वेडा...


मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासून घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकऱ्यांची झुंबड .... सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे. बराच वेळ मी तिरक्या नजरेने पाहत होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासून पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवून ठेवली होती. थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते. अरे ! माझा अंदाज चुकला तर... उत्सुकता वाढली म्हणून त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, "डॉक्टर, नका जाऊ, वेडा आहे तो!" उत्सुकता स्वस्थ बसू देइना म्हणून गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील... पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तिथंही अंदाज चुकला माझा... मीच म्हणालो, बाबा काही त्रास? कुबडी घेत हळूच उठत ते म्हणाले, "Good afternoon doctor. I think I may have some eye problem in my right eye.." मी उडालोच इतकं अस्खलीत इंग्लिश ऐकून. मी धक्क्यातून बाहेर येत, डोळा बघितला, पिकलेला मोतीबिंदू होता, मी म्हणालो मोतीबिंदू आहे बाबा, ऑपरेशन करावं लागेल.... तसे म्हणाले, "oh, cataract ? I had cataract operation in 1999 for my left eye in Ruby Hospital but..." हा प्रकार काहीतरी वेगळा आहे हे आता पक्कं जाणवलं, म्हणालो, "बाबा, तुम्ही इथं काय करताय?" "मी रोजच इथं येतो दोन तास..." "हो पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता ?" "शिकलेले?" या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, "शिकलेले???" म्हणालो, बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी ? "Oh no doc... Why would I ?... Sorry if I hurt you !" "हर्ट नाही पण मला काही कळत नाहिये, काय चाललंय बाबा ..." "कळून घेऊन काय करणार आहात डॉक्टर ?" "ओके, चला आपण तिकडे बसू, नाहीतर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील....", असं म्हणून ते हसायला लागले... आम्ही दोघंही थोडं बाजूला जाऊन एका टपरीत बसलो... "Well Doctor, I am Mechanical Engineer..." बाबांनी इंग्लिशमध्येच सुरुवात केली. "मी xxxxx या कंपनीत सिनीअर मशीन ऑपरेटर होतो, एका नवीन ऑपरेटरला शिकवत असतांना पाय मशीनमध्ये अडकला, आणि हातात कुबडी आली. कंपनीने सर्व खर्च करुन वर आणखी थोडे पैसे देऊन घरी बसवलं... लंगड्या बैलाला कोण ठेवेल?" "मग स्वतःचं छोटं वर्कशॉप काढलं, मस्त घर घेतलं, मुलगाही मेकॅनिकल इंजिनियर आहे, वर्कशॉप वाढवून त्याने छोटी कंपनी टाकली....." "मी चक्रावलो, बाबा पण मग तुम्ही इथं कसे?" "मी...? नशीबाचे भोग..." "मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणून कंपनी आणि घर दोन्ही विकलं... म्हटलं पोराची भरभराट होत्येय.. विकूदे !" "विकून सगळं घेऊन तो गेला जपानला.... आणि आम्ही इथे उरलो जपानी बाहुल्या म्हणून...", ते हसायला लागले.... हसणंही इतकं करुण असू शकतं, हे मी अनुभवलं ! "बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे, लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही..." तुटलेल्या उजव्या पायाकडे पाहत बाबा म्हणाले, "लाथ ...? कुठे आणि कशी मारू सांगा...?" मी ओशाळलो, मलाच वाईट वाटलं... "आय मीन बाबा कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजुनही , कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव खूप आहे..." "Yes doctor, मी एका वर्कशॉपमध्ये आहेच कामाला... 7000 मिळतात मला...." माझ्या डोक्यातला तिढा काही सुटत नव्हता.... "अहो बाबा तरी मग तुम्ही इथं कसे?" "डॉक्टर, मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचं शेड घेतलंय भाड्यानं, तिथं मी आणि माझी बायको राहतो, तिला Paralysis आहे ती जागेवरुन उठू शकत नाही. मी 10 ते 5 ड्युटी करतो, 5-7 इथं बसतो, आणि घरी जाऊन 'तिघांचा' स्वयंपाक करतो..." "बाबा आत्ताच म्हणालात , घरी तुम्ही आणि बायको असता मग तिघांचा स्वयंपाक?" "डॉक्टर, माझ्या लहानपणी माझी आई वारली, माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं, दोन वर्षापूर्वी तो मित्र वारला हार्ट अटॅकने, 92 वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्याच पत्र्यात... ती कुठं जाईल आता?" मी सुन्न झालो! या बाबाचे स्वतःचे सर्व हाल, बायको अपंग, स्वतःला पाय नाही, घर धड नाही, जे होतं ते मुलानं विकलं त्यात मित्राच्या म्हाताऱ्या आईला सांभाळतोय..... "बाबा मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं, तुम्हाला राग नाही येत त्याचा?" "No no डॉक्टर, अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं, घेतलं त्याने, काय चुकलं त्यात?" "बाबा घेण्याची पद्धत चुकली त्याची , त्यानं ओरबाडून घेतलं सर्व...." "डॉक्टर, अहो आपले पूर्वज माकड होते, शेपूट गेलं तरी ओरबाडायची सवय जाईल का माणसाची?", असं म्हणून हसता हसता तोंड फिरवलं .... ते हसणं होतं की लपवलेले हुंदके ??? "बाबा, कळलं मला 7000 मध्ये भागत नाही तिघांचं म्हणून तुम्ही इथं येता, बरोबर?" "No you are wrong doctor. 7000 मध्ये मी सर्व मॅनेज करतोच सगळं, पण जी म्हातारी आई आहे मित्राची तीला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालू आहेत, ती मात्र मॅनेज होत नाहीत या सात हजारात...." "मी येतो दोन तास इथे, कुणी दिलेलं अन्न मी स्विकारत नाही, पैसे कुणी दिले तर मात्र घेतो.... तिची महिन्याची औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून आधीच घेतो आणि रोज दोन तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडीकलवाल्याला रोजच्या रोज देतो...." या बाबाला त्याचा स्वतःचा मुलगा सोडून गेलाय आणि हा बसलाय दुसऱ्याची आई सांभाळत.... डोळ्यातून पाणी येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळे शेवटी मला दगा देतातच .... "बाबा, दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता ?" "दुसऱ्याची ? अहो माझ्या लहानपणी खूप केलंय तिनं माझं... आता माझी पाळी आहे इतकंच!" "मी त्या दोघींना सांगितलंय 5-7 आणखी एक काम मिळालंय म्हणून...." "बाबा, आणि त्यांना जर कळलं तुम्ही इथे मागता म्हणून तर?" "अहो कसं कळेल ? दोघीपण खाटेवर पडून... इकडच्या कुशीवरुन तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय... येतीलच कश्या त्या ? हा...हा...द्या टाळी!" हुंदका लपवण्याची आता माझी पाळी होती पण बाबांइतका मी सराईत नव्हतो या लपवालपवीत... बऱ्याच वेळानं लक्षात आलं टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता, तोच हात दोन्ही हातात घेऊन मी त्यांना विचारलं, "बाबा तुमच्या आईला मी डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायमस्वरुपी दिल्या माझ्याकडून तर तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही right ?" "no doctor, तुम्ही भिकाऱ्यांसाठी काम करता, तिला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना ? मी आहे अजून समर्थ, तिचा मुलगा म्हणून... मला कुणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तिला नाही..." "OK Doctor, जाऊ मी आता ? घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे अजून ..." "बाबा भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून नाही, तुमचा मुलगा समजून घ्या ना आज्जीसाठी औषधं ..." हात सोडवत ते म्हणाले, "डॉक्टर, आता या नात्यात मला अडकवू नका please, एक गेलाय सोडून..." "आज मला आशेला लावून उद्या तुम्ही गेलात तर? सहन करायची ताकत नाही राहिली आता..." असं म्हणत ते कुबड्यांवर निघाले सुद्धा... जाताना हळूच डोक्यावर हात ठेवला, म्हणाले, "काळजी घे बेटा स्वतःची..." शब्दातून त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या गरम स्पर्शातून जाणवलं, त्यांनी हे नातं मनोमन स्विकारलंय... या वेड्या माणसाला पाठीमागुनच नमस्कार करण्यासाठी माझे हात आपोआपच जुळले ..... लेखक - डॉ. अभिजीत सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स  9822267357 ********** Google Key Words - katha, Marathi Katha, Dr. Abhijeet Sonawane, Doctor for Braggers. अतिरिक्त दुवा - डॉ. अभिजित सोनावणे यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील लेख अवश्य वाचा.

  • भिक्षेकरीमुक्त समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे -   स्रोत सौजन्य - दै. लोकसत्ता

  • कथा , अनुभव कथन , मुक्तस्त्रोत

    प्रतिक्रिया    वाचण्यासारखे अजून काही ...

    Install on your iPad : tap and then add to homescreen