आकांक्षा पुढती गगन ठेंगणे


२०१० मध्ये मी, माझी पत्नी सोहिनी व मुलगा अपार सातारा येथे एका कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो. एक दिवस थोडा मोकळा होता व अपारची महाबळेश्वर बघण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आम्ही सकाळीच साताऱ्याहून निघालो. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करण्याच्या रस्त्यावरच भावेश भाटिया यांचे मेणबत्ती बनविण्याचे वर्कशॉप आहे; तिथे १०-१५ मिनिटांसाठी जाऊ व नंतर पॉईंट्स बघायला जाऊ म्हणून गेलो. भावेश या अतिशय गोड व्यक्तिमत्वाच्या अंध व्यक्तीला भेटलो. ते २५० प्रकारच्या सुगंधी व डेकोरेटिव्ह मेणबत्त्या तयार करायचेत, ते सर्व त्यांनी आम्हाला अतिशय जिव्हाळ्याने दाखविले. त्यांच्या सोबत बोलत बसलो असता दोन तास कसे गेलेत ते कळलेच नाही. तेथून निघताना माझा मुलगा अपार म्हणाला कि, बाबा आता महाबळेश्वरचे इतर पॉईंट्स नाही बघितले तरी चालेल. भावेशकडे आलो यातच सगळे महाबळेश्वर पाहण्याचा आनंद व समाधान मिळाले. जो अपार अतिशय आतुरतेने महाबळेश्वर पाहण्यासाठी म्हणून उत्सुक होता त्याचे हे उद्गार होते! आणि खरोखरच आता महाबळेश्वराच्या पॉइंट्समध्ये भावेश भाटिया यांच्या सनराईज कॅण्डल व वॅक्स संग्रहालय हा नवीन पॉईंट जोडला गेलाय. भावेश मूळचा कच्छमधील. वडील उपजीविकेसाठी महाराष्ट्रात गोंदियाला आलेले. शाळेत असतानापासूनच असलेल्या रेटिनाच्या आजारामुळे भावेशची दृष्टी कमीकमी होत चाललेली. शाळेतील इतर मुले त्याला आंधळा म्हणून चिडवायची. १५-१६ व्या वर्षी तर पूर्णतः अंधत्व आलेले. मात्र त्याची आई त्याला म्हणायची, "तुला जग पाहता येत नसले म्हणून काय झाले, असे काहीतरी कर की संपूर्ण जग तुझ्याकडे पाहायला लागेल" आईचे हे उद्गार त्याच्यासाठी कायम प्रेरणा देत राहिले. त्यामुळेच कदाचित भावेश पुढील आयुष्यात जगासाठी एक रोल मॉडेल बनला. दुर्दैवाने त्याची आई पण याच दरम्यान कॅन्सरने गेली. तिच्या उपचारात बराच खर्च झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती पण ढासळली होती. ते गोंदिया सोडून महाबळेश्वरला आले. तेथे उपजीविकेसाठी मिळेल ते काम केले. भावेश लहानपणापासून कल्पक व सृजनशील होता. तो खेळणी, पतंग, इ. बनवायचा. तो 1999 मध्ये मुंबईच्या नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेमध्ये मेणबत्त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून गेला. पण त्याला ते जमणार नाही म्हणून मेणबत्तीऐवजी मसाजच्या प्रशिक्षणाला प्रवेश देण्यात आला. मसाजचे प्रशिक्षण घेत असताना मेणबत्ती शिकवणाऱ्या शिक्षकांना मोफत मसाज करुन त्यांच्याकडुन त्याने मेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसात केले. ते पूर्ण करून महाबळेश्वरला परत आल्यावर तो मसाजचे काम करू लागला. पण मेणबत्ती बनविण्याचे त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याने घरच्या घरी मेणबत्त्या बनवून पाहणे सुरू केले व बाजारात ५० रु. रोजाप्रमाणे भाड्याने घेतलेल्या ठेल्यावर त्या तो विकू लागला. एक दिवस भावेश बाजारात आपल्या ठेल्यावर अशाच मेणबत्ती विकत होता. महाबळेश्वरला हवापालट करण्यासाठी म्हणून काही दिवस राहायला आलेली नीता नामक युवती त्याच्याजवळ आली. भावेशचा प्रामाणिकपणा, जिद्द पाहून ती प्रभावित झाली व रोज त्याला मदत करायला येऊ लागली. हळूहळू दोघांची मैत्री झाली व ते प्रेमात कधी पडले हे कळलेच नाही. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मेणबत्त्या बनविणाऱ्या एका अंधांसोबत सर्व काही व्यवस्थित असलेली नीता लग्न करते म्हटल्यावर तिला कुटुंबियांच्या विरोध होणे स्वाभाविकच होते, पण नीता आपल्या निर्णयावर ठाम होती. लग्न करून त्यांनी महाबळेश्वरलाच एका छोट्याशा घरात संसार थाटला. अन्न शिजायचे त्याच भांड्यात मेणबत्त्या बनविण्यासाठी मेण वितळवले जायचे. कारण त्यासाठी नवीन भांडी खरेदी करण्याची पण त्यांची परिस्थिती नव्हती. हळू हळू दोघांनी कष्टातून एक दुचाकी वाहन खरेदी केले. लग्नापूर्वी सायकलसुद्धा चालविता न येणारी नीता आता दुचाकी व पुढे चारचाकी वाहन चालवायला शिकली. भावेशने सुरुवातीला अनेक मेणबत्ती निर्माते आणि संस्थांकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. बॅंकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला परंतु त्यांनीही नाकारले. भावेश नीतासोबत मॉलमध्ये जाऊन तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या मेणबत्त्यांना स्पर्श करून त्यांचा आकार आणि बनावट समजून घ्यायला लागला. अशाप्रकारे मेणबत्ती बनविण्याचे कौशल्य त्याने विकसित करीत नेले. पुढे एका बॅंकेने त्याला 15 हजार रुपये कर्ज दिले. त्यातून त्यांनी कच्चा माल व साचे खरेदी केले व 'सनराइज कॅंडल' हि कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. ५ किलो मेणापासून सुरुवात केलेल्या भावेशला आता  मेणबत्त्या बनविण्यासाठी दररोज २५० क्विंटल मेण  लागते. मेणबत्ती बनविण्यामध्ये स्वतःची कल्पकता व सृजनशीलता वापरून विविध प्रकारचं आकर्षक सुगंधी व शोभनीय मेणबत्त्या ते बनवू लागले. हळूहळू ग्राहक त्यांच्या मेणबत्या आवर्जून खरेदी करू लागले. ठेल्यावर होणारी विक्री पुढे दुचाकी व नंतर व्हॅनमधून होणे सुरू झाले. आज जवळपास विभिन्न  १०,०००  प्रकारच्या मेणबत्त्या भावेशची कंपनी तयार करते. त्याच्या कंपनीत काम करणारे बहुतेक सर्व कर्मचारी अंध आहेत. आतापर्यंत देशभरातील २३०० अंधांना भावेशच्या कंपनीच्यामार्फत प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. एकूण ९० अंधांसाठी निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था भावेशच्या कंपनीमार्फत महाबळेश्वर येथे सध्या उभी करण्यात आलेली आहे. त्यांना राहणे-खाणे व स्टायपेंड पण प्रशिक्षण कालावधीमध्ये दिले जाते. आपापल्या गावी परत गेल्यावर मेणबत्त्या बनविण्यासाठी आवश्यक ती मदत/मार्गदर्शन सुद्धा पुरवले जाते. 'अंध व्यक्तिना डोळे नसले तरी अंत:चक्षूंनी ते जग पाहू शकतात.' हे भावेशने सिद्ध करून दाखवले आहे. या व्यवसायाने भावेशचे नाव देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर पोहोचले आहे. भावेशने मोठ्या कठीण परिस्थितीत सुरू केलेला व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. आज रिलायन्स इंडस्ट्रीज, रॅनबॅक्सी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब सारखी मोठी नावे त्यांचे नियमित ग्राहक आहेत. आज संपूर्ण देशभरात तसेच जगातील ६० देशांमध्ये त्यांच्या मेणबत्त्या निर्यात केल्या जातात. या सर्व कामात भावेशची पत्नी नीता हिची खूपच मोलाची व महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आज ती कंपनीची प्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे. दृष्टीहीन तरुणांना स्वावलंबी बनविणे हे नीता आणि भावेश यांनी आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानले आहे व ते त्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत. एवढे सगळे यश मिळवूनसुद्धा भावेश व नीता दोघेही आपले अत्यंत नम्र व गोड आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व सांभाळून आहेत. मला माझ्या ५६ वर्षांच्या आयुष्यात भेटलेल्या अतिशय विनम्र व गोड लोकांमध्ये त्यांना मी अग्रक्रमावर ठेवेन. २०१९ ला भावेश जगातील पहिला अंध व्यक्ती असेल की जो माउंट एवरेस्ट चालून गेलेला असेल. २०२० साली टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये तो भारतासाठी सुवर्णपदक घेऊन येणार आहे. त्याचे हे  संकल्प व  एवढ्या वर्षांचे अनुभव, सकारात्मक जीवनदृष्टी आपल्यासारख्या डोळसांना पण प्रेरक व मार्गदर्शक ठरणारआहे... ********** लेखक - डॉ. अविनाश सावजी, अमरावती  (स्रोत - फेसबुक)

image credit- hindish.com Google Key Words - Bhavesh Bhatia, Sunrise Candle, Sunrise Candles and Wax Museum, Museum in Mahabaleshwar, Mahabaleshwar, Decorative Candles. Candle Export.


उद्योगविश्व , व्यक्ती विशेष , फेसबुक

प्रतिक्रिया

 1. Rajiv Atre

    3 आठवड्या पूर्वी

  NIce article. Keep up the good work.

 2. Rdesai

    2 वर्षांपूर्वी

  मार्गदर्शन करणारा लेख.

 3. mugdha bhide

    4 वर्षांपूर्वी

  khoopach motivationalवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.