एका अवलियाचा अस्त


महादेव काशिनाथ गोखले पुण्यातील भरत नाट्य मंदिराजवळच्या पावनमारुती चौकात, टीचभर दुकानात गेली साठ वर्षे, वर्तमानपत्रे विकणारे महादेव काशिनाथ गोखले बसलेले दिसत. खाकी अर्धी चड्डी, बिनइस्त्रीचा, जवळजवळ चड्डी झाकणारा, पांढरा ऐसपैस शर्ट, शर्टला भला मोठ्ठा खिसा आणि कॉलरमागे खुंटीवर अडकवण्यासाठी घोडा. चेह-यावर ऊन येतय, असे वाटून ग्रासलेली मुद्रा. काटक तब्येत. स्पष्ट पुणेरी बोलणं.

पेपर विकणारे हे बाबूराव थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी ओलांडल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील, यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. पण, शतकाचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीच भेटत. अर्तक्य वाटाव्या, अशा अफाट गोष्टी करणारा हा अवलिया परवा वयाच्या १०३ व्या वर्षीच मरण पावला.

जन्मभर बाईंडींग आणि वृत्तपत्र विक्रीत रमलेल्या बाबुरावांना खाण्याचा, पळण्याचा, चालण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटाव्या अशा गोष्टी करण्याचा छंदच होता. रोज पहाटे साडेतीनला उठून, कात्रज, खेड-शिवापूर करत, कल्याण दरवाजामार्गे सिंहगडावर चढून, खडकवासला, मार्गे सकाळी नऊला दुकानात परत. काही काळ रोज लोणावळ्यापर्यंत पायी जात. पुढे दर रविवारी सायकलवरुन खोपोलीपर्यंत जाण्याचा नेम चुकला नाही. पुणे ते कराची सायकल फेरा करुन जदनबाई, हुस्नबानू, बेगमपारोचं मनमुराद गाणं ऐकलंय. स्वत: तबला वाजवत. गंधर्वांची गाणी त्यांना तोंडपाठ आहेत हे कळल्यावर नर्गिसच्या आईनं जदनबाईनं त्यांना कराचीत थांबवून त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली. सयाजीराव गायकवाडांच्या मदतीनं १९३६ साली बर्लिन ऑलिंपिकपर्यंत पोहोचले. पायात चप्पल-बूट काही न घालता, ४० मैल पळू शकतात, हे पाहून दस्तूरखुद्द हिटलरनं यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी हवे ते खाण्यासाठी पास दिला.

बडोद्यांच्या महाराजांमुळे लंडनलाही गेले. स्वागताला तीन-चार गव्हर्नर्स गाड्यांसह हजर. पुण्यात पेपर विकणा-या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर्स आत्मीयतेने कसे जमले? असा प्रश्न सयाजीराव महाराजांना पडला. उत्तर मिळाले... दर पावसाळ्यात पुणे मुक्कामी येणा-या गव्हर्नरला मराठी- हिंदी भाषा आणि क्रॉसकंट्री शिकवायला बाबुराव जात असत. पर्वती चालत कुणीही चढेल. बाबुराव हातावर शीर्षासन करत पाय-या चढत. बायकोला पाठुंगळी घेऊन ४३ वेळा पर्वती सर केलीय. क्रॉसकंट्री स्पर्धेचे २५७ बिल्ले जिंकणाऱ्या गोखलेंना काका हलवाई एक शेर दूध, एक शेर पेढ्याचा खुराक देत. महाराष्ट्र मंडळाच्या पैजेच्या जेवणात ९० जिलब्यांचे ताट सहज फस्त करत. वयाची शंभरी ओलांडल्यावरही रोज १५ पोळ्या रिचवू शकत होते.

तरुण वयात अजगर, धामण आणि चित्ता पाळला होता. त्यांच्या समवेत पहुडलेले बाबुराव हे छायाचित्रही पुरावा म्हणून दाखवत. शंतनुराव यमुताई किर्लोस्करांचं लग्न यांनीच जमवले. जयंतराव टिळकांबरोबर शिकारीचा षौक यांनीच केला. एकशे तीन वर्षांच्या आयुष्यात एकही औषधाची गोळी घेतली नाही. परवा त्यांचं निधन वृध्दपकाळात झाल्यावर त्यांना फॅमिली डॉक्टरच नसल्यानं मृत्यूचं सटीर्फिकेट आणायचं कुणाचं? असा आगळाच प्रश्न त्यांच्या समवेत राहणा-या त्यांच्या राजश्री, प्रदीप या लेक जावयाला पडला.

इतरांना जे 'अशक्य' ते मला 'शक्य' एवढीच जिद्द आयुष्यभर जोपासणा-या ह्या अवलियाचा अस्त परवा झाल्यावर एकच चुटपुट लागून राहिली की आजच्या दृकश्राव्य माध्यमाच्या जगात, या अविश्वसनीय वाटावं असं विक्रम करणा-या अवलियाला कॅमे-यात पकडून ठेवायला हवं होतं.

लेखक-सुधीर गाडगीळ प्रतिक्रिया

 1. Hemant Marathe

    4 महिन्यांपूर्वी

  खरंच आशा व्यक्ती अवलियाच असतात. खूप छान व्यक्तीविशेष लिहीला आहे

 2. Lgajanan

    4 वर्षांपूर्वी

  असेही लोक असतात? विश्वास बसत नाही. अफलातून व्यक्तिमत्व.

 3. Suchitabordekar

    4 वर्षांपूर्वी

  अवलियाला सलाम.

 4. rajashreejoshi

    4 वर्षांपूर्वी

  माणूस अवलियाच होता हा...

 5. aradhanakulkarni

    4 वर्षांपूर्वी

  विलक्षण व्यक्तिमत्व. सुंदर लेखन.

 6. Vasant

    4 वर्षांपूर्वी

  कमाल अशी माणसं होती यावर विश्वास बसत नाही

 7. ajitpatankar

    4 वर्षांपूर्वी

  बापरे !! काय अफलातून व्यक्तिमत्त्व !! लेखात म्हट्ल्याप्रमाणे हे “अघोरी” तर आहेच, पण अविश्वसनीय वाटावे असे कर्तुत्व आहे. ... ही वल्ली पु.लं.च्या लक्षात कशी नाही आली...

 8. Prabha Purohit

    4 वर्षांपूर्वी

  रोमांचकारी जीवनपट ! जपून ठेवायला हवा.

 9. Smita Mirji

    4 वर्षांपूर्वी

  सुंदर माहिती

 10. Anushree

    4 वर्षांपूर्वी

  छान लेख

 11. Shandilya

    4 वर्षांपूर्वी

  एक छोटेसे आणि प्रेरणादायी पुस्तक लिहिता येईल। किती अचंबित करणारे आयुष्य! अशाच एका पळणाऱ्या व्यक्तीवर हॉलिवूड मध्ये छान सिनेमा पण आहे। अलौकिक

 12. सुहास बिंदुमाधव सवदी

    4 वर्षांपूर्वी

  अशा अवलीयांच्या जाण्यामुळे खरी पोकळी निर्माण झाली आहे, पुणे तिथे के उणे ! असे अजून कितीतरी महाजन पुण्यात असतील , नव्हे आहेतच आणि त्या सगळ्यांची माहिती , विडिओ रेकॉर्डिंग करून ठेवले पाहिजे. सुधीर जी खूप छान लेख , अगदी मनापासून भावला.

 13. drdhairyashil

    4 वर्षांपूर्वी

  bhavpurna shradhjali

 14. drdhairyashil

    4 वर्षांपूर्वी

  BHAVPURNA SHRADAJALU

 15. प्रा.वृषाली उगले

    4 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख..जगात अशी माणसं फारच दुर्मिळ..

 16. Charudatta

    4 वर्षांपूर्वी

  कमाल आहे ! खराेखर अविश्वसनीय !!!!

 17. Mrunalini Joshi

    4 वर्षांपूर्वी

  Khupch chan wachun abhiman watla aadhi kahich mahiti nvhte pn aaj wachun aanad jhala.pn aaj te aaplyat nahit he wachun khupch dukkh jhal.Bhavpurn Sharddhanjali.

 18. vyp13392

    4 वर्षांपूर्वी

  नवीन पिढी साठी आरोग्याचे उत्तम उदाहरण आहे.

 19. vbakkar

    4 वर्षांपूर्वी

  Kharach ashi manasa astat aaplyat, vishwasach nahi basat. Pan ti nighun gelywar rukh rukh lagate.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen