मानवा, सोड तुझा अभिमान

वयम्    subodhjawadekar    2020-09-25 15:25:10   

सुबोध जावडेकर हे विज्ञानकथा लेखक व विज्ञानलेखक म्हणून परिचित आहेत. त्यांची आत्तापर्यंत १६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या कथांचे सात भारतीय व तीन यूरोपियन भाषेत अनुवाद झाले आहेत. मेंदूविज्ञान हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. या विषयावर त्यांनी लिहिलेली 'मेंदूतला माणूस' (डॉक्टर आनंद जोशी यांच्या समवेत) व 'मेंदूच्या मनात' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. सध्या ते प्राण्यांची बुद्धिमत्ता या विषयाचा विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या अभ्यासातून जे ज्ञान हाती लागले आहे, त्यावर आधारीत हा लेख-

आपण पृथ्वीतलावरचे सर्वात प्रगत प्राणी आहोत, असा माणसाला मोठा गर्व असतो. आपण शेती करतो, गुरंढोरं पाळून दूधदुभतं मिळवतो, मोठ्यामोठ्या इमारती बांधतो, शहरं वसवतो, रस्ते बांधतो, प्रचंड धरणं बांधतो, दूरवर प्रवास करतो. अवजारं बनवतो. भाषा वापरुन एकमेकाशी संवाद साधतो. त्यामुळे संपूर्ण  जगात या सर्व बाबतीत आपण एकमेवाद्वितीय आहोत, असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्या गर्वाच्या या फुग्याला टाचणी लावून त्यातली हवा काढून टाकायचं काम मुंगीपासून हत्तीपर्यंत अनेक पशुपक्षी आपाआपल्या परीनं करत असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंग्या शेती करतात. बिव्हर्स नावाचे प्राणी मोठाली धरणं बांधतात. हत्ती चित्रं काढू शकतात. कावळे अवजारं वापरतात. मधमाशा एकदुसरीशी बोलायला नृत्याची भाषा वापरतात. इतकंच काय पण मासेमारीसाठी वापरले जाणारे कॉर्मोरॅन्ट नावाचे पक्षी संपसुद्धा करतात. मानवानं शेती करायला सुरुवात केली ती सुमारे 12 हजार वर्षापूर्वी. त्याच्या तब्बल पाच कोटी वर्ष आधीपासून काही जातीच्या मुंग्या शेती करत आहेत. झाडाच्या पानांवर वाढणार्‍या विशिष्ट प्रकारच्या बुरशीची (फंगस) शेती त्या करतात. पानांचे बारीकबारीक तुकडे करून त्यांच्यावर बुरशी वाढवतात, तिची मशागत करतात आणि ती पुरेशी वाढली की ती खातात. प्राणी घरं बांधतात हे आपण बघतो. सुगरणीसारखे पक्षी तर फारच सुरेख  घरटी बांधतात. मुंग्या वारुळं बांधतात. पण नॉर्वेजियामधल्या वाळव्या जे प्रचंड मोठं वारूळ बांधतात त्याला तोड नाही. त्यांचं हे वारूळ चार मीटर उंच असत. वाळवी फक्त पाच मिलीमीटर लांब असते. म्हणजे त्यांचं वारूळ त्यांच्या ८०० पट उंच असतं. आपण जर आपल्या ८०० पट उंच इमारत बांधायची ठरवलं तर आपल्याला ती ४०० मजली बांधावी लागेल! जगातली सर्वात उंच इमारत, दुबईतली ‘बुर्ज खलिफा’ केवळ 163 मजली आहे. म्हणजे सांगा, घर बांधण्यात तरबेज कोण? वाळवीचं वारूळ फक्त उंच असतं एवढंच नाही तर त्यात सर्व सुखसोयीही असतात. ते एयरकंडिशन्ड असतं. छोटीछोटी भुयारं खणून आतपर्यन्त हवा येईल अशी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे बाहेरचं तापमान कितीही वाढलं तरी आतल्या सगळ्या खोल्या थंड राहतात. वारुळात यायला-जायला प्रशस्त रस्ते असतात. शिवाय आत वाळवीच्या पिलांसाठी पाळणाघर, बागा, अन्न साठवायच्या खोल्या असतात. इतकंच नव्हे तर त्यांची शी-शू वारुळाबाहेर वाहून जाईल, अशी चोख व्यवस्था केलेली असते. अनेक जातीचे पक्षी आणि खारीसारखे प्राणी भविष्यकाळात उपयोगी पडावं म्हणून अन्न – मुख्यत्वे करून झाडांच्या बिया - जमिनीत पुरून ठेवतात. ‘स्क्रब जे’ नावाचा पक्षी जवळजवळ २०० निरनिराळ्या ठिकाणी बिया पुरून ठेवतो आणि त्या सगळ्या जागा त्याच्या लक्षात असतात. खारींची स्मरणशक्ती त्या मानानं बेताची असते. त्याही बिया पुरून ठेवतात पण बहुतेकवेळा त्या कुठं पुरल्या आहेत ते विसरून जातात! पुढं पाऊस पडला की त्या बिया रुजतात आणि झाड वाढू लागतं. खारींचा विसराळूपणा अशा रीतीने झाडांच्या पथ्यावर पडतो. जंगलं वाढवण्यात त्या खरोखरच ‘खारीचा वाटा’ उचलतात. कावळा, पोपट अशा काही पक्षांना सोपेसोपे हिशेब करता येतात. चीनमध्ये आणि दक्षिण आशियाई देशांत मासेमारी करण्यासाठी कॉर्मोरॅन्ट नावाच्या पक्षांचा उपयोग करून घेतला जातो. बदकांसारखे दिसणारे पण बदकांपेक्षा थोडे लहान असे हे पक्षी पाण्यात सूर मारून मासे पकडतात. पण त्यांच्या गळ्यात एक कडं घातलेलं असतं त्यामुळे त्यांना तो मासा गिळता येत नाही. मग तो मासा काढून घेण्यात येतो. या पक्षांना होडीतून नेऊन त्यांच्याकडून मासे पकडून घेतले जातात. त्यांनी सात मासे पकडून आणले की आठवा मासा त्यांना बक्षीस म्हणून खायला द्यायची पद्धत आहे. हे पक्षी इतके हुशार असतात की त्यांना आठपर्यन्त आकडे मोजता येतात. त्यांनी सात मासे पकडून आणून मालकाला दिल्यानंतर जेव्हा ते आठवा मासा आणतात तेव्हा जर त्यांच्या गळ्यातलं कडं काढून त्यांना तो खायला दिला नाही तर ते चक्क संप करतात. नवव्या खेपेला पाण्यात बुडी मारायला ते साफ नकार देतात. त्यांना खाली ढकललं किंवा हातानं जोरात फटका मारला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून ढिम्म बसून राहतात. माणूस कॉर्मोरॅन्ट पक्ष्याकडून मासेमारी करून घेतो. पण ग्रीन हेरॉन नावाचे पक्षी स्वतः शोधून काढलेल्या एका युक्तीनं मासे पकडतात. त्यासाठी आमिष म्हणून ते पाण्यात लहान किडे किंवा अन्नाचे छोटे तुकडे टाकतात. ते खायला मासे आले की पटकन चोचीनं उचलून त्यांना गट्ट करतात. मासेमारीची ही पद्धत त्यांना त्यांच्या आईबाबांनी शिकवलेली नसते की दुसर्‍या कुणा पक्षाचं बघून ते तसं करत नसतात. ती त्यांनी स्वतःचं डोकं वापरुन स्वतःच शोधून काढली असते. या पद्धतीनं मासे हमखास गळाला लागत असूनही फारच थोडे हेरॉन्स मासेमारीची ही पद्धत वापरताना दिसतात. कारण माणसांत जसे सगळेच जण हुशार असत नाहीत तसे सगळेच हेरॉन्सही हुशार असत नाहीत. शिकार करण्यासाठी गळ टाकून बसणारे हे पक्षी हे काही प्राणीजगतातलं एकमेव उदाहरण नाही. निर्बुद्ध समजल्या जाणार्‍या सुसरीसुद्धा ही युक्ती वापरतात. त्या तोंडात काटक्या घेऊन, अजिबात हालचाल न करता शांत पडून राहतात. सुसरीची खडकासारखी पाठ आसपासच्या दगडात मिसळून गेल्यामुळे आपल्या घरट्यासाठी काटक्या गोळा करणार्‍या पक्षांना ती सुसर आहे हे समजतच नाही. काटकी उचलायला ते जवळ आले की लगेचच सुसर त्यांच्यावर झडप घालून त्यांना गट्ट करुन टाकते. माणसं तराफे बांधून दूरवरचा प्रवास करतात. पण अर्जेंटिनामधल्या एका जातीचे मुंगळे एक जिवंत तराफा बनवून प्रवासाला निघतात. या मुंगळ्यांना पुराच्या आपत्तीला नेहमीच तोंड द्यावं लागतं. पुराचं पाणी वारुळात शिरल्यावर सगळे मुंगळे एकमेकांचे पाय एकत्र गुंतवून एक तराफा बनवतात. या मुंगळ्यांच्या शरीरातून एक प्रकारचा मेणाचट द्रव स्रवतो. त्यामुळे त्यांच्या शरीराला पाणी चिकटत नाही. पाण्याचा पृष्टीय ताण आणि मुंगळ्यांच्या व पाण्याच्या मध्ये अडकलेली हवा यामुळे हे मुंगळ्यांचं गाठोडं पाण्यावर तरंगू शकतं. एकदा का हा तराफा तयार झाला की कामकरी मुंगळे राणीमुंगी आणि अंडी त्यावर आणून ठेवतात. हजारो मुंगळ्यांचा बनलेला हा तराफा पाण्याबरोबर वहात वहात जाऊन कित्येक आठवड्यांनी, काही किलोमीटर अंतर कापून, दुसर्‍या किनार्‍याला लागतो. लगेचच कोरडी जागा बघून मुंगळे तिथं नवीन घर बांधतात आणि आपलं नवं आयुष्य सुरू करतात. ह्या जिवंत तरफ्यातले मुंगळे खायला मासे टपलेलेच असतात. तराफ्याच्या कडेचे बरेचसे मुंगळे माशांच्या भक्षस्थानी पडतात. पण इतरांनी सुरक्षित जागी पोचावे म्हणून ते आपल्या प्राणांचं बलिदान देतात. मुंगळे आपल्यापेक्षा सुमारे दोनशेपट लहान असतात. त्यामुळे त्यांनी या तराफ्यातून जरी फक्त पाचदहा किलोमीटर अंतर कापलं तर त्यांच्या दृष्टीनं ते दीडदोनहजार किलोमीटर्संइतकं असतं. म्हणजे तरफ्यात बसून मुंबईपासून दुबईपर्यंत गेल्यासारखं झालं की! मधमाशा मध शोधण्यासाठी दूरवर जातात. मध मिळाला की परत येऊन मधाची फुलं कुठं आहेत ते इतर मधमाशांना कसं सांगत असतील? -नाच करून! होय, हे त्या नृत्याच्या द्वारे सांगतात. अशा प्रसंगी मधमाशा जो नाच करतात त्याला Waggle Dance म्हणतात. Waggle म्हणजे नागमोडी चाल. मध असलेल्या फुलांचा ठावठिकाणा माहीत असलेली मधमाशी मधाच्या पोळ्यावर नागमोडी पद्धतीनं थोडं अंतर जाऊन डावीकडे वळते. मग यू टर्न घेऊन आधी चाललेल्या मार्गानं बरोबर तेवढंच अंतर चालते. मग उजवीकडे वळून थोडं अंतर जाऊन पुन्हा यू टर्न घेते. मग पुन्हा आधी चाललेलं अंतर नागमोडी चालीनं कापून पुन्हा डावीकडे वळते. इंग्रजीत ज्याला ‘फिगर ऑफ एट’ – आठाचा आकडा म्हणतात, तसा हा नाचाचा मार्ग असतो (चित्र पहा). या नाचाच्या द्वारे ती फुलं कुठल्या दिशेला आणि किती अंतरावर आहेत ते ती सांगत असते. उदाहरणार्थ नाच करताना तिनं जर सरळ रेषेतलं अंतर एका सेकंदात कापलं तर समजायचं की फुलं एक किलोमीटरवर आहेत. आणि नाचताना ती सूर्यकिरणांशी किती अंशाचा कोन करते त्यावरून फुलं कुठल्या दिशेला आहे ते इतर मधमाश्यांना समजतं. बीव्हर हा एक उंदरासारखा दिसणारा पण उंदरापेक्षा बराच मोठा प्राणी. आकारानं हा एखाद्या लहान मेंढीएवढा असतो. हा युरोप आणि अमेरिकेत सापडतो. बीव्हर उत्तम पोहतो. पंधरावीस मिनिटं पाण्याखाली राहू शकतो. तळ्याच्या काठाला बीळ करून त्यात राहतो. त्याच्या घराचं प्रवेशद्वार म्हणजे बिळाचं तोंड पाण्याखाली असतं. त्यामुळे त्याचं कुटुंब लांडगा किंवा अस्वलासारख्या त्याच्या पिढीजात शत्रूपासून सुरक्षित असतं. पण जवळपासच्या परिसरात एखादं तळं किंवा डबकं मिळालं नाही तर? अशावेळी तो ओढ्यावर चक्क एक धरण बांधून स्वतःच तळं तयार करतो. धरण बांधण्याआधी ज्या ओढ्यावर धरण बांधायचं आहे, त्याची तो नीट पाहणी करतो. जिथं ओढ्याचं पात्र अरुंद असेल त्या जागेची निवड करतो. मग चारपाच मोठी झाडं तोडून त्यांचे बुंधे तळाच्या चिखलात उभे रोवतो. झाडं तोडण्यासाठी तो आपल्या बळकट दातांचा वापर करतो. झाड खाली पाडल्यावर त्याच्या फांद्या तोडून, बुंधा ढकलत ढकलत ओढ्यापर्यन्त आणतो आणि त्याला धरून पाण्यातून पोहत धरणाच्या नियोजित जागी आणतो. झाड ओढ्यापासून दूर असलं तर त्या झाडापर्यंत एक पाट खणतो. त्या पाटात पाणी भरलं की त्याच्यातून तो बुंधा ढकलत आणणं त्याला सोपं जातं. मग या उभ्या रोवलेल्या खांबांचा आधार घेऊन लहान फांद्या, काटक्या, झाडाच्या डहाळ्या त्याच्यात आडव्या रचतो आणि धरणाचा सांगाडा तयार करतो. या सांगाड्याच्या आत पानं, शेवाळं, चिखल, दगड वगैरे भरून धरण तयार करतो. धरणात फार जास्त पाणी साचलं तर धरण फुटू शकेल याची त्याला कल्पना असते. म्हणून खर्‍या धरणात जशा जास्तीचं पाणी वाहून जाण्यासाठी झडपा ठेवलेल्या असतात तशा बीव्हरनं बांधलेल्या ह्या धरणातही काही फटी त्यानं मुद्दाम ठेवलेल्या असतात. मुंग्या, मधमाशा, वाळवी, हेरॉन पक्षी, बिव्हर्स यांची ही कर्तबगारी पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. पण अशा विलक्षण करामती करणारे जगातले हे काही एवढेच प्राणी नाहीत. भुंगे, कावळे, पोपट, उंदीर, सरडे, तरसं, डोल्फिन्स, कुत्री, हत्ती यासारखी शेकडो जनावरंसुद्धा कधीकधी आपण आश्चर्यानं तोंडात बोट घालू अशा अचाट गोष्टी करतात. इतकंच नाही तर आपण ज्यांना बिनडोक समजतो अशी डुकरं आणि गाढवंसुद्धा काही वेळा बुद्धीची चमक दाखवतात. तेव्हा थोडक्यात, माणसानं आपल्या कर्तुत्वाचा आणि बुद्धीचा वृथा अभिमान बाळगू नये, हे उत्तम.

              -सुबोध जावडेकर,

subodh.jawadekar@hotmail.com

पूर्वप्रसिद्धी- ‘वयम्’ दिवाळी अंक २०१५  


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.