स्वतंत्र भारताचे अधुरे स्वप्न म्हणजे अटल बिहारी वाजपेयी


काल दुपारपासून अटलबिहारींची तब्येत अतिगंभीर असल्याच्या बातम्यांमुळे पुनश्च मध्ये देखील अस्वस्थता होती. गुरुवार संध्याकाळी येणारा 'सोशल मिडीया' सदरातला लेखही आम्ही २४ तास पुढे ढकलायचा निर्णय घेतला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेली कटू बातमी कधीही येऊ शकेल अशी स्थिती असताना, आपला लेख समयोचित असावा अशी त्यामागची भावना होती. आणि शेवटी ती बातमी आलीच. आज पुनश्चचे एक खंदे वाचक आणि लेखक श्री. देवेंद्र राक्षे यांनी 'मैत्री २०१२ '  या ब्लॉगसाठी  अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेला लेख, आपण सोशल मिडीया सदरात घेतला आहे. -

**********

अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदी पाहणे हे एकच स्वप्न माझ्या वडिलांनी पहिले. ते पुरे झाले १६ मे १९९६ रोजी. केवळ १३ दिवसांचे पंतप्रधानपद, पण या अपूर्व क्षणी ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानावर एक विशेष लेख प्रसिद्ध झाला होता अटलबिहारी वाजपेयी यांच्या मुंबईतील काळबादेवी येथील सभेच्या नि त्यांच्या पहिल्यावहिल्या मुंबई भेटीचा वृत्तांत होता तो. पण त्या लेखातून व्यक्त झालेले वाजपेयी हे आधुनिक भारताच्या आदर्श नेतृत्वाचेच जणू स्वप्न होते. तो प्रसंग थोडक्यात असा –

दीनदयाळ उपाध्याय यांनी एका तरुण मुलास व्याख्याता म्हणून पाठवले आहे, असे पत्र काळबादेवी स्थित यजमानांना मिळाले. ते यजमान बोरीबंदर स्थानकावर त्या तरुण मुलाला घ्यायला म्हणून आले. गाडीतून तो तरुण उतरला व दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले पत्र व दहा रुपये त्या तरूणाने यजमानांकडे सुपूर्द केले. पत्रात यजमानांसाठी संदेश होता की ‘अटलबिहारी वाजपेयी’ या तरुणास पाठवित आहे व त्याच्याकडे गाडीचे तिकीट आणि खर्चाकरिता दहा रुपये सुपूर्द केले आहे.

यजमान थक्क झाले, छत्तीस तासांचा प्रवास या तरुणाने उपाशी पोटी केला की काय. तरुणाने तत्पर उत्तर दिले, मी निघताना शिदोरी जवळ ठेवली होती, नि नंतर स्थानकांवरील पाणी पिऊन प्रवास केला. यजमान त्या तरुणाचा प्रामाणिकपणा नि निष्ठा पाहून थक्क झाले. घरी आल्यानंतर भोजनांती त्या तरुणाने यजमानांकडे एक मागणी केली. त्याच्या सदऱ्याची बाही काखेत उसवलेली होती नि ती शिवण्यासाठी सुई-दोरा हवा होता. यजमानांना एकंदरीत तरुणाचे काही ठीक वाटेना, मुंबईच्या श्रोत्यांसमोर हा कसा टिकेल याची त्यांना धास्ती बसली. पण संध्याकाळच्या सभेत ज्या तडफेने नि तळमळीने तरुण वक्ता बोलला की त्याने केवळ तीच सभा जिंकली नाही तर अशा आणखी सभा त्याच मुंबई भेटीत आखण्यात आल्या.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्याख्यानाचे गारुड  काळबादेवी, मुंबईमार्गे भारतभर हे असे झेपावले. आजही YOUTUBE वर त्यांनी शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्यावर केलेली ओजस्वी व्याख्याने उपलब्ध आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांची विद्वत्तापूर्व भाषणे आणि विषयांना धरून प्रसवलेला प्रामाणिक आवेश यांची मोहिनी जणू श्रोत्यांच्या मनावर पडे. विशेषतः पु.ल. देशपांडे आणि अटलबिहारी वाजपेयी हे दोघेही व्यासपीठावर एकाचवेळी वक्ते म्हणून उपलब्ध असणे म्हणजे तो दुग्धशर्करा योग म्हणावा. आणि या दोघांना प्रत्यक्ष आणि ते ही खूप जवळून पाहण्याचा नि ऐकण्याचा योग माझ्या खाती जमा आहे.

माझ्या आजोबांचे पत्रकार मित्र बा. ना. करंजकर लहानपणी मला माझे अति वाचन पाहून  ‘छोटा वाजपेयी’ असे चिडवत असत, पण जेव्हा आठवीत असताना अटलबिहारी वाजपेयी यांचे व्याख्यान पहिल्या रांगेत बसून ऐकले. ‘पंतप्रधान की अगली बारी – अटलबिहारी, अटलबिहारी’ अशा घोषणा त्याही, केव्हा तर, सत्ता मिळणे स्वप्नवत होते अशा काळात, आम्ही उच्च कंठरवाने देत असू. त्या व्यक्तिमत्वाची भुरळ माझ्या मनावर आजपर्यंत टिकून आहे. माझीच नाही तर अशी अनेकांची भावना असल्यामुळेच जणू गंधर्ववेद प्रकाशनाचे खाडिलकर बंधू यांना वाजपेयींचे सचित्र चरित्र  ‘जननायक’  छापण्याचा मोह पडला असावा.

शिक्षकांना वर्गात अपेक्षित असलेला ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ मला वाजपेयींच्या भाषणादरम्यान अनुभवता आला. पुढील शब्द नि पुढील वाक्य ऐकण्यासाठी आतुर होऊन स्तब्ध झालेला हजारोंचा समुदाय पाहताना अंगी रोमांच आलेले अजूनही जाणवतात. आतून बाहेरून स्वच्छ असलेल्या कवी मनाच्या या ग्वाल्हेरच्या गंधर्वाचे शब्द देखील प्रामाणिक आणि आस्थेने ओथंबलेले असे त्यांचे काव्य वाचकांच्या मनावर जणू राज्य करतात. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पारखी नजरेतून उदयास आलेले नि त्यांच्या कुशल मुशीत घडलेले वाजपेयी ‘पांचजन्य’ या हिंदी नियतकालिकाचे पहिले संपादक ठरले.

अटलबिहारी वाजपेयी यांचा योगक्षेम संघपरिवार चालवे, इतके की पोषाखाबाबतचे सर्व नियम जे संघप्रचारकास लागू तेच वाजपेयींना देखील लागू होते. संघकार्यासाठी अविवाहित राहणाऱ्या स्वयंसेवकांपैकी वाजपेयी हे देखील होत. स्वतःच्या ‘योगक्षेमं वहाम्यहम’ ची सारी मदार संघनिष्ठेशी सादर. राजकारणाच्या नावाखाली कोणतीही लांडीलबाडी करणे त्यांच्या रक्तात नव्हते. राजकारण ही त्यांची भूमिका नव्हती तर केवळ देशहित हे त्यांचे ध्येय होते, त्यामुळे आपल्या सरकारच्या शेवटच्या काही आठवड्यात जनतेची नाडी समजून उमजून ‘फीलगुड’ च्या हवेत मग्न अशा आपल्या सहकाऱ्यांना ‘बोरिया-बिस्तर उठाने का समय आया है’ ही जाणीव करताना निवडणुकीपश्चात सत्तेपासून पायउतार होताना देखील पुन्हा विरोधात बसायचे म्हणून ते अस्वस्थ नव्हते.

पराभव देखील सानंद स्वीकारण्याचे उमदेपण त्यांच्यात होते. कारण सत्ता नि राजकारण हे त्यांचे देशाप्रती केलेल्या कर्तव्याकरिता केवळ साधन होते. नि त्याचमुळे सुसंस्कृतपणा नि मुल्यांची पाठराखण हा त्यांचा सहजभाव होता. धार्मिक स्तोम न गाजवता केवळ देशहितप्राधान्य ही सावरकरांची विचारसरणी वाजपेयी यांच्या अंगीभूत होती. अखंड हिंदुस्तानचे सावरकरांचे स्वप्न त्यांच्या ध्येयमार्गातील एक साध्य असावे नि त्याचमुळे की काय परराष्ट्रधोरणात कमालीचे सौजन्य नि मवाळपणा ते दाखवीत. पण हाच मवाळपणा प्रसंगी वज्राहूनही कठीण कर्मकठोर असे हे कारगिलच्या युद्धादरम्यान त्यांनी दाखवून दिले . ‘मऊ मेणाहूनी मऊ आम्ही विष्णुदास – कठीण वज्रांशी भेदू ऐसे’ ही तुकोबांची उक्ती ते जगले.

शेजारील राष्ट्रांशी त्यांनी राखलेला भ्रातृभाव कधी कधी त्यांनाच व्यथित करी, शेजारील राष्ट्रांनी केलेल्या परतफेडीमुळे, या त्यांच्या अनुभवाची अभिनेता दिलीपकुमार याने देखील दखल घेतली व त्याने प्रचंड चिडून जाऊन पाकिस्तानवर जहरी टीका केली होती. शेजारील राष्ट्रांना शत्रू न मानण्याच्या त्यांच्या विचारांमागे सावरकरांची अखंड हिंदुस्तानची भूमिका होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेबद्दल आणि त्याच्या राजकीय व्यवहाराबद्दल त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना देखील किंचितही किंतु कधी जाणवला नाही. संसदेत दिवसभर पंतप्रधान नेहरू यांच्या सरकारवर अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वारे कडाडून टीका होऊनही, पंतप्रधान नेहरू यांना संध्याकाळी परदेशी पाहुण्यांसाठी राखलेल्या खाशा मेजवानीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांचीच साथ हवी असे.

नेहरू स्वतःभोवती असे पाठीराखे ऊभारताना त्या व्यक्तींमधील बहुप्रसवी साहित्यिक त्यांना अभिप्रेत असत. वाजपेयी अशा साहित्यिकांपैकी एक म्हणून नेहरू यांना ते प्रिय असत. नेहरू देखील परदेशी पाहुण्यांना वाजपेयी यांची ओळख करून देताना हे आमचे विरोधक आणि आम्हाला हे संसदेत कसे सळो की पळो करून सोडतात असे खुल्या दिलाने बोलत. वाजपेयी हे अशा रितीने सर्वपक्षीय लोकमान्य असे नेते होते.

कृष्णाचे वर्णन करताना माधवाचार्यांनी त्यास ‘अखिलं मधुर’ असे वर्णिले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना पाहताना नि मनात साठविताना मला ते ‘मधुराधिपतेर अखिलं मधुरं’ असेच भासतात. त्यांचे चालणे मधुर, त्यांचे वागणे मधुर, त्यांची वाणी मधुर तर त्यांचा क्रोध देखील मधुर. आंतर्बाह्य मधुर वर्तनाचे हे ‘अखिलं मधुरं’ असलेले हे ‘मधुराधिपती अटलजी’ आता मधुराच्या अनंत यात्रेस प्रस्थान पावले आहेत.

**********

'मैत्री' अनुदिनीच्या सौजन्याने लेखक- देवेंद्र रमेश राक्षे


सोशल मिडीया , मैत्री अनुदिनी

प्रतिक्रिया

 1. Ashwini Gore

    3 महिन्यांपूर्वी

  त्यांच्यासारखा राजकारणी पुन्हा होणे नाही . 🙏🌹

 2. Hemant Marathe

    3 महिन्यांपूर्वी

  सुंदर लेख. मलाही १९८४ मधे जामसंडे, देवगड येथे वाजपेयींच्या सभेला उपस्थित राहून त्यांचे ओघवते भाषण ऐकण्याची संधी मिळाली होती.

 3. udayshevde

    4 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख

 4. Bhagwat

    4 वर्षांपूर्वी

  उत्तम।

 5. vilasrose

    4 वर्षांपूर्वी

  लेख सुंदर आहे.वाजपेयींविषयी व संघाविषयी वाचायला आवडते.

 6. ajaygodbole

    4 वर्षांपूर्वी

  सुंदर लेख

 7. Sharadmani

    4 वर्षांपूर्वी

  छान लेख आहे. एकच दुरुस्ती सुचवावीशी वाटते. पांचजन्य हे हिंदी साप्ताहिक आहे इंग्रजी नाही. शरद मणी मराठे

 8. sugandhadeodhar

    4 वर्षांपूर्वी

  ?????वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen