भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ५


सवाष्ण

***

इनामदारांचा कारभार अगदी देशस्थी पद्धतीचा होता. एक तर घराणं खूप मोठं, त्यात सगळ्या गोष्टींची प्रचंड हौस, गौरी गणपतीला तमाम इनामदार मंडळी पुण्यात येत असत. सातही दिवस गप्पांचे फड, भरपूर काम, संपूर्ण परिसर दणाणून सोडणार्या आरत्या, जागरणं खाणं हे सगळं वर्षानुवर्षे चालत होतं. हे वर्षही त्याला अपवाद नव्हतंच.

शार्दूलची सगळे चुलत,आत्येभावंडं यावर्षीही आली होती. त्यातली काही पुण्यात राहायची, काही सातारला तर काही कोल्हापूरला राहायची. पुण्यात राहणार्‍या लोकांबद्दल पुण्याबाहेरच्या लोकांना विशिष्ट प्रकारचा हेवा असतो. तसा तो इनामदारांकडे सुद्धा होता. प्रत्यक्ष बोलण्यात जाणवत नसलं तरी वागण्याबोलण्यातून कळायचं. पुणेकरांची चेष्टा करणं हा इनामदारांचा आवडता उद्योग होता.

शार्दूलला त्याचं सगळ्यात जास्त टेन्शन होतं तसाही शार्दूल नाही म्हटलं तरी अस्वस्थ होताच. पहिल्या दिवशीच्या पराक्रमानंतर त्याची झोप उडालीच होती. तरी त्याला मजा वाटत होती. लग्नानंतर आपल्या 'हिट लिस्ट' वर कोण आहे याची यादीही त्याने मनोमन तयार केली होती. ओवी आज फक्त मैत्रीण म्हणून येणार असली तरी चाणाक्ष नातेवाईकांची कमतरता कोणत्याच समारंभात नसते. त्यामुळे ही लपवाछपवी करणं तसं जड होतं. तरी हे सगळं झेलायला तो तयार होता.

गालावर खसाखसा after shave lotion घासत आजच्या दिवसात काय वाढून ठेवलंय याचा तो विचार करत होता. दिवस चढू लागला तशी पाहुण्यांची लगबग वाढली. बाहेर गुरुजींचा तारस्वरात मंत्राचा जयघोष चालू होता. घरातल्या ज्येष्ठ आणि अनुभवी बायका स्वयंपाकघरात आजच्या विशेष जेवणाचं सगळं बघत होत्या. बाहेर पुरुष मंडळी अंघोळी वगैरे करून 'सकाळ' आणि 'म.टा' च्या घड्या एकमेकांना सरकवत होते. बाकी व्हॉट्सअॅप वर मेसेज, घरी फोन करून माहिती देणं, मंदी, मोदी अशा विषयावर चर्चा सुरू होत्या.

शार्दूल चे बाबा पूजेला बसले होते. त्याच्या आईची मनं आणि चालीरीती सांभाळायची लगबग सुरू होती. मात्र शार्दूल यात कुठेच नव्हता. त्याने त्याच्या चार मित्रांना आणि दोन आणखी मैत्रिणींना बोलावलं होतं. म्हणजे संशयाला फारशी जागा उरणार नव्हती. हा एकदम व्यवस्थित तयार झाला. ओवीचं last seen सकाळी सात वाजताचं होतं. त्यामुळे शार्दूलला जरा धस्स झालं. साडेअकरा बाराच्या सुमारास तिची अ‍ॅक्टिव्हा शार्दूलला गल्लीत शिरताना दिसली. अंगभर स्कार्फ आणि हेल्मेट घालून ओवी आली.

तिला गाडी लावायला जागा मिळत नव्हती. हा लगेच हातातले काम टाकून तिची गाडी लावायला गेला. हे दृश्य काही चाणाक्ष पांढर्‍या केसांनी टिपलं आणि पाहून न पाहिल्यासारखं केलं. तिने पटकन स्कार्फ आणि ग्लोव्हज डिक्कीत ठेवले. फिकट गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातलेली ओवी फार गोड दिसत होती. गालावरची केसाची बट बाजूला करत ती आपला एकूणच अवतार ठीक करत होती. शार्दूल ची विकेट गेली होती. शेवटी ओवीने त्याला चिमटा काढला..

"ओ इनामदार, शुद्धीत या.. चला."

"ohh yes."

ओवी आणि शार्दूल ने 'गृहप्रवेश' केला. शार्दूल ने ओवीला आईच्या आणि बहिणींच्या हवाली केलं आणि हा आपल्या कामाला लागला. त्याच्या पोटात प्रचंड खड्डा पडला होता.त्याचे कान आणि डोळे ओवीकडे लागले होते. काही वेळानंतर आरतीसाठी पुकारा झाला. अख्खं इनामदार घराणं आरतीत बुडून गेलं. झांजा, टाळ आणि टाळ्या यांचा नाद सगळीकडे घुमू लागला. बाबा आरतीचं ताट घेऊन होते. त्याची आई बाजूला उभी होती. अतिशय घरंदाज पद्धतीने सगळं सुरू होतं.

एका क्षणी शार्दूलला प्रचंड भरून आलं. काही वर्षांनी आपल्याला सगळं करावं लागेल. काही अंतरावर शक्य तितकी अलिप्त असल्याचं भासणारी ओवी आपल्या बाजूला असेल हे सगळं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आलं आणि नकळत त्याचे डोळे भरून आले. नात्याचं नाव बदललं की सगळं बदलतं असं ओवी का म्हणत होती याचा त्याला उलगडा झाला. 'जय देवी जय देवी जगन माऊली ओवाळिते आरती असू दे कृपा सावली' ही ओळ आली आणि नेमकं त्याच वेळी ओवी शार्दूलच्या हरवलेल्या नजरेकडे पाहत होती.

आरतीच्या स्वरांनी घर काबीज केलं होतं. पहिल्या पंगतीची लगबग सुरू झाली. हास्यविनोद, किस्से, आग्रह,पुरणपोळीवर तुपाच्या धारा, असं सगळं छान जमून आलं होतं. तेवढ्यात शार्दूलने ओवीला एकट्यात गाठलं.

"कसं वाटतंय ओवे? "

"खूप छान वाटतंय. खरं सांगू आतापासूनच सून झाल्यासारखं वाटतंय. दोन तीन दिवस खूप टेन्शन आलं होतं. बाय द वे तू का इतका सेंटी झालेला?"

"वातावरणाचा परिणाम असावा"

"चल जास्त नको बोलायला.."

असं म्हणत दोघंही जेवणाच्या खोलीकडे गेले. तिसर्‍या पंगतीत तरुण मंडळी बसली. शार्दूल आणि ओवी आजुबाजुला बसतील अशी व्यवस्था त्याच्या आईने केली होती. शार्दूलचे मित्रमैत्रिणी हॉस्टेल वर राहत असल्याने त्यांना विशेष आग्रह झाला. 'प्रभात रोड वाल्यांना' तो मान मिळाला नाही. म्हणून की काय शार्दूल ने ओवीच्या ताटात एक रव्याचा लाडू सरकवला. त्यावर ओवीचा लटका राग क्षमा काकूंच्या नजरेने टिपला. इनामदार घराण्यातले भावी सवाष्ण आणि ब्राम्हण लाडवासारखेच एकरूप झाले होते...!

(क्रमशः)

**********

लेखक - रोहन नामजोशी  


समाजकारण , कथा , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

 1. Hemant Marathe

    2 वर्षांपूर्वी

  पहिल्याच भागात कथा उलगडली गेली, आता पुढे काही सस्पेन्स आहे का कळेलच

 2. mahesh phadke

    4 वर्षांपूर्वी

  suruvat tar chan zaliy....

 3. Rdesai

    4 वर्षांपूर्वी

  मस्त -----वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen