वाचनानंद

वयम्    शुभदा चौकर    2020-10-14 23:57:37   

१५ ऑक्टोबर हा  डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वयम्’ मासिकाच्या ऑक्टोबर २०१५च्या  अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख, आज तुम्हा सर्वांना वाचायला देत आहोत-

वाचनानी मला खूप काही दिलंय... अगदी भरभरून दिलंय. नवनवे अनुभव, विचार, दृष्टिकोन हे तर नक्कीच. पण त्या पलीकडे जे काही मी वाचनाच्या सोबतीने अनुभवलं, ते आज मला तुमच्याशी शेअर करायचंय. एक आई म्हणून मी माझ्या मुलीबरोबर जी जी मजा केली, त्यात पुस्तकांचा क्रम पहिला आहे. ती अगदी तान्ही असतानाही मी तिला रोज काहीतरी वाचून दाखवायची आणि तीही माझ्याकडे टक्क बघत ते शांतपणे ऐकायची. तिला काय कळायचं, काय माहीत! पण तिला ते आवडायचं बहुतेक. तिच्या वयाच्या दुसऱ्या-तिसर्‍या वषार्पासून आम्हां दोघींचं एकत्र वाचन सुरू झालं. माधुरी पुरंदरेंच्या चित्रवाचनाचे मोठाले तक्ते, लाल पतंग, शेपट्या अशी NBT ची चित्रमय पुस्तके, Highlights मासिकातील Find the Hidden Pictures मालिका, श्याम जोशींच्या मार्मिक चित्रांची पुस्तकं हातात घेऊन आम्ही मनसोक्त गप्पा मारायचो. एकेका चित्रावर आम्ही कित्ती प्रकारे बोलायचो! ती चार-पाच वर्षांची असताना आमच्या दोघींच्या एकत्र वाचनात 'राधाचं घर’, 'आमची शाळा’ अशी माधुरी पुरंदरेंची गोड पुस्तकं आली. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या छोट्या पुस्तकांतून मुकुंद टाकसाळे अनुवादित- 'बेगम गुलाबोमावशी’ आणि ‘भटकबहाद्दर बोकोबा’ आले. एका विदेशी प्रकाशनाचं 'लेमूर’ हे पुस्तक आम्ही वाचायचो. त्यातला लहानगा लेमूर जरा भित्रा होता. झाडावर उड्या मारायला घाबरायचा, आईच्या कुशीलाच चिकटून राहायचा. त्याला उड्या मारायला भाग पाडण्यासाठी त्याची आई एकदा त्याचा हात सोडून देते आणि त्याला फांदीवर झेप घ्यायला लावते. हा प्रसंग वाचताना माझी लेक रडू लागायची, तिची अबोल मुसमुस ऐकून माझेही डोळे पाणावायचे. 'डेनिसच्या गोष्टी’ वाचताना ती खिदळायची. 'जंगलबुक’ वाचताना कातर व्हायची. डिस्नेच्या 'सिंड्रेला’, 'थिंबलिना’, 'लिटिल मर्मेड’ या परीकथा ऐकण्यात रमून जायची. ती सात-आठ वर्षांची असताना मग थोडं तिने वाचायचं, थोडं मी वाचून दाखवायचं असा दुहेरी प्रयोग सुरू झाला. जी. ए. कुलकर्णी यांचे 'बिम्म’ आणि 'मुग्धा’ हे आमचे सवंगडी झाले. 'तोत्तोचान’, राजीव तांबेची 'मोरू’, 'डुकरू’ मालिका, निलीमकुमार खैरेचा 'चंदूकाका’, विंदांच्या बालकविता यांची तर आम्ही पारायणं केली. डॉ. यश वेलणकर यांचं 'अवयव बोलू लागतात’ तिच्या डोक्यात  इतकं भिनलं होता की, तिने दुसरीत असताना तिच्या शाळेत एका कार्टूनच्या चित्रातील दातांना कॅप्शन लिहिली- 'यांत एनामेल असतं.’ शाळेतल्या ताई थक्क झाल्या. त्यांनी हे पुस्तक आमच्याकडून मागवून घेतलं आणि वर्गात त्याचं वाचन केलं. ती नऊ वर्षांची असेल, आमचा प्रकाशक मित्र विकास परांजपे याने जिव्हाळ्याने माझ्यासाठी पाठवलेलं (आणि तिने तेव्हा ते एकटीने वाचणं अपेक्षित नसलेलं) नव्याने प्रकाशित झालेलं 'हॅनाची सुटकेस’ तिने एकटीने गुपचूप वाचलं आणि तिला रडूच कोसळलं. दुपारी मी ऑफिसमध्ये असताना तिचा मला फोन- 'आई, लवकर घरी ये ना, मला खूप रडू येतंय...’ मी कारण ओळखलं; हिने आगाऊपणे ही करुण कथा वाचली असणार. ते पुस्तक तिच्या भावविश्वाचा एक भाग होऊन बसलंय! या काही पुस्तकांना ती अजिबात घराबाहेर जाऊ देत नाही. सहावी-सातवीत असताना केव्हातरी तिने जयंत नारळीकरांचं 'प्रेषित’ वाचलं, तिला ते प्रचंड आवडलं, असं तिने सांगताच मी तिला मिठीच मारली. कारण माझ्या कुमारवयात मला प्रचंड आवडलेल्या त्या कादंबरीवर आता तिचंही प्रेम जडलं होतं. तेव्हापासून माझा बुक-शेल्फ  तिचा झाला. माझ्या संग्रहातील पुस्तकांवर ती डल्ला मारू लागली. बघता बघता आमच्या दोघींचे शेल्फ एकरूप झाले. आता एक वेळ अशी आली की, तिची आवडती पुस्तकं तिच्याकडून माझ्याकडे आली. प्रकाश नारायण संतांची ‘पंखा’, ‘वनवास’, शांता शेळके यांनी अनुवादित केलेलं 'चौघीजणी’, वर्षा गजेंद्रगडकर यांनी अनुवादित केलेलं 'गॉन वुईथ द विंड’, Luisa Alcott  चं ' Little Men’ अशी कितीतरी... वाचनवेडाचं हे संक्रमण माझ्यातल्या वाचन-प्रेमी आईला खूप सुखावणारं होतं. रोजच्या वृत्तपत्रांतील लेखांचे आशय, त्यावरील मतं यांवर आमच्यात सहजपणे गप्पा होत राहतात. त्यातून लक्षात येतं की आपली विचारशैली घडण्यात वचन आणि त्यावरील शेयरिंग यांचा वाटा किती महत्त्वाचा असतो! वाचनातून मिळालेले कितीतरी आनंदाचे क्षण, अनुभव, विचार आम्ही एकमेकींना कायम सांगत राहतो. एवढंच काय, पुस्तकं आम्ही अनेकदा एखाद्या थेरपीसारखी वापरतो. काही कारणाने उदास, खिन्न वाटलं, कसला ताण आला, उगाच चिडचिड झाली की एखादं पुस्तक उघडायचं आणि वाचत बसायचं... मूड एकदम पालटून जातो. एकीकडे, आजची लहान मुलं वाचनापासून दूर चालली असल्याची तक्रार सार्वत्रिक असली तरी ‘वयम्’ मासिकाच्या निमित्ताने मला वाचनात दंग होणारी मुलंसुद्धा कितीतरी भेटतात. आणि ज्या मुलांना वाचनाची गोडी अजून लागलेली नाही, त्यांना ती लावणं ही आमची जबाबदारी आहे, असंही कायम वाटत राहतं. तुम्हां सर्व वाचकांची वाचनाची प्रेरणा सतत जागी राहो आणि आपल्याबरोबरीने अनेकांना वाचतं करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची प्रेरणा मिळत राहो, ही सदिच्छा!

-शुभदा चौकर

cshubhada@gmail.com

(पूर्वप्रसिद्धी- वयम् मासिक, ऑक्टोबर २०१५  )

 

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.