आणीबाणी ही आत्मवंचना होती- केतकर कबुली?


दिनांक २१  जून २०१५ च्या लोकमत दैनिकात पत्रकार श्री. कुमार केतकर यांचा आणीबाणी या विषयावर एक लेख आला होता.  ज्याचं शीर्षक होतं ' आणीबाणी स्मरणातली आणि विस्मरणातली! '. आणि अर्थातच केतकरांच्या सुप्रसिद्ध भूमिकेनुसार इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणणे कसे अपरिहार्य होते वगैरे, याचा उहापोह त्याही लेखात केला होता.

मात्र सदर लेख लिहिताना केतकर एक वाक्य लिहून गेले  की 'आणीबाणी ही एक आत्मवंचना होती!  या अनोख्या वाक्याचे नेमके काय अर्थ असू शकतात,  याचा सविस्तर आणि अप्रतिम समाचार श्री. राजेंद्र मणेरीकर यांनी फेसबुकवरील त्यांच्या पोस्टमध्ये घेतला होता. आणीबाणी विशेषांकातील सोशल मिडीया सदरात, आपण तीच पोस्ट आज घेतली आहे. लेखाच्या तळाशी केतकरांच्या लोकमतमधील मूळ लेखाची लिंकही संदर्भासाठी दिली आहे.

********

आणीबाणी ही एक इंदिराबाईंनी इंदिराबाईंची केलेली फसवणूक होती हा निष्कर्ष केतकरांनी सांगून झाला. आता प्रश्न आला की इंदिराबाईंनी इंदिराबाईंची फसवणूक का केली? एकीने दुसरीला फसवायला इंदिरा दोन होत्या की काय? ह्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर होय असे असून त्याचा अर्थ त्या दोघी एकाच देहात नांदत होत्या व एका क्षणी ही दुसरी इंदिरा जिंकली असा आहे.

ही काही इंदिराबाईंचीच गोष्ट नव्हे. प्रत्येकाच्या बाबतीत असणारी ही गोष्ट आहे. सामान्याचे विश्व लहान असल्याने व सामान्यांकडून अपेक्षा मर्यादित असल्याने त्याचा गवगवा मोठा होत नाही. मात्र, त्याच्या त्या छोट्या विश्वातही हा दोन बुद्धींमध्ये सामना होऊन जर नको ती बुद्धी जिंकली तर त्या विश्वातील सर्वांनाच बसलेला फटका मोठा असतो ही आपल्या नित्य परिचयाचीच गोष्ट नाही काय? दोन इंदिरा म्हणजे दोन बुद्धी - दोन प्रकारचे विचार - एकमेकांविरूद्ध असणारे. आपल्या मनात असतात तसेच.

व्यक्ती जशी मोठी होत जाते तशा अपेक्षा वाढू लागलात. त्या व्यक्तीच्या वर्तनाची समीक्षा होऊ लागते आणि ती समीक्षा होताना आपण त्या व्यक्तीकडून ज्या अपेक्षा करू लागतो त्याच्या फारच विपरित काही घडले की आपण विलक्षण नाराज होतो. भारतीय जनतेचे असे झाले. आणीबाणीने भारतीय जनतेला दोन मोठे मानसिक धक्के दिले. यापैकी पहिला हा होता की आणीबाणी नावाचे एक आपणच बनविलेले शस्त्र आपल्यावर उलटू शकते हा. दुसरा धक्का अजून मोठा होता. तो हा की, जिला आपण आपल्या हृदयात स्थान दिले त्या इंदिरेने हे केले!

इंदिरा ही काय चीज आहे हे काय भारताला माहीत नव्हते? वाजपेयी म्हणाले असतील वा नसतील, सर्वसामान्य भारतीय जनता तिला दुर्गेच्या स्वरूपातच पाहत होती. तिचे काही पटत असेल, नसेल पण तिला 'संकट निवारी' रणचंडिका मानीत होते. पक्षांतर्गत संघर्षात तिने लहानथोरांना चिरडून दाखविले होते, बांगलादेशाची निर्मिती करून पाकिस्तानचे नाक कापले होते, युद्धही जिंकले होते. भल्या मोठ्या दुष्काळातही देशाची मान तिने खाली जाऊ दिली नव्हती, निक्सनसारख्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे मदत मागतानाही तिने देशाचा आणि स्वतःचा अपमान सहन केला नव्हता.

भारतीयांचे म्हणून तिच्यावर खरेच अपूर्व प्रेम होते. तिचे दिसणे सुंदर होते, वाणी ऐकत राहावी अशी होती. तिचे निर्णय क्रांतीकारी होते. बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याची धमक असलेली ती होती. प्रांतोप्रांतीच्या गुंडपुंड राजकारण्यांना वेसण घालून नाकात दम आणू शकेल अशी एकमेव तीच होती. अशा तिला एका मर्यादेपलीकडे गैर वागायची परवानगी देण्यास भारतीय जनता तयार नव्हती. तिची ही प्रतिमा लोककल्याणकारी होती. तिनेही ती जपली होती. शक्य असूनही तिने कधी अंगावर पैसा मिरविला नव्हता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचीच प्रतिमा आपल्या लोकांना आवडते हे तिला कळत होते. म्हणूनच खेड्यापाड्यातल्या जनतेलाही ही आपली वाटत असे आणि शहरी शहाणे काहीही म्हणाले तरी आदराच्या स्थानावरील तिचा हक्क त्याचवेळी मान्य करीत होते.

राजकारण हे काही विरोधाशिवाय होत नसते. आपण, आपले सर्वौच्च स्थानी असावेत ही भावना असायचीच. जाॅर्ज वा जेपी याला अपवाद असायचे कारण नव्हते. ते आपापली काळजी करीत होते. ते इंदिराविरोधक होते. इंदिराभक्त होण्याचा मार्ग त्यांना उपलब्ध होता. तिच्या तालावर नाचता आले की झाले. ते त्यांना मान्य नव्हते. यातही काही चूक नव्हते. असे असायचेच. त्यांनी आपापली अस्त्रे उपसली. जाॅर्जबद्दल लोकांना आकर्षण होते, जेपींबद्दल आदर होता. त्यांच्या डोक्यावर देशाचे ओझे नव्हते आणि दुष्काळ कमी झाला की मग लढू, कर्ज फिटले की मग लढू अशा बावळट विचारांचेही ते बळी नव्हते. त्यांनी इंदिरेला विरोध करावा हे लोकांना स्वाभाविक वाटले.

यांत एक राजनारायण नावाचा मनुष्य होता. तो चक्क बाई विरूद्ध कोर्टात जिंकला! बाई हरली! हे सारे कायदेशीर झाले होते. जाॅर्ज आणि जेपी भावनेचा खेळ करीत होते, तो अनपेक्षित नव्हता आणि त्याला तोंड देणे कठीण नव्हते. केतकर सुचवितात तसे जेपी अमेरिकेच्या तालावर नाचत असणारे असते तरी त्याला पुरून उरेल असे मनोबल बाईकडे होते. अहो, जी कोणत्याही परिस्थितीत खचत नाही तिलाच इंदिरा नाव होते! अशी ही इंदिरा, न्यायालयात हरली आणि तिने इतके वर्षे ज्या दुसऱ्या इंदिरेला दाबून धरले होते ती क्षणात प्रबळ झाली! दोन इंदिरा एकमेकींसमोर उभ्या राहिल्या. प्रत्येकाच्या मनात एक योगी आणि एक भोगी असतो. योगबुद्धीच्या आश्रयानेच माणसे वरवर चढतात आणि त्याच जागी नांदणाऱ्या भोगबुद्धीने खाली उतरतात. चढायला वर्षानुवर्षे लागतात आणि उतरायला क्षण पुरतो.

तो क्षण इंदिरेच्या जीवनात आला. हा मोहाचा क्षण होता. तो बाईंना जिंकता आला असता तर ती भोगबुद्धी मृतवत झाली असती आणि बाईंच्या योगबुद्धीने काही काळानंतर बाई अजून वर गेल्या असत्या. ते व्हायचे नव्हते. सत्तेच्या भोगाची सरशी झाली आणि बाईंनी आणीबाणी पुकारली! योगः कर्मसु कौशलम् अशी व्याख्या गीताकार देतात. कर्मे करण्याचे कौशल्य म्हणजे योग. पाकिस्तानचे दोन तुकडे करताना बाईंचे कौशल्य पराकोटीला पोहोचले होते. बॅंका, दुष्काळ, राज्यांतर्गत प्रश्न, पक्षांतर्गत प्रश्न, देशपातळीवरचे, जागतिक पातळीवरच प्रश्न हाताळताना बाई कुठे कमी पडल्या नव्हत्या. ही त्यांच्या योगबुद्धीने केलेली भोगवृत्तीवरील मात होती. हा इतका मार सहन करणे त्या भोगबुद्धीला शक्य नव्हते. ती संधीच्या शोधात होती. ती संधी न्यायालयाच्या निर्णयाने दिली आणि इंदिरा होत्याची नव्हती झाली!

आणीबाणी आली, गेली. तिच्या जागी आलेल्यांच्या योगबुद्धी आणि भोगबुद्धी - दोन्ही सुमार होत्या. त्यामुळे लोकांनी बाईंना क्षमा केली आणि पुन्हा बाईंना बोलावून आणले. नंतरची कारकीर्द भिंद्रनवाले नामक स्वनिर्मित भस्मासुराला नष्ट केल्यामुळे व त्या आगीत स्वतःची आहुती दिल्याने लक्षात राहील. बाकी आधीचे तेज नंतर असू शकत नव्हते. आणीबाणीचे देशावर काय परिणाम झाले हे देशपातळीवरच्या तज्ज्ञांनी सांगावे. आमच्यासारख्या सामान्य मराठी लोकांच्या दृष्टीने सांगायचे आमचे फार नुकसान ह्या आणीबाणीने केले.

त्या आणीबाणीने आधी कुमार केतकर नावाच्या एक अत्यंत हुशार पत्रकाराचा नास केला आणि त्या पत्रकाराने पुढे संपूर्ण मराठी पत्रकारसृष्टीचा नास केला. ह्या मनुष्याचा नास परकीय शक्तींनी केला, येथील शक्तींनी केला की त्याच्याच दोन बुद्धींपैकी एक दीर्घ काळासाठी बंद पडली हे कळणे कठीण आहे. पण दुसरी बुद्धी पूर्ण मारून एका बुद्धीचे होण्यासाठी जी साधना करावी लागते तीत इंदिराबाई कमी पडल्या आणि आज अशी शंका येते आहे की इंदिरासमर्थनाचे हे नाटक शेवटपर्यंत निभावण्यास हा कुमारही कमी पडला. त्याच्या तोंडून अवचितपणे सत्य नुकतेच बाहेर पडले, आणीबाणी ही एक इंदिराबाईंनी इंदिराबाईंची केलेली फसवणूक होती! आता तरी कुमारभक्तांना विषय कळो!

[ कुमार केतकरांच्या मूळ लेखाची लिंक - http://www.lokmat.com/manthan/emergency-remembered-and-forgotten/ ]

********

लेखक- राजेंद्र मणेरीकर लेखकाच्या ब्लॉगची लिंक vichararth.wordpress.com संपर्क - ९३७१३११३४१


राजकारण , आणीबाणी , कुमार केतकर , राजेंद्र मणेरीकर

प्रतिक्रिया

  1. VIJAY BHAGWAT

      2 वर्षांपूर्वी

    Kumar buddhicha sumar.

  2. Sadhana Anand

      3 वर्षांपूर्वी

    वा , अतिशय उत्तम विश्लेषण

  3. Vinesh Salvi

      3 वर्षांपूर्वी

    दोन वर्तमानपत्रे होती,महाराष्ट्रात सध्या एकही नाही......

  4. sharadnaik

      6 वर्षांपूर्वी

    खुप छान विश्लेषण.

  5. प्रबोध ढवळे

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान विश्लेषणात्मक लेख आहे. जसे आज काही लोकांना मोदीभक्त संबोधले जाते तसेच त्या काळी इंदिरा भक्त पण होते. पण लेखात नमूद केलेल्या दूसऱ्या इंदिरा नी अशा भक्तांना दूर सारले म्हणून अधोगती झाली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen