शिशुसाहित्य आणि शिक्षण


साहित्य या शब्दाचा अर्थ मी माझ्या सोयीने दोन प्रकारे घेतला आहे. एक छापिल साहित्य. आणि दोन, मुलाच्या भवतालात, परीसरात सहजी उपलब्ध असणारं साहित्य. कारण या दोन्ही साहित्यांचा मुलांच्या शिकण्याशी जवळून संबंध आहे. 

मुलांसाठी छापिल साहित्याचा विचार करताना प्रथम त्यांच्या वयोगटाचा विचार करावा लागतो. शिशू गट म्हणजे 0 ते 5 असं समजूया. इथेही सुमारे साडेतीन ते चार वर्षापासून मुलांना थोडीफार अक्षरं ओळखू येऊ लागतात. वारंवार येणारे शब्द ते सवयीने ओळखून (साइट रिडींग) वाचू शकतात. त्यामुळे या शिशू गटात आणखी एक उपगट तयार होतो तो म्हणजे साडेतीन ते पाच वर्षाचा वयोगट.

शिशू गटातील पहिल्या गटासाठी म्हणजे शून्य ते साडेतीन वर्षांच्या मुलांसाठी दोन प्रकारची पुस्तके अभिप्रेत आहेत. एक wordless Books. आणि दुसरी प्रत्येक पानावर सुमारे 95% चित्र आणि केवळ 5% मजकूर असणारी पुस्तकं. प्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, wordless Book म्हणजे ‘चित्रवाचनाची पुस्तके’ नव्हे. चित्रवाचनाची पुस्तके आणि wordless Books या दोहोंत जरी संपूर्ण चित्रेच असली तरी या दोघांत जमिन अस्मानाचा फरक आहे. तो आधी समजून घेऊया.

चित्रवाचन पुस्तकात केवळ चित्रच आहेत. आणि ती चित्र ही मुलांना परिचीत असणारी. त्यांच्या भवतालाशी निगडित. प्रत्येक चित्रात भरपूर क्रिया, action packed pictures. ज्यामुळे ही चित्रं दाखवून मुलांना खूपशा माहितीच्या असणार्याa गोष्टी दाखवता येतात. ही चित्रं दाखवून, कोण काय करतं आहे? कुठे काय होत आहे? असे प्रश्न पालक किंवा शिक्षक विचारतात किंवा त्यांनी तसे विचारावेत अशी अपेक्षा असते. काही चित्रवाचनाच्या पुस्तकांसोबतच मुलांना कुठले प्रश्न विचारावेत याची एक सूची ही मिळते. पण wordless Book मात्र वेगळीच आहेत. म्हणजे त्यात ‘चित्रवाचन’ तर आहेच पण तरीही ती त्या ही पलीकडे जाणारी आहेत. कारण या पुस्तकात मूलकेंद्री अत्यंत उत्कंठाचर्धक, रंजक आणि सनसनाटी गोष्ट आहे.

प्रत्येक पान उलटताना, ‘आता काय होणार?’ याचा थरार तर मुलं अनुभवतात पण त्याचवेळी ‘ओह! माय गॉड! सॉलीड आयडिया’ असं ही चित्कारतात. ‘Aaron Becker याचं Journey हे पुस्तक असं आहे. जगातल्या प्रत्येक मुलाला आपलं बालपण या पुस्तकात मिळतं.. आणि ते ही शब्दांशिवाय. ही wordless Book ची ताकद आहे. या पुस्तकाचं आणखी एक वैशीष्ट्य म्हणजे, अद्भूत साहसकथा, विलक्षण चित्र, फॅंटसीच्या जवळ जाणारी तरीही वास्तवाचं भान असणारी चित्रशैली आणि मांडणी यांचा सुंदर मिलाफ. जर्नीच्या मुखपृष्ठावर New York Times चा अभिप्राय आहे ''a masterwork'' आणि मलपृष्ठावरचे दोन अभिप्राय ही तितकेच महत्वाचे आहेत. एक आहे, ''Captivating... for a wide range of ages. By the turn of a last page, children will immediately begin imagining the next adventure.'' आणि दुसरा, ''An absolute must for all children.''

या wordless Books चा मुख्य फायदा म्हणजे पुस्तक उघडताच मुलांची कल्पनाशक्ती चहुबाजूंनी सुसाट हुंदडू लागते आणि हेच नकळत होणारं शिक्षण आहे. मुलांने जे पाहिलंच नाही आणि ज्याची कल्पना ही केली नव्हती असं विश्व मुलासमोर हळूवारपणे उलगडत नेणं आणि पाहता-पाहता ते विश्व मुलाला आपलंच वाटणं, त्यात त्याने सहजी रमून जाणं किंबहुना त्या विश्वातीलच एक भाग होणं हे या पुस्तकाचं शक्तीस्थान आहे. आपल्या इथे नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेली काही wordless Books आहेत. पण ही पुस्तके सण, उत्सव, बागा, जत्रा, रस्ते, नदी, समुद्र, फुगे यातच अडकून पडली आहेत. हे दुय्यम दर्जाचे आहे, असं नव्हे. याची गरज आहेच. फक्त फरक इतकाच आहे की, यातली काही पुस्तके ही ‘चित्रांचे अल्बम’ आहेत तर काही पुस्तकात एकामागोमाग येणारे प्रसंग आहेत. पण केवळ ‘प्रसंग मालिका’ म्हणजे गोष्ट नव्हे. ही पुस्तके मुलांना बहुविध पध्दतीने विचार करण्यासाठी उद्युक्त करत नाहीत किंवा मुलांनी कल्पनेत ही न पाहिलेलं अचाट विश्व मुलांसमोर खुलं करत नाहीत. मुलांन गुंगवून आणि गुंतवून टाकत नाहीत.

खरंतर ही पुस्तके चित्रवाचनाच्या पलीकडे जातच नाहीत. पण म्हणून ‘चित्रवाचनाच्या पुस्तकांवर’ मी टिका करतो आहे असा कृपया गैरसमज करुन घेऊ नका. त्यांची गरज आहेच. मी फक्त आपल्या येथील wordless Books आणि परदेशातील wordless Books यातील फरक नोंदवत आहे. दुसरा प्रकार म्हणजे प्रत्येक पानावर सुमारे 95% चित्र आणि केवळ 5% मजकूर असणारी पुस्तकं. अशी पुस्तकं मराठीत तर फारच कमी आहेत. जी काही आहेत त्यात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे यात गोष्ट असली तरी मज्जा नाही. विलक्षण कल्पनांचा पट यातून उलगडत नाही. यातील Fun element हरवलं आहे. मुलांना सतत उपदेश करण्याचा वसा घेतलेल्या लेखकांमुळे हा गोंधळ झालेला आहे. या वयोगटातील मुलांच्या मनात काही अजब प्रश्न असतात, असे प्रश्न जे ते मोठ्या माणसांना विचारायला घाबरतात.

उदा. सगळ्या झाडांची पानं वेगवेगळी का असतात? समुद्राचं पाणी खारट का असतं? मांजरं गाणी म्हणतात का? मगरी कशा हसतात? अश प्रश्नांची टिंगल न करता, त्यांना मुलांच्याच गमतीशीर भाषेत मजेशीर उत्तरे देणार्याश गोष्टींची पुस्तके फारच कमी आहेत.  या वयोगटातील मुलांना वाहने आणि महाकाय वाहन प्रकार यात प्रचंड रस आहे. खेळण्यांच्या दुकानात गेलं तर हे सहजी लक्षात येईल. उदा. टॅंकर, कंटेनर, ट्रक, जेसीबी, सिमेंट मशीन्स, रोड रोलर आणि इंजीन्स याचे फारच आकर्षण मुलांना आहे. आणि मग थोडं वय वाढल्यावर गाड्या, गाड्यांचे प्रकार आणि फास्ट जाणार्याआ गाड्या. मुख्य म्हणजे, टॅंकर, ट्रॅक्टर, जेसीबी हीच मुख्य पात्र असणारी आणि त्यांच्या अनुषंगाने उलगडत जाणार्याट फॅंटसी कथांची पुस्तके मराठीत बहुधा नसावित असं मला वाटतं. (अशा गोष्टी सध्या मी लिहितो आहे)

इथं शिकणं दोन पातळ्यांवर होत असतं. चित्रातून परिचीत गोष्टींचा आढावा घेत आणि अपरिचीत विलक्षण गोष्टी समजून घेत.  याचवेळी मुलाला गोष्ट वाचून दाखवणारा आणि गोष्ट सांगणारा याची महत्वाची भूमिका सुरू होते. महत्वाची कारण, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही एकमेकांकडून शिकत असतात. बोलून, प्रश्न विचारून, समजून घेऊन, तर्क करून, वाढणार्याू शब्दसंपत्तीचा उपयोग करत, नव्यानेच समजलेल्या संकल्पनांना, जाणीवांना आपलेच वेगळे शब्द जोडत शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरू होते. पुस्तक हातात घेऊन मुलांना गोष्ट सांगत असताना, वाचून दाखवत असताना मुले चित्र पाहात तर असतातच पण अचानक त्यांच्या सभोवतालचा परीसर, आजूबाजूच्या वस्तू केवळ चित्ररुप नाही तर सजीव होऊ लागतात. यात ही दोन पातळ्या आहेत. एक, वस्तूंमधील आपापसातलं बोलणं त्यांना ऐकू येऊ लागतं, किंवा त्यांचा आणि वस्तूंचा संवाद सुरू होतो.

उदा. ‘तो पडदा बघ खूर्चीला ढकलतोय. ती ऊशी बघ माझ्याकडे कशी वेड्यासारखी बघतेय. टॅंकर म्हणाला आज मी ट्रॅफीक जॅम करणार. कुणालाच पुढे सोडणार नाही.’ हाच क्षण महत्वाचा असतो. यावेळी मुलाचा आत्मसन्मान न दुखावता त्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल असे पुरक वातावरण तयार करावे लागते. मुलांच्या भन्नाट फॅंटसीला वाव मिळेल असे प्रश्न त्यांना विचारावे लागतात.  पण याठिकाणी दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण तर कदापी द्यायची नाहीतच पण जर का त्याचे उत्तर मुलाला देता आले नाही तर प्रश्नाचा रोख बदलावा. सर्वात महत्वाचे म्हणजे, मुलाला उत्तर देण्याची घाई तर करायची नाहिच पण तो जे काही उत्तर देईल किंवा न देईल त्याचे हसून स्वागतच करायचे आहे.

उदा. “पडदा आणि खूर्ची एकमेकांचे मित्र असतील का रे? ऊशी प्रमाणे तुझ्याकडे आणखी कोण-कोण बघतं?”  या प्रश्नांनंतर त्याला पुरक अशी एक स्वत:चीच गंमत मुलाला सांगता येईल. उदा. जर का आपण त्याला सांगितलं की, “मी तुला माझी एक गंमत सांगतो हं. काल मी अजिबात लोळलो नाही कारण ऊशी ने माझं डोकं रात्रभर सावरून धरलं होतं.” या वाक्यामुळे तुमच्या बद्दल मुलांच्या मनात विश्वास निर्माण होतो. मुले भावनिक दृष्ट्या जोडली जातात आणि शिशुसाहित्यातून शिकण्याची पहिली किल्ली इथे फिरते ज्यातून अनेक कुलुपे उघडतात. वयवर्ष साडेतीन ते पाच या वयोगटातिल मुलांसाठी लेखन हे एक मोठे आव्हानंच असतं कारण ज्या वयोगटतल्या मुलांसाठी लिहायचं आहे, त्या मुलाला वाचताना ‘हे आपलंच आहे’ असं वाटलं पाहिजे. आणि त्यासाठी लेखकाने आपलं मोठेपण आणि आपला अहंकार झुगारून देऊन मूल होऊनच लिहिलं पाहिजे.

कारण मुलांच्या भावविश्वात मुलांचं बोट धरल्याशिवाय प्रवेशच मिळत नाही. आणि तुमच्यात दडलेल्या मुलाची ओळख पटल्याशिवाय मुले तुमचं बोट धरत नाहीत. लेखनशैली आणि लेखन प्रकार याकडे मी आता वळत नाही. शिशुगटातल्या मुलांना दिल्या जाणार्या  आणखी एका पुस्तकाकडे मला लक्ष वेधायचं आहे. “चित्र रंगवा” नावाची पुस्तके गुरांसमोर चारा टाकतात तशी मुलांसमोर टाकली जातात. या पुस्तकांबाबत पालकांच्या आणि शिक्षकांच्या भयावह कल्पना आहेत ज्यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेचा, कल्पनाशक्तीचा अक्षरश: चुथडा होऊन जातो.

या पुस्तकात दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात जाड काळ्या आऊटलाइन मधे चित्र दिलेले असते. जे मुलांनी रंगविणे अपेक्षित आहे. आणि दुसर्यात प्रकारात अशाच चित्रात छोटे छोटे विभाग केलेले असतात. त्या विभागांत R, BL, G, Y, BK असे लिहिलेले असते. पानाच्या तळाशी ''R = Red, BL = Blue, G = Green, Y = Yellow and BK = Black'' असे लिहिलेले असते. म्हणजे मुलांने आपलं डोकं न वापरता तिथे जे रंग सांगितले आहेत तेच रंग तिथे दिले पाहिजेत. इथे अनेक प्रकारे मुलाच्या सर्जनशीलतेचे खच्चीकरण होण्याचा धोका असतो.

उदा.  • छापिल चित्राच्या आउट लाइनच्या बाहेर जर रंग गेला तर मुलाला बोलणी खावी लागतात. मुलाने या वयात पेन्सिल, खडू हातात नीट धरून लिहिणे, रंगविणे अपेक्षितच नाही. किंबहुना त्याची ती क्षमता विकसितच झालेली नाही. अशावेळी त्याच्यावर सक्ती करणं हे अन्यायकारकच आहे. या वयात मुलांकडून मुक्त चित्रकला अपेक्षित आहे. • कुठला रंग कुठे द्यावा? हे स्वातंत्र्य मुलांना असायला हवं. खरं म्हणजे या वयातल्या मुलांनी आपल्याला समजेल असं चित्रं काढलं पाहिजे, असा अट्टाहास करू नये तर मुलांने काढलेलं चित्र मुलांकडूनच समजून घेण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, मुलांना चित्र न काढण्याचं आणि चित्र न रंगवण्याचं पण स्वातंत्र्य असायला हवं.

पालकांनी पैसे खर्च करून पुस्तके आणली आहेत म्हणून, पालकांना आता वेळ आहे म्हणून किंवा आता चित्रकलेचा तास आहे म्हणून मोठ्यांच्या इच्छेखातर मुलांनी काम करणं अपेक्षित नाही.   मुलांच्या चित्रकले बाबत एक गोष्ट सांगण्याचा मला मोह होत आहे. ही तशी खूप जुनी गोष्ट असली तरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आमच्या गावात एका रविवरी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होती. शेकडो मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेच्या परीक्षकांपैकी एक जण न आल्याने अचानक तिथे माझी नेमणूक झाली. शाळेच्या वर्गात, व्हरांड्यात, मैदानात बसून चित्रं काढण्यात मुले रंगून गेली होती. मुलांची चित्रं पाहात मी मुलांमधून फिरू लागलो. त्याच वेळी मला भेटली इयत्ता पहिलीतली प्रिया.

प्रियाचं चित्र पाहून तिला मदत करण्याची व सल्ला देण्याची अनिवार उबळ मला आली. तिने चित्रात संपूर्ण पानभर पसरलेलं हिरवं झाड काढलं होतं. त्या झाडाखाली काही मुले खेळत होती, काही खात होती तर काही लोळत वाचत होती. पण त्या सर्व मुलांचे कपडे, त्यांची खेळणी व त्यांची पुस्तकं पण प्रियाने हिरव्या रंगात रंगवली होती. आणि तिचं हे हिरवा रंग देण्याचं काम सुरूच होतं. मी प्रियाच्या बाजूला मांडी घालून बसलो. आणि माझ्या आवाजाला उसन्या प्रेमाची झालर लावत तिला म्हणालो,“अगं तुला आणखी खडू हवेत का? वेगवेळ्या रंगात रंगव की, या मुलांचे कपडे, त्यांची खेळणी आणि पुस्तकं. बघ ना आजूबाजूला.. मुलांनी किती सुंदर रंगीबेरंगी कपडे घातले आहेत ना? का..य? हा घे रंगीत खडूंचा नवीन बॉक्स.”

माझ्या या चमकदार बोलण्याने आणि मी देत असलेल्या नवीन बॉक्सने ती भारावून जाईल असं मला वाटलं होतं. पण मी ज्या हातात बॉक्स धरला होता तो बाजूला सारत ती वज्रासनात बसल्यासारखी बसली. तिने दोन हातात चित्रं घेऊन ते मला दाखवलं. एकदा त्या अपूर्ण चित्राकडे व एकदा माझ्याकडे पाहात ती हळूच हसली व म्हणाली,“काका, तुम्हाला या चित्रातली सावली दिसली नाही ना?”  मी मनापासून माझी हार कबूल करत मान डोलावली. मला समजावत प्रिया म्हणाली,“काका, या मुलांच्या कपड्यावर, त्यांच्या खेळण्यांवर आणि सर्वांवरच या हिरव्या झाडाची सावली पडली आहे.. हिरवीगार सावली! पाहा नं नीट..?” तिच्या नजरेतून त्या चित्राकडे पाहताना मी अवाक झालो. ‘मोठ्यांच्या विश्वात झाडांच्या सावल्या काळ्या पडतात, म्हणून मोठ्या माणसांना झाडाच्या सावलीत गेलं की थंडगार वाटतं. पण मुलांच्या विश्वात झाडांच्या सावल्या हिरव्या पडतात. त्यामुळे झाडाखाली गेल्यावर हिरवंगार तर वाटतंच पण त्यांचं अवघं विश्वही हिरवंगार होतं!!’

मुलांच्या अभीव्यक्तीकडे पाहण्याची एक नवी दृष्टीच मला प्रियाने दिली होती. “मुलांची अभिव्यक्ती ही आपल्याला समजेल अशीच असली पाहिजे असं नाही तर ती आपण मुलांकडून समजून घेतली पाहिजे.” “तुम्ही तुमचं मोठेपण आणि पूर्वग्रह बाजूला भिरकावून दिले आहेत, याची जेव्हा खात्री मुलांन पटते तेव्हाच ती तुमच्याशी दोस्ती करतात आणि त्यांच्या कृतीमागील कार्यकारणभाव तुम्हाला समजावा यासाठी त्यांच्या भावविश्वात तुम्हाला सामावून घेतात.”   विनोबांनी शिक्षणाची चांगली व्याख्या केली आहे, ‘जे देता येत नाही ते शिक्षण.’ ज्या पालकांना किंवा शिक्षकांना असं वाटतं की, आपण मुलांना शिकवतो, मुलांना घडवतो किंवा आपण मुलांवर सुसंस्कार करतो तर तो त्यांचा भ्रम आहे. आपण कुणालाही शिकवू शकत नाही तर शिकण्यासाठी प्रेरित करू शकतो हे एकदा समजून घेतलंच पाहिजे.

बालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन काय? मुलांना शिकवणं, उपदेश करणं, तात्पर्य सांगणं, संस्कार करणं किंवा त्यांना घडवणं हे तर नव्हे आणि नव्हेच.  बालसाहित्याचं प्रयोजन आहे, मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही तर शिकण्याच्या अनेकानेक पध्दती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवतं आणि मुलाला त्याच्यातील सूप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा ‘मुलांना गृहित धरणे’ हा नसून ‘मुलांवरचा अपार विश्वास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम’ हा आहे.

********

- राजीव तांबे [email protected] www.rajivtambe.com


शिक्षण

प्रतिक्रिया

 1. Prakash Hirlekar

    2 महिन्यांपूर्वी

  मुले जशी आहेत तशी स्वीकारा हे पटवणारा छान लेख.

 2. Ashwini Gore

    2 महिन्यांपूर्वी

  खूप छान माहिती !!

 3. Jagadish Palnitkar

    2 महिन्यांपूर्वी

  अप्रतिम !! कुठलीही बोजड मानसशास्त्रीय किंवा शिक्षण-शास्त्रीय भाषा न वापरता नेमके मुद्दे मांडले आहेत... तांबे सरांनी मुलांसाठी लिहिलेल्या सुंदर पुस्तकांमध्येही हाच "सतत संस्कार वगैरे करण्याचा आव न आणता, मुलांची कुतूहलक्षमता जागती ठेवणे" दृष्टिकोन दिसतो...वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen