रहमानचा रंगीला - एक अनोखा साऊंड


१९९५ साल ... नववीचं वर्ष आणि दिवाळीची सुट्टी. ए आर रहमानची नवीन कॅसेट आणली होती. रहमानचा पहिला ओरिजिनल म्हणजे डब न केलेला हिंदी अल्बम असं कॅसेटवर ठळकपणे लिहिलं होतं. घरच्या साउंड सिस्टीमवर ती कॅसेट फुल व्हॉल्युमवर दोनदा ऐकली आणि सगळीच गाणी इतकी आवडली की साईड ए अन साईड बी बदलत राहून तासंतास घरी रंगीलाची गाणी लावून ठेवायचो. घरचे वैतागेपर्यंत.

तेव्हा माझे वडील लाऊड स्पीकर कॅबिनेट डिझाईन करत असत. आणि काही पीस घरी टेस्ट साठी यायचे त्यामुळे अद्ययावत साउंड घरी सहज उपलब्ध होता. रंगीला ऐकताना असं वाटलं की असा स्पष्ट, एकेक बारकावा ऐकू येणार, सूर आणि तालाच्या पलीकडे जाऊन माहौल निर्माण करणारा साउंड पूर्वी कधीच ऐकला नव्हता. रोजा, हम से है मुकाबला, बॉम्बे अशा डब केलेल्या साउंडट्रॅक मधून रहमानने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती खरी. पण रंगीला हा पूर्ण अल्बम ऐकणं हा एक वेगळाच आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा अनुभव होता.

आजही रंगीलाची गाणी हेडफोनवर किंवा गाडीत ऐकताना अगदी तितकीच ताजीतवानी आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेली वाटतात. २०१९ मधलं कोणतंही गाणं लावा पण १९९५ साली केलेल्या रंगीलाचा साउंड या आजच्या गाण्यांपेक्षाही उजवा वाटेल. तमिळमध्ये फॅन्स नी रहमानला इसै पूयल म्हणजे संगीताचं वादळ असं नाव ठेवलं आहे. रंगीलाचं संगीत अक्षरश: वादळासारखंच तेव्हा बॉलिवूडमध्ये आलं आणि रहमान एक बेंचमार्क मानला जाऊ लागला. ७ गाणी आणि ४४ मिनिटं ... कितीदा या गाण्यांची आवर्तने केली असतील आठवतच नाही.

तेव्हा अगदी क्वचित असं होत असे की एकही गाणं फॉरवर्ड न करता एखाद्या सिनेमाची सगळी कॅसेट उत्साहात ऐकली जात असेल.

रंगीला रे मधील आशाताईंचा आवाज ... ८-९ वर्षाच्या आदित्य नारायण चं कॅडबरी अमूल कॉम्प्लॅन हॉर्लिक्स चं कडवं आणि एक वेगळ्याप्रकारे बांधलेला ठेका ... मिली या उर्मिला मातोंडकरने रंगवलेल्या भूमिकेची ओळख करून देणारं हे गाणं... आणि मेहबूब साहेबांचे शब्द .. बातें या हाथों में, चांद या तारों में किस्मत को ढूंढे पर खुद्द में क्या है ये न जाने हा कसला फंडा होता.

आशाताईंनी रंगीलात गायलेलं दुसरं आणि अफाट गाणं म्हणजे तनहा तनहा यहाँ पे जीना.. या गाण्याची सुरुवात बासरीच्या पण वेगळ्याच भासणाऱ्या आवाजाने होते. खूप वर्षांनी २००९ ला मी जेव्हा नवीन जींची मुलाखत घेतली तेव्हा कळलं की या गाण्यात सुरुवातीला पॅन फ्लूट नावाचं वेगळं वाद्य वापरलं आहे ...नंतर नवीन कुमार जी बासरी वर जी काही जादू निर्माण करतात आणि सोबत असलेल्या ऑर्केस्ट्रल स्ट्रिंग्ज (पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात अनेक व्हायोलिन्स चा असा वापर असा करतात. बॉलिवूडमध्ये शंकर जयकिशन स्ट्रिंग्स खूप सुंदर वापरत असत) यांनी एक वेगळा माहौल निर्माण होतो.. मागे पाखरांचा चिवचिवाट सुद्धा वापरला आहे.

कडव्यात एका ठिकाणी भैरवी डोकावून जाते (ये जिंदगी वैसे एक सजा है साथ किसी का हो तो और ही मजा है) ती जागा फारच सुंदर आहे. दुसऱ्या कडव्या पूर्वीच्या संगीतातही व्हायोलिन्स आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. थंडीतील एखाद्या सोनेरी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर कसं वाटतं तसं वाटतं क्या करें क्या ना करें ची सुरुवात सुद्धा स्ट्रिंग्ज नी होते आणि मग अगदी अनपेक्षित असा सॅक्सोफोन गाण्याला एक गति आणि ऊर्जा देतो. फक्त सुरुवातीचं संगीतच एक मिनिट आहे. आणि वेगळाच ठेका आहे. तालाच्या बाबतीत या अल्बम मध्ये इतकं वैविध्य आहे हे क्वचितच पाहायला मिळतं.

या गाण्याचं बलस्थान गायकीपेक्षा वाद्य संयोजनात आहे असं मला वाटलं. पण उदित नारायणाने या गाण्यासाठी जो आवाज लावलाय तो सुद्धा लाजवाब आहे.. प्रेम व्यक्त करू की न को या संभ्रमाचा जो भाव आहे तो उदितजी छानच व्यक्त करतात... संगीत संयोजनातील एकेक डिटेल ऐका ... दरवेळी काहीतरी नवीन सापडत राहतं... या गाण्यात बोंब मारणाऱ्या बायकांचा आवाज अगदी सुरात वापरला आहे ... आणि ठेक्यात तिबेटन गॉंग (मोठ्या धातूच्या थाळीवर प्रहार करून येणारा आवाज) सुद्धा अप्रतिम वापरला आहे.

वो सामने चमकती है साँस ही अटकती है और ये जबान जाती है फिसल नंतर एक शांत जागा आहे ... त्यातलं सौंदर्यही खासच ... प्रत्येक गाणं साउंड आणि निर्मितीच्या दृष्टीने अचूक, परफेक्ट आहे.. संगणकावर निर्माण केलं जाणार संगीत आणि acoustic वाद्ये यांचा मिलाफ इतका सुंदर झालाय की कुठेही त्यांच्यात वेगळेपणा जाणवत नाही. कलाकार हा निर्भीड असावा ... संगीतकार म्हणून ते आवश्यक बंडखोरपण पंचमदांच्या मध्ये होतं ... रंगीलात ते ए आर रहमानच्या कामात नक्कीच दिसतं. हिंदी फिल्म संगीताच्या च्या ठराविक चौकटीबाहेरचा सांगीतिक अनुभव निर्माण करणारा हा साउंडट्रॅक आहे असं म्हणता येईल.

शास्त्रीय संगीताची खोली आणि त्याला वाद्य संयोजन आणि साउंड डिझाईनची उत्कृष्ट जोड यातून घडलेलं शिल्प म्हणजे हाय रामा ये क्या हुआ ...पुरीया धनाश्री किंवा दाक्षिणात्य पंतुवारली रागातील हे गाणं हरिहरन आणि स्वर्णलता यांनी खूप ताकदीने गायलं आहे. या गाण्यातील शृंगार.. गायन आणि संगीतातूनच इतका उत्कटपणे मांडला गेला आहे की चित्रीकरण तितक्या सामर्थ्याने करणं हे आव्हानच रहमानने दिग्दर्शक रामगोपाल वर्मासमोर ठेवलं आहे. याही गाण्यात नवीनजींच्या बासरीने आणि खूप वेगळ्या पद्धतीने वापरलेल्या स्ट्रिंग्ज (व्हायोलिन्स) नी कमाल केली आहे.

काफी रागातील प्यार ये जाने कैसा है ... सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती ... इथंही गायकांची निवड उत्कृष्ट ... स्ट्रिंग्जच्या वापराचा अजून एक अनोखा प्रयोग ... सतार आणि वीणेतून साकारलेल्या इंटरल्यूड ... या अल्बम मधील सगळ्यात शांत गाणं ... पण तितकंच आकर्षक .. यारों सुन लो जरा मध्ये उदित नारायण आमिर खानचा मुन्ना सवाल जवाबात छान उभा करतात ... पुन्हा एक वेगळ्या धाटणीचा ठेका... आणि स्पिरिट ऑफ रंगीला मध्ये पुन्हा एकदा स्ट्रिंग्ज चा ताकदवान वापर ... कितीदा कौतुक करायचं! पण प्रत्येक गाण्यात स्ट्रिंग्ज असल्या तरी वापर एकसारखा नाही...

रहमानच्या सुरुवातीच्या काळात साउंड इंजिनिअर एच श्रीधरने निर्मितीचा दर्जा उत्कृष्ट राखण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे.. सांगीतिक सौंदर्य आणि ध्वनीचे विज्ञान यांची जाण असल्याने इतके लेयर्स असलेलं संगीतही कोलाहल वाटता ध्वनिमुद्रित आणि मिक्स झाले. श्रीधर खूप लवकर गेले पण त्यांचं काम अद्वितीय होतं.

हा साउंडट्रॅक येऊन पुढच्या वर्षी २५ वर्षे पूर्ण होतील... पण निर्मिती आणि रचनेच्या बाबतीत आजही ऐकताना तो समकालीन आणि ताजा वाटतो. आणि हल्ली रंगीला ऐकताना जाणवलं की रहमानच्या एकंदर कामात हा उठून दिसणारा, वेगळेपण असणारा अल्बम आहे. कुठंतरी वाचलं की आमिर खानला हे संगीत सुरुवातीला आवडलं नव्हतं ... हे जर खरं असेल तर संगीतात बदल झाले नाहीत हे रसिकांचं भाग्यच! पुन्हा एकदा मस्त नवे हेडफोन घेऊन किंवा चांगल्या साउंड सिस्टीमवर नाहीतर एखाद्या लॉन्ग ड्राइव्ह वर रंगीला नक्की ऐका!

**********

लेखक- चिन्मय भावे

या लेखकाचे अन्य लेख आपण त्यांच्या ब्लॉगवर जाऊन वाचू शकता.  www.chinmaye.com


सोशल मिडीया , अवांतर , संगीत , चिन्मय भावे

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen