ठणठणपाळचा हातोडा आणि आणीबाणी

आणीबाणी    जयवंत दळवी    2018-06-27 06:00:07   

आणीबाणीविषयी मराठीत आजवर विविधांगी लिखाण प्रसिध्द झालं आहे. या वैविध्याचा प्रत्यय देणारे आणि गाजलेले लेख आम्ही पुनश्र्च डिजिटलच्या आणीबाणी विशेषांकात गेला महिनाभर देत आहोत. या लेखमालिकेचा समारोप महाराष्ट्राच्या लाडक्या ठणठणपाळ यांच्या लेखनानं करत आहोत. आणीबाणी आणि साहित्यिक हा विषय ठणठणपाळ यांच्या तिरकस लेखणीसाठी पर्वणीच होती. एकेकाची टोपी उडवताना ठणठणपाळच्या हातातील लाकडी हातोडा आणि लेखणीतला शब्दसंभार यांच्यात जणू स्पर्धाच लागलेली होती. त्यांनी १९७५ ते १९७७ या काळात आपल्या स्तंभातून अक्षरशः धुमाकुळ घातला. सुदैवानं तिरकस शैली आणि अप्रत्यक्ष खिल्ली समजून घेण्याची बौध्दिक कुवत पोलीस आणि नोकरशाही दोघांकडेही नसल्यानं या लिखाणाकडे आणि पर्यायानं ठणठणपाळकडेही त्यांचं लक्ष गेलं नाही. विविध लेखांमधून निवडलेले हे तीन तुकडे वाचताना, त्यातील साहित्यिक संदर्भ तपासताना आपलं आपणच आतल्या आत मोठ्ठ्यानं हसतो...कधी कधी तर फुटतोच...!

स्त्रीचे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य

एक फार मोठा समुद्र होता; आणि त्या समुद्रात एक विशाल बेट होते. त्या बेटावर एक सुंदर वन होते. त्या वनात सुंदर सुंदर तलाव होते. रंगीबेरंगी फुलांची भरमार होती आणि निरनिराळ्या प्रकारच्या मधुर फुलांची रेलचेल होती. अशा त्या शोभायमान वनात मोर, पोपट, कोकिळा, चकोर, हंस वगैरे अनेक जातींचे पक्षी होते. अनेक वृक्षांवर त्यांनी आपापली घरटी बांधिली होती, आणि ते सुखाने राहत होते. त्या वनामध्ये एक विशाल पिंपळाचा वृक्ष होता. त्या वृक्षावर एक मैनेने आपले घरटे बांधिले होते व ती सुखाने तेथे राहत होती.

अचानक एके दिवशी त्या वनात मोठे वादळ झाले. त्या वादळात एक पोपट फार हैराण झाला. त्या बिचाऱ्या पोपटाचे घरटे मोडून गेले आणि तो कसाबसा त्या पिंपळावर आश्रयासाठी येऊन बसला. त्याला त्या पिंपळावरील मैनेने पाहिले. तिला त्याचा राग आलेला दिसला. तिने आपल्या भुवया चढविल्या आणि रागाने म्हणाली, “ए पोपटा! चल निघ इथून. जा कुठेतरी आणि बैस तिकडे. ह्या माझ्या पिंपळावर का आलास?” पोपट म्हणाला, “हे मैने! का तुझा एवढा राग माझ्यावर? मी तुझे काय नुकसान केले आहे असे? एक रात्रभर येथे विश्रांती घेईन आणि सकाळी दिवस उगवला की जाईन आपल्या मार्गाने.” मैना म्हणाली, “छे, छे! ते काही नाही. विश्रांती नाही आणि सकाळ नाही. तुम्ही पुरुष मेले सारे दुष्ट! कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार? मला तर पुरुषजातीबद्दल भारी तिरस्कार वाटतो. फार निर्दय जात असते पुरुषांची. तू जा कसा येथून!”

ही मैनेची उर्मट भाषा ऐकून पोपटालाही राग आला, आणि तो म्हणाला, “अगं ए मैने! फार विचित्र आहेस गं तू.. पुरुषांना निर्दय म्हणतेस एकदम! असा काय अनुभव आहे तुला पुरुषांच्या निर्दयपणाचा? नाहीतरी  सगळे जग मात्र ओळखते की, स्त्रीजात ही पक्की बेईमान आणि निर्दय आहे म्हणून! पाहा ना, कुणीसे म्हटले सुद्धा आहे की – स्त्रीचे चरित्र गहन हे अति। पतीस मारून बनते सती।। म्हणून हे मैने, तुझे म्हणणे चूक आहे. अगं, पुरुषाप्रमाणे शब्दाचा पक्का आणि भरवशाचा सच्चा तर या दुनियेत कोणी सापडावयाचा नाही. त्याचे बोलणे ऐकून मैनेनेच पोपटाला गोष्ट सांगायला सुरुवात केली -

हे पोपटा! मुंबापुरी नावाच्या एका भव्य नगरीत एक विद्वान, सत्यवादी पण अत्यंत शीघ्रकोपी ब्राह्मणकन्या वास्तव्य करीत असे. तिचे नाव देवी दुर्गादेवी. ही ब्राह्मणकन्या अत्यंत चारित्र्यशील असून वेदशास्त्रात पारंगत होती. सभोवार शास्त्रांचे ग्रंथ घेऊन ती मग्न असे. तिचे शास्त्रातील नैपुण्य पाहून कराडनगरीतील प्रजाजनांनी तिचा भव्य सत्कार करावयाचे ठरविले. या सत्काराला दिल्ली दरबारचा सरदार यावयाचा होता. तिकडे कराडनगरीत ब्राह्मणकन्या देवी दुर्गादेवी हिच्या स्वागताची तयारी सुरू झाली. इकडे मुंबापुरीत ब्राह्मणकन्येने प्रवासाची सर्व व्यवस्था केली.

आणि ती प्रवासाला निघणार तोच, “ब्राह्मणकन्येचा विजय असो” असे शब्द तिच्या कानी आले. देवी दुर्गादेवीने कोण आहे म्हणून वळून पाहिले, तो साधनापुरीचा प्रधान गप्रसेन मुजरा करीत उभा होता. “प्रधानजी, साधनापुरीचे काय वर्तमान?” असे ब्राह्मणकन्येने विचारले. त्यावर गप्रसेन म्हणाला, “देवी, तू उदयिक कराडनगरीस जात आहेस. तिथे तुझा सत्कार आणि सन्मान होणार आहे-” “होय-” देवी दुर्गावती म्हणाली. “त्या सत्कार-सन्मानाप्रसंगी दिल्लीदरबारचा एक सरदार यशवंतसेन तुझ्या स्वागतासाठी येणार आहे असे ऐकतो.” त्यावर दुर्गावती म्हणाली, “होय! गप्रसेना, तू म्हणतोस ते खरे आहे.” ते ऐकून गप्रसेन विचारता झाला- “हे देवी दुर्गावती! तू असे म्हणाल्याचे ऐकिवात आहे की, राजदरबारीची दाने स्वीकारून आपल्या साहित्यशास्त्रकलापारंगत विद्वान ब्राह्मणांचे कणे मोडले आहेत!” “होय गप्रसेना! तोही माझा निर्धार खरा आहे. त्यावर तुझे काय बरे म्हणणे आहे?”

ते ऐकून गप्रसेनाने वाकून मुजरा केला आणि तो म्हणाला, “देवी, तुझ्याबद्दलचा, तुझ्या निःस्पृहतेबद्दलचा माझा आदर दुणावला आहे. परंतु या समयी मी एक प्रश्न विचारू इच्छितो-” “विचार! गप्रसेना, खुशाल विचार-” “कराडनगरी तुझ्या स्वागतासाठी सरकारदरबारचा एक सरदार यावयाचा आहे. अशा वेळी, देवी, तुझी भूमिका काय राहील?” हे ऐकून, देवी दुर्गावती ही शीघ्रकोपी असल्यामुळे, तिच्या तळपायाची आग मस्तकी गेली. तिचा चेहरा लालबुंद झाला. तिच्या नेत्रांतून अग्निबाण बाहेर फेकले गेले. आणि ती अत्यन्त कठोर आवाजात उद्गारली- “हे साधनापुरीच्या प्रधाना, गप्रसेना, ऐक! मी काय म्हणते ते नीट कान देऊन ऐक! तुझ्या छद्मी सवालाला माझा जबाब ऐक- तू आणि तुझ्या साधनापुरीने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ निश्चित येऊन ठेपली आहे. दरबाराशी फटकून वागण्याचे अंतिम ध्येय पत्करल्यावरदेखील साधनापुरीचा एक मांडलिक यदुनाथगुप्त दरबारच्या ‘लोकराज्य’ या पाणपोईत पाणी भरतो, साधनापुरीचे सेना (सेवा) दल दरबारच्या मदतीची याचना करते. साधनापुरीचा दुसरा मांडलिक बापटगुप्त वसंतसेन दरबारच्या अनेक खात्यांतून (रेडिओ-टीव्ही) आनंदाने दाने घेतो. एवढेच काय, हे गप्रसेना, तुझ्या समाजप्रबोधनाच्या यज्ञासाठी तूही सरकारदरबारीच्या मोहोरा मिळवल्या आहेसच ना?- मग हा भूमिकेचा प्रश्न तू मला का बरे विचारतो आहेस?

पण तरीही हे गप्रसेना, तुझ्या मूळच्या प्रश्नास मी उत्तर देते ते नीट ध्यान देऊन श्रवण कर. कराडनगरीच्या ज्या प्रजाजनांनी सत्कारासाठी माझी निवड केली आहे त्याच प्रजाजनांनी दिल्लीदरबारच्या सरदाराला निवडले आहे. त्या प्रजाजनांचा आदर मला केलाच पाहिजे. तेथे स्वागतप्रसंगी त्या सरदाराचे जसे वक्तव्य होईल तसे माझेही होईल हे तू खूप जाणून ऐस!”

तो विद्युल्लतेचा कडकडाट ऐकताच प्रधान गप्रसेन गडबडला आणि तत्काळ घोड्यावर स्वार होऊन त्याने आपला घोडा साधनापुरीच्या दिशेने फेकला. गप्रसेन साधनापुरीस परतताच त्याचा थकलेला आणि चिंताग्रस्त चेहरा पाहून साधनापुरीचे मांडलिक यदुनाथगुप्त आणि बापटगुप्त वसंतसेन यांनी गप्रसेनाकडे कुशल पुशिले. थोडा वेळ गप्रसेन काही बोलला नाही. परंतु त्यास वसंतसेनाने पुनः पुनः विचारले असता गप्रसेनाने भयभीत होऊन सारी हकिगत कथन केली. दुर्गावतीची उर्मट दुरुत्तरे ऐकून बापटगुप्ताचा चेहरा लालबुंद झाला. “हे ब्राह्मणकन्ये, आम्हा साधनापुरीच्या मांडलिकांशी तुझा एवढा उद्दामपणा?” अशी गर्जना करून बापटगुप्ताने घोड्यावर टांग मारली आणि आपला अबलख घोडा तीरासारखा मुंबापुरीच्या दिशेने फेकला! इकडे देवी दुर्गावती आपला एकनिष्ठ दाढीवाला सेवक जोशीभट्ट नानाचंद याच्या मदतीने कराडनगरीच्या प्रवासाची तयारी करीत होती. तोच घोड्याच्या टापांचा आवाज कानी आला.

दुर्गावती आणि दाढीवाला नानाचंद वळून मागे पाहतात तोच “हे ब्राह्मणकन्ये दुर्गावती, तुझा धिक्कार असो! त्रिवार धिक्कार असो!” असे कठोर शब्द त्यांच्या कानी पडले. आणि पाठोपाठ साधनापुरीचा मांडलिक बापटगुप्त आपल्या अबलख घोड्यावरून खाली उतरताना दिसला. दाढीवाल्या नानाचंदाने वाकून मुजरा केला आणि “बापटगुप्ताचा विजय असो!” असा पुकारा केला. पण बापटगुप्ताने तिकडे दुर्लक्ष करून तो तरातरा पुढे आला. त्याने दोन्ही पाय फाकले आणि कमरेचा शेला आवळून कमरेवर हात ठेवले. आणि मुद्दाम मान तिरपी करून आणि आवाजाला कंप देत त्याने कठोर आवाजात प्रश्न केला - “हे ब्राह्मणकन्ये दुर्गावती, तू स्वतःला समजतेस तरी कोण? साधनापुरीचा अत्यंत शूर आणि आदरणीय प्रधान गप्रसेन याजकडे तू आम्हा साधनापुरीच्या मांडलिकांची जी घोर नालस्ती केली आहेस ती आमच्या कानी आली आहे. त्याबद्दल तुझा धिक्कार असो! त्रिवार धिक्कार असो!

आमच्या सेना (सेवा) दलास सरकारदरबाराचे दान नियमितपणे मिळालेले नाही हे मी तुझ्या कानी घालू इच्छितो. तू हेही श्रवण कर की चारित्र्यसंवर्धन, सर्वांगीण विकास आणि लोकशिक्षण करणाऱ्या, तसेच समानता, स्वतंत्रता, लोकशाही यांसाठी झटणाऱ्या संस्थांना सरकारदरबारीचे धन मिळालेच पाहिजे. दरबाराच्या गाडग्यातल्या मोहोरा ही काही कोणा एकाची मालमत्ता नाही. अनुदान म्हणजे भिक्षा नव्हे, दानही नव्हे! आणि ब्राह्मणकन्ये, तू हेही श्रवण कर की दरबाराच्या दानासंबंधी कोणी मिजास मारू नये. कारण ‘ऋतुचक्र’, ‘पैस’ यांसारख्या होमहवनासाठी ब्राह्मणकन्ये, तुलाही दरबारची दाने मिळाली आहेत.” एवढे वाग्ताडन करून बापटगुप्त अश्र्वारूढ झाला आणि शीघ्रकोपी ब्राह्मणकन्येने आणखी शापवाणी उच्चारण्याआधी त्याने साधनापुरीच्या दिशेने घोडदौड केली.

ही गोष्ट सांगून मैना म्हणाली, “ हे पोपटा, पाहा बरे! अशा सत्यवादी आणि एकास दोन करणाऱ्या विदुषी आहेत म्हणून तर स्त्रीजातीस अजून महत्त्व आहे! नाही तर तुम्ही पुरुष! तुम्ही घोड्यावर बसून पळ काढावा!” हे ऐकून पोपट म्हणाला, “हे मैने, स्त्रीजातीची कड घेऊन तू उगाच मिजास मारू नकोस. सुभाषितकारांनी म्हटलेच आहे – स्त्रियश्र्चरित्रं पुरुषस्य भाग्यम्। देवो न जानाति कुतो मनुष्य।। म्हणजेच स्त्रीचे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य देवही जाणू शकत नाही तेथे मानवाचा बिचाऱ्याचा काय पाड? ”

साहित्यिक तोता-मैना अर्थात चटकदार बोधपर गोष्टी, ललित – दिवाळी अंक, १९७५)

पुलश्री आणि दुर्गाबाई

एकंदरीत आपले परम मित्र आणि मराठीतले एक थोर विनोदकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्रभर मोठी धमाल उडवून दिली यात शंकाच नाही. गेल्या दोनअडीच महिन्यांत लोकसभेच्या निवडणूकप्रचाराची जी रणधुमाळी चालू होती त्यात काहीसा पचपचीतपणा निर्माण झाला होता. जनता पक्षाच्या नेत्यांनी हुकूमशाहीची तीच तीच वर्णने करावीत आणि काँग्रसेच्या नेत्यांनी खिचडी, पचडी, भेळ, मिसळ अशी खाद्यपदार्थांची नामावळी देऊन जनता पक्षाची वर्णने करावीत असे चालले होते. पण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे प्रचारसभा घेऊ लागले आणि एकूण वातावरण पुलकित किंवा प्रपुल्लित झाले. भव्य जनसमुदायाला विनोदाचे आणि त्यातही उपरोधात्मक विनोदाचे किती आकर्षण असते याची या वेळी प्रचीती आली.

‘नेतृत्व हे कर्तृत्वाच्या जोरावर मिळवावे लागते, ते मातृत्वाच्या जोरावर मिळत नसते’ किंवा ‘गीतेचे अठरा अध्याय असताना मुख्यमंत्र्यांनी गीतेची वीस कलमी कार्यक्रमाशी तुलना का केली असा प्रश्न पडला आणि म्हणून मी पुनः एकदा गीता उघडून पाहिली आणि उलगडा झाला. सुरवातीलाच शब्द होते – संजय उवाच.’ असल्या फटकाऱ्यामुळे प्रचंड जनसमुदाय सतेज झाला. असल्या भाषणबाजीमुळे जनसमुदायांची मने जिंकली जातात, काँग्रेसच्या नेत्यांची अप्रत्यक्षपणे निर्भत्सना होते हे जाणूनच परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण किंवा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे अस्वस्थ झाले आणि त्यांनी यांना (म्हणजे पुल देशपांडे व इतर साहित्यिकांना ) राजकारणात येण्याचा काय अधिकार असा जाहीर प्रश्न विचारला.

पुलश्री एका जाहीर भाषणात म्हणाले, “मोटारीचा कारखाना ज्याला चालविता येत नाही त्याला तरी राजकारणात येण्याचा काय अधिकार?” पुलश्रींचा मुंबई मराठी पत्रकार संघातला वार्तालापचा कार्यक्रमही असाच खूप रंगला. “आपण या लढ्यात आधी – म्हणजे आणीबाणी कडक होती त्या वेळी – का उतरला नाहीत?” असा प्रश्न कुणा पत्रकाराने विचारला. या प्रश्नाला पुलश्रींनी जगजीवनरामांच्या थाटात उत्तर दिले असले तरी खरे म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कचेरीत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कुठल्याही सदस्याने किंवा विश्वस्ताने (किमान स्वतःच्या लाजेकाजेस्तव तरी) हा प्रश्न विचारायला नको होता. कारण आणीबाणी कडक होती तेव्हा याच मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार-दिनाच्या वार्षिक समारंभाला महनीय प्रवक्ते म्हणून ‘साधना’कार यदुनाथ थत्ते यांना आमंत्रणपूर्वक बोलावून ते आणीबाणीच्या विरुद्ध बोलतील या भीतीने त्यांना एक चकार शब्दसुद्धा बोलू दिला नव्हता.

मुद्दाम प्रवक्ता म्हणून बोलावून समारंभात त्याला गुळाच्या गणपतीसारखा बसवून ठेवायचा, एक शब्द बोलू द्यायचा नाही, अशी घटना जगाच्या इतिहासात कधी घडली नसेल! असो! आपण सर्वजणच कमीअधिक प्रमाणात स्वास्थ्यप्रिय असतो आणि म्हणूनच त्या त्या प्रमाणात भित्रे असतो. पण माझ्या समोरचा माणूस मला माझ्यापेक्षा अधिक भित्रा दिसतो एवढेच! (म्हणूनच पत्रकार संघात तो प्रश्न विचारला गेला असावा!) असो! असो! निवडणुकांच्या एकूण रणधुमाळीत हे सारे असेच चालायचे!

“तुम्ही त्या वेळी कुठे होता?” अशा थाटाचा आणखी एक प्रश्न असतो. हा एकमेव प्रश्न सर्वसाधारणपणे नारायण सुर्वे, सदा कऱ्हाडे, प्र.श्री. नेरूरकर आणि सतीश काळसेकर (‘गँग ऑफ फोर’ यांनी विचारायचा आणि तोही व्हिएटनामच्या संदर्भात विचारायचा, अशी एक जुनी पूर्वापार प्रथा आहे. “व्हिएटनामवर अमेरिकेचे आक्रमण होत होते तेव्हा तुम्ही कोठे होता?” (मसणात!) असा एक प्रश्न पत्रक काढून विचारायचा आणि ते पत्रक ‘नवशक्ती’त छापायचे असा एक सरावच पडून गेला आहे. काही वेळा या चौघांनी पत्रक काढले नाही तरी ‘नवशक्ती’कार अधूनमधून (जागा असेल तेव्हा-) हे पत्रक छापतातच. या चौघांनी तिथे कायमच्या सह्या देऊन ठेवल्या आहेत. (व्हिएटनाम स्वतंत्र होऊन काही वर्षे लोटली आहेत हेही या चौघांना आता कोणीतरी सांगायला पाहिजे.)

खरे म्हणजे पुल देशपांड्यांनीसुद्धा आपली एक सही ‘नवशक्ती’कडे का पाठवू नये? याच पत्रकात समाविष्ट करण्यासाठी? म्हणजे मग “त्या वेळी तुम्ही कोठे होता?” हा प्रश्न आपल्या उद्देशून आहे असे पुलश्रींना वाटायला नको! कसेही असो! पुलश्रींनी गेल्या काही दिवसांत निवडणुकीच्या वातावरणात खुमासदार रंग भरले यात शंकाच नाही. या सर्व प्रकरणात एक गोष्ट बरी झाली. दुर्गाबाई भागवत आणि पुल देशपांडे यांचे जे जुने भांडण होते ते संपुष्टात आले. दुर्गाबाईंनी पुलश्रींना एक अडीच हात लांबीचे पत्र पाठवून पुलश्रींचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. (पुलश्रींनी हे सर्टिफिकेट फ्रेम करून आपल्या दिवाणखान्यात लावले आहे, एवढेच नव्हे तर त्याच्या ‘ ट्रू कॉपीज’ काढून आपल्या मित्रांस पाठविल्या आहेत असे म्हणतात!)

पुलश्रींवरील हल्ला हा मी माझ्यावरील हल्ला समजेन असेही दुर्गाबाईंनी जाहीर केले आहे! दुर्गाबाई आणि पुलश्री यांची ही अभेद्य एकजूट झाल्यानंतरही जनता पक्षाची एकजूट टिकेल की नाही असा जे कोणी प्रश्न विचारतात त्यांचेच आम्हाला आश्चर्य वाटते! जेथे या दोघांची एकजूट झाली तेथे त्या चार पक्षांची एकजूट झाली यात काहीच नवल नाही!

(घटका गेली! पळे गेली!,  ललित – एप्रिल १९७७)

राजारामशास्त्री दुर्गाबाईंचे कोण?

आणीबाणी संपुष्टात येऊन आता उणेपुरे चार महिने लोटले तरी महाराष्ट्रातले भीतीचे वातावरण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत ही एक दुर्दैवाची गोष्ट होय! उलट, उत्तरोत्तर हे वातावरण अधिकाधिक भीतीग्रस्त होत आहे यात शंकाच नाही. तुम्ही वर मान करून कुणाच्याही तोंडाकडे पाहा-ज्याच्याकडे पाहावे तो खाली मुंडी घालून भयभीत होऊन निसटताना दिसतो. अनेकांनी तर कुठे काही बोलण्याची-किंवा नको तेथे नको ते बोलण्याची-आफत नको म्हणून ‘शांशं’ पद्धतीने तोंडात तंबाखूची चिमूट सोडणयाचीही सवय जडवून घेतली आहे (या पद्धतीचे आद्यजनक-शां.शं. रेगे!). 

कालपरवा शिवाजीपार्कच्या आसपास आम्हांस श्रीना पेंडसे दिसले. त्यांना मूळचीच खाली मुंडी घालून चालण्याची सवय. तसे ते चालत असताना आम्ही फक्त ‘दुर्गाबाई’ एवढेच म्हटले मात्र बिच्चारे पेंडसे याही वयात शर्यतीत पळाल्यासारखे पळत सुटले. नाटककार वसंतराव कानेटकर आणि कविवर्य कुसुमाग्रज हे दोघे तर सध्या नाशिकच्या बाहेर पडतच नाहीत. कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ या नाटकाचा नवीन नटसंचात मुंबईस प्रथम प्रयोग झाला तेव्हा तो पाहण्यासाठी कुसुमाग्रज वेष पालटून मुंबईस आले आणि प्रयोग संपताच रातोरात ते नाशिकला पळाले. (वेळेबरहुकूम कुसुमाग्रजांनी केलेली ही आयुष्यातली पहिलीच गोष्ट असे म्हणतात!)

वसंतराव कानेटकर आपल्या ‘विषवृक्षाची छाया’ या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगासाठी मुंबईत आले तेसुद्धा (ऐतिहासिक नाटके लिहायची सवय असल्यामुळे-) अंगावर चिलखत, डोकीवर जिरेटोप आणि हातात वाघनखे घालून! (खुर्चीत बसता येत नव्हते म्हणून ऐतिहासिक पोज घेऊन तीन तास थेटरात उभे होते असे म्हणतात!) तथापि ज्या दुर्गाबाई भागवतांमुळे ही भीतीग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली त्यांना मात्र त्याचे काहीच नाही याचे आम्हांस राहून राहून आश्चर्य वाटते आहे! आणीबाणीच्या काळात वसंत कानेटकर, कुसुमाग्रज आणि श्रीना पेंडसे यांनी म्हणे टीव्हीवर मुलाखती देऊन आणीबाणीला पाठिंबा दिला होता. (टीव्हीने आणखी कुणाकडे मुलाखती मागितल्या नाहीत म्हणून बाकीचे लेखक तरी सुटले!)

मुळात या मुलाखती कोणत्या स्वरूपाच्या होत्या कोण जाणे! कारण या तिघांपैकी एकही ‘मी आणीबाणीला पाठिंबा दिला होता’ असे म्हणत नाही. कुणी म्हणतो ‘मी आणीला पाठिंबा दिला होता’, तर कुणी म्हणतो ‘मी बाणीला पाठिंबा दिला होता’. पण संपूर्ण आणीबाणीला कुणीच पाठिंबा दिला नव्हता! खरे म्हणजे मराठी लेखकांचा आणीबाणीस पाठिंबा आणि विरोध-उघड आणि छुपा-या विषयावर कुणीतरी, कधीतरी संशोधन करणे आवश्यक आहे! (आम्ही कुणीतरी असे म्हटले खरे, पण शांशं रेगेंचे काम बहुधा सुरू झालेच असणार! त्यांना तरी दुसरे काय काम?)

आतापर्यंत काय होत होते?-कुणी आणीबाणीस पाठिंबा दिला, सरकारपाशी लाचारी केली की दुर्गाबाई त्याला ‘झोडत’ होत्या. ते आम्ही शांतपणे बघत होतो. नाहीतरी एक साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकास ‘झोडतो’ तेव्हा ते सगळे प्रकरण ऐकायला, वाचायला बरे वाटतेच! (येथे ‘झोडतो’ हा शब्द आम्ही मुद्दाम वापरला आहे. कारण त्यात ‘झाडतो’ हाही शब्द समाविष्ट आहे!) आणीबाणीच्या पूर्वी दुर्गाबाई आणि पु.ल. देशपांडे यांचे एकमेकांना झोडणे-झाडणे सुरू होते तेव्हा काय मौज येत होती? येत होती की नाही? पण असो! (गेले ते दिवस!) अर्थात आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता दुर्गाबाईंना पुलंसारखा दुसरा मित्र नाही! (तरीही बिचारे पुलं मात्र दुर्गाबाईंना अजूनही घाबरूनच असतात! इतके की ते सुनीताबाईंना जास्त घाबरतात की दुर्गाबाईंना जास्त घाबरतात यावर लोकांच्या पैजा लागतात! आपले लोकही नामीच!)

आता प्रसंग काय गुदरला आहे ते पाहा! मध्यंतरी वसंतराव कानेटकर यांच्या ‘विषवृक्षाची छाया’ या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग होता. या उत्सवाला अध्यक्ष म्हणून बोलावण्यासाठी नाट्यनिर्माते बिपीन तळपदे दुर्गाबाईंकडे गेले. दुर्गाबाई बिचाऱ्या तळपदेंवर एकदम खवळल्या! आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या वसंत कानेटकरांच्या नाटकाला हजर राहून मी कानेटकरांना प्रतिष्ठा मिळवून देणार नाही असे बजावून त्यांनी तळपदेंना वाटेला लावले. तळपदे तेथून निसटले ते थेट एसेम जोशींच्या भेटीला गेले. एसेम आनंदाने तयार झाले. (त्यांना तरी एरव्ही नाटकाचे साडेसात रुपयांचे तिकीट कुठे परवडते?) त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. भाषण केले. आणि प्रसंग निभावून नेला. पण दुर्गाबाई कुठे काय निभावू देतात? त्यांनी वसंतराव कानेटकरांबरोबरच एसेमनाही धारेवर धरले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसंतरावांनी एसेमच्या छायेत येऊन, आणीबाणीला पाठिंबा दिल्यामुळे समाजात गेलेली पत परत मिळविण्याचा प्रयत्न केला आणि एसेमनी तो प्रयत्न सफल होऊ दिला. या दोन्ही गोष्टी चालायच्या नाहीत! (नाटक चालले तरी खूप झाले!)

आता त्यांनी या गोष्टी चालायच्या नाहीत असे म्हटले म्हणजे त्या गोष्टी चालत नाहीत असे थोडेच आहे! किंबहुना आपल्याकडे सगळ्याच गोष्टी चालत असतात. तेच तर आपले वैशिष्ट्य आहे! पण या वैशिष्ट्याकडे दुर्लक्ष करून ‘नवाकाळ’चे संपादक नीलकंठराव खाडिलकर दुर्गाबाईंवर अक्षरशः तुटून पडले. आणि तुटून पडले म्हणजे कसले? आठ आठ कॉलमी तुटून पडले. (हे अग्रलेख वाचून नीळकंठरावांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी मुंबई-पुण्यातील अनेक साहित्यिकांनी नीलकंठरावांना फोन केले होते अशी एक आतली बातमी आहे. त्यावर ‘उद्याच्या अंकी तुमची नावे छापू का?’ असे नीळकंठरावांनी विचारताच फोन करणाऱ्या सर्व साहित्यिकांनी ‘नको...नको...कृपा करा...’ असे ओरडत फोन पटापट खाली ठेवले अशीही एक आणखी आतली बातमी आहे!...बातमी सोडा, पण दुर्गाबाईंचा एकूण दरारा काय आहे तो बघा!)

तर या खाडिलकरांचे अग्रलेख वाचून होतात न होतात तोच- ‘सोबत’चे संपादक गणपतीबाप्पा बेहेरे यांचा दहा कॉलमी अग्रलेख. त्यांचा अग्रलेख येतो न येतो तोच-वसंतराव कानेटकरांचे ‘सोबत’मध्येच पाच कॉलमी पत्र! आणि या प्रत्येकाच्या मधोमध. आणि नंतर दुर्गाबाईंची फटाफट उत्तरे आहेतच! दुर्गाबाईंचे काय झाले आहे...(अरे बापरे! आमच्या छातीत का बरे अशी एकाएकी धडधड सुरू झाली?...पण असो...!) दुर्गाबाईंचे काय झाले आहे...त्यांचा मूळचा स्वभावच आधी उग्र आणि तापट. सतत चिडत राहणे हा त्यांचा स्थायीभाव! सतत चिडवणाऱ्या गोष्टी त्यांच्यासमोर येत राहतात आणि दुर्गाबाई (तोल जाईपर्यंत) चिडत राहतात. त्याला त्या काय करणार आणि आम्ही तरी काय करणार?... पण एक गोष्ट खरी की याच त्यांच्या स्वभावामुळे त्या उघडपणे आणीबाणीविरुद्ध बोलत राहिल्या.

कऱ्हाड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गाबाईंची निवड झाली तेव्हा प्रथेप्रमाणे मुंबई मराठी साहित्य संघात दुर्गाबाईंचा जाहीर सत्कार झाला. तो आणीबाणीचा काळ. दुर्गाबाई रोजच्या रोज उघडपणे आणीबाणीविरुद्ध भाषण करीतच होत्या. त्यामुळे साहित्य संघाच्या सगळ्याच लोकांच्या छातीत जाम धडधडत होते. दुर्गाबाई कमीअधिक बोलल्या तर अनवस्था-प्रसंग! म्हणून दुर्गाबाईंना चुचकारण्यासाठी वि ह कुलकर्णी उठले. खाली मान करून, भुवया वर उंचावून, कधी मुद्दा धरून तर कधी मुद्दा सोडून, मधूनच एखादा विनोद करीत, मधून थोडा (थोडा का?) खवचटपणा करीत मंद आवाजात विहंगवृत्तीने घिरट्या घालीत विहंनी दुर्गास्तोत्राचे पठण सुरू केले. (विहंग हा शब्दच मुळी या विहवरून निर्माण झाला आहे असे म्हणतात.)

थोडी सलगी करून बाईंना आपल्या आवारात घेण्यासाठी विह म्हणाले, मी मूळचा कशेळीचा. आमचे वारा ढवळे कशेळीचे! (तसे पाहता तात्या आमोणकर सोडले तर संघाचे सगळेच कशेळीचे दिसतात! कसे कोण जाणे!) आणि दुर्गाबाई ज्यांची नात ते राजारामशास्त्री भागवतही कशेळीचेच! (तेच तेवढे साहित्य संघात नव्हते!) एवढे झाल्यावर ‘ठीक आहे!’ असे म्हणून दुर्गाबाईंना स्वस्थ बसायला काय हरकत होती? पण त्या ज्या उठल्या त्या आपला आणि कशेळीचा काहीही संबंध नाही हेच सांगत बसल्या! (थोडक्यात म्हणजे सगळ्या कशेळीकरांचा ‘क’च त्यांनी काढून टाकला!) ‘राजारामशास्त्री भागवत हे प्रार्थनासमाजाचे एक संस्थापक भास्कर हरी भागवत यांचे पुतणे, माझ्या आजीचे चुलतभाऊ आणि माझ्या वडिलांचे ते चुलतमामा’ असेही त्यांनी गुंतागुंतीचे नाते सांगितले आणि विठ्ठलराव कशेळीकर यांना अक्षरशः गोंधळात टाकले! या गोष्टीला आता दोन वर्षे झाली. पण विठ्ठलरावांच्या मनातला गोंधळ जरासासुद्धा कमी झालेला नाही. तुम्ही कधीही नव्हे, तर कुठेही विठ्ठलरावांना भेटा. ते तुम्हांला (तुमची खुशाली विचारण्याआधी-) दोन प्रश्न विचारतील-‘राजारामशास्त्री दुर्गाबाईंचे कोण?’ आणि ‘दुर्गाबाई राजारामशास्त्र्यांच्या कोण?’

(घटका गेली! पळे गेली!, ललित-जुलै १९७७)   लेखक- जयवंत दळवी  


राजकारण , ललित , आणीबाणी , जयवंत दळवी , ठणठणपाळ

प्रतिक्रिया

  1.   3 वर्षांपूर्वी

    ठणठणपाळ सदर जेव्हा सर्वप्रथम प्रसिद्ध होत होते तेव्हा मी लहान असल्याने पुरेशी समज नव्हती.. आज सारे संदर्भ कालबाह्य झाले असले तरी वाचताना मजा आली...

  2. Suhasthatte

      6 वर्षांपूर्वी

    मला मूळ लेख वाचायचा आहे .

  3. Achninad

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख.

  4. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल आभार.

  5. Ashishchaskar

      6 वर्षांपूर्वी

    "त्यावेळी तुम्ही कुठे होता?" हे 1977 पासून आहे तर... ??

  6. Devendra

      6 वर्षांपूर्वी

    हे लेख सशुल्क आहेत, पण त्याचा व्यवहार कसा मांडणार, म्हणजे १०० लेख वेगवेगळे की एक लेख १०० वेळा असे पण हिशेब लावणार ते आधीच सांगा, कारण हा लेख १००० वेळा वाचला तरी समाधान म्हणून होणार नाही. निदान हा लेख सशुल्क यादीतून काढावा, एखाद्या निराश समयी वा थकलेल्या मनास उभारी आणणारे हे लेख पुनः पुन्हा वाचल्यास व ते वाचता आल्यास वाचकास उभारी मिळेल. अतिशय ओघवती भाषा, बारीकसारीक तपशिलांनी भरलेले एवंगुणस्वभाव वैशिष्ट्यांनी नटलेले ठंणठणपाळाचे हे लेख म्हणजे मराठी साहित्यातील न आटणारा ठेवाच आहे. आणिबाणीचे दशक म्हणजे ठंणठणपाळाचे उमेदीचे दिन. ठंणठणपाळाने आसपासच्या कुणाला सोडले असेल हा पण एक अभ्यासाचा विषय ठरावा. ठंणठणपाळाचे लेख यंत्रणेला समजले नाहीत असे म्हणणे भोळसटपणाचे ठरेल, पण तरीसुद्धा ते यंत्रणेच्या धाकातून सुटले हा केवळ चमत्काराचाच विषय ठरतो हे खरे. इंग्रजी साहित्यात पी जी वुडहाऊस चे जे स्थान ते मराठी सारस्वतात ठंणठणपाळाने कमविले. चिमणराव संचार करताना प्रसंगनिष्ठ व्यवहारांवर भाष्य करतो, तर ठंणठणपाळ केवळ मराठी सारस्वतातील बारा भानगडींचा व्यात्यास शाब्दिक फुलोऱ्यांनी विनोदाचे कारंजे उडवित असे काही खुलवितो की वाचक मंद हास्य ते गडबडा लोळणे यात रममाण होतो. ठंणठणपाळ म्हणजे विनोदाचे कारंजे, विनोदी प्रहसन, मद्र सप्तकातील विनोदाचे खुमासदार मंथन. मेरूपर्वताच्या घुसळणीतून निघालेले हे एक प्रकारचे चौदावे रत्नच म्हणावे की याच्या असुडाचा फटका गुदगुल्या करीत लोळवतो नि अक्षरशः छळतो. या लेखमालेची सांगता ठंणठणपाळाने होणे म्हणजेच साठाउत्तराची आणीबाणी पाचा उत्तरी (विफळ) (संपन्न नव्हे पण) समाप्त.

  7. shashi50

      6 वर्षांपूर्वी

    फारच सुंदर आणि मजेदार लेख ! आजची इंग्लिश मेडियमची मुलेही हा लेख वाचून मराठीच्या प्रेमात पडतील ! त्या काळात आम्ही ललित मासिकाचे वार्षिक वर्गणीदार होतो ! हे आणि इतर लेख सुद्धा तेंव्हाही खुप आवडले होते ! आज नव्याने आनंद झाला शशिकांत कुलकर्णी , पुणे

  8. संजय मुळ्ये

      6 वर्षांपूर्वी

    आतापर्यंत आलेल्या सर्व लेखांपेक्षा अधिक उजवे लेख... जयवंत दळवींचे भाषेवरील अफाट प्रभुत्व आणि sense of humour लाजवाब...... जुन्या पिढीसाठी अप्रतिम वाचनानंद....



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen