सिधी बात नो बकवास ...


डॉक्टरांना एक अनुभव नेहमीच येतो ,साधारणपणे प्रॅक्टीस ला पाच - सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेशंट आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी किंवा करीअरविषयी अगदी विश्वासाने डॉक्टरांचा सल्ला घेतात ,त्यात मुलगा किंवा मुलगी मेडिकलला जाणार असेल तर नक्कीच .

तर असाच आमचाही योग आला ,एक नेहमीचा पेशंट ,त्याचा तसा ' वेल सेटल 'ट्रांसपोर्ट चा बिझनेस आहे ,खोल्या वगैरे भाड्याने आहेत (टिपिकल गाववाला ),शेतजमीन (गुन्ठाच म्हणा, कारण शेती फारशी काही कोणी करत नाही )आहे . मुलाच्या करीअर विषयी चर्चा करण्यासाठी आला . "डॉक्टर , पोरगं थोडं हुशार आहे हे तुमाला तर माहीतच आहे , कालेजात सर लोकं पण सारखं असंच म्हणायचे .डॉक्टर व्हायच म्हणतंय !!

मी म्हणालो ,"चांगले आहे की ! त्याला आवड असेल तर काय हरकत आहे , तसं तुम्ही पेमेंट सीट पण अफोर्ड करू शकता ,नाही का ?  मेडिकलची फ्री सीट मिळणे तसे अवघड आहे .

तेच तर डॉक्टर , तसं आपलं पैसापाण्याने सगळं ओके आहे . फ्री सीट ठीक आहे मिळाली तर ,पण समजा नाही मिळाली अन् पेमेंटला अँडमिशन घ्यायची म्हटलं तर 50-60 लाखाचे बजेट आहे M.B.B.S. चं असे जरा चौकशी केल्यावर कळलं .यांत सगळं शिक्षण होणार मग पुन्हा स्पेशालिटी, लय लाम्ब जातंय हे , वेळ आणि पैसा दोन्ही पण !! त्यापेक्षा बघा ,थोडे प्रयत्न केले ,वशिला लावला की 20-30लाखात वाईन शॉप चे ' लाइसेन्स' मिळते ,लई भारी धंदा . वर्षभरच्या आत मिळेल ते , एका जागी निवांतपणे बसून कमाई ,बरं गिऱ्हाईकाल बोलवायची गरज नाही , आपसूकच येत्यात ,रोख व्यवहार ,काहीबी रिस्क नाय ,रात्री शटर ओढायचे ,पोरगं ठेवलं तरी जमतय हिशोब घ्यायचा फक्त .कुठल्याबी स्पॉटला चालतय ,येत्यात शोधत बराबर ,सदा गर्दी कुठल्याबी दिवशी !! अगदी अभ्यासू भाव चेहऱ्यावर आणून तो बोलत होता .

मधेच तात्विक गुगली टाकावा म्हणून मी म्हटले ,"अहो हा झाला धंदेवाईक विचार.  शिक्षण, ज्ञान, आवड, मान, आदर याला काही महत्व आहे की नाही ?? असा प्रश्न त्याला अपेक्षितच होता बहुतेक , त्याने पण गुगलीवर शॉट लावला ,तो म्हणाला ,"अहो ग्रेजुयेट झाला तरी शिक्षण होते की ,शेवटी काय पैसाच कमवायचाय !लोकं म्हणतातची डॉक्टरकी हा पण धंदाच झालाय आजकाल ! कसला मान घेऊन बसलात डॉक्टर ,दररोज हल्ले होतातच की डॉक्टरवर ,पहिल्यासारखे कोण देवपण देतय डॉक्टरला.अन एव्हढा त्याग करुन दोन टाइम खायला तरी नीट वेळ मिळतो का डॉक्टरला ,सारखं टेन्शनमधी!! तुमीच सांगा खरं आहे की नाय हे , काय लाइफ बिइप म्हणत्यात ते तरी आहे का ,सारखी धावपळ. अभ्यास आणि कष्ट करुन आउट- पुट नाय , ह्याला हेच म्हणतोय, गेले ते पूर्वीचे दिवस ,कशाला सुखाचा जीव दुःखात घालतो ?  सांगा तुम्ही .दुसरं काही बी कर ' डॉक्टरकी' नको !!

मी म्हणालो ,"अगदी असच काही नाही ,थोडेफार वातावरण बदलले आहे हे नक्की ,पण अजून हे 'नोबल प्रोफेशन' आहे ,आता हेच बघा ना ,तुम्ही नाही का आला विश्वासाने चर्चा करायला ?"

"तेच तर म्हणतोय मी ,अहो आताचे ठीक आहे पण 10-12 वर्षानी जेव्हा हा डॉक्टर होईल तेंव्हा हे थोडेफार राहणार नाही ,काळाची पावलं नको का ओळखायला आपण ??,"   तो थोडसं जबाबदारीच्या सुरात बोलला.

त्याचं पोरगं माझ्याकडे आशेने पहात होतं ,सर काहीतरी बोलून बापाला समजावून सांगतील ,डॉक्टर होणे किती "ग्रेट "आहे ते ?,

मी म्हटलं , "बघू आता पेशन्ट आहेत बाहेर , वेळ आहे अजून रिझल्टला ,'entrance ' चा निकाल लागल्यावर बोलू !" मी पळवाट काढली आणी वेळ मारून नेली . इथं त्याने माझाच निकाल लावला होता. एक विचार मात्र मी बराच वेळ करत राहिलो .तो जे बोलत होता त्याचा सारांश हा तर नसावा ???

"सब क्लियर हैं ,सीधी बात बाकी नो बकवास !!!!"


अवांतर , मुक्तस्त्रोत , संकलन

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    वर्तमान अथवा भविष्याचा विचार करता मुलाच्या वडीलांचे विचार अगदीच चुकीचे म्हणता येत नाहीत, जर मुलगा ऐतखाऊ असेल तर. परंतु जर मुलाला स्वतः ला काही करायचे असेल तर त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. त्याला सांगू शकतो सरकारी कोट्यातील प्रवेश मिळेल असे गुण तु मिळवायचे व पुढे जायचे.

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    मार्मिक लेख . आवडला .

  3. Satish Bhagwat

      3 वर्षांपूर्वी

    समाजाची खालावलेली "नैतिकता" नीट पुढे आणली आहे. पैशाचे अवास्तव वाढलेले महत्व (शेवटी काय पैसाच कमवायचा आहे!), तसेच नैतिकता आणि कायदा ह्यातील वाढलेले अंतर (पैसे देऊन ऍडमिशन किंवा लायसेन्स मिळवणे ठीक आहे), कसे हळूहळू समाजमान्य झाले आहे हे अगदी साध्या घटनेतून मांडले आहेत.

  4.   3 वर्षांपूर्वी

    मस्त



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen