अध्यात्माची भानगड


अनेकशास्त्रं बहुवेदितव्यम, अल्पश्च कालो बहवश्च विघ्ना: यत् सारभूतं तदुपासितव्य, हंसो यथा क्षीरमिवाम्भुमध्यात् ।

शिकण्यासाठी शास्त्रे अनेक आहेत आणि ज्ञान तर अपरिमित आहे. आपल्यापाशी वेळ कमी आहे आणि अडचणी अनंत आहेत. म्हणून हंस जसे केवळ दूधच निवडून घेतो तसे शास्त्रांचे सार आपण जाणले पाहिजे. आपण असे पाहिले की...

१) ज्या सृष्टीचे आपण घटक आहो, ज्या सृष्टीचे आकलन आपल्याला आपल्या ज्ञानेद्रियांमार्फत होते त्या सृष्टीचे स्वरूप सतत बदलते असते.

२) ह्या बदलाचे जे कारण वा हे बदल जी घडविते तिला प्रकृती अथवा माया असे म्हणतात.

३) ह्या सृष्टीत रूपांतरे सतत घडत असली तरी विनाश असा कधीच कशाचा होत नाही. यावरून अनुमान निघते की एक नित्य तत्त्व ह्या रूपांतरांमागे अविचल उभे आहे. त्या अविनाशी नित्य तत्त्वास आत्मा/परमात्मा/ब्रह्म अशा संज्ञांनी ओळखतात.

४) ह्या सृष्टीची रूपांतरे होत असताना एक क्षण असा येतो की त्यावेळी अनेकरूपी अनेकावयवी विश्व एकजिनसी एकावयवी बनते. हा प्रलयाचा अंतिम क्षण असतो व नव्या सृष्टीच्या उभारणीची ती नांदी असते.

५) ऋग्वेदातील नासदीय सूक्तात ह्या स्थितीचे वर्णन असून त्यावेळी तेथे काहीतरी स्फुरत होते असे म्हटले आहे. त्या स्पंदनांचा जो नाद होत होता त्या नादास ॐकार असे म्हणतात व त्या स्थितीला ॐकाराची स्थिती असे म्हणतात.

६) प्रलयाच्या ह्या अंतिम स्थितीतील स्फुरणे ही नवसृष्टीच्या निर्मितीची नांदी असते आणि म्हणून ॐकाराला ह्या विश्वाचा आदि असे म्हणतात.

७) नवसृष्टीचे निर्माण ह्या क्षणापासून सुरू होते व माया ही नानारूपी सृष्टी उभारते. मायेचा हा खेळ एकीकडे चालू असताना तिकडे आत्मा मात्र अविचल असतो. रूपांतरे व नित्यत्व ह्या सृष्टीच्या दोनही विशेषांचा अनुभव आपल्याला एकाच वेळी येतो याचे कारण हेच.

८) ह्या विश्वाच्या आयुष्यात ॐकार हा जसा नवनिर्मितीचा क्षण येऊन नवसृष्टीची उभारणी होते तसाच एका क्षणी संहारणीचा म्हणजेच अनेकरूपांकडून एकरूपत्वाकडे जाण्याचा क्षणही येतो. त्या क्षणानंतर प्रकृती आपला पसारा आवरू लागते व शेवटी आत्मा व प्रकृती एकमेकांत असे विलीन होतात की आत्मा व प्रकृती असा भेद राहू नये. म्हणजेच ॐकाराकडून प्रवास सुरु होतो आणि तो ॐकारातच येऊन संपतो. जुन्या सृष्टीचे स्वरूप पूर्ण नष्ट होते व नवी सृष्टी उभारण्यास प्रारंभ होतो.

९) प्रकृतीला वा मायेला रूपांतरे करता येतात, सृष्टी उभारता वा संहारता येते याचे कारण ती त्रिगुणात्मक असते, सगुण असते. फक्त ॐकार स्थितीत तिने आपले तिन्ही गुण - म्हणजेच सत्व रज तम - हे साम्यावस्थेत आणलेले असतात.

१०) नवसृष्टीच्या उभारणीसाठी प्रकृती आपली साम्यावस्था मोडते व सत्त्वरजतमाचे प्रमाण कमी जास्त करून एका आदि वस्तुपासून अनंत प्रकारचे नानारूपी घटक उत्पन्न करते. यामुळे सध्याच्या सृष्टीत आपल्यासारखे सेंद्रिय सजीव व दगडांसारखे निरिंद्रिय निर्जीव आपल्याला दिसतात.

११) मायेच्या प्रसविण्यामुळे व तिच्या त्रिगुणात्मक व्यवहारांमुळे आपल्याला पांच ज्ञानेंद्रिये, पांच कर्मेंद्रिये व मन अशी एकूण अकरा इंद्रिये प्राप्त झाली आहेत.

१२) ह्यावरून लक्षात येईल की आत्मा नित्य आहे व माया अनित्य आहे. अनित्य असल्याने तिचे ह्या क्षणाचे रूप पुढच्या क्षणाला नसते म्हणून तिला मिथ्या असे म्हणतात.

१३) आत्म्यामुळे ह्या सृष्टीला व आपल्याला अस्तित्व आहे तर मायेमुळे सृष्टीस व आपणास हे स्वरूप प्राप्त झाले आहे.

१४) अध्यात्म म्हणजे आत्म्यासंबंधी.

१५) आत्म्यासंबंधी विचार करणे, आत्म्याचे चिंतन करणे अशा आत्म्यासंबंधीच्या आपल्या मानसिक व्यवहारांस अध्यात्म असे म्हणतात व अंतिमतः आत्म्याप्रमाणे स्थिरभावाचे होणे ह्याला आत्मा जाणणे असे म्हणतात.

लेखक- राजेंद्र मणेरीकर

**********

Google Key Words- Spirituality, Philosophy, Vedic Philosophy, Indian Philosophy, Atman. Srishti and Atman, Adhyatma.


सोशल मिडीया , मनसंवाद , अध्यात्म

प्रतिक्रिया

  1. bookworm

      4 वर्षांपूर्वी

    थोडक्यात अध्यात्माचा व कर्मकांडांचा काही संबंध नाही!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen