द चेकलिस्ट मॅनिफेस्टो - अतुल गवांदे


मला याद्या करण्याची सवय आहे. कुठलाही कार्यक्रम असो, घरगुती समारंभ की घरी कुणी जेवायला येणार असो मी याद्या करते. मला त्या याद्या बघून तयारी करणं सोपं जातं. खूपशा गोष्टींसाठी याद्या करण्याची सवय अनेकदा चांगली सवय असते त्यामुळे ते काम जास्तीत जास्त चांगलं पार पडू शकतं. उदाहरणार्थ पॅकिंगची यादी. यादी अगदी लहानशी, पण त्यामुळे निर्वेधपणे प्रवास पार पडू शकतो.

तर या याद्या म्हणजे चेकलिस्ट. आपण याद्या करतो आणि जसं जसं आपलं काम होईल तसतसं त्या मुद्द्यावर टिकमार्क करत जातो. आपल्या याद्या झाल्या घरगुती. पण अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या कामांमध्ये या याद्या फार महत्त्वाचं काम बजावतात. विमानोड्डाणासाठीच्या चेकलिस्ट किंवा ऑपरेशन थिएटरमधल्या चेकलिस्ट, अंतराळवीरांच्या चेकलिस्ट, खेळाडूंच्या चेकलिस्ट या किती महत्त्वाच्या असतील ते सांगायला नको.

चेकलिस्टचं महत्त्व काय तर थोडक्या वेळात महत्त्वाच्या गोष्टी ठरवून त्या तंतोतंत अंमलात आणणं, म्हणजे चुकीला कमीतकमी जागा उरेल. अतुल गवांदे हे एक नावाजलेले अमेरिकी सर्जन आहेत. ते उत्तम सर्जन आहेतच पण त्याचबरोबर ते एक उत्तम लेखक आहेत. वैद्यकीय पार्श्वभूमीचा आधार घेऊन त्यांनी केलेलं ललित लेखन प्रत्येकानं वाचावं असंच आहे. निरंजन अनेक वर्षं मला त्यांची पुस्तकं वाचायला सांगत होता पण ते राहूनच जात होतं (तसंही इंग्रजी वाचायचं म्हटलं की थोडा कानाडोळा होतोच ? ).

दर महिन्याप्रमाणे मध्यंतरी मॅजेस्टिकला चक्कर टाकली तेव्हा अतुल गवांदेंच्या द चेकलिस्ट मॅनिफेस्टो या पुस्तकाचा अनुवाद दिसला. लगेचच ते पुस्तक उचललं. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) त्यांच्यावर रूग्णालयात, विशेषतः ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या जाणा-या चेकलिस्ट तयार करण्याचं काम सोपवलं. ऑपरेशनदरम्यान आणि त्यानंतर अतिदक्षता विभागात होणा-या मृत्युंचं आणि संसर्गांचं प्रमाण कमी करण्यासाठी या चेकलिस्ट अतीव महत्त्वाच्या ठरणार होत्या.

अनेकदा एखाद्या साध्या सोप्या ऑपरेशनमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याचं आपण ऐकतो किंवा अनेकदा अगदी गंभीर परिस्थितीतला रूग्ण सहीसलामत बचावल्याचंही ऐकतो. यात रूग्णाचा आजार, त्याची सहनशक्ती, त्याच्या शरीराचा प्रतिसाद हे सगळं असतंच पण त्याचबरोबर त्याच्यावर केले जाणारे योग्य उपचार सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. योग्य उपचार म्हणजे फक्त योग्य ती औषधयोजना नव्हे. औषधं कितीही बरोबर दिली तरी साध्या चुकीमुळे होणा-या जंतुसंसर्गामुळे रूग्ण दगावू शकतो.

अशा चुका टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार गवांदे यांनी ज्या चेकलिस्ट तयार केल्या त्यामुळे रूग्ण दगावण्याचं तसंच संसर्गाचं प्रमाण लक्षणीय कमी झालं. या चेकलिस्ट करताना अतुल गवांदे वैमानिक, बांधकाम तज्ज्ञ, शेफ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना भेटले. आपलं काम जास्तीतजास्त चांगलं होण्यासाठी, अचूक होण्यासाठी ते काय काय करतात हे त्यांनी जाणून घेतलं. वेगवेगळ्या देशातल्या रूग्णालयांमधली स्थिती, तिथली उपचारपद्धती, तिथल्या लोकांची राहाणी, आर्थिक स्थिती या सगळ्या गोष्टींचा विचार करून, अनेक प्रयोग करून, त्यांची अंमलबजावणी करून, त्याचं यश तपासून मग या चेकलिस्ट तयार केल्या.

आज त्यांच्या या चेकलिस्ट जगभरातल्या ब-याचशा रूग्णालयांमध्ये वापरल्या जातात. वर म्हटलं तसं त्यामुळे मृत्युंचं आणि संसर्गांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. शस्त्रक्रिया हे टीमवर्क आहे. मोठ्यामोठ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा शस्त्रक्रिया होतात तेव्हा अनेकदा आपल्या टीममधल्या सभासदांची ओळखही एकमेकांना नसते. चेकलिस्टमध्ये ओळख करून घेण्यापासून सुरूवात करण्यात आली. गवांदे लिहितात – ब-याचदा साह्य करणा-या इतरांना, रूग्णाच्या परिस्थितीच्या गांभीर्याची किंवा त्यांच्यापुढे उभ्या राहू शकणा-या समस्यांची अजिबात कल्पना नसते.

शस्त्रक्रियेनंतर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडणा-या लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या तेव्हा ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी कोणत्या अवयवावर सुरी चालवली जाणार आहे याची माहिती प्रत्येकी आठपैकी एका माणसाला नव्हती. गवांदे यांनी एक अत्यंत रंजक माहिती दिली आहे जी माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. जोडी अडम्स या प्रसिद्ध अमेरिकी शेफच्या रेस्टॉरंटमध्ये बसून त्यांनी तिच्या कामाच्या पद्धतीचं निरीक्षण केलं. ज्या रेस्टॉरंटच्या चेन्स असतात त्या रेस्टॉरंटमध्ये वर्षानुवर्षं ठराविक चवीचं जेवण मिळतं. पण जी अशी अनवट रेस्टॉरंट असतात तिथे रोजच्या रोज अत्यंत निगुतीनं स्वयंपाक केला जातो आणि तो करण्याच्या पद्धती फार काटेकोरपणे पाळल्या जातात.

चिमूटभर मीठ म्हणजे नेमके काय, पास्ता बनवताना लोणी हळूहळू कसं वितळवायचं हे मला तिथे समजलं असं गवांदे लिहितात. त्या रेस्टॉरंटमध्ये पाककृतीपासून ते प्रत्येक ग्राहकाच्या फीडबॅकपर्यंत अनेक चेकलिस्ट तिथे टाचून ठेवलेल्या होत्या आणि त्यानुसार तिथलं काम चाललं होतं. गवांदे लिहितात – अन्नपदार्थ बनवणं ही एक कला होती. ते ठोकळेबाज विज्ञान नव्हतं पण असा जागीसुद्धा चेकलिस्ट अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मला या पुस्तकातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे गवांदे कुतूहलानं सगळ्या गोष्टींकडे बघतात.

त्यांना आपलं क्षेत्र महत्त्वाचं आणि इतर क्षेत्रं बिनमहत्त्वाची असं अजिबात वाटत नाही. ते वैमानिकांबरोबर बोलतात. विमानोड्डाणाच्या चेकलिस्ट तयार करणा-या तज्ज्ञाबरोबर सिम्युलेटरमधून प्रवास करतात, रेस्टॉरंटमध्ये जाऊन संपूर्ण संध्याकाळ बारकाईनं निरीक्षण करतात, बांधकाम तज्ज्ञाबरोबर बांधकामाची प्रक्रिया समजून घेतात आणि हे ते करतात ते जागतिक आरोग्य संघटनेसाठीची चेकलिस्ट बनवण्यासाठी!

या पुस्तकाचा अनुवाद चांगला जमलेला नाहीये तरीही हे पुस्तक वाचावंसं वाटतं याचं कारण गवांदेंची आयुष्याकडे बघण्याची नितळ दृष्टी. मी लगोलग काल त्यांचं Being Mortal हे पुस्तक मागवलं. इंग्रजीत वाचतानाही मला मजा येतेय. अतिशय सोपी भाषा, रसाळ पद्धतीनं केलेलं वर्णन यामुळे हे पुस्तकही लवकरच संपणार असं वाटतंय. या पुस्तकात गवांदे यांनी मृत्युबद्दल लिहिलंय. सुरूवातीच्या काही पानांमध्ये ते लिहितात – आम्हाला आयुष्य वाचवायचं कसं याचं ज्ञान दिलं जातं पण जर ते वाचवणं अशक्य असेल तर त्याकडे कसं बघायचं हे शिकवलं जात नाही. नक्की वाचाच.

**********

लेखिका- सायली राजाध्यक्ष


सोशल मिडीया , सायली राजाध्यक्ष , अतुल गवांदे

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen