मी पुण्याची.. त्यामुळे मला सायकल, स्कूटर, बाईक्स चालवता येते हे वेगळे सांगायला नकोच. वयाच्या १९व्या वर्षापासून टू व्हीलर चालवायचे. पुण्यात सरसकट सगळ्याच वाहनांना “गाडी” शब्द वापरायचो. लग्नानंतर मुंबईला आल्यावर ह्या ‘गाडी’ शब्दावरून बरेच टोले खाल्ले..अगं, गाडी काय? गाडी म्हणजे four wheeler. Scooty म्हण किंवा बाईक म्हण..” इत्यादी इत्यादी. पण ह्या सगळ्यात मला जाणवले ते म्हणजे आपल्याला four wheeler चालवता येत नाही.
आम्ही मारुती 800 घेणार होतो म्हणून आम्ही नवरा-बायको दोघांनीही driving school ला नावं टाकली. मी शिकताना तो मागे आणि तो शिकताना मी मागे आणि ट्रेनर driving seat च्या बाजुला. नवऱ्याने ह्यापूर्वीच मुंबई-पुणे हायवे वर आर्माडा चालवली होती त्यामुळे त्याची confidance level बरीच वर होती. तर त्यावेळी नोकरी नाही, नवीन शहर, नवे रस्ते ह्यामुळे माझी मात्र अगदी नेहेमीप्रमाणे शून्याच्याही खाली होती. एकीकडे स्टीअरिंग सांभाळा, आरशांमधून मागे बघा, क्लच दाबा, गिअर्स बदलताना त्या ट्रेनरच्या हाताचा स्पर्श चुकवा...ह्यात माझी तारांबळ उडे.
ब्रेक दाबता येत नाही ह्याचा तर मला न्यूनगंडच आला होता. अचानक कोणी मध्ये आलं, वळताना किंवा खड्डा आला तर माझ्या अंदाजाने मी ब्रेक दाबण्यापूर्वी माझा नवरा “ब्रेssssक, उडवशील कोणालातरी” असं काळजीने ओरडायचा आणि माझे पाय त्या ब्रेक वर जाण्यापूर्वीच ट्रेनर त्याच्यासमोरचा जोडलेला ब्रेक दाबून मोकळा झालेला असायचा. गाडी सुरु होतानाच सारखी बंद पडायची. स्टीअरिंग फिरवताना इकडे तिकडे पहिलं तर गाडी भलतीकडेच जायची आणि ट्रेनर मला, “मेडम, किधर जा रही है?” असं उपहासाने म्हणतोय असं मला वाटायचं आणि मला आराश्यामधून मागच्या सीटवरून माझा नवरा गालातल्या गालात हसताना दिसायचा.
एरवी झाशीच्या राणीप्रमाणे बाईकवर स्वार होऊन गर्दीतून लीलया पुढे जाणारी मी, पण इथे मात्र माझा अगदी भित्रा ससा झाला होता. Driver seat थोडी खाली असल्याने ताठ बसून मान वर करून गाडी चालवायचे. तसंच सगळं लक्ष विविध controls वर असल्याने तोंड उघडे पडायचे आणि चेहेऱ्यावर जन्मतः असलेला बावळटपणा अजूनच गडद व्हायचा. एकदा तर एका वळणावर बाहेरचा एक मवाली,” ए, तोंड बंद करून चालव” असं ओरडला सुद्धा. एकंदर, गाडी शिकणे हा माझ्यासाठी अतिशय मानभंग करणारा, स्वाभिमानाला तडा देणारा आणि आत्मविश्वास नाहीसा करणारा अनुभव होता.
मग घरी आल्यावर झोपताना खूप रडायचे आणि नवरा समजवायचा, “येईल तुला नक्की, काळजी नको करूस. अगं, तुला बाईक येते न तश्शीच चालवायची.” पण दूर दूर पर्यंत मला गाडी येईल असं मलाच वाटत नव्हतं. थिअरी सगळी व्यवस्थित जमायची. त्याची उजळणी करायचे. पण घडलेल्या किश्शांची उजळणी करताना माझ्या नवऱ्याच्या चेहेऱ्यावर थोडं जरी हसू दिसलं कि संपलं, माझं अवसान पार तळागाळाला पोहोचायचं. अशातच नवऱ्याच touring आलं आणि शेवटचे 15 दिवस मी एकटीनेच ट्रेनिंग घेतले. तरीही ड्रायव्हिंग टेस्टच्या वेळी नवरा पूर्ण कॉन्फिडन्ट आणि मी मात्र घाबरलेली.
महिनाभर घेतलेलं सगळं ज्ञान पणाला लावून टेस्ट दिली. पण ट्रेनरची ती खजील करणारी वाक्य ऐकली की ”साहब, आपका तो क्या हो जायेंगा..पर मेडेम, आप चिंता मत करो, वो अफिसर सब पहचानवाले है...वो सब संभाललेंगे...आपकाभी काम हम कर देते है...” आणि मिळालेलं License सुद्धा मी न्युनगंडातच स्वीकारलं. १९९० ला मिळालेलं driving license २०१२ साल येईपर्यंत नावापुरतेच राहिले. मला गाडी चालवायची संधी फक्त रात्री ११ नंतर सगळे रस्ते मोकळे असतील तर किंवा कोकणात कुडाळ-विजयदुर्ग अशा सुनसान हायवेवर सरळ रस्ता असेल तर मिळायची. बाजुला माझा तारणकर्ता, विघ्नहर्ता नवरा डोळ्यात तेल घालून माझ्या driving वर लक्ष ठेवायचा. ‘ब्रेक’ हा त्याचा खूप आवडता शब्द.
तरीही तो मध्येच मला, “पळव आता, कोणी नाहीये आजुबाजुला” असं सांगायचा आणि जरा गाडी पळवण्याचा आनंद घेतेय तोच “ब्रेssssक” असं ओरडायचा. त्याच्या दचकण्यातून बाहेर येउन तो नक्की ‘ब्रेक’ असे का म्हणाला ह्याची मी आराशामधून बघून शहानिशा करतेय तोच, तो सांगायचा “अगं स्टीअरिंग कडे लक्ष दे, गाडी पलीकडच्या लेन मध्ये जातेय समोरून वाहनं येताहेत”. म्हणून ब्रेक दाबून स्टीअरिंग फिरवेपर्यंत एखादा ‘चढाव’ यायचा. मग ‘फर्स्ट गिअर टाक गाडी बंद पडेल’ अशी सुचना यायची. हे सगळं इतक्या झपाट्याने घडायचं की तोपर्यंत गाडी बंद! मागून ट्रक्स, कार्सचे ड्रायव्हर्स होर्नस वाजवायचे, रागारागाने माझ्याकडे बघायचे. “येत नाही तर कशाला चालवतात या बायका गाड्या?’ असे भाव त्यांच्या चेहेऱ्यावर दिसायचे आणि माझा स्त्रीप्रधान विचारांना खिजावल्यासारखे व्हायचे.
माझा नवरा त्वरेने माझ्या मदतीला धावून यायचा. म्हणजे मला पुन्हा start म्हणायचा नाही तर पटकन बाजूच्या seat वरून उठून कारच्याबाहेर पडायचा मागच्या सर्वांना sorry म्हणायचा आणि मला तिथूनच seat बदलायला सांगून स्वतः driver seat वर बसायचा. horns थांबायचे आणि आमची गाडी पुढे जायची. बरं, हे सगळं घरच्या मंडळींसमोर घडायचं. एकदा तर कोल्हापूर-पुणे रस्त्यावर माझ्या चुलत सासुसासऱ्यांना माझं driving skill बघायला मिळालं. आम्ही सगळे खूप हसायचो. माझा ‘बिचारा’ नवरा मला दिलासा द्यायचा...”जी चालवलीस ती मस्तच चालवलीस.” पण माझं मन मात्र अगदी चूर-चूर व्हायचं कारण मला माहित असायचं कि मी चांगली चालवायचे तेव्हा रस्त्यावर कोणीच नसायचं आणि रस्ता एकदम सरळसोट असायचा...फक्त वेगाने चालवणे जमायचं..वेग कमी करून controls ठेवायला नाही जमायचे.
पुढे माझी धाकटी मुलगी माझी ह्या प्रसंगातून सुटका करायची. कुठे प्रवासात रस्ता मोकळा मिळाला की नवरा विचारायचा, “काय चालवणार का?”. आणि माझी धाकटीच सांगायची, “नाही, मला आई हवी...”. मग काय, तिचं नाव पुढे करून मी आपली बाजूच्या seat वर झोपून जायचे. २०१२ साल उजाडलं... लायसन्स मिळून १३ वर्ष होऊन गेली होती. साठ्ये कॉलेज मधल्या नोकरीत स्थिरस्थावर होऊन १० वर्षे झाली होती. जनसंपर्कामुळे म्हणा किंवा प्रयत्नांनी म्हणा, तसा आत्मविश्वासही दुणावला होता. पुण्यात एकदा M. Sc. च्या मैत्रिणीला कार चालवताना नीट निरखून पहिले आणि वाटलं आपल्याला पण अशी चालवता येईल कि कार. अशातच एकेदिवशी सासऱ्यांनी जाहीर केलं की ते Tata Nano विकत घेणार आहेत आणि २९ जानेवारी २०१२ ला सासुबाईंच्या वाढदिवसादिवशी चक्क nano आणली सुद्धा!
Nano घरी आली आणि पहिल्या फेऱ्या झाल्यावर चार दिवस ती तशीच पडून राहिली. नवरा आणि दीर ऑफिसला. चालवणार कोण? एक दिवस दुपारी कॉलेजमधून घरी आले. धाकटीला घ्यायला आमच्या वरच्या घरी गेले आणि सहज म्हणाले, ”खरंतर आत्ता दुपारी गाडी चालवायला हवी तर येईल चालवता...”. माझे सासरे उठून त्यांच्या खोलीत गेले आणि बाहेर येताना हातात nano ची चावी आणली. मला म्हणाले, “ जा बिनधास्त”. माझ्या मनात मिश्र भावनांची कालवाकालव झाली. अजून जेवण बाकी होतं, त्यामुळे भूक लागली होती. पण आता गाडी चालवायची आहे ह्या उत्सुकतेपोटी ती तशीच मागे गेली. भीती वाटली...आपल्याला नाही आली तर? नवरा आत्ता ऑफिसमध्ये होता. एकीकडे मनात म्हणाले, “आत्ता नाही तर कधीच नाही”. धडधडत हात पुढे केला. माझा भाचा cum पुतण्या ओजस तेव्हा ९ वीत होता. तो पुढे झाला. मला म्हणाला, ”चल काकू, मी येतो तुझ्याबरोबर.”
मला धीर आला. मनात म्हटलं ‘चला, तेवढाच बुडत्याला काडीचा आधार! Nano च्या driving seat वर बसले. बाजुला पुतण्या बसला. स्टीअरिंग, क्लच, ब्रेक, गिअर्स, अक्सिलीरेटर हे सगळं जणु काही माझ्याच देहायष्टीला अनुकूल असे बनवले आहेत असं मला वाटलं. आत्मविश्वासाने seat belt लावला. गाडी कॉलनीच्या बाहेर काढली. बाजुला बसलेला ओजस, “काकू..मस्त. चालव बिनधास्त..” असं म्हणाला आणि मुठभर मांस चढलं. दुपारच्यावेळी गर्दी नसलेल्या पार्ल्याच्या तेजपाल स्कीम मध्ये गाडी नेली. प्रत्येक वळणावर गाडी बंद पडायची. पण ओजस माझं धैर्य वाढवायचा, “काकु, घाबरू नकोस. कर चालू... माझ्या बाबांची पण अशीच बंद पडायची.” मागच्या गाड्यांचे horns जोरात वाजायला लागले कि मी अस्वस्थ व्हायचे. पण ओजसची वाक्य मला दिलासा द्यायची, “काकू, लक्ष देऊ नकोस. मुद्दाम नवशिकी बघून होर्न वाजवत आहेत. तू घाबरू नकोस. चालवत रहा.”
त्याला गाडी चालवता येत नव्हती त्यामुळे तो असंच म्हणणार असं एखादा म्हणेल. पण “काकू, काय तू ? तुला एवढी पण येत नाही? मी नाही बाबा उद्यापासून येणार...”, असं तो म्हणाला असता तर? तर मी धाडस केलेच नसते. रोज दुपारी तो शाळेतून आणि मी कॉलेजमधून घरी आले कि जेवणानंतर गाडी चालवायला जायचो. आणि व्हायचं तेच झालं. एखाद्या सिनेमात घडते तसे झाले. मला वळणावळणामधून गाडी चालवता येऊ लागली. मध्ये मध्ये बंद पडणं हळूहळू कमी झालं. ओजसच्या कौतुकाच्या शब्दांमुळे आणि धीर देण्यामुळे मी आठ दिवसात गाडी शिकले. पुढच्या आठ दहा दिवसात गाडी कॉलेजला नेली. रस्त्यावर nano तशी नवीन होती. टाटांनी तिची पब्लिसिटीच अशी केली होती ना कि ती ‘गरिबांची गाडी’ असं लोकांचं इम्प्रेशन झालं होतं. त्यामुळे रस्त्याने जाताना लोकांच्या चेहेऱ्यावर मिश्र प्रतिक्रिया दिसत.
कोणी संपूर्ण भारतीय बनावटीची म्हणून नवलाईने बघत, कोणी “Nano! Nano!” असं ओरडत तर कोणी शी! nano..कसली boring गाडी आहे असं म्हणत हिणवून बघत. पण मी ह्या सगळ्याच्या पुढे होते. आपल्याला कार चालवता येते ह्या आनंदापुढे मला कशाचाच त्रास होत नव्हता. कॉलेजमधून येताना बहुतेकवेळा मैत्रीण बरोबर असायची. तिला महिलासंघापाशी सोडलं कि माझी सवयीची ‘तेजपाल स्कीम’ यायची आणि मी घरी यायचे. म्हणजे घर ते कॉलेज आणि परत घरी असा जेमतेम 3 किलोमीटर गाडी चालवायचे. पण प्रवासात धडधड वाढलेली, हात थंडगार, मान ताठ आणि श्वास रोखलेला अशी अवस्था असायची.
त्यात एक दिवस गंमत झाली. सकाळी पावणे सातच्या सुमारास कॉलेजला जाताना माझ्या पुढे पोलिसांची patroling van खूप हळुहळु चालली होती. त्यामुळे मला nano सुद्धा डावीकडे ठेऊन हळू चालवताना बंद न पडू द्यायची कसरत करावी लागत होती. एक गस्त घालणारा पोलीस डाव्याबाजुने चालला होता. त्याने अचानक खिशात हात घातले. मागून येणाऱ्या माझ्या गाडीच्या आरश्याचा त्याच्या त्या हाताला धक्का लागला. नशीब त्याला कुठे लागले नाही. पण त्याचा खिसा फाटला. समोरच्या पोलिसांच्या गाडीतून पोलीस बघतच होते. त्यांची गाडी थांबली. मला पण गाडी बाजुला घ्यायला सांगितली. जवळजवळ १५ ते २० पोलीस माझ्या भोवती रागावून उभे होते. मी त्यांना पूर्ण शरण गेले होते. सर्व प्रकारच्या शिक्षेला तयार होते. पण सुदैवाने मी ‘प्राध्यापिका आहे’ म्हणून मला समज देऊन सोडण्यात आले.
त्यादिवशी घरी जाताना पाय लटपटू लागले. मग एका कॉलेजच्या ऑफिसमधल्या एका मित्राला बरोबर घेतले. साठ्ये कॉलेजभोवती दोन तीन चक्करा मारल्या. आणि मग जमतंय असं वाटल्यावर भीती गेली. त्याला कॉलेजला सोडून मी घरी गेले. हळुहळू आत्मविश्वास वाढत होता. मोठ्या मुलीला गोरेगाव (प.) येथे भरतनाट्यम नृत्याच्या सरावाला न्यायचे होते. जवळजवळ महिनाभर S. V. रोडच्या ट्राफिकमध्ये गाडी कमी वेगाने गाडी चालवण्याची इतकी प्रक्टिस झाली कि आता हात थंड पडणे वगरे बंद झाले होते. तरी अजून लांब अंतर एकटे जायला भीती वाटायची. माझ्याबरोबर कधी आई, कधी सासूबाई, कधी मैत्रीण तर कधी बहिण cum जाऊ असं कोणीनाकोणीतरी असायचंच. त्यातच मी माटुंग्याला ICT येथे Ph.D. साठी प्रवेश घेतला.
इतक्या लांब जायचे तर कोणी न कोणीतरी बरोबर असायचेच...कधी बहिण कधी सासरे कधी सहकारी...पण कधीतरी एकटे जायलाच हवे होते. एके दिवशी नवऱ्याला foreign ला जायचे होते. मी सांगितले, “ मी सोडते airport वर”. नवरा बाजुला बसला. त्याला एकदाही सुचना द्यावी लागली नाही. खाली उतरताना मनापासून शाबासकी दिली, “छान चालवलीस. अंधेरी-कुर्ला रोडचा ट्राफिक झेपवलास...मस्त...असं म्हणाला. आनंद गगनात मावेना! घरी पोहोचल्यावर फोन केला. तरी बरोबर सासूबाई आणि बहिण होत्याच. पण आता ठरवलं माटुंग्याला एकटे जायचे. आत्मविश्वासाने गाडी काढली. धारावीच्या भागात आजुबाजुला मोठे मोठे ट्रक्स आणि मिक्सर्स होते. पण मी घाबरले नाही. आणि ICT मध्ये पोहोचले. येताना मात्र मी आनंदाच्या शिखरावर होते. Western Express Highway ने घरी परतत होते. बाजुनी मर्सिडिस, ह्युंदाई, टोयोटा अशा एका पेक्षा एक अलिशान गाड्या शानदारपणे चालल्या होत्या. पण मीही माझी ‘Tata Nano’, रहदारीचे सगळे नियम पाळत, अगदी तितक्याच किंवा त्याहून जास्तच अभिमानाने, आनंदाने आणि दिमाखात पळवत होते!
लेखिका - प्रा. सुकृता पेठे पदार्थविज्ञान विभाग, साठ्ये कॉलेज. व्यंगचित्र: स्नेहल मालसे Google Key Words - Sukruta Pethe.
माझी Nano सवारी!
निवडक सोशल मिडीया
सुकृता पेठे
2018-02-14 20:46:45
Vilas Ranade
4 वर्षांपूर्वीछान लेख लिहिला आहे.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीअतीशय प्रामाणिक लिखाण.
Vilas15
5 वर्षांपूर्वीmadam, ushira lekh vachayala milala, mazya baykola aaj suddha driving licence asun suddha gadi yet nahi karan mich aahe mi bajula basalyamule tila kadhi confidence yeu dilach nahi. aso pan atta jar tine mhatale tar mi nakki bajula basen.
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीमहिलांचे प्रतिनिधित्व करणारा. स्वानुभवाने स्मरण करुन देणारा लेख. म्हणूनच मनापासून भावला
Anand24
7 वर्षांपूर्वीWah! mastach lekh.
anantpalav
7 वर्षांपूर्वीआपला लेख सौ.ला मी मुद्दाम वाचायला देणार. गेली १५ वर्षे तिला गाडी शिकवतो. धन्यवाद .
केतकी
7 वर्षांपूर्वीखूप छान सुकू...I m going through the same situation right now.....बघू कधी जमतंय मला...?
Vasudha soman
7 वर्षांपूर्वीKhup Sundar sukruta.......sagala samor ghadtay asa vatala. Mala kuthalach vahan chalavta yet nahi. He vachalyawar vatatay mala pn Jamel.
स्मिता पेठे
7 वर्षांपूर्वीसुकृता नेहमी प्रमाणे सहज सुंदर..
चारचाकी चालवू इच्छिणाऱ्या पण मनात भिती असणाऱ्या , विशेषतः स्त्री वर्गाची मॉडेल होणार आता तू…
Rashmme
7 वर्षांपूर्वीSuku sahaj ani Sundar lihil aahes
Tuza aajun ek pailu disala
Keep writing dear!
Shripad Joshi
7 वर्षांपूर्वीSukruta – very good. Kept of reading!! Keep it up…???
Varsha
7 वर्षांपूर्वीखूपच छान. इतकं भरभरून लिहितेस की असं वाटतं की हे सगळं आमच्या समोरच घडलंय. तुझा आत्मविश्वास बघून इतरांनाही नक्कीच बळ मिळेल. नॅनो प्रमाणेच आणखीही अनेक अलिशान गाड्यांची दिमाखदार ‘सवारी’ तुला लाभो!
Abhay Joshi
7 वर्षांपूर्वीछान ओघवत्या भाषेत ष्टोरी जमलीय की……………मस्त
सीमा
7 वर्षांपूर्वीखूप छान लिहिलं आहेस सुकृता.
विरेंद्र
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख लिहिला आहे मैडम नी.
अमर पेठे
7 वर्षांपूर्वीवाह, छान लेख….
Varsha Bapat
7 वर्षांपूर्वीखूपच छान. इतकं भरभरून लिहितेस की असं वाटतं की हे सगळं आमच्या समोरच घडलंय. तुझा आत्मविश्वास बघून इतरांनाही नक्कीच बळ मिळेल. नॅनो प्रमाणेच आणखीही अनेक अलिशान गाड्यांची दिमाखदार ‘सवारी’ तुला लाभो!
Ashutosh
7 वर्षांपूर्वीम्हटलं तर खासगी, म्हटलं तर प्रातिनिधिक अनुभव कथन, ओघवती भाषा अन् शैली, अथ ते गति अगदी smooth ride!
Atmaja
7 वर्षांपूर्वीSukruta...Masta lihle aahes....mala maze driving dolyasamor aale...tyach bhavanna Aani tich bhiti...?☺
Prashant
7 वर्षांपूर्वीसुंदर...सहज ... लेख.