बाहुली, स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी !!


क्रांतिज्योती सावित्रीमाईंबद्दल वाचत असताना बाहुलीच्या हौदाचा उल्लेख सापडला. त्यानंतर शोधले असता हा उल्का मोकासदारांचा लघुलेख मिळाला. समाजाच्या उद्धारासाठी किती ज्ञात-अज्ञात आहूती पडल्या, माता -भगिनीचा शिक्षणासाठीचा संघर्ष कामी आला आहे.. भाऊबीज महिलांसाठी या दिवसाचे खूप महत्त्व.पण १७५ वर्षापूर्वी याच दिवशी पुणे नगरीत एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली. बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण बाहुलीचा हौद ? बाहुली कोण ? या हौदाचे एव्हढे महत्व का? सांगते... मी स्वतः इतिहासाची विद्यार्थिनी कॉलेजमध्ये असताना महात्मा फुले यांचे चरित्र अभ्यासताना कुठे तरी वारंवार डॉ. विश्राम घोले यांचा उल्लेख यायचा. ते फार मोठे शल्यविशारद, माळी समाजातील बडे प्रस्थ, पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. डॉ.घोले महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते अग्रणी सुधारक होते. महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली. सुरवात आपल्या घरातून करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुलीला शिकवण्यास सुरवात केली. बाहुली खरोखरच नावाप्रमाणे बाहुली वय अवघे ६-७ वर्ष.. अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत. बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती, महिलांना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती, किंबहुना प्रखर विरोध होता.अनेकदा डॉ.घोले यांना समजविण्याचा प्रयत्न जातीतील मान्यवरांनी केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली. पण डॉ.घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही. शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईकांनी काचा कुटुन घातलेला लाडु बाहुलीस खावयास दिला. अश्राप पोर ती काचांचा लाडु खाल्ल्या मुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली. ‌स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी. आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉ. घोले यांनी बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद आहे. पण इतिहासात बाहुलीच्या जन्ममृत्यूच्या तारखेची नोंद मात्र आढळत नाही. ‌काळ बदललाय कालपटावरील आठवणी धुसर झाल्यात. डॉ. विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड आता सतत वाहनांच्या वर्दळीने धावतपळत असतो. पूर्वी शांत निवांत असलेली बुधवार पेठ आज व्यापारी पेठ म्हणून गजबजून गेलीये. फरासखाना पोलीस चौकी सुध्दा आता कोपऱ्यात अंग मिटुन बसलीये..आणि त्या फरासखाना पोलीस चौकीच्या एका कोपऱ्यात बाहुलीचा हौद इतिहासाचा मुक साक्षीदार स्थितप्रज्ञाची वस्त्रे लेवून उभा आहे. बाहुलीचा फोटो मला खुप शोध घेतल्यावर इतिहास संशोधक मंडळातील एका जीर्ण पुस्तकात साधारणपणे ६ वर्षापूर्वी सापडला. आज बाहुलीची आठवण कारण आजचा तो दिवस तिच्या स्मरणार्थ बांधलेल्या हौदाचा आज लोकार्पण सोहळा. स्त्री शिक्षणासाठी आत्माहुती देणाऱ्या बाहुलीच्या निरागस सुंदर स्मृतींना मनोभावे वंदन. - साभार-उल्का मोकासदार ( व्हॉटस एप आणि khaasre.com वरुन साभार ) Google Key Words - Dr. Vishram Ghole, First Victim of Women Education, Bahulicha Haud.


समाजकारण , शिक्षण , स्त्री विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    खूपच ह्रुदयद्रावक तसेच प्रेरणादायी कथा आहे

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच विदारक परिस्थिती होती तेव्हा .

  3. Siddheshwar

      7 वर्षांपूर्वी

    किती वेळा मी अप्पा बळवंत चौकात जातोय,आता आवर्जून बहुलीचा हौद पाहीन...डॉ विश्राम घोले यांचे दुःख हेलावून टाकणारे आहे...

  4. Manisha Kale

      7 वर्षांपूर्वी

    Lekh apratim. Antarmukh karato. Strila shikshnasathi anek divyatun par vhave lagat ase he mahit hote parantu tyabaddal eka niragas kowalya lahan mulicha bali gela aahe he aajach kalale. Angavar kata aala. Aani Dr. Ghole yana trivar vandan. Aasha nishthur samajavirudha jaun tyani aaplya mulila shikvayacha prayatna kela. Shatshha Pranam aasha tyana.

  5. सुकृता पेठे

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती.

  6. सुकृता पेठे

      7 वर्षांपूर्वी

    वाचताना खरोखर अंगावर काटा आला.

  7. अमोल गमरे

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय चांगली माहिती दिलीत. धन्यवाद!

  8. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    काशीबाई घोले यांचा जन्म १३सप्टें .१८६९ व मृत्यू २७सप्टें १८७७ संदर्भ :विस्मृतीचित्रे`:अरुण ढेरे

  9. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    डॉ .विश्राम घोले यांच्यावर डॉ .अरुणा ढेरे यांचे अभ्यासपूर्ण पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे .

  10. kiran bhide

      7 वर्षांपूर्वी

    धन्यवाद नातूमॅडम. अशीच माहिती देत राहा.

  11. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    डॉ .विश्राम घोलेनी आपल्या दुसऱ्या मुलीला (गंगुबाई)हिला शिक्षण दिले.तिचे लग्न १६व्या वर्षी डॉ .रघुनाथ खेडकर यांच्याशी करून दिले .डॉ .घोले हे गवळी समाजातील होते .

  12. mugdha bhide

      7 वर्षांपूर्वी

    angawar sarsarun kata aala……… aapanhi teva talibanich hoto asa janawal.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen