ताणतणाव आणि आरोग्य

मनोगत

 

आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव वाढले आहेत याची जाणीव अनेकांना होत आहे. तणावाचे दुष्परिणाम ते अनुभवत आहेत. परंतु तणाव का वाढतो व त्याचे व्यवस्थापन करण्याचे सुरक्षित उपाय कोणते याची माहिती देणारी मोठमोठी पुस्तके वाचायलाही वेळ मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी तणाव म्हणजे नक्की काय ? त्यामुळे शारीरिक आजार कसे होतात? ही शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत या पुस्तिकेत दिलेली आहे.

 

अनेक पद्धतींनी या तणावाचे व्यवस्थापन करता येते. कोणतीही एकच पद्धत सर्वच माणसांना उपयोगी पडेल असं म्हणणं बरोबर होणार नाही. म्हणून वेगवेगळ्या पद्धतींची ओळख या पुस्तिकेत करून दिलेली आहे. ही शास्त्रीय पुस्तिका नाही. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींना यांतील माहिती फारच प्राथमिक वाटेल. पण शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी तणावांचे प्रातिनिधिक प्रकार व त्यावरील उपाय या पुस्तिकेत संवाद रूपात दिलेले आहेत. शास्त्रीय माहिती असलेले एक डॉक्टर व आठ दहा स्त्री-पुरुष यांचा हा संवाद आहे. यामध्ये स्त्रिया व पुरुष आपापल्या शंका विचारत आहेत व त्यांचे संभाषण सहजतेने पुढे सरकत आहे.

 

पुस्तिका छोटी व सहज विकत घेता येईल अशी व्हावी यासाठी सविस्तर उदाहरणे दिलेली नाहीत, गोष्टी सांगितलेल्या नाहीत तर एखाद्या तणावप्रसंगी कोणती पद्धती कशी उपयोगी पडू शकेल याची नेमकी माहिती रंजक भाषेत दिलेली आहे. ही पुस्तिका फक्त एकदा वाचण्यासाठी नाही तर संग्रही ठेवून परत परत पाहण्यासाठी व त्यातील वेगवेगळ्या उपाययोजना कृतीत आणण्यासाठी आहे. एखाद्या पद्धतीच्या अधिक अभ्यासासाठी त्याविषयातील पुस्तकांची यादी शेवटी दिली आहे. केवळ ही पुस्तिका वाचून एखाद्या पद्धतीची व्यवस्थित कल्पना येणार नाही, पण ही पुस्तिका रस्त्यावरील दिशादर्शक फलकाप्रमाणे आहे. यात अनेक पद्धती सुचवलेल्या आहेत. ज्याला जी पटेल, रुचेल योग्य वाटेल ती त्याने आचरणात आणली तर तणावाचे दुष्परिणाम टाळता येतील. या उपायांचे सर्व श्रेय हे श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ, लेखक, तत्त्वज्ञानी व संत यांचेच आहे. मी तर केवळ भारवाही हमाल आहे.एखाद्या पद्धतीविषयी पुरेशी कल्पना येत नसेल तर तो दोष सर्वस्वी माझा आहे.

 

या छोट्याशा पुस्तिकेत अनेक गंभीर तणाव प्रकारांची चर्चा झालेली नाही. त्या तणावांवरील उपाय व सवयी बदलण्यासाठी करायचे प्रयत्न यांची चर्चा पुढील पुस्तिकेत करूया.

 

तणाव व्यवस्थापन करणे, आनंदी, प्रसन्न राहणे म्हणजे मठ्ठ किंवा बधिर होणे नव्हे तर आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी, आपल्या शारीरमानस क्षमता वाढवण्यासाठी, जणू काही हत्याराला धार काढण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आपण सर्व एकमेकांच्या सहकार्यानेच प्रगती करू शकतो. त्यासाठी आपला संवाद व्हायला हवा.

 

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

 

डॉ. यश वेलणकर

 

मु. पो. विजयदुर्ग, ता. देवगड,

जि. सिंधुदुर्ग. ४१६८०६

फोन- ९४२२०५४५५१

Mail id- [email protected]

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

ताणतणाव आणि आरोग्य

Install on your iPad : tap and then add to homescreen