मराठी प्रथम

मराठी प्रथममध्ये आपले स्वागत आहे. मराठी प्रथम ही मराठी अभ्यास केंद्राची ई-पत्रिका आहे. मराठी भाषेविषयी आस्था, प्रेम , अभिमान असलेल्या मराठी भाषकांना मराठी अभ्यास केंद्राच्या कामाचा परिचय आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्या संवर्धनाला वाहिलेली आणि मराठी शाळा, मराठी तंत्रज्ञान, उच्च शिक्षणात मराठी, न्यायालयीन मराठी आदी विविध कृतिगटांमार्फत कार्यरत असलेली ही एक स्वयंसेवी संस्था आहे. महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र हे तिचे कार्यक्षेत्र आहे. मराठी भाषेच्या विविध प्रश्नांना अभ्यासाच्या व चळवळीच्या अंगांनी भिडताना मराठी अभ्यास केंद्राला अशा नियतकालिकाची प्रथमपासून गरज जाणवत होती. मराठी भाषेविषयीची परंपरागत सरकारी अनास्था, वाढती सामाजिक उदासीनता आणि मराठीहिताचा दावा करणाऱ्या राजकीय पक्षांनी मराठी भाषेशी केलेली प्रतारणा यांमुळे मराठी अभ्यास केंद्राला मराठी भाषकांशी संवाद साधण्यासाठी अधिक व्यापक, कालोचित, थेट पण लवचीक माध्यमाची गरज होती. ई-पत्रिका किंवा ई-नियतकालिक हे आजच्या आणि उद्याच्या जगाचे असेच एक माध्यम आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाचे मुख्य उद्दिष्ट ठेवून मराठी प्रथम ही ई-पत्रिका वाचकांपुढे नियमितपणे सादर होणार आहे.

 

जागतिकीकरणानंतर जगातील समृद्ध भाषावैभव वेगाने कमी होत असून त्याविषयी सार्थ चिंता व्यक्त केली जात आहे. भाषाविविधता हा सांस्कृतिक विविधतेचा मूलाधार आहे. अनेक भाषा, वैविध्यपूर्ण संस्कृती हे जगाचे संचित आहे आणि ते आपण जतन केले पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. परंतु, बदललेल्या परिस्थितीत भौतिक प्रगतीसाठी इंग्रजी आदी काही ठरावीक भाषांनाच महत्त्व मिळत गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात इतर भाषा एकेका व्यवहारक्षेत्रांतून हद्दपार होत नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जैवविविधतेप्रमाणेच भाषावैविध्य धोक्यात येणे ही एक गंभीर बाब आहे. प्रत्येकाने आपापल्या भाषेचे जतन आणि संवर्धन केले तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तसे घडताना दिसत नाही. लोक भौतिक प्रगतीच्या नावाखाली आपापल्या भाषांचा त्याग करीत आहेत. मराठी हीदेखील अशाच भाषिक वर्तनाची बळी ठरत आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळा घेत आहेत. हा बदल आज ना उद्या मराठी भाषेच्या मुळावर येणार आहे. ह्या परिस्थितीकडे कालाय तस्मै नमः म्हणत बघ्याची भूमिका घ्यावी असे आम्हांला वाटत नाही. प्रथम भाषेचे स्थान असलेल्या मराठी शाळा टिकल्या तर आणि तरच मराठी भाषेला काही भवितव्य आहे. अन्यथा ती एक बोली भाषा म्हणून फार तर उरेल. जगात अनेक भाषा आहेत आणि त्या आत्मसात करायला आमची काहीच हरकत नाही. किंबहुना, प्रत्येकाने स्वभाषेव्यतिरिक्त किमान दोन तरी भाषा अवगत केल्या पहिजेत असे आम्हंला वाटते. पण त्या आधी स्वभाषा शिकली व सांभाळली पाहिजे. मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा आहे. तिला समृद्ध असा वाङ्‍मयीन व सांस्कृतिक वारसा आहे. केवळ पोटार्थी होऊन मराठी प्रथमच्या जागी इंग्रजी प्रथम असे भाषिक वर्तन करणे हा सामाजिक अपराध आहे. काही लोकांना त्याचा आर्थिक फायदा झाला, विदेशगमनाचा व तिथेच स्थायिक होण्याचा लाभ झाला तरी तेवढ्यासाठी द्वितीय भाषेला प्रथम भाषेची जागा घेऊ देणे व्यापक व दूरगामी सामाजिक हिताचे नाही. मराठी ही आज ज्ञानभाषा नसेल, पण ती आपल्या सामूहिक व अविरत प्रयत्नांतून ज्ञानभाषा होऊ शकते. पण त्यासाठी तिचे सामाजिक, शैक्षणिक स्थान प्रथम भाषेचेच असले पाहिजे. मराठी आपल्यासाठी आज, उद्या आणि निरंतर प्रथम भाषाच असेल. असली पाहिजे. बाकी सर्व भाषा आपल्यासाठी कमीअधिक महत्त्वाच्या असल्या तरी त्यांचे स्थान कायम दुसऱ्या क्रमांकाचे राहील. मराठी प्रथम हा ह्या भूमिकेचाच उच्चार आहे.

आपले मनःपूर्वक स्वागत. आपल्या निरंतर सोबतीची व सहकार्याची अपेक्षा.

प्रकाशकः डॉ. दीपक पवार (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र)
संपादक : डॉ. प्रकाश परब, संपादन साहाय्य : साधना गोरे
कला व मांडणी सल्लागार : प्रदीप म्हापसेकर, साहाय्य : शाई_ईशा

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

मराठी प्रथम

Install on your iPad : tap and then add to homescreen