गावातील पिक्चर


गावात लहानपणी सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाचा सण असायचा. या गणेशोत्सवाच्या दरम्यान मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम असायचे यापैकी एक म्हणजे चित्रपट दाखवणे. हल्ली पायलीला पन्नास चॅनल आणि त्यावरील विविधढंगी कार्यक्रम हे फावल्या वेळेचे मनोरंजनाचे साधन आहे. पण पूर्वी तसे नव्हते. या बाबतीत दूरदर्शन हाच एकमेव सखा होता आणि तोही सर्वांना सहजसाध्य नव्हता.

अशा परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या  चित्रपटाचे खूप आकर्षण आणि कौतुक असायचे. जेवढे मंडळ मोठे तितका पिक्चर भारी, नवीन असायचा. याची तयारी गणपती आल्याआल्या सुरू व्हायची. मंडळातील वरिष्ठ लोक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पिक्चरच्या वाटाघाटी ठरवायची. एकदा का चित्रपट फायनल झाला का मग त्याची जाहिरात सुरू व्हायची....

अमक्या दिवशी रात्री ठिक नऊ वाजता मस्त मराठी/हिंदी रंगीत चित्रपट अशी जाहीरात दिवसभर माईकवर कलकलायची. रंगीत पिक्चर हे त्या चित्रपटाचे एक ठळक वैशिष्ट्य असायचे. पिक्चरमधील कलाकारापासून ते फायटिंग पर्यंत चर्चा रंगायची. त्यावेळी फायटिंग हा चित्रपटांच्या यशस्वीततेचा निकष असायचा. एका मंडळाच्या तारखेनुसार दुसरी मंडळे तारखेचे नियोजन करायची. दहा दिवसांच्या या उत्सवात बरेच चित्रपट पहायला मिळायचे.

प्रत्यक्ष पिक्चरदिवशी घरोघरी तयारी व्हायची. गुरांच्या धारा जरा लवकरच व्हायच्या. तिन्हीसांजेलाच चुली पेटायच्या. पिक्चरच्या तयारीचा महत्वाचा भाग म्हणजे पिक्चरची पेटी. मुक्कामाच्या गाडीने पेटी गावात यायची. मंडळाची पोर आधीच एस टि स्टॅंडवर हजर असायची. शेवटची गाडी पेटीवाल्या माणसाला घेऊन यायची. पेटीवाला गाडीतून उतरला की पोर एस टि वाल्याकडे मोठ्या कृतज्ञतेने बघायची.

फिट पॅन्ट ,रंगीबेरंगी शर्ट आणि पांढऱ्या रंगाची चप्पल हे सहज ओळखता येणारं पेटीवाल्याच रूप असायचा. पेटीवाला रुबाबात खाली उतरायचा. पोर त्याच्याभोवती जमायची. त्याच्या हातात एक अल्युमिनीअमची पेटी किंवा सुटकेस असायची आणि यातच पिक्चरचा खजिना असायचा. या पेटीलाच पिक्चरची पेटी म्हणायचे. पेटी गावात आली आहे ही आनंदाची खबर संपूर्ण गावात वाऱ्याच्या वेगाने पसरायची.

पेटी आली आहे अशी अधिकृत घोषणा लाऊडस्पीकर वरून व्हायची. पेटीवाल्याची सोय सोसायटीच्या ऑफिसात व्हायची. मंडळाचे कार्यकर्ते त्याच्या पाहुणचारात रमायचे. बाजारात किंवा मठातल्या मैदानात पांढराशुभ्र पडदा लावला जायचा. भुरभुर पडणाऱ्या पावसाचा किंचित रागच यायचा........गाववाल्यांचा रागरंग बघून तोही थांबायचा. मंडळाच्या कार्यकर्तांच्या उत्साहाला भरत यायच ....आकडा टाकून किंवा कोणाच्यातरी घरून लाईटची व्यवस्था व्हायची.

हाॅटेलातल्या टेबलाला मैदानात मध्यभागी उभा राहायचा मान मिळायचा. माजघर आणि चुलीचा पोतारा आवरून आयाबाया पिक्चरच्या तयारीला लागायच्या. खाली अंथरायला जाजम, खताचे रिकामे ठिक किंवा जूने पोते हाताशी घेतलं जायचं. छोट्या लेकरांना स्वेटर टोपी घालून तयार केल जायचं. अंगावर पांघरायला धोतराच धडप नाहीतर जुन दंडाच लुगड असायच. दाराच्या कड्याकुलपांची ओढून तपासणी होऊन सर्वजण पिक्चरच्या दिशेने निघायचे.

गल्लीबोळातून माणसांचे लोंढे ठरलेल्या जागी जमायचे. योग्य ठिकाण आणि शेजारी बघून बसण्याची जागा फायनल व्हायची. जमलेल्या लोकांत गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरूष असे भेदभाव नसायचे. वेगवेगळ्या जाती धर्माची सर्व मंडळी एकत्र यायची. लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील गणेशोत्सवातील सामाजिक एकी गावकऱ्यांत या पिक्चरच्या निमित्ताने बघायला मिळायची. मधल्या वेळात मंडळाचा इतिहास माईकवरून ऐकविला जायचा.

पेटीवाला मोठ्या तांत्रिकाच्या थाटात फोकसची आणि फिल्मच्या रिळाची ऍडजेसमेंट करायचा. मशीनमधून निघालेल्या फोकसच्या वाटेत हात, टाॅवेल अस काहीबाही मध्ये येऊन वेगवेगळ्या आकृत्या पडद्यावर दिसायच्या. मंडळाचे कार्यकर्ते हातातील बागायतदार टाॅवेलच शस्त्र करून उगीच मध्ये उभ राहणाराना खाली बसवून शिस्त लावत. अंधारात दृष्टी कमी झाल्याने चेहऱ्याजवळ जाऊन निरखून बघून पोर मित्रांची ओळख पटवून आपापल्या ग्रुपमधी सामील व्हायची.

आता दिवसाउजेडी लोक एकमेकांना पाहूनही तोंड वळवून निघून जातात....त्यावेळी अस नव्हत. पेटीची पुजा करून नारळ फोडणे ही उद्घाटनाची औपचारिकता असायची. उद्घाटनाचा मान मंडळांच्या अध्यक्षांना असायचा. माईकवरून अध्यक्षांना उद्घाटनाची विनंती व्हायची. गर्दीत बसलेली अध्यक्षांची मालकीण अभिमानाने लाजायची. अगरबत्तीच्या वासाने आणि नारळाच्या आवाजाने उद्घाटनाची घोषणा व्हायची.

सुरवातीला बाहेरच्या देशातील गव्हाच्या शेतीची किंवा अशीच काहीतरी ट्रायल रिळ असायची.... आणि शेवटी 7,6,...3,2,1 असे उलटे काऊंटडाऊन होउन मूळ पिक्चरला सुरूवात व्हायची. पिक्चरमधील फायटिंग बघून पोरसोर मुठी आवळायची. नव्या नांदत्या सासुरवाशीनी आशा काळेत स्वतःला बघायच्या.. ....तर निळू फुलेचा पडद्यावरील कपटीपणा बघून आयाबाया बोट मोडायच्या. पडद्यावरील देवाला सुध्दा हात जोडायचा निरागसपणा गाववाल्यात होता. पि

क्चर ऐन रंगात आला असता अचानक व्यतय यायचा. गावातील कोणाचीतरी अडलेली म्हैस अथवा गाय व्यालेली असायची किंवा दावणीचे दावे तोडून पळालेली असायची. म्हशी किंवा गाईच्या मालकाचे नाव घेऊन त्यांला घरी जाण्याची सुचना मिळायची. म्हशीमुळे मालकाचे नाव चारचौघात निघायचे. या अवचित व्यतयानंतर पुन्हा नव्याने सारे पिक्चरच्या स्टोरीत शिरायचे.

मोठ्या उत्साहाने आलेली लेकर मध्यांतरानंतर आईच्या मांडीवर झोपायची. अखेर बरीच भावनिक आंदोलने होऊन पिक्चर संपायचा. पेंगुळलेल्या डोळ्यांनी आणि भरलेल्या मनानी माणसं घरी परतायची. ...हे मनोरंजनाचे टाॅनिक लोक मनात साठवायची......आता रिमोटच्या बटणावर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर मनोरंजनाची कितीतरी साधने आली, ऐशोरामी सुविधा असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटांची गर्दी उठलीय पण त्यावेळी मोकळ्या आकाशाखाली, खुला मैदानात बघितलेल्या पिक्चरची सर याला येत नाही...

लेखक- यश दळवी 

**********

Google Key Words - Yash Dalvi, Village Nostalgia, Village life, Movie nostalgia, Memories of Village life.


सोशल मिडीया , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Shriram Bhide

      3 वर्षांपूर्वी

    गणपतीतील कार्यक्रमात ऐनवेळी, "रीळ उपलब्ध झाले नाही" या कारणास्तव देव आनंदच्या ज्वेलथीफ चित्रपटाऐवजी देवआनंदचाच नंदा बरोबरचा " एक के बाद एक" हा कुटुंबनियोजनावरील सामाजिक विषय असलेला तद्दन चित्रपट वयाच्या दहाव्या वर्षी अर्धा सोडून घरी परत निघून आल्याचे आठवते. त्या प्रोजेक्टरवाल्याला चपलेनी बडविल्याचे दुसर्‍या दिवशी समजले.

  2. आनंद शेटे-पाटील

      4 वर्षांपूर्वी

    शहरात पण अशीच काही मजा होती. बरेचजण पोती किंवा पाट घेऊन जायचे बसायला. मुंबई मध्ये चित्रपट चालू असताना मध्ये घुस किंवा उंदीर शिरायचे तेव्हा खूप गोंधळ उडायचा. बरेच चित्रपट मिथुन किंवा जितेंद्र, गोविंदा यांचे असायचे.

  3. jasipra

      4 वर्षांपूर्वी

    Nice

  4. VinayakP

      6 वर्षांपूर्वी

    अगदी काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलीला मी पडद्यावरच्या "पिच्चरची" गोष्ट सांगितली होती आणि आज हा लेख वाचायला मिळाला. कसलं बहारदार वर्णन केलंय तुम्ही यश...आणि तेही इतकं तपशीलवार... सुंदर...?

  5. ashutoshk

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान, जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  6. jayashreehinge

      6 वर्षांपूर्वी

    आमच्या लहानपणाचा काळ आठवला.

  7. Meenal Ogale

      6 वर्षांपूर्वी

    दादरच्या आमच्या चाळीत सुद्धा असे चित्रपट बघितले आहेत.फिल्म मधे मधे तुटणे,प्रोजेक्टर बिघडणे वगैरे होऊन कधींकधीं सिनेमाला दुप्पट वेळ लागायचा पण कोणी जागेवरून उठत नसे.सगळ्या मैत्रिणींबरोबर वेळ अगदीं मजेत जायचे.पडद्याच्या मागून उलटे पदर असलेल्या नायिकांचे चित्रपट मजेत बघितले आहेत.ती मजा वेगळीच.

  8. gadiyarabhay

      6 वर्षांपूर्वी

    जागा मिळाली नाही तर पडद्याच्या मागे बसून उलटी चित्रे बघावी लागायची त्याची गमतीदार आठवण आली

  9. Sachin Belagade

      6 वर्षांपूर्वी

    खरच गेले ते दिवस

  10. kaustubhtamhankar

      6 वर्षांपूर्वी

    हा लेख वाचून मला सुद्धा असे सिनेमे बघितल्याची आठवण झाली . कांही कांही वेळा गर्दी एवढी व्हायची कि पडद्या समोर बसायला जागा मिळायची नाही अशावेळी ज्यांनी तो सिनेमा आधी बघितला असायचा अशी मंडळी पडद्याच्या मागे बसून देखील सिनेमा बघायची . सिनेमा उलटा बघण्यात एक वेगळीच मजा यायची . असा उलटा सिनेमा बघायची मजा आता कशी घेता येणार ?

  11. manjiriv

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान. जुन्या आठवणींची सुरेख साठवण.

  12. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    nostalgic अहो गावात कशाला शहरात पण हीच परिस्थिती होती,



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen