उकडीचे मोदक


कोकणात मोदकाचा उल्लेख 'उकडीचा मोदक' असा करणं म्हणजे पिवळा पीतांबर म्हणण्यासारखं आहे. मोदक म्हटला की तो उकडीचाच. चवीच्या बाबतीत हा पदार्थ एका वेगळ्या उंचीवर आहेच. पण आकाराच्या बाबतीतही हा मोदक फार मोहक आहे. आंतर्बाह्य सौंदर्याने भरलेला हा पदार्थ जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करतो.

मोदक म्हटलं की मला नेहमी पुलंनी वर्णन केलेली 'सुबक ठेंगणी' आठवते. मोदक खाणं हा जितका आनंददायी विषय आहे तितकाच तो बघणं हा देखील आनंदाचा विषय आहे. एकसारख्या पाऱ्या आणि सुबक नाक असल्याशिवाय चवीने कितीही चांगला असला तरी तो खावासा वाटत नाही. एरवी चिमटे काढल्यामुळे कुणाला त्रास होत असेल, पण या मोदकांचा बाबतीत मात्र याच चिमट्यांमुळे त्याचं सौंदर्य अजून खुलतं. अत्यंत सुबक मोदक वळणाऱ्या अनेक बायका आमच्याइकडे गावागावात सापडतील.

मधेच एखाद्या ठिकाणी फुटलेला आणि पॅरलिसिस झालेल्या मनुष्याच्या तोंडासारखा कसातरी दिसणारा उचिरवाचिर मोदक बघूनच डोक्यात जातो. तोंडात जायची गोष्ट लांबचीच. उकड काढताना त्याचा एक प्रकारचा सुगंध येतो. मळून मऊ झालेली उकड हाताला पण मस्त लागते एकदम. आतलं पुरण सोनेरी रंगाचं असेल तर सोन्याहून पिवळं. हे पुरण मात्र पक्कं गोड व्हायला हवं. त्याशिवाय मजा नाही. पुरण बरोबर गोड झालंय की नाही ते सर्टिफाय करण्याइतपतच माझ्या ऑडिटर असण्याचा आमच्या मातोश्रींना फायदा आहे. ह्या चव बघायच्या निमित्ताने चार पाच वेळा बचकभर पुरण खायची संधी मिळते.

पूर्वीच्या काळी मोदक शिजवायला मोठ्या आकाराची तांब्याची टाके मारलेली मोदकपात्र असायची. आमच्या घरात अजूनही आहे. त्याच्या चाळणीत केळीच्या पानावर मांडलेले एकसारख्या आकाराचे मोदक बघून डोळ्याचं पारणं फिटतं. जोडीला एक छोटीशी करंजी पण करतात. एक एकच हिरवं पांढरं कॉम्बिनेशन असेल जे बघायला चांगलं वाटतं. मोदक करायचे म्हणजे बरोबर निविगऱ्या करायच्या हा एक अलिखित नियम आहे. शांतपणे आपलं काम करणाऱ्या शांत स्वभावाच्या भावाला मधेच येऊन प्रेमाने छळणाऱ्या बहिणीसारखं नातं आहे मोदक आणि निविग्री मध्ये. त्या खायलाच जीव तुटतो खरं सांगायचं तर. कितीही खाल्ल्या तरी पुरेशा पडत नाहीत.

शिजलेले मोदक बाहेर काढल्यावर एक प्रकारचा तुकतुकीतपणा येतो त्यांना.तो बघायला फार छान वाटतो. उकडीचा, मोदक वळताना हाताला लावलेल्या गोड्या तेलाचा आणि केळीच्या पानांचा मिळून एक मस्त वास येतो मोदकांना. पानात मोदक असले की तो पहिला वरण भात सुद्धा कधी एकदा संपतोय असं होऊन जातं. पानातला पहिला मोदक पटकन संपवून पुढचे मोदक चारच्या पटीत घ्यावे असं म्हणतात.? तूप घालण्यासाठी त्या मोदकांची नाकं मोडताना काळीज तुटतं खरं तर. पण नाईलाज असतो.

मोदकांमध्ये घालायचं तूप पातळ हवं. नाक फोडून त्यात शक्य असेल तर अलवणातुन तूप ओतून घ्यावं. म्हणजे त्याची चव अजून वाढते. हे सगळे सोपस्कार झाल्यावर तर्जनी आणि अंगठा यात तो मोदक धरून मोठा आ करून अक्खा मोदक तोंडात घालावा आणि त्या चवीत बुडून जावं. त्या क्षणी आयुष्य थांबून राहावं असं वाटतं. चवीत बदल म्हणून मधेच निविगऱ्या असतातच. त्या कच्चं गोडतेल लावून किंवा दह्याबरोबर मस्त लागतात एकदम. सध्या गणपतीचे दिवस जवळ आल्यामुळे मनात मोदकाबद्दलचे संकल्प विकल्प सुरु झालेले आहेत. आता खरोखर मोदक खात नाही तोवर काही खरं नाही.?


सोशल मिडीया

प्रतिक्रिया

 1. Swapna Patwardhan

    3 आठवड्या पूर्वी

  मोदक करण्याचे आणि खायचे वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटले,मोदक आणि त्यावर पातळ केलेल्या तुपाची धार अहाहा

 2. avthite

    3 वर्षांपूर्वी

  आज संकष्टीचतुर्थीला डोळ्यांना का होईना पण मोदक खाण्याचे भाग्य मिळाले.. अलभ्य लाभ??

 3. krmrkr

    3 वर्षांपूर्वी

  पहिला मोदक चाखल्यावर चारच्या पटीत मोदक घेण्याची नुस्ती कल्पनाच इतकी बहारदार आहे की बास! जोडीला अस्सल पायरीचा रस.... म्हणजे कळावे लोभ असावा....

 4. rajashreejoshi

    3 वर्षांपूर्वी

  मस्त....परत मोदक खावेसे वाटले

 5. shailesh

    4 वर्षांपूर्वी

  लेख वाचूनच मोदक खाल्याचं समाधान मिळालं, तोंडाला पाणी सुटलं?

 6. TINGDU

    4 वर्षांपूर्वी

  खाद्यपदार्थांचे इतके छान वर्णन नका करत जाऊ. जीभेला डोहाळे लागतात म्हणून.

 7. DayanandSkamble

    4 वर्षांपूर्वी

  लेख वाचून मोदक खायची पद्धत समजली,,

 8. MK046188

    4 वर्षांपूर्वी

  खुपच छान

 9. maheshbapat63

    4 वर्षांपूर्वी

  छान वाचूनच मजा आली।

 10. asmitaph

    4 वर्षांपूर्वी

  आहा !

 11. Suhasthatte

    4 वर्षांपूर्वी

  हल्लीच्या पिढीला माेमाेज म्हणजे तिखट माेदक आवडतात . गाढवाला गुळाची चव काय ?

 12. manjiriv

    4 वर्षांपूर्वी

  मोदक पुराण मस्त.

 13. Sharadmani

    4 वर्षांपूर्वी

  लेख छान आहे. कुणी लिहिला आहे?वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen