एका मनस्वी प्रतिभावंताचे प्रयाण


आपले आवडते लेखक लक्ष्मण लोंढे आता आपल्यात नाहीत. प्रकृतीच्या दृष्टीने गेले वर्ष तसे यांना वाईटच गेले. एक बायपास पूर्वीच झाली होती, आता श्वसनाला खूप त्रास होत होता, पाच मिनिटे चालले तरी धाप लागत होती. सतत रुग्णालयात जा-ये चालू होती. पण तरीही यांचे सत्तराव्या वर्षी, गुरुवार, ६ ऑगस्ट २०१५ रोजी, मुंबईत झालेले निधन मनाला खूप चटका लावून गेले.

त्यांचे पहिले पुस्तक हॉन डॉट (अभिनव प्रकाशन) म्हणजे व्हिएतनाममधील अमेरिकन सैनिकांविरुद्ध सामान्य गावकऱ्यांना दिलेल्या लढ्याची उज्ज्वल कहाणी होती. हे अनुवादित पुस्तक ३५२ पानी होते. नंतरदेखील भूतकथांपासून कवितांपर्यंत आणि कादंबरीपासून नाटकांपर्यंत विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. पण तरीही कुठलीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेला हा प्रतिभावंत विज्ञानकथाकार म्हणूनच रसिकांना अधिक परिचित झाला. त्यांच्या प्रतिभेला तसे कुंपण घालणे, तिला सीमित करणे हा एक अन्यायच होता. ICICI ह्या वित्तसंस्थेली उत्तम कायमस्वरूपी नोकरी त्यांनी एकदा तडकाफडकी सोडली होती. संस्थेतील राजकारणाला वैतागून. कशावरूनतरी भांडण झाले आणि बॉसच्या टेबलावर राजीनामा ठेवून लोंढे संध्याकाळी सरळ घरी निघून आले. ते असे काही करतील अशी घरीदारी कोणाला कल्पनाही नव्हती. सगळ्यांनी खूप समजावल्यावर मग कसाबसा त्यांनी तो राजीनामा परत घेतला; पण अल्पकाळासाठीच.

हा मनस्वीपणा त्यांचा एक स्वभावविशेष होता. पन्नाशीनंतर मात्र ते पूर्णवेळ लेखन करू लागले. दुसरा आइन्स्टाइन, नव्या शतकाच्या उंबरठ्यावर, लक्ष्मणझुला, वाळूचे गाणे, रिमोट कंट्रोल आणि वसंत पुन्हा बहरला, निसर्गलेणी वगैरे त्यांची पुस्तके वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळतील. 'सायन्स टुडे' ह्या बाळ फोंडके संपादित करत असलेल्या प्रतिष्ठित नियतकालिकात त्यांच्या दुसरा आइ्न्स्टाइन ह्या कथेचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला होता. पुढे वेगवेगळ्या भाषांतील उत्तम विज्ञानकथांच्या एका जागतिक पातळीवरील इंग्रजी संग्रहातदेखील तो समाविष्ट झाला होता. अशा प्रकारचा सन्मान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञानकथाकार होते.

लेखनाप्रमाणे लोंढे उत्तम वक्ते व कथाकथनकारदेखील होते. चित्रकलेचीही त्यांना आवड होती. मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणाऱ्या विज्ञान लेखकांच्या अनेक कार्यशाळांमध्ये ते मार्गदर्शन करत असत. परिषदेच्या मुखपत्रात ते लेखनही करीत व दोनतीनदा तर त्यांनी त्या मुखपत्राची मुखपृष्ठेही चितारली होती.

आमची पहिली भेट सुबोध जावडेकर ह्या लेखकमित्राच्या घरी झाली. पहिल्या दोन-चार वाक्यांनंतर लगेचच ‘‘मला अरेतुरे केलेलं अधिक आवडेल’’, असे ते म्हणाले व एखाद्या लेखकाला कसे संबोधावे, ‘अहो-जाहो’ करावे का ‘अरे-तुरे’, ह्या खुपदा पडणाऱ्या प्रश्नाला लगेच उत्तर मिळून गेले. हा प्रांजळपणा हादेखील लोंढे यांचा एक स्वभावविशेष होता.

लेखकाला समाजात पुरेसा पैसा व योग्य ती प्रतिष्ठा मिळत नाही याची त्यांना चीड असायची. त्यामुळे लेखनासाठी आणि वक्ता म्हणून मिळणाऱ्या मानधनाविषयी त्यांची खुपदा पूर्वअट असे व त्यांचा तो आग्रह माझ्या मते अगदी रास्त होता. अंतर्नादच्या पहिल्या अंकापासून सलग पुढील तीन वर्षे ‘लक्ष्मणझुला’ हे विज्ञान, अध्यात्म आणि पर्यावरण यांची सांगड घालणाऱ्या आगळ्यावेगळ्या चिंतनपर लेखांचे सदर त्यांनी चालवले. ते संगणकावर लेखन करीत. असे करणारे त्यावेळी फारच थोडे मराठी लेखक होते. ठरलेली शब्दसंख्या असलेला त्यांचा लेख ठरलेल्या वेळेत यायचा. त्यांची व्यावसायिकता लगेच नजरेत भरायची. त्यांचे ते लेखन अंतर्नादच्या एकूण पिंडाशी साधर्म्य असणारे होते व त्यामुळे हे सदर बरेच वाचकप्रियही ठरले.

नंतरच्या काळात आमच्या गाठीभेटी काहीशा कमी झाल्या, त्यांचे लेखनदेखील तसे कमी झाले. मध्यंतरी एकदा अचानक मुंबईत वरळीला नेहरू सेंटरमध्ये आमची गाठ पडली होती. चित्रकलेच्या एका प्रदर्शनाला ते आले होते. मोकळा वेळ असल्याने आम्हां दोघांच्या गप्पा रंगल्या. एकूण साहित्यविश्वाबद्दल, त्यातील गटबाजीबद्दल, त्यामुळे स्वत: काहीसे डावलले गेल्याबद्दल ते बरेच कडवट झालेले दिसले. ‘‘इतकी वर्षं लेखन करून, आणि गेली काही वर्षं तर पूर्णवेळ लेखन करून शेवटी काय मिळवलं? कोणालाच त्याचं काही अप्रूप नाही, लेखनाचं काही चीज होत नाही. पैसाही नाही आणि मोठेपणाही नाही. त्यापेक्षा ही चित्रकला मला अधिक समाधान देते’’, असेही ते म्हणाले. त्यांचा विषाद तसा स्वाभाविक होता.

अर्थात लेखन हा त्यांचा स्वभावधर्मच होता व तो त्यांना स्वस्थ बसू देणार नव्हता. जमेल तेव्हा ते लेखन करतच राहिले. सांगली येथील साहित्यसंमेलनात संमेलनाध्यक्ष म.द. हातकणंगलेकर यांनी लोंढे यांच्या सातत्याने केलेल्या विज्ञानकथालेखनाचा नावानिशी कौतुकास्पद उल्लेख केला होता तेव्हा मलातरी थोडे समाधान वाटले होते. त्यांच्या जाण्याने मराठीतील एक प्रतिभावंत व मनस्वी लेखक आपल्यातून गेला आहे. त्यांच्या पत्नी स्वाती यांनाही साहित्याची मनापासून आवड आहे. अंतर्नादला पाठवलेल्या आपल्या इ-पत्रात त्या लिहितात : ‘‘काल दुसरं काहीतरी शोधताना ह्यांची एक कविता मिळाली. खरंतर ह्यांच्या प्रत्येक साहित्याची पहिली वाचक मी असताना ही कविता त्यांनी मला कशी वाचायला दिली नाही, माहीत नाही. एक विज्ञानलेखक मृत्यूशी इतका छान संवाद साधू शकतो हे मला ती कविता वाचताना जाणवलं. म्हणून मी ती आपल्याकडे दिवाळी अंकासाठी पाठवत आहे.’’

लोंढे यांनी ही कविता नेमकी कधी लिहिली हे सांगणे अवघड आहे, कारण कवितेखाली कुठलीच तारीख नाही. पण कवितेतील एकूण सुरावरून ती अखेरच्या आजारपणातील आहे हे जाणवते. यांची प्रगल्भ वैचारिक जाणीव, उत्कटता आणि शब्दप्रभुत्व ह्या कवितेत सुरेख प्रतीत झाले आहे. तीच खाली प्रकाशित करत आहोत. एका प्रतिभावंताला याहून समर्पक आदरांजली काय असू शकणार?

***

तुझी माझी भेट केव्हाचीच ठरली आहे.

साठ पावसाळे सरले तरी भेटीचं नक्की आहे.

कधी, केव्हा, कसा भेटशील, हे ठरवायचं राहिलं आहे.

पण तसा तो तपशील अगदीच किरकोळ आहे.

परत परत आठवण करू नको, आपली भेट नक्की आहे.

तेवढी माझीही आठवण पक्की आहे.

पहिला टँहा फोडला तेव्हाच दारावर आला होतास,

एवढं मला नक्की आठवतंय, तेव्हाच भेटीचं ठरवून गेलास

कानात नाव सांगितलं जाण्यापूर्वीच ‘‘परत येतो’’ सांगून गेलास.

तेव्हा यायचं असेल तेव्हा ये, मी स्वागताला सज्ज आहे,

मागणं फक्त एवढंच की मी धडधाकट आहे तेव्हाच ये.

उगीच लुळा-पांगुळा, अशक्त झाल्यावर येऊ नको.

तुझं स्वागत नीट होणार नाही, बजावून ठेवतो.

मी आहे वैज्ञानिक – माझे काही वैज्ञानिक मित्र

तुला टाळण्याच्या, तुझी भेट टाळण्याच्या प्रयत्नात आहेत.

पण मला ते मान्य नाही.

दिलं वचन न तोडणाऱ्यांपैकी मी एक आहे.

सारं जग भटकून पाहाण्याएवढी मला सवडच कुठे मिळणार आहे?

पण पाहिलं तेवढ्यावरून सांगतो, हे जग क्रूर आहे.

काही प्रमाणात प्रेमळ, सुंदरही आहे.

तू मला इथं आणलंस.

मी थोडा दुडदुडलो, थोडा धडपडलो.

थोडा हसलो… थोडा रडलोदेखील

एकूण साठ पावसाळ्यांचा हिशोब काढायचा झाला तर

अगदीच आतबट्ट्याचा व्यवहार झाला नाही.

तसं हे जग बरं आहे, निदान एकदा येण्याइतपत आहे.

इथल्या काही कोवळ्या सकाळी, हुरहुरभरल्या संध्याकाळी,

इथले काही धुँवाधार पावसाळे, रणरणते उन्हाळे आणि काही गुलाबी हिवाळे,

काही हर्ष, काही स्पर्श, काही भांडणं, काही रुसवे,

मी मनात जपून ठेवले आहेत.

काही पानं, काही फुलं, मातीची भांडी,

शंख-शिंपले आणि गारगोट्या बरोबर घेतल्या आहेत

पण नव्या जगात जाताना हे सारं इथेच सोडून जायचं,

अशी तुझी अटच असेल तर

मी ते इथेच सोडून जायला तयार आहे.

हे जग मला विसरणार नाही

तेवढं काही तरी मी इथे रुजवलं आहे,

मान्य आहे छोटा असेल पण

पृथ्वीचा एक चौकोनी कोपरा सजवला आहे.

तो पाहायला लोक येत राहतील –

किंवा हीही माझी भाबडी समजूत असेल

पण भ्रमही किती गोड असतो नाही?

पाण्यावर मारलेल्या रेघोट्या

आणि वाळूत बांधलेले किल्ले टिकत नसतात, हेच खरं.

हेही खरंच आहे, नवी आठवण तयार व्हायची तर

जुनी विसरायलाच हवी.

नवा किल्ला बांधायचा तर जुना लाटेनं धुऊन टाकायला नको का?

कसंही असो, पण तू येच

कारण मला नवं जग पाहायची इच्छा आहे.

माझी खात्री आहे तू दाखवशील ते पलीकडलं जग

नक्कीच अधिक सुंदर असेल

कारण तिथं गेलेला अजून कोणीच परत आला नाही.

तेव्हा कधी येतोयस?

-लक्ष्मण लोंढे

लेखक- भानू काळे 

** पुनश्चचे एक दर्दी सभासद आणि स्वतः चळवळे साहित्यप्रेमी असलेले श्री. मंगेश नाबर यांच्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे. श्री. लक्ष्मण लोंढे यांच्यावरील एक उत्तम लेख  तिथे वाचता येईल. https://bit.ly/3xNN9Fr


भानू काळे , लक्ष्मण लोंढे

प्रतिक्रिया

 1. jyoti patwardhan

    3 महिन्यांपूर्वी

  लेख आवडला.

 2. arush

    4 वर्षांपूर्वी

  कविता खूपच भावली साधे सोपे सरळ शब्द पण परतीच्या प्रवासाला लागलेल्या माणसाच्या भावना खूप छान मांडल्या आहेत

 3. Neela Apte.

    4 वर्षांपूर्वी

  अत्यत स्तुत्य उपक्रम !! वाचन sanskruti tikun rahanyasathi upyukt hoilach shivay Vachanachi Abhiruchi nishchit vrudhhingat hovu shakel ase vatate .

 4. bookworm

    4 वर्षांपूर्वी

  कविता ह्रुद्य, दुर्गा भागवतांच्या देहोपनिषद कवितेची आठवण झाली....मनाला चटका लावून गेला हा लेख!

 5. Asmita

    4 वर्षांपूर्वी

  हृदयस्पर्शी लेख

 6. prakash

    4 वर्षांपूर्वी

  सुंदर कविता Link पुन्हा टाकतो आहे, कारण लेखातील link पुढे जात नाही. https://maitri2012.wordpress.com/2016/08/05/भेटीगाठीतून-दिसलेले-लक्ष/

 7. shailesh71

    4 वर्षांपूर्वी

  लेख छान व कविता सुद्धा मनस्वी !

 8. aradhanakulkarni

    4 वर्षांपूर्वी

  हृदयस्पर्शी लेख व काव्यही

 9. arya

    4 वर्षांपूर्वी

  सुंदर, अत्यंत प्रासादिक ,थेट हृृदयाला भिडला!

 10. वैशाली गुणे

    4 वर्षांपूर्वी

  ???सुंदर कविता

 11. Manjiri

    4 वर्षांपूर्वी

  अप्रतिम

 12. asiatic

    4 वर्षांपूर्वी

  झकास. कविता तर अप्रतिम.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen