निवडक दिवाळी २०१८

मराठी साहित्यात दिवाळी अंकांची मोठी परंपरा राहिली आहे. १९०९ साली मनोरंजन चा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला, त्यानंतर आता दरवर्षी साधारण तीनेकशे अंक नियमितपणे गेली अनेक वर्ष प्रसिद्ध होत आहेत. एवढे दिवाळी अंक विकत घेऊन वाचणे शक्य नसल्यामुळे यांची वेगळी फी घेऊन नियमित वाचनालये त्यांच्या सभासदांना हे दोन तीनशे अंक उपलब्ध करून देतात. तरीही एवढे अंक वाचणे, तेही पुढच्या दिवाळीच्या आत, सामान्य माणसाला शक्य होत नाही. एक माणूस साधारण ५-१० अंक, तेही गाजावाजा झालेले, वाचतो. मग उरलेल्या अंकातील चांगल्या साहित्याचे काय?

याच विचाराने ठाणे येथील मकरंद जोशी यांनी 2018 साली बहुविध डॉट कॉम वर निवडक दिवाळी-2018 हा उपक्रम केला. सर्व उपलब्ध अंक चाळून त्यांनी त्यातील निवडक लेख online उपलब्ध करून दिले. त्याचेच हे संकलन...

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

निवडक दिवाळी २०१८

बॉर्डरलगतचं जगणं

मुक्ता चैतन्य | 27 May 2021

फिरोजपूर जिल्ह्यातलं हुसैनीवाला, जिथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची समाधी आहे. या तिघांना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह इंग्रजांनी हुसैनीवालापाशी ठेवले.

रमाकांत: एक खोल विवर

जयंत पवार | 04 May 2021

या शहरातील गटारांची घाण उपसण्यातच ज्यांचा जन्म जातो अशाच एका सफाई कामगाराचे दुःख रेखाटणारी ‘रमाकांत एक खोल विवर ’ ही अंगावर काटा आणणारी कथा

रफिकची मुंबई

शर्मिला फडके | 01 Jul 2019

“माझगाव आत्ता आहे त्यापेक्षा खूप वेगळं समृद्ध होतं. 18-19 व्या शतकात इथे राहणं प्रतिष्ठेचं मानलं जाई. धनवान, उच्च मध्यमवर्गीयांची पसंती माझगावला होती. माझगावची भरभराट समृद्धी, वस्तीचे नशीब गोदीशी जोडले गेले होते. इथे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट होतं. सिंधिया  होते शिपिंग क्षेत्रात, सकाळी सात वाजता भोंगा वाजायचा.लोकं मग आपआपल्या कामाला जायला निघायचे, साडेसातला अजून एक भोंगा व्हायचा. पुन्हा साडेचारला भोंगा. ही घरातल्या पुरुष माणसांची  परतायची वेळ. सगळ्यांचं दैनंदिन जीवन गोदीतल्या भोंग्याच्या आवाजाशी बांधलं गेलेलं.सुरुवातीला इथे प्रमुख वस्ती कॅथॅलिक धर्मियांची असली तरी इतर धर्मीयही मोठ्या संख्येने आले. जगभरातून आलेले कामगार गोदीत काम करायचे. गोदीतलं वातावरण विविध जाती, धर्म देश असलेल्या लोकांनी बनलेलं होतं, तेच इथल्या वसाहतींमध्ये झिरपलं. माझगावचं कॉस्मोपोलिटन कल्चर त्यामुळेच बनलं.”

डिलाइट विद्यापीठः विस्मृतीत गेलेला काळाचा तुकडा

अनिल शिदोरे | 20 Jun 2019

मी ‘डिलाइट’ला पोहोचलो त्यावेळेस दिल्लीत इंदिरा गांधींचा पराभव होऊन मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाल्याला अवघे दोन-तीनच महिने झाले होतते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्षे झाली होती. पहिला रोमॅन्टिसीझम आटायला लागला होता. आधी ‘जंजीर’, नंतर ‘दीवार’मधून अमिताभ त्याच्या सगळ्या जगावरचा राग व्यक्त करत होता. ‘इंडिया टुडे’ने नव्या युगाची पत्रकारित देशासमोर आणली होती. मुंबईला ग्रंथाली वाचक चळवळ आकार घेत असताना दलित मन व्यक्त व्हायला लागले होते. ‘घाशिराम कोतवाल’, ‘बाईंडर’ने महाराष्ट्र हडबडला होता. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘जैत रे जैत’नी मराठी सिनेमा नवी क्षितिजे शोधत होता. देशात काहीतरी वेगळे होणार आहे असे वाटायला लागले होते. नवे वेध लागत होते. महाराष्ट्र आणि सारा देशच कूस बदलत होता.

विज्ञानाच बिनरहस्य.

हेमंत कर्णिक | 17 Jun 2019

निसर्गात नियम असतात, ते शोधता येतात, शोधून त्यांचा उपयोग करुन घेता येतो, तसं करताना नियम अधिक पक्का सापडत जातो, त्या नियमाला एखादा फाटा फुटू शकतो, त्या फाट्याने पुढे गेल्यास असंख्य वाटा समोर येतात आणि शंभर वेळा रस्ता चुकल्यावर त्यातली एक वाट आपल्याला हवं तिथे घेऊन जाते. – हे विज्ञान! हेच विज्ञान. तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेलं हेच तर विज्ञान. आपण हा सरळ रस्ता सोडून का दिला? कधी सोडला? व ज्ञान म्हणजे अद्भुत, विज्ञान म्हणजे बुद्धिमंतांचं काम, विज्ञानाचा आपला संबंध नाही, आपण गाय, बैल, शेळ्या आणि मेंढ्या यांच्याचसारखे आहोत, विचार करणं आपलं काम नाही, विचारांचा पाठपुरावा करणं तर नाहीच नाही; असे बैलप्रकृतीचे स्वतःला आपण का मानतो?

भुसावळ—दिल्ली एक ट्रेन, सहा राज्यं

विनय खंडागळे | 10 Jun 2019

ट्रेनमधल्या बऱ्याचशा प्रवाशांना गप्पा मारायला आवडतं. तिथे संवाद सुरू करणं अवघड गोष्ट नसते. प्रवासात भिन्न राज्य, संस्कृती, भाषा, नोकरी, व्यवसाय असलेले लोक भेटतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाजवळ असतं अनुभवांचं भलं मोठं गाठोडं. सचखंड एक्स्प्रेसमध्ये बरेचसे प्रवासी पंजाबी असायचे. पंजाबी माणूस मुळातच दिलदार. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर ‘हमारा पेट और दिल बहोत बड़ा होता है।’ ट्रेनमध्ये पुरीभाजी, चहा, फळं, चणे-फुटाणे, संत्रा गोळ्या... काहीही विकायला येऊ द्या, पंजाबी परिवार त्या विक्रेत्याला विन्मुख परत पाठवणार नाही. एवढं खाऊनही जेवणाचा डबा उघडणार (अन् तो सहप्रवाशांना आग्रहाने खायला लावणार).

अ चाइल्ड इज अ फादर ऑफ अ मॅन...

मुकेश माचकर | 06 Jun 2019

बनेश बेणारे आणि बिपीन कारखानीस ही एक अजब जोडगोळी आहे मामा-भाच्यांची. त्यांच्या नावांवरून तुम्हाला काही आठवलं का? करेक्ट. बनेश हे भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेचं नाव. तो फुरसुंगीचा, तसा हा बन्याही योगायोगाने फुरसुंगीचाच. न्यू फुरसुंगीमध्ये सॉलिटेअर ड्रीम्समध्ये राहतो आणि जवळच्याच सेंट अँड्र्यूजमध्ये सहावीत शिकतो.बिपीन कारखानीस हा त्याचा मामा. बन्याचं बनेश हे नाव त्यानेच ठेवलंय. तेही फास्टर फेणेवरूनच. त्याचं स्वत:चं बिपीन हे नाव त्याच्या वडिलांनी भा. रा. भागवतांच्याच बिपीन बुकलवार या हिरोवरून ठेवलेलं आहे. हा बुकलवार म्हणजे बुकलव्हर... सॉलिड पुस्तकं वाचायचा आणि त्या माहितीच्या आधारावर रहस्यं सोडवायचा.

कानसेनी महाराष्ट्राला डोळे नाहीत ?

शशिकांत सावंत | 03 Jun 2019

समजा, आपण शब्द उच्चारायला शिकलोच नसतो, भाषा निर्माणच झाल्या नसत्या; प्राणिसृष्टीप्रमाणे काही आवाज, वास, सहजप्रवृत्ती यांवरच आपली भिस्त असती तर? किंवा रंगांनी, रेषांनीच भावना दाखवल्यात (एकमेकांशी न बोलणारी माणसे लिहून काही तरी सांगतात तसे), अशा जगाची आपण कल्पना करून पाहू. राग आल्यावर माणसे लाल रंगाची रेषा काढतील, शांतपणा दाखवण्यासाठी हिरवा वापरतील, काही हवे असेल तर त्याचे चित्र काढतील... वगैरे कल्पना करू. मग अनेक रंग, छटा, आकार अर्धवट राहतील त्याचे काय? हजारो वर्षे गेली तर मग अशा अमूर्त आकारांनाही अर्थ प्राप्त होईल.

मसाल्यांची बेडेकरी

अजित बेडेकर | 27 May 2019

त्यावेळी लोणची, पापड हे घरीच बनवण्याचं प्रमाण जास्त होतं. त्या काळात त्यांनी एक जाहिरात केली होती. त्यात असं म्हटल होतं की, ‘उत्तम मसाले बनवणारे दोनच... एक तुम्ही स्वतः आणि तुम्हाला वेळ नसले तर दुसरा पर्याय फक्त बेडेकरचं!’ त्यांची ही जाहिरात खूपच लोकप्रिय झाली होती. मार्केटिंग डिप्लोमाच्या अभ्यासात उत्तम जाहिरातीचं उदाहरण म्हणून ही जाहिरात शिकवली जायची.

लेखणीची दहशत

ज्युनियर ब्रह्मे | 23 May 2019

हा एक नवाच ताप झाला होता. जर कुणा बऱ्यापैकी नाव असलेल्या लेखकाचं कुठलंही नवं पुस्तक बाजारात यायचं झालं, की मोठा समारंभ कररून आलं पाहिजे, असा शिरस्ता झाला होता. रस्ता जितके तास बंद होईल तितकं ते पुस्तक चर्चेत राहायचं. कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या तालावर पुस्तकातला काही भाग वाचून दाखवणे, गेस्ट अपीअरन्स म्हणून इतर लेखकांकडून स्टेजवर हाणामारीयुक्त चर्चा घडवून आणणे, पुस्तकातल्या पानांची दहीहंडी करून ती जुन्याजाणत्या लेखक मंडळांकडून फोडणे असले थिल्लर प्रकार सर्रास झाल होते. नवरात्रीत स्पीकरवर एखाद्या कादंबरीचं प्रकरण वाचत त्यावर तासन्तास झुलणाऱ्या पोरी आणि गणपतीत डीजेच्या तालावर पुस्तकाची परीक्षणे वाचणारी पोरं कमी होती की काय, म्हणून हे नवीन फॅड आलं होतं.

माणसांनी हरवलेली माया

मिलिंद बोकिल | 20 May 2019

त्या सगळ्याकडे बघताना मन विषण्णतेने भरून गेले. जी संस्कारित होते तिला संस्कृती म्हणतात; पण खरेतर जी सतत चालू राहते. जिला सातत्या असते तिलाच संस्कृती म्हणायला पाहिजे. जिथे माणसे नाहीत तिथे कसली आली आहे संस्कृती? तिथे नुसते दगड आणि माती. हे अवशेष जतन करून ठेवले आहेत खरे, पण ती माणसे तिथे असती तरच त्यांना अर्थ होता. काही तुरळक माया वस्त्या शिल्लक असतील आणि जुन्या लोकांचे संकरित वंशज तिथे राहत असतील, पण ते खरे लोक मात्र काळाच्या उदरात गडप झालेले आहेत. आणि त्यांच्याबरोबरच त्यांची सगळी समजूत, त्यांची भाषा,  त्यांचे साहित्य, त्यांची गाणी, त्यांचे अध्यात्म, त्यांचा जगाविषयीचा दृष्टिकोन हे सगळेच नाहीसे झालेले आहे. हे लोक आज असते तर किती बहार आली असती!

आदिम गुहेच्या अंधारात

अनिल साबळे | 13 May 2019

मी रात्रभर विचार करत होतो. ही गुहा सोडून गावात घर बांधायचं का? बदललेल्या जगात मिसळून जायचं का? आपल्या हाताची बोटं यंत्रावर धरून आधार कार्ड काढायचं का? मतदान कार्ड खिशात असलं म्हणजे अर्धा तिकिटात एस.टी.तून आपल्याला हिंडता येईल. ते काढायचं का? माझ्या तीन पिढ्यांनी कोणालाच मतदान केलं नव्हतं. म्हणजे कोणी आमच्या गुहेपर्यंत मत मागायलाच आलं नव्हतं. शाळेचा दाखला असला तरच जातीचा दाखला मिळणार होता. तीन पिढ्यांत कोणी शाळेतच गेलं नाही. आमच्या पिढ्यांनी खडे ठेवून गायी-म्हशी मोजल्या होत्या.

शोक नायिका अख्मातोवा

अरुण नेरुरकर | 09 May 2019

अख्मातोवाने भयानक दिवस अनुभवले आणि या दरम्यान, नादेद्झा मान्देलस्तामच्या म्हणण्यानुसार, ती धीरोदात्त नायिकेसारखी वागली. जाहीररित्या किंवा माझ्याशी खाजगीत बोलतना, सोविएत राजवटींविरोधात तिने एकही शब्द उच्चारला नाही. मात्र, तिचं सारं आयुष्य हर्जेन -Harzen - ने केलेल्या रशियन साहित्याच्या वर्णनाबरहुकूम होतं – रशियन वास्तवाचं एक सातत्यापूर्ण गुन्हेगारी आरोपपत्र.सोविएत युनियनमध्ये उघडपणे जाहीर न करताही सर्व दूर पसरलेली आणि आजही होत असलेली तिच्या स्मृतींची पूजा, मी जाणतो तितपत, अद्वितीय आहे. ती स्वतः आणि तिचा देश, यांना ललामभूत नसलेल्या गोष्टींविरोधात असलेल्या तिच्या अबोल, निग्रही प्रतिकाराने, तिचं रूपांतर (बेलिन्स्कीने हर्जेनविषयी भाकित केलं होतं तसं) केवळ रशियन साहित्यातील नव्हे तर, आपल्या काळाच्या रशियन इतिहासातील एका नामी व्यक्तीमध्ये केलं.

अदिती अखिलाची गोष्ट

रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ | 06 May 2019

ह्या एकटेपणाला घाबरून माणसं लग्न करीत असतील का? किंवा मग प्रेम वगैरे? पण मग पुन्हा एकटेपण हवंसं वाटलं तर काय? ते जवळचं, आपलं वगैरे माणूस राहू देईल पुन्हा आपल्याला एकटं? जाऊन बसेल आपण बोलावलं पुन्हा, तर येता यावं इतपत दूर, पण तरीही हाकेच्या अंतरावर? पण मग त्या माणसाबरोबर येणारा सगळा गोतावळा? साधनेला एकटं रहावसं वाटत असेल, तेव्हा ती काय बरं करत असेल? की गर्दीत राहून ती एकटं राहणंच विसरून गेली असेल? पण हे कसं शक्य आहे? प्रत्येकाला दिवसभरात केव्हातरी आपल्या स्वतःसोबत केव्हातरी आपल्या स्वतःसोबत राहावसं वाटणं ही त्याची गरज नाही का, अगदी जीवनावश्यक म्हणावी अशी?

‘स्वाधीन’ विदुषीचे मनोज्ञ चिंतन

विनय हर्डीकर | 02 May 2019

राज्यसंस्था आवश्यक आहे म्हणून त्या-त्या काळातले शासनही आवश्यकच असते. या फसवणुकीच्या भूमिकेचे सडेतोड खंडन करून “तेव्हा शासनाचा प्रत्यक्ष व्यवहार पाहून व तपासून आणि खऱ्या हेतूचा कयास बांधूनच शासनाशी व पर्यायानी राज्यसंस्थेशी काय ते सहकार्य केले पाहिजे”, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. राज्यसंस्था आणि संस्कृती व स्वातंत्र्याचे मूल्य, स्वातंत्र्य, समता व उदारमतवाद हेही विषय त्यांनी विचारात घेतले आणि उदारमतवाद हा शब्द गढूळ झाला असल्याची टिप्पणी केली आहे. या विचारपरंपरेचे मुख्य आधार म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य आणि समानता यांच्या आचरणामध्ये येणारे प्रश्न त्यांनी विचारात घेऊन समाजातील रंजल्या-गांजलेल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकेकट्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जरा बाजूला ठेवले तर काय हरकत आहे, ही भूमिकाही खोडून काढली आहे.

इंग्रजीची मास्तरकी

छाया महाजन | 22 Apr 2019

तेव्हा गी द मोपासाची ‘नेकलेस’ ही कथा शिकवण्यात आनंद न वाटला तरच नवल. मुलांना पहिल्यांदा या फ्रेंच नावाचा उच्चार शिकवणं ही कसरत. मग आमची गाडी अडली ती ‘द बॉल’ या शब्दावर. त्याचा ढोबळ अर्थ ‘पार्टी’ असा सांगितला खरा; पण त्यात शांत, सौम्य संगीतावरचे नृत्य हे अपेक्षित आहे. आपल्याकडे पार्टीचा आधुनिक अवतार म्हणजे ढँ ढँ वाजणारी गाणी आणि डी जे आणि दारूचा सर्रास वापर असा आहे. तो येथे अभिप्रेत नाही.युरोपियन कपड्यांची पद्धतही वेगळी. शिवाय बॉल्स हे राजे, उमराव आयोजित करत. त्यासाठी सजवलेले अतिप्रशस्त हॉल्स असत, हे बरेच सांगून मी थोडी थकले. पण तरीही ती संकल्पना त्या सुंदर निमुळत्या कमरेच्या कुमारिका (अर्थात् कोर्सेट्स् किती ओढून कमरेवर ताणून बसवतात, हे पाहिल्यावर ‘नको तो सुंदर गाउन घालणं’ असंच वाटतं!) त्या त्यांच्या नाजूक हातांनी हलकेच फुलपाखरासारखा गाउन उचलत टाकणारी पावलं, हे शब्दात सांगता येतं; पण दरवेळी त्याला दृश्यात्मकता येतेच असं नाही.मला आठवतं, मी सिलॅबस प्लॅनिंगच्या वेळी मराठी मुलामुलींना चित्रांनी नव्हे, तर चित्रफितीच्या साह्यानं इंग्रजी शिकवावं, असं सुचवलं होतं.

फ्लेमिंगो

मोनिका गजेंद्रगडकर | 18 Apr 2019

सॅम दमून गेला होता. ती गर्दी, ते ऊन, ती दुर्गंधी... साऱ्यानेच... त्यांच्या डॅडची शाळा... आता हा डॅडचा देश... न आकळता... नजरेत सामावू न शकणारा... त्याच्या डॅडला त्या गरीब शाळेत जाऊन मोठं व्हावं लागलं. कारण याच देशाच्या मातीत त्याचा रूजवा होता... या अफाट गर्दीखाली सतत तुडवली जाणारी या देशाची ही भूमी! ही गर्दी, ही दुर्गंधी, ही अस्वच्छता, ही उन्हाची काहिली... ही या भूमीची ओळख... पणम तीच असंख्यांची जन्मभूमी—त्याच्या डॅडीचीही... ती पाहायच्या ओढीने इथे काही काळ स्थलांतरित झालेला, परक्या भूमीतला हा सॅम नावाचा जणू फ्लेमिंगोच...

जगातील पहिली महिला बॅरिस्टर – कार्नेलिया सोराबजी

मेधा निजसुरे | 11 Apr 2019

मी भारतीयच आहे ना. महाराष्ट्राच्या मातीतूनच वर आले आहे ना, तरी तिथल्यांनी मला परकं कसं समजावं. १८६६ सालच्या नाशिकमध्येच ना माझा जन्म झाला? माझं काही लहानपणही तिथलंच ना? म्हणजे मी स्वतःला त्यांच्यापेक्षा वेगळीच काही समजते की काय? माझ्या इतक्या हिंदू, पारशी, ख्रिश्र्चन, मुस्लिम सर्व प्रकारच्या मैत्रिणी भारतातल्या अनेक शहरात आहेत. त्यांना माझ्याविषयी इतका आपलेपणा आहे. त्या विशिष्ट प्रेमादराने माझ्याकडे बघताहेत, त्या काय मी त्यांची कोणी वाटत असल्याशिवाय?ज्या पडदानशीन महिलांना मी न्याय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न मनापासून केला, त्या मला आपली नाही समजत? एका परक्या समाजातल्या स्त्रीने आपणहून त्यांना मदत दिली म्हणजे त्यांच्यात काहीतरी समान धागा असणारच नाही का? मी कशी परकी वाटेन त्यांना?
Install on your iPad : tap and then add to homescreen