेश्वर, सुधाकर प्रभुदेसाई हे आमचे कार्यकर्ते आले होते, त्यांच्याशी व माधवराव खांडेकरांशी गप्पा मारीत बसले होते. रात्री ८-९ वाजता पन्नालाल सुराणा येणार होते. त्यांची वाट पहात बसलो होतो. तेवढ्यात बेल वाजली... बहुतेक पन्नालाल आले, असं म्हणत खांडेकर उठले आणि त्यांनी दार उघडलं... बाहेर काय चाललंय याची मला कल्पनाच नव्हती. आमच्या गप्पा चालूच होत्या. तेवढ्यात खांडेकर चेहरा टाकूनच खोलीत परतले, म्हणाले,' संपलं ' 

खांडेकरांच्या त्या वाक्याचा अर्थ ध्यानात यायला वेळ लागला नाही. मी समजून चुकले. आपलं स्वातंत्र्य संपलं, आणि स्वातंत्र्यासाठी चाललेली खटपटही संपली. खांडेकरांच्या मागेच इन्स्पेक्टर इंगळे उभे होते! रेशमी झब्बा. फरची टोपी. खाजगी वेशात. तेही ओळखीचे. ‘ताई, चला.’ हसून ‘चला’ असा प्रतिसाद दिला व तयारीसाठी वेळ मागून घेतला आणि आतल्या खोलीतल्या कागदपत्रांची डायरीची लपवालपवी केली आणि अर्ध्या तासातच त्यांच्याबरोबर निघाले. त्यांनी टॅक्सी मागवली होती. तिच्या दाराशी पोचले आणि आठवलं की, खांडेकरांच्या बहिणीला काही कागदपत्र व डायरी ताबडतोब नाहीशी करायला सांगावे. मग इंगळ्यांना म्हटलं- इंगळे, चष्मा राहिला आहे तेवढा घेऊन येते. बरं म्हणाले. तेवढ्यात वर जाऊन ‘ती’ वही नाहीशी करण्याचं सुचवून गाडीत येऊन बसले.

पाचच मिनिटात टॅक्सी वांद्रे पोलिस स्टेशनवर पोचली. इंगळे साहेबांनी तेथून फोन केले. साऱ्या वरिष्ठांना त्यांनी काम फत्ते झाल्याची वर्दी दिली असणार! मी पण मधल्या वेळेचा असाच उपयोग करून घेतला. पोलिस स्टेशनच्या बाहेर आमचे वांद्र्याचे सलिमभाई जाताना दिसले. त्यांना हाका मारून बोलावून घेतले. चार-दोन नावे सांगून त्यांना, मला अटक झाल्याचे कळवा म्हणून निरोप दिला.

पहिलं भांडण

मला अटक झाली ८ वाजता व क्रॉफर्ड मार्केटजवळच्या सी.आय.डी. ऑफीसमध्ये पोचायला आम्हाला रात्रीचे २ वाजले. मधलं सगळंच काही सांगत बसत नाही, पण माझं पहिलं भांडण येथेच सुरू झालं. मी म्हणत होते, मला प्रथम घरी घेऊन चला - गोरेगावला. मला कपडे-पुस्तके घ्यायची आहेत, पण पोलिस ऐकेनात. त्यांनी जास्तीत जास्त सवलत दिली, खारला भावाकडे भेटण्याची. खारला माझा तास-दीड तास अगदी मजेत गेला. मला पकडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते डेप्यु. कमिशनर मोकाशी तेवढ्यात येऊन पोचले. ‘‘काय आमच्याकडले गुलाब पहायला केव्हा येणार?’’ हसत हसत मोकाशींनी विचारले. चेंबूरच्या त्यांच्या बागेतील गुलाबाला, गुलाबप्रदर्शनात बक्षीस मिळाल्याचे वाचल्यावर मी त्यांना भूमिगत असतानाच एक पत्र पाठविले होते. त्या पत्राचे हे उत्तर होते. ते ऐकून मी पण हसले. मग त्यांना माझ्या थोरल्या भावाकडे घेऊन चला म्हणून आग्रह धरला, धाकट्या दिरांना भेटायचं आहे म्हणून सांगितलं. माझं जेवण खारलाच झालं. वहिनीनी आवडीचे पदार्थ केले होते. रात्री १२।। वाजता आम्ही दादरला गेलो. माझ्या दिराची भेट घेतली. कुलाब्याला आई-वडिलांना भेटले. मला अटक झाल्याचे पाहिल्यावर आईने सुटकेचा नि:श्वास सोडला, मला म्हणते कशी ‘अगं, आता पंधरा दिवसांनी का होईना तुरुंगात तुला भेटता तरी येईल!’ तिचं उत्तर ऐकून मी हसले. पण मला तिची व्यथा समजत होती. भूमिगत कालखंडात फक्त एकदाच मी आई-वडिलांना भेटू शकले होते. आईला माझी सारखी काळजी असायची. गुप्तपणे वावरताना माझे हाल चालले आहेत, असं तिला वाटायचं. त्यामुळेच मला अटक झाल्यावरची तिची पहिली प्रतिक्रिया सुटकेची होती! रात्रीच्या या वेळी अवेळी झालेल्या विचित्र अवस्थेतील भेटीगाठी संपवून रात्री २।। वाजता सी.आय.डी. कचेरीत आम्ही आलो. तिथे स्त्रियांचा वेगळा वॉर्ड नाही - तेव्हा एका खोलीतच टेबलावर बिछाना तयार केला व सकाळची वाट पहात उरली सुरली रात्र काढली.

फोन केला हे खोट्टं

२२ डिसेंबर हा तुरुंगवासाचा माझा पहिला दिवस. मी आता ऑर्थर रोडमध्ये भरती झाले आहे. आमचे भुमिगत प्रयत्न काही अगदीच फसलेले नाहीत. तुरुंग सत्याग्रहींनी भरून गेलेला आहे. एवढा गच्च भरलेला आहे की या तुरुंगात धडपणे झोपायलासुद्धा जागा नाही. अक्षरश: कुशीवर आम्ही सगळ्या झोपत होतो. एकत्र जेवण, गप्पागोष्टी, बौद्धिके. दोन दिवस कसे मजेत गेले. पण हे सुख काही लाभायचं नव्हतं. दि. २४ लाच मला अकोल्याला हलविण्यात आलं. २५ तारखेला माझ्या भाचीचं लग्न होतं, लग्नाला सारी नातेवाईक मंडळी जमतील, कोणीना कोणी भेटणारच या आनंदात मी होते, पण कसल्या भेटीगाठी घेऊन बसलात? चोवीसच्या संध्याकाळी मला सांगण्यात आलं : २० मिनिटात तयारी करा. अकोल्याची गाडी गाठायची आहे! ‘‘मला मुंबईहून अकोल्याला नेले जात आहे हे घरी कळवू दे - नाहीतर उद्या आमच्या घरच्या लोकांना हेलपाटा पडेल’’ मी पोलिस अधिकाऱ्याना सांगत होते, पण ते ऐकायला तयार नव्हते. मी हट्टाला पेटणार असे दिसताच मग ‘‘आम्ही फोन करून निरोप सांगतो’’ याला कबूल झाले, आणि माझ्यासमोर नंबर फिरवून त्यांनी फोन केल्याचे नाटक केले! होय! नाटक केले असंच मी म्हणते. कारण मी अकोल्याला आहे हे बाहेर कुणाला कळवलंच नाही. पोलिसांच्या खोटेपणाचा हा काही एकच अनुभव नाही. पुढेही मला असेच वाईट अनुभव आले आहेत. येरवड्याच्या जेलमध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आलेल्या भाचीला मला फुलं देण्यापुरतंसुद्धा भेटू दिलं नाही! तिथल्या जेलरबाईचं आडनाव होतं रसाळ, पण नुसती नावाची रसाळ! एवढासुद्धा ओलावा तिच्या मनाला नसावा. ही झाली पुढली गोष्ट. माझ्या तुरुंगवासातले खरे रामायण झाले अकोल्याला. बोरीबंदरवर अकोल्याच्या गाडीत मला मागल्या बाजूने चढविण्यात आले. हेतू असा की गाडीत कोणाला समजू नये की मृणाल गोरे गाडीत आहेत. पण मी काय झाकून रहाणारी बाई होते का? रेल्वेवरचे नोकर, स्टेशनवरचे पोर्टर, ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांनी त्यांनी डब्यापाशी गर्दी केली आणि दहा-पंधरा मिनिटात साऱ्यांना ही बातमी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला अकोल्याच्या तुरुंगात भरती करण्यात आलं. अकोल्याचा तुरुंग म्हणजे का तुरुंग होता? एकाला एक जोडलेल्या दोन बराकी. थोड्याच अंतरावर तिसरी बराक. त्यातली एक बराक माझ्यासाठी साफसूफ करून ठेवली, पण दिवस थंडीचे होते. माझं अंथरुण-पांघरुण असलं तरी आम्हाला मुंबईच्या थंडीची सवय - एका शालीनं येथली थंडी भागते. अकोल्याला ती रात्र मी अक्षरश: कुडकुडत काढली. गार वारे अंगाला झोंबत, त्यांनी झोप साफ उडाली होतीच, तेवढ्यात बराकीच्या दुसऱ्या टोकाकडे पाहून मी तर भेदरूनच गेले. ....एक नागडी आणि केस सोडलेली बाई त्या बराकीच्या गजांना धरून माझ्याकडे रोखून पाहात असलेली जेव्हा दिसली तेव्हा तर थंडी असूनही डोळ्याला डोळा लागण्याची जी थोडी फार शक्यता होती तीही मावळली. ही नागडी बाई ठार वेडी होती. बाई कसली १९-२० वर्षांची तरुणी, तिचे असे का झाले, कधी झाले, केव्हापासून झाले मला काही समजले नाही, पण ती रात्र मी त्या बिछान्यावर कशी काढली माझी मला माहीत. त्या वेडीचे सारे विधी त्या बराकीतच होत. ती स्नान कधी करीत असे देव जाणे. तिच्या जोडीला दोन कैदी बायका होत्या, पण तिचा हा अवतार पाहून त्या तिच्याकडे दुर्लक्षच करीत. त्या तिला पुरेसे खायलासुद्धा देत नसत. जास्त खाल्लं की जास्त घाण करते! असं त्यांचं म्हणणं - म्हणजे तिची उपासमार चाललेलीही मला दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राऊंडवर आलेल्या जेलरला माझी तक्रार मी सांगितली. पण तो काहीच करू शकत नव्हता. ‘मला बदलीचा हुकूम मिळाल्याशिवाय मी तुम्हाला हलवू शकणार नाही व येथे या बराकीशिवाय स्त्रियांचा दुसरा तुरुंग नाही.’ जेलचे सर्वच कर्मचारी माझ्याशी चांगले वागत. त्यांच्या त्यांच्या मर्यादेत जेवढे होईल तेवढी मदत करीत. जास्त मदत करीत. काही वेळा त्यांचाही नाइलाज असे, मग अगतिकपणे त्यांना नियम पाळावे लागत. अकोल्याच्या जेलरचे तसेच होते. तो बिचारा अगतिक होता, पण मी तरी काय करणार? पलीकडल्या बराकीत महारोगी बायकांचे ठाण आणि येथे सोबतीला वेडी. तिचे कपडे काढून टाकून रडणे-ओरडणे. आपण चार दिवस येथे राहिलो तर आपल्यालाच वेड लागणार नाही ना! अशा भीतीने मी धास्तावले होते. म्हणून साऱ्या हकिगतीचं एक पत्र पोस्टात पडेल अशी व्यवस्था मी केली. पत्र पोचलं आणि चार दिवसात प्रभुभाई संघवी व कोमकर वकील अकोल्याला आले आणि त्यांनी कोर्टात अर्ज करायचे ठरविले.

भुकेली मुलं

त्याच्या आधीच त्या वेड्याबाईशी मी जमवून घेतलं होतं. एके दिवशी दुपारी माझं जेवण चाललं असताना तिने दाराशी येऊन ‘आई’ अशी हाक मारली. मी एकदम चमकून पाहिले. मला आई म्हणून हाक कोण मारते आहे? तोच ती वेडी म्हणाली : आई, भाकर दे ना! 'आई भाकर दे ना' या तिच्या शब्दांतील सारं कारुण्य मला एकदम जाणवलं, मी त्या दाराशी गेले आणि तिला माझ्यातील पोळी-भाजी नेऊन दिली. माझा तिच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि मी तिच्याकडे अधिक ममतेने पाहू लागले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिने हाक मारली. मी वाट पाहातच होते. मग मी तिला म्हटलं, ‘‘तू कपडे घालून ये तर तुला भाकरी देते.’’ ‘‘देशील? नक्की देशील?’’ असे म्हणत ती पोरगी पळाली. कोपऱ्यात फेकून दिलेली साडी नेसून, डोक्यावरून पदर घेऊन अशी लाजून दाराशी उभी राहिली, मी क्षणभर चक्रावून गेले. हीच का ती वेडी होती? माझ्यातली भाकरी तिला दिली. तेव्हा म्हटलं, आता साडी टाकायची नाही ना? किती छान दिसतेस तू. भाकरी खाऊन झाली आणि दोनच मिनिटात पुन्हा तिला हिसका आला आणि कपडे भिरकावून ती पुन्हा निसर्गावस्थेत नाचू-ओरडू लागली. या तुरुंगात इतर काही कैदी बायका होत्या. त्या काही गुन्हेगार नव्हेत. किरकोळ गुन्ह्यासाठी आलेल्या. जामीन भरायला पैसे पण नसत. अशा बायकांच्या चार-दोन मुलांशीही माझी ओळख झाली होती, ती पण मुलं भुकेली असत. सकाळी-संध्याकाळी थोडी भाकरी, कधी फळं, असं त्यांना द्यावं, त्यांच्याशी प्रेमानं बोलावं, केवढा विरंगुळा होता मला आणि त्या मुलांनासुद्धा. ती मुलं माझी वाट पहात बसत. तुरुंगातल्या मुलांवरून आठवलं. ऑर्थररोड जेलमध्ये सोलापूरकडला एक मुलगा होता. नाव शेखर. माझ्याकडून माझ्यातला ब्रेड हक्कानं घ्यायचा. मी पण त्याला हाक मारून, बोलावून द्यायची. इतरही खाऊ द्यायची. मला तो ताईच्या ऐवजी ‘तारी’ म्हणायचा. ‘तारी, खाऊ’. निरागसपणे माझ्या वॉर्डपाशी येणाऱ्या त्या छोकऱ्याला मला विसरताच येणार नाही. माझ्या भेटीला येणाऱ्या लोकांकडून मी त्याला कपडेही आणवून दिले. इतक्या लहान वयात त्यांना घराच्या उबदार वातावरणाबाहेर तुरुंगात आपले बालपण काढावे लागावे. नियती तरी केवढी क्रूर असते! घराच्या अंगणात बागडायचं त्याचं वय चार भिंतीच्या आत जखडलं जातं, कोंदट, कुबट वातावरणात. मला राहून राहून वाटतं, निष्कारण तुरुंगवास घडणाऱ्या या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. शहरातल्या महिला मंडळांनी महिन्यातून एकदा तरी या मुलांना गोडधोड खाऊ द्यायला काय हरकत आहे?

पोलीस गाडीसमोर सत्याग्रह

बोलता बोलता अकोल्यावरून मी एकदम ऑर्थररोडमध्ये आले, त्या शेखरसाठी! तिथे अकोल्यात मात्र ती वेडी सुधारण्याचे काहीच लक्षण दिसेना. मी तिला भाकरी देत होते, समजावितही होते, पण एकीकडे माझे डोके फिरून जात होते. पण हा छळ लवकरच संपायचा होता. कारण प्रभुभाईंनी हायकोर्टात अर्ज दाखल केल्यामुळे सरकार जागे झाले होते. मुंबईला केव्हा काय झाले, मला काही कळले नाही. पण एके दिवशी संध्याकाळी अकोल्याहून मला नेण्यासाठी पोलीसची गाडी येऊन उभी राहिली! ‘कुठे नेणार?’ मी विचारले. ‘धुळ्याला’ - जेलरने सांगितले. ‘या गाडीतून...’ आश्चर्याने मी विचारले! कारण ती गाडी म्हणजे खटारा होता. जाळीची निळी पोलीस गाडी असते तशी. नाही आत बसायला बाक ना काही. मी तिथं अक्षरश: सत्याग्रहच केला. या गाडीतून मी जाणार नाही. तुम्हाला हवे असेल तर मला उचलून आत ठेवा. निर्धाराच्या या वाक्याने जेलर व पोलीस अधिकारी चमकले. पण त्यांनी हट्ट कायम ठेवला होता. माझाही निर्धार पक्का होता. माझ्याबरोबर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस ॲम्बॅसडरमधून येणार आणि मला खटाऱ्यातून - तेवढ्यात मला भांडणाचा आणखी एक मुद्दा सुचला. ‘माझी ट्रान्सफर ऑर्डर कुठे आहे?’ मी विचारले. ‘ती तुम्हाला धुळ्याला देऊ, तुमच्या कागदपत्रात सील होऊन पुढे गेली आहे.’ - जेलरने सांगितले. वस्तुस्थिती अशी होती की ट्रान्सफर ऑर्डर मुळी निघालीच नव्हती. टेलिफोनवरून तातडीचा निरोप होता, गोरेबाईंना धुळ्याला हलवा! जेलर तरी मला ऑर्डर दाखवणार कुठून? त्यांनी चक्क थाप मारली होती. पण मी त्याचा फायदा घेऊन भांडण वाढवले आणि त्या दिवशी रात्री काही ते मला धुळ्याला नेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी गाडी बदलली तेव्हाच मी निघाले. यामुळे मुंबईला मात्र सरकारची तारांबळ झाली. कोर्टात माझा अर्ज जेव्हा सुनावणीला निघाला तेव्हा सरकारी वकील फक्त एवढेच सांगू शकला, त्या अकोल्याला नाहीत. कारण यावेळपर्यंत मी धुळ्याला पोचलेच नव्हते.

पत्राची पोचही नाही

अकोला सुटले आणि धुळ्याला आले, पण वेडीची संगत सुटण्याचे काही लक्षण दिसेना. येथेही माझ्या वॉर्डात एक वेडी होतीच. पण ही असे छान गाणे म्हणायची की ऐकत राहावे. येथे जी मेट्रन होती तिची पण मला आठवण होते. या बाई फार प्रेमळ होत्या. या वेडीला त्या जवळ बसवून घ्यायच्या, तिला औषध द्यायचे तर मांडीवर डोकं ठेवून घ्यायच्या. तिला थोपटायच्या. आमच्या डॉक्टरांना सांगून मी तिच्यासाठी थोडी चांगली औषधे मिळवून दिली. धुळ्याच्या तुरुंगातही माझे भांडण सुटले नाहीच. महिलांचा वॉर्ड म्हणायचा आणि तिथं दार असलेला संडास आणि बाथरूम नाही. एकदा तर मी यासाठी उपोषणही केले. शेवटी या तक्रारीची दाद लागली. त्या बाथरूम-संडासाला दारे मिळाली. माझ्या बराकीच्या निमित्ताने महिला वॉर्डला व्हाईटवॉश झाला. येथूनच मी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना महिला वॉर्डची ही दुरवस्था पाहून पत्र पाठविले. पण आणीबाणीच्या काळातील पराकोटीच्या कार्यक्षमतेतसुद्धा त्यांना या पत्राची पोचही पाठविण्यास वेळ मिळाला नाही! तुरुंगात सुधारणा व्हावी म्हणून खूप काही केले पाहिजे, असे मत या वर्षभरात झाले. धुळ्याच्या तुरुंगात किमान गरजेसाठी मी उपोषण केल्याचे सांगतेच. थोडी पुढली ऑर्थररोडची हकिगत येथेच सांगते. तिथल्या महिला वॉर्डात स्त्रियांच्या स्नानासाठी हौदासारखी एक टाकी, त्यात सगळ्या महिला कैद्यांनी आंघोळ करायची. ते पाणी पाहून किळस यावी अशी अवस्था. मग आंघोळ करावीशी कशी वाटणार? मी हे प्रकरण धसाला लावले व आंघोळीसाठी नळ मिळवून दिले.

महिलांना माणुसकी

महिला कैद्यांचा प्रश्नच अधिक माणुसकीने हाताळला पाहिजे असे मला वाटते. तुरुंगात येणाऱ्या बहुसंख्य बायका खरोखरीच्या गुन्हेगार नसतात. काहीतरी कारणाने त्यांच्या हातून गुन्हा घडतो. त्यांना तुरुंगात यावे लागते. त्यांना चांगल्या जीवनापासून वंचित करू नका. मी ऑर्थररोडला होते. शेजारचा वॉर्ड महिला कैद्यांचा. मी असताना माझा ट्रांझिस्टर थोडा मोठा करून त्यांच्या वॉर्डाच्या दाराशी ठेवायची. मग गाणी ऐकायला बायका-मुलं जमत. अनुभव असा आला की त्यामुळं त्यांची भांडणं कमी होत. जेलचा रेडिओ नियमाप्रमाणे असे. पण तो सतत मोडलेला! महिला कैद्यांना रेडिओसारखी साधी करमणूकसुद्धा आपण देऊ शकणार नाही का? ऑर्थररोड जेलमधील महिला कैद्यांचा आणखी एक प्रश्न आहे. येथे येणाऱ्या कैद्यांत मुख्य भरणा वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींचा. या मुलीसुद्धा काही अट्टल गुन्हेगार नव्हेत. त्यांची वेगळी व्यवस्था व्हावी. मुख्यत: असे आढळले की फोरासरोड किंवा अन्य वेश्यावस्तीत अड्डे चालवणाऱ्या बायका मुद्दाम अटक करून घेऊन ऑर्थररोडला येतात व येथे असलेल्या नव्या मुलींशी संपर्क वाढवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून अड्ड्यावर भरती करतात. ऑर्थररोड महिला वॉर्ड अड्डेवाल्यांचे भरती केंद्र बनू नये असे वाटत असेल तर या देहविक्रयवाल्या  बायांपासून मुलींना वाचविले पाहिजे! धुळ्याला मला उपोषण करावे लागले खरे, पण येथले माझे दिवस बरे गेले. शांतपणे वाचायला वेळ मिळाला आणि मुख्य म्हणजे मी येथे अंजूला स्वेटर केला! माझे लग्न , संसार  हे सारे चळवळीच्या धामधुमीत झाले होते. संसारातल्या बारीकसारीक गोष्टी माझ्या हातून झाल्याच नाहीत. नाहीतर अंजूला लहानपणीच स्वेटर विणायला काय हरकत होती? पण वेळच नाही झाला. स्वेटर विणायला घेतला तेव्हा सहज आठवण आली, माझ्या बाहुलीला मी लहान असताना स्वेटर विणला होता. - त्यानंतर आताच. धुळ्यानंतर मध्येच चार महिने येरवड्याला काढले. हे दिवसही फार छान गेले. कमल देसाई, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर, जयवंतीबेन मेहता, इंदुताई पाटणकर इत्यादींचा सहवास होता. तुरुंग मोठा होता. आळीपाळीने स्वैपाक करावा लागे, खेळ होत. व्यायाम चाले. वाचन होतेच. येथे आमच्या छबुताईनं (कमल देसाई) वातावरणात चैतन्य आणलं. तिनं नाच गाणी बसवून घेतली, अगदी नागपूरच्या सुमतीबाई सुकळीकरांपासून सगळ्यांना तिने नाचायला भाग पाडले.

येरवड्यातला झब्बू

येरवड्याच्या तुरुंगातही माझ्यावर सत्याग्रहाचा प्रसंग आला होता. त्या प्रसंगाची हकिगत सांगून हा लांबलेला लेख संपवणार आहे. येरवडा जेलमध्ये दिवस बरे चालले होते. तेवढ्यात कोठून कळ फिरली कोण जाणे माझी पुन्हा धुळ्याला बदली करण्याचा हुकूम आला. पण माझ्या सहकारी कैदी महिलांनी याला सक्त विरोध करायचे ठरविले. जेलरने येऊन तयार होण्यास सांगितले. मी काहीच बोलले नाही. आम्ही आत बराकीत आलो आणि पत्त्याचा डाव मांडला. मला नेण्यासाठी आलेले पोलीस उभे आहेत आणि आमचा झब्बू जोरात चालू आहे. प्रमिला दे झब्बू - मृणाल घे झब्बू असा आमचा खेळ आम्ही रंगवत ठेवला. आमचा पत्ते-सत्याग्रह पाहून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याना फोन केला. शेवटी त्यांना यावे लागले. माझ्या बरोबरीच्या साऱ्या मैत्रिणींनी त्यांच्याकडून कबूल करून घेतले की तिला (म्हणजे मला) एकटीला ठेवणार नाही. तेव्हाच मी धुळ्याला जायला निघाले. मग शेवटले तीन महिने धुळ्यातच काढले. या साऱ्या कारावासाच्या काळात भांडणाचे प्रसंग आले, सत्याग्रहापर्यंत पाळी आली. तुरुंगात सुधारणा व्हावी म्हणून झगडावेही लागले. काही गोष्टी कायम ध्यानात राहातील अशा घडल्या.धुळ्याच्या जेलमध्ये मला हॉलंडमधल्या एका शाळकरी मुलाचे ग्रीटिंग कार्ड आले. स्वत: त्याने एक छानसे चित्र काढले होते, आणि लिहिले, होते, सिस्टर, तुम्ही आमच्यापासून खूप लांबलांब आहात - तुम्ही तुरुंगात आहात असे आमच्या टीचरने सांगितले - तुमची प्रकृती बरी आहे ना? - तुम्हाला आमच्या शुभेच्छा.

 

हॉलंडमधील सेल्सगर्ल

ओळख ना देख - हॉलंडमधल्या मुलाने मला पत्र पाठविले. मी तर चक्रावूनच गेले. नंतर समजले, ‘ॲमनेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेचा हा सारा प्रताप. माणसे तरी बघा केवढा उद्योग करीत असतात. या ‘ॲमनेस्टी इंटरनॅशनल’ ने भारतातील राजबंद्यांच्या याद्या जगभर पाठवून दिल्या होत्या व आपल्या सदस्यांनी कैद्यांना शुभेच्छा कार्डे पाठवावीत असे कळविले होते. हॉलंडमधील टीचर त्या संस्थेची सभासद. तिने आपल्या मुलांकरवी पत्रे पाठविली. मी त्या छोकऱ्याला उत्तर पाठविले पण सरकारने ते सेन्सॉर केले असले पाहिजे. कारण त्याला ते मिळाले नाही. धुळे, येरवडा, अकोला या तुरुंगात रखडणारी मी - माझे नाव हॉलंडमध्ये माहीत झाले होते. त्याचा आणखी एक अनुभव. आमचे एक परिचित देवल हॉलंडमध्ये शॉपिंग करीत होते. बरोबरच्या मराठी दोस्ताबरोबर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. त्यात विषय होता - मृणाल गोरे सुटल्या बरं का? त्या दुकानातील सेल्सगर्लने कान टवकारले. आपण कुणाबद्दल बोलता आहा - मृणाल गोरे म्हणजे - त्याच का.... ‘ॲमनेस्टी’ने पुरविलेली सारी माहिती त्या बाईने ऐकवली आणि - थँक गॉड, गोरे सुटल्या तर! - म्हणून नि:श्वास सोडला. देशातल्याप्रमाणे परदेशातही माझ्या सुटकेचे औत्सुक्य होते हे नंतर समजले. पण आता खरोखरच मी सुटले आहे. तुरुंगातून सुटले आहे. पण कामांच्या आणि माणसांच्या घोळक्यात अडकले आहे. त्यातून मात्र सुटका नाही आणि सुटका नकोही - मधून मधून आपले जपून ठेवलेले अनुभव, आठवणी सांगण्याची अशी सवड मिळाली तरी पुरे.

********

मृणाल गोरे, खासदार, मुंबई शब्दांकन : विश्वनाथ देवधर


राजकारण , आणीबाणी , मृणाल गोरे
राजकारण

प्रतिक्रिया

  1. निशिकांत tendulkar

      3 वर्षांपूर्वी

    अशा पुढार्‍यांची आता कमतरता आहे.

  2. sudhirdnaik

      6 वर्षांपूर्वी

    So nice to know what "some of our" representatives went through. We have to seek out such people before the next election

  3. Shandilya

      6 वर्षांपूर्वी

    छान वाटलं

  4. Meenalogale

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान माहितीपू्र्ण लेख.माणुसकी आणि धडाडी यांचा मनोज्ञ संगम

  5. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    मृणाल ताईंमधल्या खंबीर परंतु कोमल माणुसकीचे मनोज्ञ दर्शन या लेखात घडते. आजच्या पिढीसाठी त्या एक आदर्श कार्यकर्ता म्हणून अनुकरणीय आहेत.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संतुलित राहायचे याचा वस्तुपाठ आहे हा लेख. छान!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen