देवगिरीचं साम्राज्य अत्यंत श्रीमंत आणि सामर्थ्यवान होतं. मात्र त्याचा सम्राट रामदेवराय ( १२७१ -१३११ ) हा ते सांभाळण्यासाठी पुरेसा लायक नव्हता, असं इतिहास सांगतो. अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली तेव्हा हा अगदी अनभिज्ञ होता. आणि ज्यावेळी खिलजीने देवगिरीला वेढा दिला तेव्हा किल्ल्याच्या गोदामात धान्याऐवजी मिठाची पोती भरून ठेवल्याचे वृत्त रामदेवरायाला समजले अशीही कथा सांगितली जाते. पण सदर लेखकाच्या मते ही गोष्ट चुकीची आहे. कशी ? ते वाचा. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात वेश्याव्यवसायाला राजमान्यता असून, गणिकांच्यासाठी एक आचारसंहिताही निश्चित केली होती, अशी रोचक माहिती लेखात वाचायला मिळते.
********
यादवांच्या राज्यात टंच भरलेल्या गोण्यांच्या थप्प्या गुदामातून लागलेल्या असत, जात्यांचे गळे जोंधळ्यांनी भरत, वैभवशाली ....... असत अशी वर्णने पुस्तकांतून आपण वाचली आहेतच; त्यामुळे झाले काय, की समाज अनुशासनबद्ध आणि कार्यक्षम झाला व शासकीय अधिकाऱ्यांना कामेच उरली नाहीत. त्यामुळे देवगिरीवरची धान्याची पोती खाली नेऊन लावून मिठाची पोती वर आणा आणि पुनः मिठाची पोती खाली नेऊन धान्याची पोती परत वर आणा अशी कामे करण्यात शासनाधिकारी वेळ घालवू लागले. त्याखेरीज, ‘काम करा, अधिक काम करा, आताच काम करा आणि नेटाने काम करा’ हा रामदेवराय महाराजांचा संदेश अमलात कसा येणार? दुर्दैवाने मिठाची पोती वर आणली आणि खिलजीचा वेढा पडला. काही खुळचट लोक यादवांच्या पराभवाचे कारण शासनाधिकाऱ्यांनी किल्ल्यात भरून ठेवलेली मिठाची पोती हे देतात; पण हे चूक आहे. दुर्दैव हे या पराभवाचे कारण आहे. असो.
रामदेवरायांचा एक कारभारी अमोघबुद्धि कर्क या नावाचा होता. त्याने निराळेच काम हाती घेतले. यादवांच्या काळी महाराष्ट्रात धनधान्यसमृद्धी असल्याने व्यापार तेजीत असे. म्हणून पुरुषमंडळी प्रवासात असत. ‘मायासप्तशती’ वाचणाऱ्यांच्या हे ध्यानांत आलेच असेल. साहजिकच गणिकाव्यवसाय मोठ्या प्रमाणावर होता. पुरुष व स्त्री या दोन्ही प्रकारच्या गणिका असत. गणिका म्हटल्या की अनाचार आलाच. हा त्रास अमोघबुद्धीला सहन होईना. तेव्हा त्याने गणिकांसाठी ‘आचारसंहिता आणि व्यवसायनीती’ तयार करण्याची योजना आखली. या योजनेसाठी खर्च मान्य व्हावा म्हणून तो रामदेवाला भेटला. तेव्हा रामदेवाने ही क्षुद्र गोष्ट आहे, असा शेरा मारला. त्या वेळी अमोघबुद्धी म्हणाला, ‘महाराज ही गोष्ट सामान्य नाही. अफवांचे हल्ली पीक उठते. या पिकाला खतपाणी गणिकागृहांतून जितके मिळते तितके इतर कुठेच नाही. या वार्ताकेंद्रावर आपली पकड घट्ट हवी. म्हटलेच आहे,
‘आपत्काले तु प्राप्तेस्मित् वेष्याश्च गणिकास्तया।
वार्ताप्रसारप्रमुखाः भवन्ति यादवाधिषः।।’
कर्काने दोन चलाख कारकून हाती घेऊन लवकरच एक ‘गणिका व्यवसायाची आचारसंहिता आणि नीती’ तयार केली. तिला कर्क-नीती असे नाव आहे. या कर्क-नीतीच्या काही प्रती हल्लीच उपलब्ध झाल्या आहेत. पुस्तक लहानसेच, ऐंशी-पंचाऐंशी पानांचे आहे; पण रंजक आणि कर्कवृत्तीने भरलेले आहे. त्याचा जमेल तेवढा सारांश खाली दिला आहे. कर्काने प्रथम सहा गणिकासंच निर्माण केले. विदर्भाचा एक, देवगिरी परिसराचा दुसरा, शूर्पक व अपरान्तकाचा तिसरा, करहाटकाचा चौथा आणि पुण्यपुरीचा पाचवा. पुरुषगणिकांचा खास सहावा संच होता. मग या सर्व संचासाठी एकच नीती लिहिली. शासनाधिकाऱ्यांचे चातुर्य इथेच दिसते. प्रथम भाग करायचे आणि एकाच नियमांनी ते जोडायचे. त्या संहितेतील तरतुदी अशा होत्याः
- प्रत्येक गणिकेला विचार व अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य आहे; पण ग्राहकाच्या सान्निध्यात तिने राजकीय मते व्यक्त करू नयेत. खुलासाः गणिकेच्या सान्निध्यात ग्राहकाची विचारशक्ती क्षीण असते. त्यामुळे मतांचा प्रभाव अधिक पडतो. आपल्या व्यवसायाचा अनुचित लाभ तिला घेता येऊ नये, एवढाच यातील उद्देश आहे.
- सप्ताहात चाळीस तास गणिकेने व्यवसायासाठी खर्च केले पाहिजेत. त्यातील कमीत कमी २० तास ग्राहकाच्या सान्निध्यात घालविले पाहिजेत. उरलेले वीस तास आपले व्यवसायचातुर्य वाढविण्यासाठी आहेत. त्या काळात तिने अभिनय, नर्तन, गायन याचा अभ्यास करावा.
- पर्जन्यकाळात सर्व माणसे आपापल्या घरी असल्याने व्यवसाय मंदित असतो, पण याचा अर्थ गणिकेला सुट्टी असा घेऊ नये. त्या काळात अधिकारी व्यक्ती तिच्याकडून तिच्या व्यवसायाशी संबंधित अशी कामे करून घेऊ शकतील. खुलासाः अशा कामांची एक यादीही कर्कनीतीत दिली आहे. त्यात शासनाधिकाऱ्यांचे सहकुटुंब मनोरंजन, शासकीय प्रचारासाठी निर्माण होणाऱ्या कलापथकांत कामे करणे व दौरे काढणे, दांपत्य-विकोपाबद्दल विकोपग्रस्त दांपत्यांना सल्ला अशा गोष्टींचा समावेश आहे.
- ‘अधिक काम करा; नेटाने काम करा; झटपट काम करा; उद्याचे काम आज व आजचे काम आताच करा; कामासाठी जादू नाही!’ हा सर्वज्ञ महाराजांचा संदेश सर्व व्यवसायांना उपयुक्त आहे. मात्र गणिका-व्यवसायाच्या बाबतीत या संदेशातील ‘काम’ हा शब्द संदर्भानुसार पुल्लिंगीही समजता येईल.
ही कर्कनीती अमोघबुद्धीने महाराजांना अर्पण केली तेव्हा महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्काला काही बक्षिसी माग म्हणून आज्ञा केली. तेव्हा कर्क म्हणाला, ‘महाराज आपण गणिका-व्यवसाय-मंडळ निर्माण करून माझी त्याचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करा, म्हणजे आपल्या सेवेचे २००० रप्यक वेतन व अध्यक्षपदाचे ३००० रप्यक वेतन मला मिळेल. मग पुण्यपुरीजवळील हरितक्षेत्रात माझे ........ लवकर उभे राहील!’
********
लेखक- श्री.मा. भावे [ मुख्य छायाचित्र, उत्सव(१९८४) या सिनेमातील गणिकागृहाचे आहे]
गणिकांसाठी कर्क-नीती
निवडक सोशल मिडीया
श्री. मा. भावे
2021-06-15 12:00:03
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीमजेशीर आहे. बरेचदा आमच्या विविध विषयांवर चर्चा होत असतात. काही वेळा बलात्कार या विषयावर पण चर्चा होते व मी बरेचदा यावर माझे मत व्यक्त करतो की आपल्या देशात या व्यवसायाला अधिक्रुत दर्जा देणे आवश्यक आहे, यामुळे नक्कीच बलात्कार कमी होऊ शकतात.