कोकणची म्हातारी


कोकणातले माझे वयोवृद्ध पेशंट्स हा फारच भन्नाट प्रकार आहे. बऱ्याचदा एकटी आजी, एकटे आजोबा किंवा असं जोडपं हे सतत तणावाखाली असतात. घरी सोबतीला कोणी नाही. मुलं, सुना, नातवंडं मुंबईला. राती माझा काय झाला तर कोणाक समजूक तरी व्हया ही धास्ती सतत मनात घेऊन हे म्हातारे जीव रात्र ढकलत राहतात. शेजारच्या घरातल्या कोणाक तरी रात्री वांगडाक झोपूसाठी ते शोधत असतात. पैसे देऊन तरी सोबतीला कोणी रात्री भेटेल का याचा विचार करीत असतात.

अशा घरी मी संध्याकाळी कधी गेलो की फार उदास होतो. पडवीत एक ४० चा दिवा लागलेला असतो. त्या पिवळ्या प्रकाशात घरातल्या वाशांवर खडूनं लिहून ठेवलेले सुविचार असतात. गेलेल्या म्हाताऱ्यांचा कुंकू लावलेला फोटो असतो. झिलानं हौसेनं बसवलेल्या सीलिंग फॅनच्या पात्यावर पिवळा रंग आणि जळमटं असतात. म्हातारीला त्या पंख्याची गरजच नसते. झील आल्यावरच तो पुसला आणि लावला जातो. जमीन सारवायची ताकद म्हातारीत उरलेली नसते.

आतल्या चुलीवर भात शिजत असतो. म्हातारी सकाळी पेज करते. दुपारी डाळभात आणि रात्री भातडाळ. महिनोन्महिने हेच असते. कधीतरी शेजारची मच्छीची आमटी पाठवते. म्हातारी फार तर बटाटय़ाची भाजी, काळ्या वाटाण्याचे सांबार बदल म्हणून खाते. काळी लाकडी पेटी असते. इलेक्ट्रिक बोर्डावरच्या वायरी म्हातारीइतक्याच जुन्या असतात. एक खाट असते, त्यावर म्हातारी कधीच झोपत नाही. म्हातारे गेल्यापासून ती रिकामीच आहे. त्यावरची गादीसुद्धा गुंडाळून ठेवली आहे. एक जुनी लाकडी आरामखुर्ची आहे.

गणपती बसवायच्या जागेवर एक लाकडी टेबल, त्यावर छतावर मंडपी (लाकडी चौकट) आणि त्याला गणपतीच्या दिवसात लावलेल्या पताका. भिंतीतल्या कोनाडय़ात म्हातारीची औषधं, कागदपत्रं ठेवलेली आणि एक कृषक टॉर्च ठेवलेला असतो. पांढऱ्या नायलॉनच्या पिशवीत रिपोर्ट्स! हे अगदी असंच्या असं बहुतेक एकटय़ा म्हातारीच्या घरातलं चित्र असते. रात्रच्या रात्र यांना झोप नसते. चटईवर पडून हे एकटे जीव तासन्तास काय विचार करत असतील, काय आठवत असतील हे मला आश्चर्यच आहे.

अशीच माझी एक हिरावती नावाची पेशंट आहे. ती दवाखान्यात पाऊल टाकते तीच मुळी परवत. (परवणं म्हणजे विव्हळणं). आल्या आल्या झिला माका नीट तपास म्हणून सांगते. तिला हात देऊन टेबलावर झोपवलं की खरं नाटक सुरू होतं. खरं तर हिरावती आजी येते ती मला बघायला आणि भेटायला. तिचा हात हातात घेऊन तिला एक जादू की झप्पी दिली की तिची ट्रीटमेंट एक महिन्याकरता पुरी होते, पण तपासणी करायलाच हवी. हिरावती आजीचं बीपी बघितलं की ते बरोबर आहे. नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत, फुफ्फुसांचे आवाज छान आहेत, अशी रनिंग कॉमेंट्री मी चालू ठेवतो. आणि मग काय होतंय हे न विचारता मी तिच्या कपाळावर हात ठेवतो. आजी सांगते, कपाळ लई चावता, माथा पेटता. मी डोळ्यांवर हात ठेवतो, ती सांगते डोळे रखरखतत, वाफा येतत.

मी गळ्यावर हात ठेवतो. ती सांगते हय पिचावता, डाचता. छातीवर हात- हय धडधडता, पोटावर हात- डावी कूस फुगता, पोट गच्च वाटता, ओटीपोटावर हात- निरणात कळा मारतत, लघवी गरम होता, मांडय़ांवर हात- हयसून दवण- शीरेपर्यंत फूट लागता. पोटऱ्या- वळतत, तळपाय- जळजळतत, मुंग्या येतत, सुन्न पडतत. अशी आदेह तक्रार ती नोंदवते. मी काही न विचारता गेली अनेक वर्षे ती याच तक्रारी सांगते. काही फरक नाही. माझ्या तपासणीत-ट्रीटमध्येही नाही आणि तिच्या या तक्रारीतही नाही. तेच बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन मी देतो. पुन्हा एक महिन्यानं हेच घडतं, पण प्रत्येक वेळी तिला पाहिलं की मी उत्साही होतो. अनेक वर्षांनी भेटल्यासारखा मी तिला भेटतो. तीही प्रत्येक वेळी तेवढय़ाच तीव्रतेनं डोळ्यांतून पाणी काढते. तितक्याच तीव्रतेनं गळाभेट घेते आणि तेच जगप्रसिद्ध वाताचं इंजेक्शन विश्वासानं घेते.

ती येते ती मन मोकळं करायला. कोणीतरी माझं ऐकून घ्या हे सांगायला आणि तिचं असं एक अस्तित्व आहे आणि हा डॉक्टर ते प्रेमानं मान्य करतो हे पाहायला. सगळ्या म्हाताऱ्यांना मी बी कॉम्प्लेक्स वापरतोच वापरतो. डाळभात- भातडाळ-पेज यात आमच्या माणसाला हे व्हिटॅमिन मिळणार तरी कोठून? सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांत मेडिसीन शिकवायला सगळे थोर स्पेशालिस्ट्स, उच्चविद्याविभूषित, हॉस्पिटल चालक-धारक आयसीयू स्पेशालिस्ट असेच लोक असतात. या लोकांना जनरल ओपीडीचा अनुभवच नसतो. सामान्य माणूस ज्या सामान्य तक्रारी सांगतो त्या त्यांनी कधी ऐकलेल्याच नसतात किंवा ऐकल्या असल्याच तर त्या मानसिक आहेत, असा शिक्का मारून ते मोकळे होतात. त्यामुळे ते जे काही शिकवतात त्याचा ओपीडीत उपयोग फार कमीच असतो.

खरं तर मेडिसिनचं एक लेक्चर हे ओपीडी या विषयांवर ठेवायला हवं. मेडिसिनच्या प्रतिष्ठित पुस्तकांतही हाच प्रकार असतो. त्यात वेगवेगळे सिंड्रोम्स खूप असतात, पण पोटफुगीवर काय करायचं ते नसतं. त्यात खूप दुर्मीळ गोष्टी असतात, पण रोज दिसणाऱ्या तक्रारीचं काय करायचं ते नसतं. ओपीडीतले ७० टक्के पेशंट्स रोज ज्या तक्रारी सांगतात त्या भयाण हैराण करणाऱ्या असतात. पाय वळणं, मुंग्या येणं, अगम्य थकवा, पोट/ कूस फुगणं, डोकं चावणं यातील खूप पेशंट्स मानसिकदृष्टय़ा खचलेले असले तरी याहीमागं काहीतरी शास्त्र, काही उपाय असणारच. आमच्याकडे मासे, तंबाखू, पॉलीश्ड राइस, चहा यांचं प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी हॅरिसन नावाच्या मेडिसिनच्या पुस्तकात मी वाचलं की, या सर्व घटकांत थायमिनेझ नावाचा घटक असतो, जो शरीरातील बी-वन (थायमिन) नष्ट करतो.

कदाचित याचमुळं कोकणातील माझा सामान्य पेशंट या व्हेग तक्रारी सांगत असेल, पण याची खात्री होणार कशी? हे संशोधन करणार कोण? मी करायचं तर त्याकरता सुसज्ज लॅब, आर्थिक मदत, तज्ज्ञांची मदत कोठून येणार? खेडय़ात व्यवसाय करताना हे असे अनेक प्रश्न भंडावून सोडतात. संजय गांधी निराधार योजनेचे ३०० रुपये घेणारी, मुलबाळं नसणारी एखादी आजी येते तेव्हा तिला औषधं लिहून देताना पेन पुढं सरकतच नाही. त्या ३०० रुपयांत तिला महिना काढायचा असतो. काय लिहाल? सॅम्पलच्या औषधांचा अशा वेळी आधार असतो, पण गंमत अशी की, एखादं सॅम्पलचं अ‍ॅन्टिबॉयोटिक दिलं तरी दुसऱ्या दिवशी ती म्हातारी औषधांनी हैराण होऊन परत येते. त्या गोळ्यांसह जे पौष्टिक अन्न, विश्रांती आदी हवं ते कोठून आणणार? गोळ्या भारी पडल्या. रातभर हैराण झालय. भाऊनो हय़ा काय केलास माजा? औषधांनी जीव सुकून गेलो. घासभर अन्न पोटात टिकत नायया. पित्ताच्या गोळ्यांचा खर्चही म्हातारीला झेपणार नाही हे माहिती असल्याने त्या दिलेल्या नसतात आणि कोरा चहा, तंबाखू यांनी अगोदरच वाढलेल्या पित्ताला माझ्या गोळ्यांनी भडकवलेलं असतं. मी हैराण होतो. आर्थिक गणितं जमवता जमवता मी मेटाकुटीला येतो. प्रिस्क्रिप्शन लिहिताना सर्वात स्वस्त कंपनीचं औषध आपसूकच लिहिलं जातं. त्यातही म्हातारी १० पैकी ३ गोळ्या घेते. पित्ताची आणि बी-कॉम्प्लेक्सची गोळी खाते आणि महत्त्वाचं अ‍ॅन्टिबॉयोटिक खातच नाही.

एकदा भरलेल्या ओपीडीत लग्न होऊन सासुरवाशीण झालेली मुलगी आणि तिचा बाप एकाच वेळी आले. म्हणजे त्यांना एकमेकांना माहिती नव्हतं की आज बापलेकीची भेट दवाखान्यात होईल. मुलीचा नंबर आधी होता. वडील नंतर आले. एकमेकांना बघून दोघेही गहिवरले. त्या सासुरवाशिणीनं बापाचा हात हातात घेतला, आईची चौकशी केली. बापानंही लेकीची विचारपूस केली. शब्द मोजके आणि रांगडे होते, पण प्रेम होतं. मुलीनं बापाला आपल्याच नंबरवर आत घेतलं. मी तिला तपासलं आणि इंजेक्शन घ्यायला आतल्या खोलीत पाठवलं. ती बाहेर येईपर्यंत बापाला तपासलं आणि त्यालाही आत इंजेक्शनसाठी पाठवलं. (आमच्याकडे इंजेक्शन न देणारा डॉक्टर नसतो).

मुलगी बाहेर आली आणि गडबडीनं तिनं पन्नास रुपये काढले. माझे पैशे घेवा. मी प्रश्नार्थक पाहिलं तेव्हा ती हळू आवाजात म्हणाली. माझा बिल घेवा, बाबा त्याचा बिल देईल. बापही बाहेर आला. त्यानं शांतपणे त्याचे पन्नास काढले. स्वत:चं बिल दिलं. लेक निरोप घेऊन निघाली. डोळ्यांत पाणी काढून बिचारी गेली. बापानं शांतपणे विचारलं. तिचा बिल तिच्याकडसून घेतलास मा? मी होय म्हणालो. म्हातारा म्हणाला, पोरीचे मी दिल असतय पण गाडीभाडय़ाकही रवले नसते. आणि ती तरी काय करात? माझा बिल देऊक तिच्याकडे तरी खयसून पैका येईत! मी आवंढा गिळला. जिला खांद्यावर खेळवलं, जी बापाचा हात धरून फणसगावच्या जत्रेत फिरली त्या दोघांनाही ५० रुपये म्हणजे मोठीच रक्कम होती. आता लग्न झालं आणि जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या. मी म्हाताऱ्याकडं पाहिलं- म्हातारा समजूतदारसा हसला. माझ्या डोळ्यांसमोर माझी मुलगी आली आणि मी हसायचं विसरलो.

 

डॉ. मिलिंद कुलकर्णी, सिंधुदुर्ग  


समाजकारण , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. spruha joshi

      3 वर्षांपूर्वी

    पोटात कालवलं.. सुंदर लेख!

  2. Shreekrushna Manohar

      3 वर्षांपूर्वी

    अतीशय सुंदर भाषाशैली, खरा कोकणी माणूस कसा आहे हे आपल्या अनुभवावरून कळले . कोकणातील खेड्यांमध्ये

  3. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेखन आणि अनुभव - असं वाचताना मन पिळवटून निघते '

  4. Ramdas Kelkar

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय बोलके वर्णन .उत्तम निरीक्षण.नवीन डॉकटर.नी जरुर वाचले पाहिजे.क थेचा विषय आहे.

  5. Mohan Ranade

      3 वर्षांपूर्वी

    फारच सुंदर असे डाॅक्टर आता दिसत नाहीत आणी कोकणात कोणी अश्या प्रकारे सेवा करणेसाठी तयार नाहीत

  6. Ashwini Gore

      3 वर्षांपूर्वी

    छान लेख

  7. Sandhya Kadam

      3 वर्षांपूर्वी

    खरंच ! असेच आहे

  8. Prashant Mathkar

      3 वर्षांपूर्वी

    अगदी सत्य परिस्थिती.. आज कोकणात खेडेगावातून हीच परिस्थिती आढळून येते.. अशा एकटे राहणाऱ्या आजी आजोबांना गावातला डॉक्टर हा एक मानसिक आधार असतो.आणि तो पुरवणारे सरांसारखे डॉक्टर्स कोकणात अजून आहेत.. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कोकणात अजून शाबूत आहे....... प्रशांत मठकर

  9. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अगदी खरं लिहीलय डाँक्टरनी. ओपीडी चे अनुभव भारीच असणार

  10. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    डॉ. चे काम जास्त करून मानसिकच असते.पण हल्ली डॉक्टर तपासता नाहीत.

  11. vivek khadilkar

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय खर खुऱ वर्णन.बहुतेक सर्वच गावामध्ये जवळजवळ ऐशी नव्वद टक्के वृधांची हीच अवस्था आहे.तसेच बहुतेक डॉक्टर सुद्धा अशाच प्रकारच्या सेवाव्रतीने लोक सेवा करत आहेत हे माझ्या स्वतः च्या बदलीच्या ठिकाणी अनुभवले आहे.मात्र त्यामुळेच डॉक्टर चा मान देवा इतकाच आदर मिळवून देत असतो.

  12.   5 वर्षांपूर्वी

    Khup chan

  13. Bhausaheb

      5 वर्षांपूर्वी

    एकदम छान !reality in rural India !

  14. TNiranjan

      6 वर्षांपूर्वी

    मीही तिथलाच. ३०व्या वर्षांपर्यंत तिथंच लहानाचा मोठा झालो. गेली २८ वर्षं नोकरी निमित्त बाहेरच फिरतोय. आता ही जेव्हा चर्या घरी जातो तर आजूबाजूच्या परिस्थितीत फारसा फरक झाल्याचं जाणवत नाही. अत्यंत तुटपुंजी मिळकत असते तरी नेटाने संसार चालवतात. तिथले डॉक्टर्स (पुर्वीचे आणि आताचे ही) अगदी किरकोळ फिज घेऊन वैद्यकीय सेवा पुरविणाऱे आहेत. मिलिंद कुलकर्णी सरांनी खूपच चांगल्या प्रकारे निरीक्षणे नोंदविली आहेत. अगदी जिवंत चित्र उभं केलं आहे. परमेश्वर त्यांना बळ देवो हीच प्रार्थना... निरंजन तिनईकर

  15. shandilya_samant

      6 वर्षांपूर्वी

    वा मस्तच



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen