गोविंदविडा


विविध पदार्थांविषयी आपल्याला सोशल मिडीयावर नेहमी वाचायला मिळतं. पण मुखशुद्धी म्हणून खाल्ला जाणारा विडा, गौरी - महालक्ष्मी च्या वेळी लागणारा गोविंदविडा याबद्दल कुणी लिहित नाही. खानदेशात ज्यांचे मूळ गाव आहे असे वकील श्री. माधव भोकरीकर यांनी फेसबुकवर लिहिलेला हा छोटासा लेख सोशल मिडीयावर खूप गाजला. 

**********

विडा आणि गोविंद विडा

विड्याचे पान आपल्या सर्वांच्या परिचयाचे ! देवीदेवतेची पूजा विड्याच्या पानाशिवाय होत नाही. याला नागवेलीचे पण पान म्हणतात. बारी समाजाची ही जवळपास मक्तेदारी मानली जायची. नागवेलीचे वेल लावणे, त्याची नीट जोपासना करणे, पुरेसे मोठे झाले की पाने तोडणे, पाने सडू नयेत यासाठी ती सारखी फिरवणे. ही असंख्य आणि कौशल्याची कामे ! त्यात ती पाने पिकविणे, पिवळीधमक आणि नरम रहातील, अशी पकवणे. हे किचकट व वेळखाऊ काम यांतील कलाकार लोकच करू जाणे. आमच्या गांवातील बारी मंडळी या सर्व बाबतीत फार प्रसिध्द ! आमचे गांव म्हणजे रावेर आणि जामनेर जवळील ‘पानाचे कुऱ्हे’ हे गांव तसेच जळगांव जवळचे ‘शिरसोली’ ही गांवे यासाठी प्रसिद्ध !

विड्याची पाने पानाच्या ठेल्यावर आणि घरी पण तब्येतीनी करून आपण खूप खाल्ली असतील. पण महालक्ष्मीला भोजनोत्तर जो विडा लागतो, तो ‘गोविंद विडा !’ हा पाच पानांचा तयार करतात. त्यात सुपारी बडीशेप, सुकामेवा, गुलाबपाकळी, गुलाबपाणी, गुलकंद, मध, केशर, अस्मनतारा, वेलची, लवंग, ओवा, जेष्ठमध, कंकोळ, तीळ, खोबरे, पत्री, खडीसाखर, काळा मनुका, मध, कापूर, केवड्याच्या पानात घालून मुरवलेला काथ वगैरे बहुगुणी वस्तू त्यात टाकलेल्या असतात. याचा आकार हा चौपेडी असतो. खायचे म्हटले तर एका वेळी, एक विडा पूर्णपणे आपल्या तोंडात बसत नाही, त्याचे दोनतीन घास करावेच लागतात. हा गोविंद विडा करणे पण कौशल्याचे काम आहे. विडा हा निदान दुसऱ्या दिवशीच्या विसर्जनापर्यंत बंदीस्त रहायला हवा, मोकळा सुटायला नको. कारण हे विडे गौरींचा प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी घरातील मंडळी घेतात. चिमूटचिमूट विडा भक्तीभावाने खात समाधान मानले जायचे. हा डावीकडील मोठा गोविंद विडा आणि उजवीकडील आपला नेहमीचा ! मुख्य म्हणजे हा विडा माझी मुलगी माध्यमिक शाळेत असल्यापासून करतेय ! हा पण फोटोतील विडा तिने शेजारच्या घरी महालक्ष्म्यांसाठी करून दिला !


सोशल मिडीया , माधव भोकरीकर

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    गोविंद विडा ऐकून होतो व त्यात बरेच पदार्थ घालतात हे ऐकून होतो. परंतु इथे पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद. फक्त तो आकार येण्यासाठी काय करायचे ते व्हिडिओ द्वारे सांगितले तर उत्तम.

  2. Anil95

      7 वर्षांपूर्वी

    चांगली माहीती.

  3. 9322496973

      7 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे. एक सुचना. ह्या गोविंदराव वाड्यात काय घालायचे ते या लेखावरून समजले .आता तो कसा बनवायचा तो व्हीडीओ रूपात मिळावा हीसुद्धा अपेक्षा आहे .

  4. bharatik64

      7 वर्षांपूर्वी

    आमच्या कडे पण महालक्श्मी ले करतात हा विडा मी पण खान्देशची भुसावळ येथील आहे. माझी आजी पण खुप पान खायची. आणि ठरावीक पानाचे कुर्हे येथील विकणारे नेहमीचे त्यांच्या कडुनच घ्यायचे

  5. seemadighe

      7 वर्षांपूर्वी

    मस्त , आमच्या कडे पण महालक्ष्मी ना गोविंद विडा करतात. घरात जेष्ठ मंडळी असल्यामुळे मला कधी वेळ येत नव्हती. गेली ५/६ वर्षे झाली मी पण करू लागले. सासूबाईंनी शिकवला, अगदी निगुतीने त्या गोविंद विडा करीत. माधव सरांच्या मुलीचे कौतुक करावेसे वाटते, तिने खूपच छान बनवलाय गिविंद विडा.

  6. shubhada.bapat

      7 वर्षांपूर्वी

    हे माहिती नव्हत.लग्नात वधूपक्षाने जावयाला का सासूला द्यायचा असतो अस वाटत. अगदी धामधूम असते.

  7. manjiriv

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती. गोविंद विडा शिकायला हवा.

  8. Smita Mirji

      7 वर्षांपूर्वी

    सुंदर लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या मावशीआज्जीने पहिल्यांदा शिकवला होता आजही गौरीच्या दिवशी तिची आठवण आल्याशिवाय रहात नाही

  9. प्रफुल्ल पाध्ये

      7 वर्षांपूर्वी

    ' विडा घ्या हो नारायणा ' ह्यात गोविंद विड्याचा उल्लेख आहे की नाही माहित नाही पण वरील लेखामधील वर्णन एकदम नवीन म्हणून interesting वाटलं . छोटेखानी पण छान लेख .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen