जपानी माणूस जेव्हा मराठी बोलतो


पुणे तिथे ...... " पुण्यात यावेळी मतदान कमी का झालं ? " हा प्रश्न कानी पडला आणि मी चमकून वळून पाहिलं. कारण हा प्रश्न विचारला जाण्याची जागा होती ....चेन्नई .

चेन्नई किंवा मद्रासला हिंदी सुद्धा कमी ऐकू येते ...तिथे चक्क मराठी .... आणि हा प्रश्न विचारणारा होता ...एक जपानी माणूस . होय ....जपानी . तो केवळ मराठीत प्रश्न विचारत होता इतकेच नाही ....तर त्याचे मराठी उच्चार सुद्धा अतिशय व्यवस्थित होते . होय ....जपानी माणूस . झालं असं .... मी गेले दोन दिवस ऑफीस टूर मुळे चेन्नईला आहे .

आज सकाळी नाश्त्याच्या ( ब्रेकफास्ट ) वेळी माझ्या शेजारच्या टेबलावर ६ - ७ जणांचा एक ग्रूप बसला होता . त्यात काही जपानी व्यक्ति होत्या . ते सगळे एका वाहन - उद्योगाशी संबंधित कंपनीच्या विविध विभागातील , विविध शहरातील आधिकारी होते . त्यापैकी बहुतेकजण एकमेकांना प्रथमच भेटत असावेत . त्यामुळे परस्पर - परिचयाचा कार्यक्रम ( हा शब्द त्या जपानी आधिकाऱ्याने नंतर वापरला .) सुरु होता .

त्यावेळी त्यातल्या एका आधिकाऱ्याने जेंव्हां स्वतःची ओळख करून देताना तो पुण्याचा आहे असे सांगितले तेंव्हा त्या जपानी आधिकाऱ्याने हा प्रश्न मस्त मराठीत विचारला ..." पुण्यात यावेळी इतके कमी मतदान का झाले ? " या त्यांच्या गप्पांच्या ओघात त्या जपानी आधिकाऱ्याने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांविषयी जी आणि जितकी माहीती सांगितली ती तर थक्क करणारी होती ....इतकी माहीती कदाचित ....कदाचित ...पुण्याच्या मतदारांनी सुद्धा स्वतःच्या उमेदवारांविषयी मिळवली नसेल .

किंवा अशी आणि इतकी माहीती मिळवण्याची प्रक्रिया सुरु असल्याने मतदानाचे प्रमाण कमी राहिले असेल . त्यांच्या आपापसातील बोलण्यावरून मग लक्षात आलं की हा जपानी आधिकारी येत्या काही दिवसांत त्या कंपनीच्या पुणे कार्यालयाचा प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेणार आहे . काही वर्षांपूर्वी दुसऱ्या कंपनीत विभाग - प्रमुख म्हणून सात - आठ वर्षे तो पुण्यात राहिला आहे . त्यावेळी शिकलेल्या मराठीचा सराव त्यांनी आजतागायत सुरूच ठेवला आहे . आत्ता चेन्नईला येण्याआधी काही दिवस सुटी घेऊन त्याने ते दिवस वैयक्तिक पातळीवर पुण्यात घालवले आहेत .

सुटीच्या या काळात तो सोलापूर - पंढरपूर - सातारा - सांगली - कोल्हापूर - बेळगाव असा फेरफटका मारून आला आहे . तोही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून . कारण हा भाग नंतर त्याच्या कार्यकक्षेत येणार आहे . त्याच्या आधीच्या अनुभवामुळे आणि अलीकडच्या फेरफटक्याने तो त्याचे अनुभव , त्याची मते सांगत होता .... त्यापैकी काही अशी .... ....पुणे - सातारा रस्त्यावर सगळीकडे " अख्खा मसूर " च्या पाट्या लागलेल्या असतात . खरंच कोणी ते खातं का ? ....तांबडा रस्सा - पांढरा रस्सा आपला आब राखून आहे . .....फडतरे मिसळ बेस्ट ... ...ज्वारी - नाचणीची भाकरी खाणाऱ्याच्या डोळ्यांसमोर चुलीवर तयार करून दिली तर ग्राहक आणखी वाढतील का ? .....साताऱ्यात स्वयंपाक कोल्हापूरपेक्षा जास्त तिखट असतो . .....

सातारा -इचलकरंजी - किर्लोस्करवाडीची औद्योगिक परंपरा जोमात सुरु न राहणे हे दुर्दैवी . .....कोल्हापूर पुण्यापेक्षा राजकीय द्रुष्ट्या जास्त सजग आणि संवेदनशील आहे . आणि मला सगळ्यात जास्त वैशिष्ट्यपूर्णं वाटले ते म्हणजे .... पुणे विभागाची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या तो नरसोबाची वाडी आणि सज्जनगड इथे दर्शनाला जाणार आहे .... हे सगळे सांगताना त्याचे व्यावसायिक डोकं कार्यरत होतंच ... या भूभागाची पर्यटन - क्षमता लक्षात घेता या भागात कंपनीतर्फे भाड्याने दुचाकी वाहने देण्याच्या व्यवसायाला सुरवात किंवा चालना देता येईल का .....गोव्यात मिळतात तशी ....

बोलण्याच्या ओघात त्यांनी तो सध्या वाचत असलेले पुस्तक दाखवले ....ते होते ....न .चिं .केळकर यानी लिहिलेल्या लोकमान्य टिळक चरित्राचा तिसरा खंड . सगळ्यात कहर म्हणजे या जपानी माणसाने त्या पुणेस्थित आधिकाऱ्याला उठता उठता विचारलेला हा प्रश्न .... " पुण्यात हल्ली व्याख्याने कमी आणि गाण्याचे कार्यक्रम जास्त असे का आणि कसे होते ? त्यातही व्याख्याने झालीच तर श्रोते कमी का असतात ? " जगदंब जगदंब .... पुणे तिथे .... केल्याने देशाटन ...

चन्द्रशेखर टिळक 

२५ एप्रिल २०१९ .


सोशल मिडीया , अवांतर , चन्द्रशेखर टिळक

प्रतिक्रिया

 1. Kiran Joshi

    2 महिन्यांपूर्वी

  क्या बात.....! ग्रेट!!!

 2. Sandhya Tembe

    2 महिन्यांपूर्वी

  ya swabhavane JAPAN yashasvi aahe. iekhan khuskhushit.

 3. Chandrakant Chandratre

    2 महिन्यांपूर्वी

  व्वा.

 4. dhananjay deshpande

    2 महिन्यांपूर्वी

  मराठी माणसाने आत्मपरीक्षण करावे इतके ज्ञान ह्या व्यक्तीने घेतले आहे, बारीक निरीक्षण पहाता मला पु ल देशपांडे यांची आठवण आली.छान

 5. Hemant Marathe

    2 महिन्यांपूर्वी

  व्यावसायिक का होईना पण फक्त भाषा नाही तर ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय व सांस्कृतिक जाण देखील जपानी माणसाने वाढवलेली लक्षात येते.

 6. Amol Nirban

    2 महिन्यांपूर्वी

  Marathi vyaktinni hyatun shiknyasarkhe aahe.

 7. arush

    3 वर्षांपूर्वी

  म्हणजे पुण्याची किर्ती जपानलाही पोचली. पण या माणसाची डोळस हुशारी वाखाणण्यासारखी आहे

 8. psirane

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम

 9. [email protected]

    3 वर्षांपूर्वी

  छानच आहेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen