मौज दिवाळी २०२०

दिवाळी २०२०

 

यंदाचा २०२०चा 'मौज' दिवाळी अंक प्रकाशित करताना आनंदाबरोबर समाधान वाटते आहे. खरेतर हे वर्ष 'काळ तर मोठा कठीण आला' या धर्तीवरचे. त्यामुळेच अनेक तऱ्हेच्या अडचणी, अडथळे पार पाडत मौज दिवाळी अंकाची निर्मिती करणे हे एक आव्हान म्हणून समोर उभे होते.

प्रत्येक वर्षी येणारी दीपावली चैतन्याने आणि लक्ष दीपांच्या प्रकाशाने उजळलेली असते. हे चैतन्य या वर्षी नाही. कुठलासा विषाणू आकस्मात अवतरावा नि त्याचा अदृश्य विळखा पूर्ण मानवजातीभोवती आवळला जावा, याचे आकलन मति गुंग करणारे आहे. माणसाला समोर दिसणाऱ्या प्रत्येक माणसाची, त्याच्या अस्तित्वाचीच दहशत वाटावी आणि माणसा-माणसांत आधीच संवादाची दरी वाढत चालली असताना, आताचे हे अंतर माणसांसाठी सुरक्षित नि म्हणून अपरिहार्य ठरावे, यासारखी दुदैवी गोष्ट  कुठली! शिवाय हाथरससारखी विषण्ण करणारी घटना काय, भारत-चीन सीमेवरचा युद्धसदृश्य तणाव काय. ओला दुष्काळ काय... अशाही अस्मानी सुलतानी संकटांचे आघात आपल्याला पेलावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर जीवनात नवे उन्मेष जागवणाऱ्या शाश्वत अशा कलांची सोबत आपल्याजवळ असणं, यासारखं दुसरं आनंदनिधान कुठलं? वेगवेगळी संवेदने मनात मूर्त करणारा मौजचा दिवाळी अंक त्यांतीलच एक! व्यक्तिचित्रात्मक, कलाविषयक, विज्ञाननिष्ठ, ललित, वैचारिक, प्रवासवर्णनपर अशा विविध साहित्यप्रकारांचे दर्जेदार लेखन मौजला या अवघड काळातही प्राप्त झाले, याचा म्हणूनही आनंद आहे.

जगाच्या नकाशावर अशांत आणि धार्मिक पातळीवर अनेकविध घडामोडी चालू असणारा अफगाणिस्तानासारखा देश, त्याचं अंतरंग मिलिंद बोकीलांसारख्या सजग समाजभान असणाऱ्या लेखकाने प्रत्यक्ष भेटीतून उलगडले आहे. तर उत्तुंग हिमालयाच्या कुशीतल्या अनघड वाटा-वळणं तुडवत तिथल्या निसर्गरम्यतेला राणी दुर्वे यांनी शब्दांच्या कॅमेऱ्यात पकडून, त्याचा एक दृश्यात्मक असा कोलाजच चितारला आहे.

ललित लेखनाच्या क्षेत्रात अल्पावधीत लक्ष वेधून घेणाऱ्या रश्मी कशेळकर यांनी गंध संवेदन जागवत, कोकणच्या मातीतल्या कमळाच्या गंधांची अनेक पातळ्यांवरून परिमळणारी गंधचित्रं उत्कटपणे पकडली आहेत. नंदू मुलमुले यांचा लेख आहे, जगातील पहिल्या श्रेष्ठ चित्रपटांमध्ये गणना होणाऱ्या 'एट अँड द हाफ' या चित्रपटावरचा. इटालियन दिग्दर्शक फेलिनी यांचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या निर्मिती करण्यामागच्या कलावंत मनाची अस्वस्थता नि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य यांचा कलात्मक गोफच! आत्मशुद्ध आनंद देणारी संगीत ही कला. या कलेच्या उपासकांचे मनस्वी वागणे जगणे हीच कलाकार असण्याची अस्सल ओळख! सतारनवाज विलायतखाँ नि त्यांचे बंधू इमरतखाँ या दोघांच्या नात्यातील हळव्या दुखऱ्या क्षणांना तरलतेने शब्दबद्ध केले आहे अंबरीश मिश्र यांनी, नमिता देवीदयाल यांच्या विलायतखाँवरील पुस्तकातील एका भागाच्या अनुवादातून.

व्यक्तिचित्र हा साहित्यप्रकार हा एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक शोध नसतो तर त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवरही त्यातून अलगद प्रकाश पडत असतो. बालमोहन लिमये यांचा आपल्या स्वातंत्र्यसैनिक आई-वडिलांवरचा लेख याचाच व्यापक प्रत्यय देणारा आहे. तर हरी नरके या ज्येष्ठ विचारवंताने आपल्या वडीलभावाच्या आयुष्याची अस्वस्थ चित्तरकथा रेखाटली आहे. जी मनभर कारुण्य निर्माण करते. बरोबरीने आपल्या सहचराचे-विजय देव यांचे प्रसिद्धीपासून दूरस्थ राहिलेले कर्तृत्वसंपन्न व्यक्तित्त्व हळुवारपणे वीणा देव यांनी रेखाटलेले जाणवते. तर चित्रपटक्षेत्राची पार्श्वभूमी नसतानाही या आव्हानात्मक क्षेत्रात आपली अमीट प्रतिमा निर्माण करणाऱ्या गुणवंत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या विलक्षण प्रतिभेचा मागोवा घेतला आहे त्यांच्या जवळच्या मित्राने-अनिल अवचट यांनी.

विज्ञानातील विविध शोध सुबोध भाषेतून वाचकांपर्यंत पोहोचवत विज्ञानलेखाला ललित लेखाची लय प्राप्त करून देणारी शैली ज्यांची आहे, ते वैज्ञानिक बाळ फोंडके. आपल्या लेखातून फोंडके यांनी माणसाचा प्रत्येक निर्णय मेंदूने पूर्वनिर्धारित केलेला असतो, की तो त्याच्या मनाच्या मर्जीने घेत असतो? या प्रश्नाचा रंजक मागोवा घेतला आहे.

महाभारतातील श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा ही वैशिष्ट्यपूर्ण अशी. त्या व्यक्तिरेखेच्या वेगवेगळ्या रूपांतील असामान्य योद्धा या रूपाचा अश्विन पुंडलीक या आजच्या तरुण पिढीच्या लेखकाने विश्लेषणात्मक अंगाने वेध घेतला आहे, जो परिपूर्णही आहे नि अभ्यासपूर्णही!

गेली काही वर्षे सातत्याने लेखन करून चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरलेले श्रीरंग भागवत यांनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला. आफ्रिकन बाप-लेकीवरचा या वर्षीचा त्यांचा अंतर्मुख करणारा लेख, हा मौजमधला त्यांचा शेवटचा लेख ठरेल, याची कल्पना नव्हती. त्यांच्या जाण्याने मौज प्रकाशनाने एक उमेदीचा लेखक गमावला, याचे वाईट वाटते.

गोदावरी परुळेकर या मार्क्सवादी ज्येष्ठ कार्यकर्त्या. जेव्हा माणूस जागा होतोया त्यांच्या आदिवासींवरील पुस्तकाला यंदा ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गोदूताईंनी आदिवासींसाठी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करावे नि गेल्या ५० वर्षांतील आदिवासींच्या जीवनातील विकासाचा सर्वांगीण वेध परिसंवादाच्या रूपात घ्यावा असे वाटले. हेरंब कुलकर्णी या संवेदनक्षम कार्यकर्त्याने या परिसंवादाची जबाबदारी उचलली. मेधाताई पाटकर, प्रकाश आमटे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बरोबरीने अशोक ढवळे, विवेक पंडीत, पुर्णिमा उपाध्याय नि बंड्या साने, वाहरू सोनवणे आदी विविध आदिवासी इलाख्यांत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी लिहिते केले आणि आदिवासी जीवनसंस्कृतीच्या परिवर्तनाचा एक आलेख हाती आला. हा परिसंवाद म्हणजे मौजचे या वर्षीचे वैशिष्ट्य आहे.

दोन नवीन, सकस कथाकारांच्या कथा या वर्षी मौजमध्ये दिसतील. निखिलेश चित्रे हे चाकोरीबाह्य दृष्टी ठेवून कथानुभव जिवंत करणारे कथाकार. मौजेतील त्यांच्या कथेतील अनुभवाला त्यांनी सूक्ष्मपणे दिलेली गूढतेची त्रिमिती त्यांच्यातल्या कथाकाराची ताकद अधोरेखित करते. तर ऊर्जिता कुलकर्णी या नवीन आश्वासक कथालेखिकेची कथा दोन बहिणींमधील गुंतागुंतीच्या नात्याची वीण नजाकतीने चितारते.

याशिवाय दोन ज्येष्ठ कथाकारांच्या परस्परभिन्न छटांच्या कथा मौजमध्ये आहेत. सानिया यांची प्रगल्भ दीर्घकथा, स्त्री-पुरूष संबंधांची परिभाषा वेगवेगळ्या कोनांतून मांडत, तपासत 'मी टू' चळवळीची आठवण जागवत ठेवते. तर ज्येष्ठ विनोदी लेखक वसंत मिरासदार यांची खुसखुशीत विनोदी कथा हसवत ठेवत, निखळ आनंद देऊन जाते.

या वर्षी अंकाची पृष्ठे मर्यादित ठेवण्याचे बंधन होते. त्यामुळे काही लेखकांचे लेख मागवूनही आयत्या वेळी बाजूला ठेवावे लागले, आणि काही कवींच्या कविताही. या गोष्टीचा अर्थातच खेद वाटतो. ज्येष्ठ कवींच्या काव्यप्रतिभेला मनःपूर्वक प्रणाम करावा अशा त्यांच्या कविता मौजमध्ये आहेतच, शिवाय समकालीन, नव्या कवींच्या कविताही, ज्यांतून जाणिवांची प्रगल्भता नजरेस येईल.

अमृता शेरगिल या संवेदनशील चित्रकर्तीचे मुखपृष्ठ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार प्रभाकर कोलते यांनी या वर्षी मौजसाठी निवडले आहे. तिच्या कलावंत व्यक्तिमत्त्वाची परिमाणे कोलते यांनी या मुखपृष्ठाच्या निमित्ताने लिहिलेल्या त्यांच्या लेखात प्रभावीरीत्या मांडलेले दिसतील.

मौजच्या अंकाच्या देखण्या सजावटीमागे कल्पेश गोसावी, अन्वर हुसेन, चंद्रमोहन कुलकर्णी व ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांची कलादृष्टी आहे. या सर्वांचे मन:पूर्वक आभार.

मौजच्या निर्मितीत नेत्रा मयेकर यांचे लाभणारे सहकार्य मोलाचे असते. शिवाय मौजमधील मिलिंद जोशी, प्रूफरीडर माधवी विचारे यांचेही. संपादनाच्या कामात वेगवेगळ्या प्रकारचे साहाय्य लागत असते असे विविध साहाय्य कवी गीतेश शिंदे, पद्मा भागवत आणि अभिजित गजेंद्रगडकर यांनी केले. या सगळ्यांचेही आभार.

मौजचे प्रकाशक संजय भागवत यांच्या निधनाला वर्ष झाले. परंतु त्यांची कमी सतत भासत राहते. त्यांच्या स्मृतीस वंदन. सर्व भागवत बंधूंच्या सहकार्याचेही स्मरण.

या वर्षभरात दिवंगत झालेल्या साहित्य-कला क्षेत्रांतील दिग्गजांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा. करोना विषाणूचे दुरित तिमिर लवकर नष्ट व्हावे नि नव्या प्रकाशासह सर्वांचे नवजीवन बहरून यावे यासाठीही!

-संपादक

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

मौज दिवाळी २०२०

माझे(ही) बायोपिक

वसंत मिरासदार | 12 Aug 2021

वलयांकित व्यक्तींच्या जोडीला समाजातील उपेक्षित, गरीब, तळागाळातील सामान्य माणसांच्या आयुष्यावरही बायोपिक्स निघत राहतील अशी आशा आणि इच्छा मी अनेकांजवळ अनेक वेळा व्यक्त केली होती.

सर्वलक्षणलक्षण्य:

अश्र्विन पुंडलीक | 10 Aug 2021

धर्माची स्थापना व्हावी. सज्जनांचे परित्राण व्हावे, दुष्टांचा विनाश व्हावा यासाठीच जन्म घेतलेल्या कृष्णाने धर्मराज्य पुढे चालूच राहील याची दक्षता परीक्षिताला वाचवून आणि नंतर त्याच्यावर संस्कार करून घेतलेली आहे.

आदिवासी भागातील विकास : काय झालं, काय राहिलं?

हेरंब कुलकर्णी | 07 Aug 2021

गोदूताईंनी आदिवासींसाठी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करावे नि गेल्या ५० वर्षांतील आदिवासींच्या जीवनातील विकासाचा सर्वांगीण वेध परिसंवादाच्या रूपात घ्यावा असे वाटले.

सममितीचा अन्वयार्थ

निखिलेश चित्रे | 04 Aug 2021

निखिलेश चित्रे हे चाकोरीबाह्य दृष्टी ठेवून कथानुभव जिवंत करणारे कथाकार. मौजेतील त्यांच्या कथेतील अनुभवाला त्यांनी सूक्ष्मपणे दिलेली गूढतेची त्रिमिती त्यांच्यातल्या कथाकाराची ताकद अधोरेखित करते.

मनाली ते मनाली व्हाया रारंग ढांग

राणी दुर्वे | 03 Aug 2021

उत्तुंग हिमालयाच्या कुशीतल्या अनघड वाटा-वळणं तुडवत तिथल्या निसर्गरम्यतेला राणी दुर्वे यांनी शब्दांच्या कॅमेऱ्यात पकडून, त्याचा एक दृश्यात्मक असा कोलाजच चितारला आहे.

8 1/2 वास्तवाचा भास

डॉ. नंदू मुलमुले | 02 Aug 2021

इटालियन दिग्दर्शक फेलिनी यांचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या निर्मिती करण्यामागच्या कलावंत मनाची अस्वस्थता नि त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य यांचा कलात्मक गोफच!

आई-बाबांची स्मृतिचित्रे

बालमोहन लिमये | 29 Jul 2021

व्यक्तिचित्र हा साहित्यप्रकार हा एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक शोध नसतो तर त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवरही त्यातून अलगद प्रकाश पडत असतो.

चित्रकलेतील ध्यासपर्व—अमृता शेरगिल

प्रभाकर कोलते | 25 Jul 2021

अमृता शेरगिल या संवेदनशील चित्रकर्तीचे मुखपृष्ठ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार प्रभाकर कोलते यांनी या वर्षी मौजसाठी निवडले आहे.

पश्चिमेतील स्वरपहाट

नमिता देवीदयाल | 22 Jul 2021

सतारनवाज विलायतखाँ नि त्यांचे बंधू इमरतखाँ या दोघांच्या नात्यातील हळव्या दुखऱ्या क्षणांना तरलतेने शब्दबद्ध केले आहे अंबरीश मिश्र यांनी, नमिता देवीदयाल यांच्या विलायतखाँवरील पुस्तकातील एका भागाच्या अनुवादातून.

एक दर्शन: अफगाणिस्तानचे

मिलिंद बोकील | 17 Jul 2021

जगाच्या नकाशावर अशांत आणि धार्मिक पातळीवर अनेकविध घडामोडी चालू असणारा अफगाणिस्तानासारखा देश, त्याचं अंतरंग मिलिंद बोकीलांसारख्या सजग समाजभान असणाऱ्या लेखकाने प्रत्यक्ष भेटीतून उलगडले आहे.
Install on your iPad : tap and then add to homescreen