आषाढीचे आधुनिक अभंग

पुनश्च    तंबी दुराई    2018-07-22 06:00:03   

लेखक: तंबी दुराई

आषाढी एकादशीच्या आधी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत निघतात. संतांच्या पालख्या पंढरपुराकडे वाटचाल करू लागतात. मध्यमवर्गीय माणूस त्यांची छायाचित्रे पाहतो, कौतुक करतो. त्याच्या स्वतःच्या वर्षभराच्या दिनक्रमात मात्र असा  कोणताही बदल होण्याची सूतराम शक्यता नसते. तो मनातल्या मनातच वारी करतो. त्याचे हे आधुनिक अभंग-

 

वारीच्या वाटेवरी

कितीही खड्डे जरी।

येईन तरी मी

पांडुरंगा।।

अशक्त ते पूल

पडो त्याला उल।

ओलांडिन त्यासी

प्रेमभरे।।

ढग लागे झरू

प्लास्टिक पांघरू।

तुच भरी देवा

दंड माझा।।

पेट्रोल ते वाढो

डिझेल ते चढो।

पाय माझे भले

देवराया।।

साहेबांनी नाही

दिली जरी रजा।

तरीही तेधवा

येईन मी।।

कन्या दहावीला

पुत्र  बारावीला।

आता एक तूचि

आधार रे।।

फेसबुक तुचि

व्हाट्सॅप तुचि।

ट्विटरही माझे

तुचि असे।।

ऐक माझी गोष्ट

वाच माझी पोस्ट।

किमान लाइक

करी देवा।।

मिळो न मिळो मज

सातवा आयोग।

परि ना वियोग

घडो तुझा।।

तूच असे दाता

तूच असे डेटा।

तुझी रेंज मोठी

पांडुरंगा।।

तुझ्याविना कोणी

सर्वव्यापी नाही।

एक तुला स्पर्धा

जीएसटी ची।।

मी ना शेतकरी

मी ना कामगार।

असे मी बिचारा

मध्यमवर्गी।।

असे येती पैसे

असे जाती पैसे।

उरे शून्य हाती

अंती माझ्या।।

फिक्स डिपॉझिट

ठेव माझे निट।

फंड हा आपुला

म्युच्युअल।।

संसाराचे पाणी

आले गळ्यापाशी।

एक प्रेमझप्पी

देरे देवा।।

येतो जातो काळ

करी तू सांभाळ।

असू दे विठ्ठला

कृपा तुझी।।

********

तंबी दुराई

  [ आजच्या तंबी दुराईची फिचर्ड इमेज, पुनश्च-मित्र आणि कमर्शियल आर्ट्सच्या तरुण विद्यार्थिनी ' जयश्री भोसले ' यांनी स्वतः रेखाटली आहे. ]

तंबी दुराई , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.